आपल्या मराठी रंगभूमीला १८५ वर्षांचा इतिहास आहे. अत्यंत समृद्ध रंगभूमी म्हणून मराठी रंगभूमीचे वर्णन करावे लागेल. गेल्या पावणेदोनशेपेक्षा जास्त वर्षांत हजारो नाटके रंगभूमीवर आली असतील. त्याची विभागणी करायची झाली तर संगीत नाटक, ऐतिहासिक नाटक, सामाजिक नाटक, प्रहसन किंवा फार्स आणि लोककलेवर आधारित फॉर्ममधील नाटके. विविध विषयांवर नवनवे लेखक नाटके लिहित असतात, नवनव्या संहिता दरवर्षी येत असतात तरीही मराठी रंगभूमीचा कल पुनरुज्जीवित नाटकांकडे का आहे?
सगळ्यात आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, नाटकांचे पुनरुज्जीवन होणे ही एक काळाची गरज आहे. रंगभूमीला चिरंजीव करणारी आणि नाटक संहितेला जिवंत ठेवणारी प्रक्रिया म्हणजे नाटकांचे पुनरुज्जीवन आहे. ते काही आज होते आहे असे नाही तर पावणेदोनशे वर्षांत ते सातत्याने होत आले आहे. या पुनरुज्जीवनामुळेच तर समृद्ध मराठी रंगभूमीचा इतिहास समजतो आहे. जुनी नाटके नव्या संचात पुन्हा येणे ही वाईट गोष्ट आहे असे समजण्याचे कारण नाही. कारण जुन्या नाटकांबरोबरच नवी नाटकेही रंगभूमीवर येत असतात. पण मराठी रंगभूमीचा पुनरुज्जीवित नाटकांकडे कल आहे ते या रंगभूमीसाठी वरदानच आहे. त्यामुळे जुनी नाटके नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेत.
शंभर, दीडशे वर्षांपूर्वी संगीत हा नाटकाचा आत्मा होता. त्यावेळी ज्यांच्याकडे गायकी आहे अशा गवयांनाच रंगभूमीवर संधी मिळत असे. नाटकाच्या कथानकापेक्षा गायनासाठी प्रेक्षक येत असत. त्यामुळे गायक कलाकार दशकानुदशके नाटकांत काम करत राहिले. परिणामी कालांतराने साथ न देणाºया शरीराला मेकअप करून ते नाटक लादले जाऊ लागले. बालगंधर्व खूप मोठे होते, पण अखेरच्या काळात सोळा ते वीस वर्षांच्या नायिकेच्या भूमिकेत त्यांना स्वीकारणे प्रेक्षकांना शक्य नव्हते. याबाबत साक्षात पु. ल. देशपांडे यांनीही खंत व्यक्त केली होती. कुठेतरी थांबता आले पाहिजे. पण कलाकार थांबला म्हणून नाटक थांबता कामा नये. शो मस्ट गो आॅन हे तर आपले ध्येय असते. मग नव्या संचात ते नाटक आले पाहिजे. बालगंधर्वांच्या जमान्यानंतर स्त्री कलाकार काम करू लागल्या. मग एकच प्यालामधील बालगंधर्वांची सिंधू अनेक महिला गायिकांनी केली आणि त्याही तितक्याच चांगल्या झाल्या. यामध्ये जयमाला शिलेदार असतील, कान्होपात्रा, मधुवंती दांडेकर, नयना आपटे अशा अनेक अभिनेत्रींनी त्या भूमिका केल्या आणि नाटक जिवंत ठेवले. त्यामुळे गंधर्व, किर्लोस्कर, शिलेदार अशा अनेक कंपन्यांनी संगीत नाटके वेगवेगळ्या संचात ठेवून त्या संहिता जिवंत ठेवल्या. ही एक काळाची गरज आहे. संशयकल्लोळसारखे नाटक रामदास कामत, प्रभाकर कारेकर, प्रसाद सावकार यांच्यापासून ते अगदी आता राहुल देशपांडे यांच्यापर्यंत केले जात आहे. विविध संचात हे नाटक तितकेच कौतुकाने पाहिले जात आहे.
नाटकाचे पुनरुज्जीवन झाल्याने त्याला रिपीट आॅडीयन्स मिळतो. आधी पाहिलेले नव्या संचात कसे केले आहे, या उत्सुकतेपोटी येतात. काहीजण तुलना करतात तर काहीजण पूर्वीचे छान होते म्हणतात. पण नाटके गर्दी खेचतात. वि. वा. शिरवाडकरांचे नटसम्राट हे नाटक कितीवेळा पुनरुज्जीवित झाले आहे पाहा. प्रत्येक खेपेला गर्दी खेचली आहे या नाटकाने. श्रीराम लागू शांता जोग यांनी एका उंचीवर नेलेल्या या नाटकात नंतर दत्ता भट, मधूसुधन कोल्हटकर, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी, गिरीश देशपांडे आणि अलीकडेच मोहन जोशी यांनीही ही भूमिका साकारली. म्हणून ते नाटक जिवंत राहिले.
या उलट एखादी चांगली संहिता आहे, पण एखाद्या कलाकाराच्या नंतर तीचे पुनरुज्जीवन झाले नाही तर काय होते याचे उदाहरण म्हणजे साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे तो मी नव्हेच हे नाटक. प्रभाकर पणशीकरांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेल्या या नाटकाला कोणी हात लावायला जात नाही. गिरीश ओक आणि सुमीत राघवन यावर प्रयत्न करणार होते पण ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून मराठी प्रेक्षक एका चांगल्या नाटकापासून दूर गेला आहे. आचार्य अत्रे यांच्या अन्य नाटकांचे अजूनही पुनरुज्जीवन होते. यामध्ये लग्नाची बेडी, मोरुची मावशी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. लग्नाची बेडी कितीवेळा पुरुज्जीवित झाली? पद्मा चव्हाण यांच्यानंतर आशू, आबोली साठे, अश्विनी भावे अशा कितीतरी अभिनेत्रींनी ते नाटक केले. ते आजही तितकेच लोकप्रिय आहे. मोरुची मावशी विजय चव्हाण यांनी उंचीवर नेऊन ठेवलेले नाटक भरत जाधव त्याच ताकदीने करत आहेत. पुनरुजीवित नाटकांमुळे नाटक अजरामर होत आहे. त्यामुळेच ते मराठी रंगभूमीला लाभलेले वरदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
पुनरुज्जीवन झाले नाही तर खूप चांगली नाटके मागे पडली आहेत. डॉ. लागू यांचे नंतर प्रेमानंद गज्वींचे किरवंत कोणी केला नाही. डॉ. लागूंनंतर तेंडुलकरांचे कन्यादान कोणी केले नाही. डॉ. लागूंनतर तेंडुलकरांचे गिधाडे परत आले नाही. डॉ. मोहन आगाशे यांच्या नंतर घाशीराम कोतवाल रुजला नाही. डॉ. सतीश आळेकरांचे महानिर्वाण, महापूर ही नाटके पुन्हा नाही झाली. या चांगल्या संहितांपासून आजचा प्रेक्षक वंचित राहतो आहे. त्यामुळे मराठी नाटकाची ताकद नव्या पिढीला समजत नाही. नाना पाटेकर विक्रम गोखले यांनी एका उंचीवर नेलेले जयवंत दळवींचे महासागर नाटक कालबाह्य झाले. ही नाटकेही पुनरुज्जीवित होण्याची गरज आहे.
श्रीकांत मोघे दया डोंगरे यांनी गाजवलेले कानेटकरांचे लेकुरे उदंड झाली हे नाटक सुबोध भावेनी पुनरुज्जीवित केले. सुनील बर्वे यांनी हार्बेरियमच्या माध्यमातून अनेक जुनी नाटके पुनरुज्जीवित केली. पण त्याचे प्रयोग फार कमी केले जातात. यात सूर्याची पिल्ले, पती गेले गं काठेवाडी या नाटकांचा उल्लेख करावा लागेल.
निळू फुले लालन सारंग यांनी गाजवलेल्या सखाराम बाइंडर नाटकाचे सयाजी शिंदे यांनी पुनरुज्जीवन केले. अलीकडेच पु. ल. देशपांडे यांचे सुंदर मी होणारही पुनरुज्जीवित होत आहे. हमिदाबाईची कोठी पुनरुज्जीवित होत आहे. संगीत नाटकानंतरचा सामाजिक नाटकांनी गाजवलेला जुना काळ नव्या संचात पुन: पुन्हा येतो, तेव्हा मराठी संहितेला संजिवनी मिळते.त्यामुळे मराठी रंगभूमीचा पुनरुज्जीवनाकडे असलेला कल हे एक फार मोठे वरदान आहे, असे वाटते.
प्रफुल्ल फडके/तिसरी घंटा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा