सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

महायुती अभेद्य, महाविकास आघाडीला घरघर


राज्यातील २८८ नगर परिषद आणि नगर पंचायतींचा निकाल रविवारी लागला आणि यात महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेप्रमाणेच भारतीय जनता पक्ष राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे, शिंदेंची शिवसेना दुसºया क्रमांकावर आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिसºया क्रमांकावर राहिला आहे. यातून महायुती अभेद्य आहे हे स्पष्ट झाले, तर शिवसेना (ठाकरे गट), शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात ताळमेळ नसल्याने महाविकास आघाडीला घरघर लागल्याचे दिसून आले आहे.


२८८ पैकी १३०च्या आसपास नगराध्यक्ष आणि नगरपालिका भाजपने जिंकल्या आहेत, तर ५१ आसपास नगरपालिका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने जिंकल्या आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३३च्या आसपास नगराध्यक्ष आणि नगरपालिका जिंकल्या आहेत. २९ महापालिका वगळून उर्वरित महाराष्ट्रावर असलेली ही महायुतीची पकड स्पष्टपणे दाखवून देते की, महायुतीची वर्षभरातील कामगिरी चांगली झालेली आहे. त्याची ही पोच पावती मतदारांनी मतदानातून दिलेली आहे. महाविकास आघाडीला मतदारांनी विधानसभेप्रमाणेच साफ नाकारल्याचे चित्र आहे. त्यामुळे वर्षभरात काहीही बदल घडवण्यात विरोधकांना यश आलेले नाही. त्यामुळेच विरोधकांनी मंथन करण्याची गरज आहे.

खरे तर या निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढत होते. अनेक ठिकाणी त्यांच्यात समोरासमोर लढती होत्या. तरीही प्रत्येकाने आपले स्थान कायम ठेवले आहे. यात विरोधकांना कुठे वावच मिळाला नव्हता. परस्पर लढणाºया महायुतीतील घटक पक्षांना एकाकी पाडून महाविकास आघाडी विजय मिळवू शकली असती. महायुतीतील मतविभाजनाचा फायदा घेता आला असता, पण ते महाविकास आघाडीतील कोणालाही शक्य झाले नाही. यातून महाविकास आघाडीचे भवितव्य काय ते दिसून येते.


ही सगळी परिस्थिती पाहता पुढील महिन्यात होणाºया २९ महापालिकांच्या निवडणुकीत फारसे वेगळे चित्र असेल असे वाटत नाही. याचे कारण विरोधकांकडे कोणतेही विकासाचे मुद्दे नाहीत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला पळवणार, मराठी माणूस हे मुद्दे गुळगुळीत झालेले आहेत, त्याला मतदार भुलणार नाही हे ठाकरेंची शिवसेना, मनसे या पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे. काहीही झाले तरी मुंबई वेगळी होणार नाही हे मतदारांना माहिती आहे. त्यामुळे यांच्याकडे विकासाचे किंवा कसलेच मुद्दे नाहीत म्हणून हे बोलत आहेत, इतके समजण्याइतपत मतदार सूज्ञ आहेत. त्यामुळ महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मतदारांना गृहीत धरणे सोडून दिले पाहिजे. या निकालातून आपली महापालिका निवडणुकीतील परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याची संधी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन, पैसा वाटला असल्या उथळ आरोपांची खैरात आता विरोधक करतील. पण मतदारांना माहिती आहे की, आम्ही महायुतीलाच मतदान केलेले होते. त्यामुळे हा अपप्रचारही काही फायद्याचा ठरणार नाही. त्यामुळे ठोस कार्यक्रम, विकासाचे मुद्दे असतील तरच काही मतदार विरोधकांचा महापालिका निवडणुकीत विचार करतील. काँग्रेस, उबाठा शिवसेना हे जर विकासाच्या कामांना विरोध करू असा प्रचार करतील तर मुंबई महापालिका आपल्या हातातून गेली हे त्यांनी आताच लक्षात घेतले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत जाहीर सभांमधून उद्धव ठाकरे मी एमएमआरडीए बंद करणार, धारावीचा विकास होऊ देणार नाही, वाढवण बंदर होऊ देणार नाही असे बोलत होते. तुम्ही सगळे बंद पाडण्यासाठी सत्तेवर येणार का? लोकांना, मतदारांना बंद पाडण्यासाठी कोणाकडे सत्ता द्यायची नव्हती. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर मतदारांनी कौल दिला. तो अजून मान्य होत नाही, त्यामुळे खोकी बोकी, ईव्हीएम, निवडणूक आयोग यांना दोष देण्यात धन्यता मानत आहेत. पण विधानसभेच्याच निकालाची पुनरावृत्ती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकीत झालेली दिसत आहे. एक वर्षाची महायुतीची कामगिरी चोख असल्याचे या निकालातून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे येत्या १५ तारखेला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधकांना आपली प्रचाराची दिशा बदलली पाहिजे. घाणेरड्या भाषेतील प्रचारापेक्षा विचारांना प्राधान्य दिले पाहिजे. गद्दार, पाठीत खंजीर खुपसला, नामर्द, मर्दाची औलाद असल्या भाषेपेक्षा विकासाची भाषा बोलूनच सत्ता मिळवता येते, टिकवता येते हे ध्यानात घेतले पाहिजे. काँग्रेसच्या प्रादेशिक, स्थानिक नेत्यांनीही अदानी, अंबानी, उद्योगपती, जीएसटी, आरएसएस यांच्या नावाने शंख करणे सोडून देऊन आपण काय करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे अस्तित्व शाबूत राहील.


महायुतीने या निवडणुकीत आपले अस्तित्व आणि सामर्थ्य अबाधीत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. त्या तुलनेत महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता नव्हती. कोणताही समन्वय नव्हता. महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे प्रचंड मेहनत घेत होते. दिवस-रात्र प्रचारसभा घेत होते. याउलट काँग्रेस, उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे नेते प्रचारात कुठे दिसलेही नाहीत. फक्त महापालिका म्हणजेच राज्य असा समज या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. पण ग्रामीण, शहरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिकांमधून महायुतीने आपले पाय रुजवून पाया भक्कम केलेला आहे. याचा फायदा त्यांना या आगामी महापालिका निवडणुकीतही होईल यात शंका नाही.

निवडणुका होण्या अगोदरच निवडणूक आयोग, ईव्हीएम मशीन यावर संशय व्यक्त करून, मतमोजणी न्यायालयाच्या निर्णयाने पुढे ढकलली गेली तर त्याचाही गैर अर्थ काढून विरोधकांनी अगोदरच मानसिक पराभव मान्य केलेला होता. याउलट महायुतीचे नेते सातत्याने मतदारसंघात संपर्क ठेवून होते. निवडणुका आल्यावर कधी तयारीला लागायचे नसते तर ती तयारी आपोआप होत असते. त्यासाठी जनसंपर्क असावा लागतो हे महायुतीने जाणले होते, त्याचा हा परिणाम आहे. विजय मतदान यंत्रातून होत असला तरी त्याचे तंत्र मतदारांशी संपर्क ठेवून असते. निवडणुका आल्यावर मेळावे घ्यायचे, सत्ताधाºयांनी भ्रष्टाचार केले असे चित्र उभे करायचे यातून काहीही साध्य होत नाही हे विरोधकांनी ध्यानात घेतलेच पाहिजे.


-प्रफुल्ल फडके/विश्लेषण


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: