शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

महापालिकांमध्ये महायुतीचा करिष्मा कायम


महाराष्ट्रातल्या २९ महापालिकांचा निकाल शुक्रवारी लागला आणि यात सर्वाधिक महापालिकांवर आपले वर्चस्व राखत महायुतीने आपला भगवा झेंडा फडकवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील या महायुतीने २०२४च्या विधानसभा, डिसेंबर २०२५च्या नगरपालिका आणि नगर परिषदांपाठोपाठ २०२६ मधील या महापालिकांमध्ये घवघवीत यश मिळवत विजयाची हॅट्ट्रिक केलेली आहे. यामध्ये मुंबईतील सत्ता मिळवण्याचे पूर्ण केलेले स्वप्न हे तसे अपेक्षित असले, तरी ठाकरेंच्या हातून २५ वर्षांची सत्ता काढून फार मोठी कामगिरी केलेली आहे.


संपूर्ण २९ महापालिकांमध्ये मिळून २८६९ नगरसेवक निवडून येणार होते. त्यापैकी १४०० नगरसेवक हे एकट्या भाजपचे आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने आपले नाव राखले आहे. त्यापाठोपाठ ३५० नगरसेवक जिंकत शिवसेनेने दुसरा क्रमांक राखलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १३९च्या आसपास नगरसेवक आहेत. त्यामुळे साधारण महायुतीचे असे निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक महाराष्ट्रात आहेत. जरी काही ठिकाणी हे पक्ष परस्पर विरोधात, मैत्रिपूर्ण लढले असले तरी महाराष्ट्रात डंका हा महायुतीचाच आहे हे या तिघा पक्षांनी दाखवून दिलेले आहे.

विरोधकांनी कितीही रडारड केली, आदळआपट केली, ईव्हीएमला दोष दिला, मतदारयादीला दोष दिला, शाई पुसण्याला दोष दिला, निवडणूक आयोगावर टीका केली तरी जनादेशाचा अनादर त्यांनी करू नये. आपल्याला मतदारांनी नाकारले आहे हे वास्तव समजून घेतले पाहिजे. ईव्हीएमला दोष देणे म्हणजे मतदारांचा तो अपमान आहे. त्यामुळे उरलेसुरले मतदारही विरोधकांपासून दूर जातील हे लक्षात घेतले पाहिजे.


२९ महापालिकांमध्ये सर्वाधिक लक्ष हे संपूर्ण देशाचे मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागलेले होते. यात एक हैं तो ठाकरे सेफ हैं हे वास्तव समोर आले आहे. २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. दोघांना मिळून ७०च्याआसपास जागा मिळाल्या. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मनसेची ५ ते १० टक्के मते इथे निर्णायक ठरली. त्यामुळे उबाठा शिवसेनेला एवढी मजल मारता आली. त्याचप्रमाणे शून्य असलेल्या मनसेला काही नगरसेवक निवडून आणता आले. त्यामुळे त्यांनाही ती लॉटरी लागली असेच म्हणावे लागेल. त्यामुळे ठाकरे ब्रँड टिकवायचा असेल तर एक हैं तो सेफ हैं हा मोदींचा संदेश त्यांना इथे लागू पडतो आहे. आज दोघे एकत्र लढले नसते तर महायुतीला २०० जागा मिळवणेही शक्य होते. पण अशा पाशवी विजयापासून रोखण्याचे काम ठाकरे बंधूंच्या एकीकरणामुळे झाले म्हणून त्यांचेही या यशाबद्दल कौतुक करावे लागेल.

भारतीय जनता पक्षापाठोपाठ शिवसेनेने चांगले यश मिळवले आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यभर प्रवास आणि प्रचार करून खºया अर्थाने शिवसेना शहरी आणि ग्रामीण भागात रुजवली. यातून ठाकरे बंधूंनी काहीतरी बोध घेतला पाहिजे. मुंबई पलीकडे कुठेही प्रचारासाठी न जाता कार्यकर्त्यांना वाºयावर सोडून दिले. नाशिकप्रमाणे पुणे, कोल्हापूर, सांगली इथे सभा घेतली असती तर अजून संख्याबळ वाढले असते. पण मुंबईपलीकडे महाराष्ट्र आहे हे आम्ही ध्यानातच घेत नसू तर काय समजायचे? नक्की महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडतेय याचा मतदार विचार करतो. मुख्यमंत्री सुद्धा जर बाहेरचा आहे असे म्हटले जात असेल तर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा हे सगळे बाहेरचे आहेत असे समजून आपण त्यांचा द्वेष करत राहू तर मुंबई महाराष्ट्रापासून कोण तोडतेय याचा विचार मतदारांनी केला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.


प्रचाराच्या भाषणातही इतकी खालची पातळी गाठली होती की भाजप, अदानी यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली गेली. अदानी काय निवडणुकीला उभे होते काय? त्यापेक्षा आपल्या उमेदवारांचे कौतुक आणि कर्तृत्व सांगणे गरजेचे होते. तुम्ही काय केले हे सांगायला हवे होते. मतदारांना हे आवडले नाही हे निकालातून स्पष्ट झाले आहे. युवानेते आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांची केलेली नक्कल हास्यास्पद होती. त्यांच्या बोलण्याची नक्कल करण्यापेक्षा कार्यशैलीची नक्कल केली तर भविष्यात यश मिळवता येईल हा बोध आता घेतला पाहिजे. मतदार टीकेवर आणि भाषणबाजीवर मतदान करत नाही. काम आणि विकास पाहून मतदान करतो. कितीही टीका केली तर देवेंद्र फडणवीस यांनी आपला संयम ठेवला आणि सभ्यपणा सोडला नाही त्याची पोहोचपावती भाजपला मिळाली.

बाकी, नागपूर, पुणे, नवी मुंबई, पनवेल, इचलकरंजी, जळगाव, पिंपरी-चिंचवड, मीरा-भार्इंदर,नाशिक, नांदेड, सोलापूर इथेही भाजपने घवघवीत यश मिळवले. त्यापाठोपाठ काँग्रेसनी चांगला प्रचार करून आपल्या जागा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने आपला गड राखला आहे. पण प्रत्येक महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला चेहरा जपला आहे. कार्यकर्त्यांची एकजूट, शेवटच्या दुव्यापर्यंत पोहोचण्याची देवेंद्र फडणवीस यांची हातोटी यामुळे हे शक्य झाले आहे. विशेषत: लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून विलासराव देशमुख यांचा चुकीचा उल्लेख झाला होता. ती बाजू ज्याप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सावरून घेतली आणि विलासराव देशमुख यांच्याबाबत गौरवोद्गार काढले ते अत्यंत अभ्यासू आणि समयसूचक राजकारण्याचे लक्षण या निवडणुकीत दिसून आले.


महायुतीत राहून विरोधात लढणारे अजित पवारांना भाजपला हरवणे सोपे नाही हे यातून लक्षात आले असेल. काकांना जरी जवळ केले तरी आपल्याला अधिक ताकद महायुतीतून मिळेल याची जाणिव त्यांना या निकालातून झाल्याशिवाय राहणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईकरांनी पूर्णपणे बेदखल केले तर राज्यात अन्यत्रही त्यांना फारसे डोके वर काढता आले नाही. त्यामुळे नगरपालिका, महापालिका, विधानसभा सगळीकडे आम्हीच आहोत हे महायुतीने दाखवून दिले.

प्रफुल्ल फडके/निवडणूक विश्लेषण


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: