कोरोनाचा
अंतिम टप्पा सध्या सुरू आहे. हळुहळू अनलॉक होण्याची चर्चा आहे. आता सगळं
पूर्वीसारखं होईल असे अनेकांना वाटत आहे. पण ज्याप्रकारे देशभरातील
कोरोनाचा आकडा वाढत आहे, त्या मानाने हा रोग आटोक्यात आला आहे असे वाटत
नाही. कोणतेही मोठे संंकट असते तेंव्हा त्यावर सार्वत्रिक आणि एकजुटीचे
उपाय महत्वाचे असतात. पण आज रामदेव बाबांनी दावा केलेल्या औषधांवरून जे
राजकारण चालले आहे ते फार भयानक आहे. एका संकटातून देश जात असताना आणि
बाहेर पडत असताना सावध असण्याची गरज असते. आज हे संकट पूर्णपणे टळलेले
नाही. तज्ञांच्या मते येत्या नोव्हेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत
प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे कोरोनाची स्थिती आणि भविष्यातील कोरोनाचा
होणारा उद्रेक पाहता आत्तापर्यंत तरी कोरोना नावाच्या हत्तीचे फक्त शेपूट
गेले आहे, हत्ती अजून बाकीच आहे अशीच स्थिती आहे.
महाराष्ट्र आणि
मुंबईतील किंवा देशातील बरे झालेल्या रूग्णांचा आकडा वाढत असला तरी नव्याने
येणार्या रूग्णांचा आकडाही काही कमी नाही.
राज्याची परिस्थिती
पाहिल्यास आत्तापर्यंत 1,42,075 रुग्णांची नोंद झाली आहे. 74,744 रुग्ण बरे
झाले आहेत. पण गेल्या 24 तासात 3,870 नवीन रुग्ण सापडले आहेत. 60,147
रुग्णांवर अद्यापही विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत राज्यात
6 हजार पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातही काल दिल्लीतील
परिस्थिती बिघडल्याचे बोलले जात आहे.
कोरोनाच्या स्थितीवर एक नजर
टाकल्यास जवळजवळ एकूण रुग्णांच्या 50 टक्के रुग्ण बरे झाले आहेत, तर 50
टक्के अद्याप रुग्णालयात आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची
संख्या अधिक आहे. पेंद्र, राज्य सरकार व मुंबईत महापालिका प्रशासन हे
युद्धपातळीवर उपाययोजना करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा सर्वतोपरी
प्रयत्न करीत आहेत. मात्र, अपेक्षित फळ मिळालेले नाही. कोरोनावर संपूर्ण
नियंत्रण अद्यापही मिळविता आलेले नाही. तज्ञांच्या मते येत्या नोव्हेंबर
महिन्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे
कोरोनाची स्थिती आणि भविष्यातील कोरोनाचा होणारा उद्रेक पाहता आत्तापर्यंत
तरी कोरोना नावाच्या हत्तीचे फक्त शेपूट गेले आहे, हत्ती अजून बाकीच आहे
अशीच स्थिती आहे.
मुंबईत प्रारंभी वरळी, प्रभादेवी भागात मोठया
प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्याचबरोबर भायखळा, ग्रँटरोड
आदी भागातही रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर पालिकेने युद्धपातळीवर
उपाययोजना वाढवली. त्यामुळे वरळीमधील कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले
होते. त्यानंतर पूर्व उपनगरात घाटकोपरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत
गेली. पालिकेने आवश्यक उपाययोजना वाढवली आणि घाटकोपरमधून कोरोना रुग्णांचे
प्रमाण काहीसे कमी झाले. मात्र, आता कोरोनाने पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंड
या भागात तर पश्चिम उपनगरातील कांदिवली, दहिसर, बोरिवली या भागात शिरकाव
केला आहे. सध्या या भागात कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. फक्त आवश्यक
वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात येत आहेत तर मोटार सायकलवरून दोघांना प्रवास
करण्यास बंधने घालण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात करडी नजर ठेवण्यात
येत आहे. घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरोना रुग्णाच्या
संपर्कातील नागरिकांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
पालिका आयुक्त
इकबाल चहल यांनी, या भागात ‘मिशन शून्य’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला
आहे. याअंतर्गत आता शीघ्र कृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. फिरते
दवाखाने, वैद्यकीय पथके कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेणार आहेत. सरकार,
पालिका विविध पद्धतीने उपाययोजना करीत आहेत. परंतु, त्याला अपेक्षित यश
येत नाही.
त्यामुळे आता पालिकेने घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी करणे,
रुग्णांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. तसेच,
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने नागरिकांनीही बाजारपेठ, रस्ते, सार्वजनिक
ठिकाणी उगाच गर्दी करू नये. तर राज्य सरकार आणि महापालिकेनेही सरकारी,
पालिका व खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांवर व्यवस्थित उपचार करण्यावर अधिक
लक्ष पेंद्रीत करायला हवे. तेथील डॉक्टर, डीन यांनी विशेष करून कोरोना
बाधित रुग्णांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. कुठे काही
हलगर्जीपणा होत तर नाही ना, त्याचा मोठा फटका त्या रुग्णाला बसत नाही ना,
याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे. महापौर, आयुक्त यांनी प्रत्येक
रुग्णालयात जाऊन नुसती भेट न देता रुग्णांशी संपर्क साधून त्यांना सुविधा,
उपचार नीटपणे मिळत आहेत ना, काही त्रास तर नाही ना, त्याबाबत माहिती जाणून
घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करून अंमलबजावणी करायला हवी. राज्य सरकार व
मुंबईत महापालिका यांनी एक लक्षात घ्यावे की, कोरोनाबाबत कुठेतरी आपले गणित
चुकते आहे. त्याचा पुन्हा एकदा तज्ञांच्या मदतीने सखोल अभ्यास करावा.
आत्मपरीक्षण करावे आणि त्यावर एकदाचा अंतिम तोडगा, उपाययोजना करावी.
कोरोनामुळे अनेक नागरिकांच्या नोक़र्या गेल्या, रोजगार बुडाले, कंपन्या बंद
पडल्या. सर्वकाही ठप्प झाले. देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.
त्यामुळे कोरोनावर मात केली तरच देशातील ठप्प झालेले जनजीवन पुन्हा एकदा
सुरुळीत होईल. त्यासाठी पेंद्र, राज्य सरकर, मुंबई महापालिका व खासगी
रुग्णालये, इतर यंत्रणा आदींनी मिळून एकत्रित उपाय योजना करायला हवी. ही
मात करण्यासाठी जो जो सहकार्य करत आहे त्या प्रत्येकाची मदत घेणे गरजेचे
आहे. तो कोणत्या पक्षाचा आहे असला किरकोळ विचार करून राजकीय अस्पृष्यतेला
थारा देउ नये. बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे औषध चांगले असेल तर त्यालाही
संधी दिली पाहिजे. बाबा रामदेव भगवी वस्त्रे घालतात म्हणून त्यांना भाजपेयी
ठरवून त्यांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील
रोगी त्यांच्या औषधाने बरे होत असतील तर त्याला विरोध का?
वारीच्या नियोजनानुसार आता सातारा
जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात वारी पुढे सरकत आहे. विठ्ठलाच्या अधिकाअधिक
जवळ वारी पोहोचत आहे. जसजसा एकादशीचा दिवस जवळ येवू लागतो तसतसा हा आनंद,
ही विठ्ठल भेटीची ओढ वेगाने वाढत जाते. कधी एकदा या विठ्ठलाच्या पायावर
डोकं टेकून आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेवू अशी ओढ लागते. तुकारामांच्या
अभंगात वर्णन केल्याप्रमाणे भेटी लागी जीवा, लागलीसे आस म्हणजे नेमके काय
ते या आठवड्यात वारकरी अनुभवताना दिसेल. मजल दरमजल करत एकेक गांव, शहर,
तालुका, जिल्हा मागे टाकत आता पंढरपुराच्या दिशेने पावले पडत आहेत.
वारकर्यांच्या
दींडीचा मार्ग म्हणजे प्रेमभक्तीचा मार्ग. समर्पणाचा मार्ग. हे समर्पण
म्हणजे आपल्यातील अहंकार, गर्व, मत्सर या भावनांचा त्याग करण्याचा मार्ग.
जे काही आहे ते या वारीत आहे. जे काही घडते आहे ते या पांडुरंगामुळे घडले
आहे. कर्ता करवता तो आहे हे समजण्याचा मार्ग. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी
अर्जूनाला गीता सांगताना जे काही घडते आहे ते माझ्या इच्छेने सांगितले.
सगळं काही माझ्यामुळे आहे, माझ्या इच्छेने घडते आहे. जे तू करत नाहीस
त्याचा शोक का करतोस असे सांगून आपल्या कर्तव्यापासून च्यूत होणार्या
अर्जूनाला मार्गावर आणले. तोच हा मार्ग. प्रत्येक वारकर्याला त्याचा अर्थ
समजला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला ज्याप्रमाणे सांगतात की तुझे नी माझे
नाते हे जन्म जन्मांतराचे आहे. आपण सतत एकमेकांबरोबरच आहोत. तसेच आपले या
पांडुरंगाशी नाते जोडले गेलेले आहे याची जाणिव प्रत्येक वारकर्याला आहे.
त्यामुळे आपण वारीच्या मार्गावरून चालायचे आहे, आपल्याला दरवर्षी वारी
करायची आहे आणि त्या भगवंतावर प्रेम करून त्याच्या सानिध्यात रहायचे आहे हे
वारकर्याला समजले आहे. त्यामुळे भगवंतभेटीची ही ओढ फार महत्त्वाची असते.
भगवंताच्या या भक्ताला, या वारकर्याला भगवत प्रेमाची एवढी भूक आहे की ती
काही केल्या संपत नाही. याचे कारण एकदा प्रेमाची गोडी चाखल्यानंतर तितकं
प्रेम त्याला मिळत नाही. म्हणून त्याला प्रेमाची भूक आहे आणि त्याचाच
त्याला दुष्काळ आहे. याचे वर्णन संत तुकाराम एका अभंगात करतात. ते म्हणतात-
थोर प्रेमाचा भुकेला। हाचि दुष्काळ तयाला।
पोहे सुदाम देवाचे। फके मारी कोरडेची।
न म्हणे उचिष्ट अथवा थोडे। तुका म्हणे भावापुढे॥
आपल्या
वाट्याला जे आलेले आहे हे थोडं आहे का, उष्टं आहे याचीही पर्वा त्या
भगवंताला नसते. शबरीची उष्टी बोरेसुद्धा तो आवडीने खातो. कारण त्यामध्ये
भक्ताचे प्रेम त्याला दिसते आहे. कारण त्यात प्रेम आहे, भाव आहे. ही भावाची
महती प्रत्येक वारकर्याला समजली आहे. त्यामुळे कधीही तोंडात घास घेताना
पांडुरंगाचे स्मरण केल्याशिवाय तो घेत नाही. केवळ वारीतच नाही तर त्याच्या
जीवनातच प्रत्येक श्वास, प्रत्येक घास हा तो पांडुरंगासाठी घेत असतो. हे
प्रत्येक संतांना समजले होते. त्यामुळे वारकर्यांच्या या भगवत भक्तीची
माहीती असल्याने संत एकनाथ महाराजांनी म्हटले आहे की,
भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा। अभिमान नित्य नवा तयामाजी।
प्रेम सूख देई प्रेम सूख देई्। प्रेमावीन नाही समाधान॥
म्हणजे
ज्ञानापेक्षाही प्रेमाचं महत्त्व आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात,
‘भावाशिवाय भक्ती करणं म्हणजे शक्तीशिवाय बळ दाखवण्यासारखं आहे.’ अगदी बळ
जरी असलं तरी प्रेमापुढे बळाचा वापरही होऊ शकत नाही. त्यामुळे खर्या
अर्थाने भगवंतावर प्रेम करत, प्रत्येक गोष्टीत भगवंताचे दर्शन घेट हा
वारकरी ही वारी करत असतो. त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर दिसत
असतो, पांडुरंग दिसत असतो. कारण तो आहे यावर त्याचा विश्वास गाढ असतो.
विश्वास, श्रद्धा, भक्ती असल्याशिवाय याची अनुभूती मिळणे शक्य नसते.
पदरी घाली पिळा। बाप निर्बळसाठी बाळा।
एखादा अगदी हिंदकेसरी पैलवान आहे. संपूर्ण देशात त्याला तोडीस तोड असा
कोणी नाही, असा दांडगा पैलवान घराबाहेर पडू लागतो. तेव्हा त्याचा दोन
वर्षाचा मुलगा त्याला पायाला धरून सांगतो. बाबा तू बाहेर जाऊ नको. मी तुला
सोडणार नाही. मोठमोठ्या पैलवानांना सहज आडवा करणारा तो हिंदकेसरी मग बाहेर
जायचे सोडतो आणि मुलांच्या आग्रहाखातर घरात जाऊन बसतो. बाप निर्बळासाठी
बाळा. भगवंतही तसाच शक्तिमान आहे. परंतु भक्तांच्या प्रेमापुढे तो
त्यांच्यासारखा होऊन राहतो. मात्र भावावीन केलेल्या भक्तीचा कोणताही उपयोग
होणार नाही. तशा भक्तीने कोणतंही दैवत प्रसन्न होऊ शकत नाही, असं
ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. त्यामुळे या दिंडीत येणार्या प्रत्येक
वारकर्यांच्या मनात अत्यंत भक्तीभाव असतो म्हणूनच त्यांना त्याचे दर्शन
होते. दूध जसे जास्त उष्णता मिळाल्यावर वर वर येवू लागते, तसा हा भक्तीभाव
उफाळून येतो. कारण आता सोलापूरच्या हद्दीत शिरताना त्या भगवत प्रेमाची उब
वाढत असते. दुधाप्रमाणे हे प्रेमाचे, भक्तीचे उतू जाणे हा खरा आनंद आता
इथून पुढच्या प्रवासात मिळत असतो. कधी एकदा एकादशीचा दिवस उजाडतो, कधी एकदा
चंद्रभागेत डुबकी घेतो आणि आणि पुंडलीक पायरीचे दर्शन घेउन पुडे
पांडुरंगाकडे कसे जातो याचा विचार प्रत्येकाच्या मनात असते. ही भगवतभेटीची
ओढ, हा ध्यास बरेच काही शिकवून जातो. कोणतीही गोष्ट विशिष्ट प्रकारचा ध्यास
घेतल्याशिवाय साध्य होत नाही. त्यासाठी हा ध्यास घेण्याची शिकवण या वारीत
मिळते. आता हा ध्यास पराकोटीला पोहोचला आहे कारण आता चार दिवसांवर आता
माउलीचे दर्शनाचा दिवस आला आहे.
कोरोनाचे
संकट महाराष्ट्रात आल्यावर आपल्या मुलखाकडे पळालेेले परप्रांतिय आता
पुन्हा मुंबईत परत येत आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने त्यांचे आगमन होत
आहे. इथून मजूर निघून गेल्यामुळे आपल्या मराठी लोकांना रोजगार मिळेल अशी
अपेक्षा करणारांचा याने भ्रमनिरास झाला का? का फक्त रोजगाराचे ते
दिवास्वप्न होते? कोव्हीड 2019 च्या धक्क्यातून किती मराठी तरूण
स्वयंरोजगाराकडे वळले? उत्तर प्रदेशात एकाच दिवशी काहीतरी 1 कोटी रोजगार
योगी सरकारने दिल्याची बातमी दोन दिवसांपूर्वी आली. त्याचे महाकौतुकही
झाले. तसे आमच्या महाराष्ट्रात का झाले नाही?
आज महाराष्ट्रात रोज किमान
17 हजार परप्रांतीय मजूर येत आहेत आणि राज्य सरकार त्यांना अपेक्षित
ठिकाणी पोहोचवत आहे, असा खुलासा खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख
यांनी केला आहे. कोरोनाशी लढताना महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केले
होते. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवसाय कोरोनाच्या संकटामुळे बंद
झाले होते, पण आता राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्योग,
व्यवसाय हळुहळू चालू झाले आहेत. हे उद्योग, व्यवसाय चालू होत असल्याने
महाराष्ट्रातील परप्रांतीय श्रमिक जे आपापल्या राज्यात उत्तर प्रदेश,
बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे मोठ्या संख्येने परत गेले होते, त्यांची
महाराष्ट्रात घरवापसी सुरु झाली आहे. मोठ्या संख्येने ते येत आहेत. हळुहळू
ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल. परप्रांतियांना त्यांच्या गावी
जाण्यासाठी राज्य आणि केंद्राने श्रमिक ट्रेन्स, एसटी आदींच्या माध्यमातून
सरकारी तिजोरीतून प्रवास, आरोग्य तपासणीचा खर्च उचलला होता. आता हा कर
पेट्रोल दरवाढीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक वाहनधारकांकडून वसूल
केला जात आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर रस्त्यांवरून चालत जाणा-या
मजुरांची झुंबड पाहायला मिळत होती. लांबलचक रांगा महामार्गांवर होत्या. ते
लोक पुन्हा येत आहेत. मग त्यांना पाठवण्याची काय गरज होती? उलट हा रोग
त्यांनी पसरवण्याचेच काम केले. म्हणजे महाराष्ट्रातील अन्य व्यवसायात
कामगार कपात, पगार कपात होत असून अनेकांचा रोजगार जात आहे. यात मराठी
माणसांचे प्रमाण अधिक आहे. असे असताना सोडून गेलेल्या कामगारांच्या
रोजगाराची जागा मराठी माणसांना का मिळू शकली नाही याचा विचार राज्यसरकारने
केला पाहिजे. वास्तविक पाहता आता अनलॉक झाला असला तरी रेल्वे गाड्या अद्याप
पूर्ववत झालेल्या नाहीत. लोकल गाड्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत.
बसेसही बंद आहेत. मग हे मजूर कोणत्या वाहनांनी आणि मार्गांनी महाराष्ट्रात
येत आहेत, हे समजू शकलेले नाही.परप्रांतिय मजुरांसाठी पायघड्या घालणारे,
त्यांची ने-आण करणारे सरकार स्थानिक भूमीपुत्रांकडे जरा लक्ष देईल का? आज
मुंबईसह राज्यातील दहा टक्के कर्मचा-यांना कामावर बोलावले जात आहे. ज्यात
सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयांचा, सहकारी आणि आंतरराष्ट्रीय खासगी
बँकांचाही सहभाग आहे. मुंबईतील लोकलसेवा अत्यावश्यक सेवेसाठी सुरु करण्यात
आली आहे. ज्यात बँक, मिडीयाच्या लोकांना प्रवेश नाही. एकीकडे माध्यमांना
अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करायचे, त्यांच्यासाठी मोफत 50 लाख रुपये विमा
कवच देण्याची घोषणा करायची आणि प्रत्यक्षात माध्यम प्रतिनिधी, कर्मचारी
यांना कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी लोकलमध्ये प्रवेश नाकारायचा, हा कसला
नियम. एकीकडे परप्रांतिय मजुरांना सरकार विविध जिल्ह्यांत आणून सोडत आहे,
तर दुसरीकडे जिल्हा बंदी, राज्य बंदी, ई पास अशा कचाट्यात स्थानिकांचे जगणे
आणखीन कठीण करुन ठेवले आहे.
सध्या जिल्हा बंदीमुळे जे कर्मचारी
लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी परतले, त्यांना बोलावणे येत असूनही केवळ
प्रवासाला परवानगी मिळत नसल्याने कामावर रुजू होता येत नाही. खासगी प्रवासी
वाहतूक उदा. ट्रक चालक कोल्हापूर ते मुंबई प्रवासासाठी पाच ते सात हजार
रुपये आकारत आहेत. यातील काही पैसे ट्राफिक पोलिसांना द्यावे लागतात अशी
स्पष्टोक्तीही हे ट्रक चालक देतात. ज्या एसटी सुरु केल्या आहेत, त्याही
जिल्हांतर्गत मर्यादित आहेत. अत्यावश्यक कारणासाठी जरी जायचे असेल तरी
सहजपणे परवानगी दिली जात नाही. संपूर्ण जिल्हा आणि राज्य बंदी कायम असताना
परप्रांतिय मजुरांचा प्रवास कसा काय निर्धोक होतो? मग हा स्थानिक
भूमीपुत्रांवर अन्याय नाही का? आज राज्यातील ग्रामीण वा शहरी भागातील लाखो
कर्मचारी, कामगार चार महिने पुढे काय होईल या विवंचनेत कसेबसे टिकून आहेत.
प्रचंड निराशेचे वातावरण आहे. रोज भेडसावणार्या आर्थिक विवंचनेला कंटाळून
ठिकठिकाणी आत्महत्या होत आहेत. या सर्व आत्महत्यांमागे आर्थिक विवंचना,
नोकरी, व्यवसाय बंद असल्याने रोजच्या खर्चाची भ्रांत, मुलांचे शिक्षण,
आरोग्य खर्च अशा अनेक कारणाने केल्या आहेत. याचे उत्तरदायित्व सरकार
स्वीकारणार आहे का? दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत चालली आहे. दुसरीकडे
राज्यातील उद्योजकांनी स्थानिकांना नोकरीत सामावून घेताना अनेक अटी-शर्ती
समोर ठेवल्या आहेत. या अटींचे अनेक जिल्ह्यांतील उद्योजकांनी समर्थनही केले
आहे. मुळातच सध्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातूनच मोठ्या प्रमाणात मजूर,
कर्मचारी आपापल्या गावी निघून गेले आहेत. या परतून गेलेल्या मजुरांसाठी
केंद्राने नुकतीच नवी गरीब कल्याण योजनाही जाहीर केली आहे. याचा लाभ
महाराष्ट्राला होणार नाही, तर महाराष्ट्रात आजवर जे मजूर काम करीत होते
त्यांना त्यांच्या गावाी मिळणार आहे. ही योजना बिहार, उत्तरप्रदेश,
राजस्थान, ओडिशा, झारखंड आणि मध्य प्रदेशमधील कामगारांना अनेक केंद्रीय
योजनांमधून कामे दिली जाणार आहेत. ज्याद्वारे पुढील सहा महिन्यांपर्यंत या
परतलेल्या मजुरांना आपापल्या गावात, राज्यात हाताला काम मिळू शकणार आहे. या
सर्व परिस्थितीत महाराष्ट्रात काय मिळणार आहे? तर आई जेवू देईना आणि बाप
भीक मागू देईना हे वास्तव सध्या महाराष्ट्रातील स्थानिकांचे आहे. समोर काम
तर दिसते, नोकरभरतीची संभाव्यताही दिसते, पण अनेक अटींमुळे ती स्वीकारता
येत नाही आणि समजा नोकरी स्वीकारलीच तर त्या ठिकाणापर्यंत पोहोचता येत
नाही. कारण राज्याचे अतर्क्य असे धोरण. यातून काय करायचे हा प्रश्न सामान्य
लोकांपुढे आहे. रोेजगाराच्या संकटाने अशाप्रकारे महाराष्ट्राला ग्रासले
आहे. या संकटाची संधी साधण्यात आम्हाला अपयश आले आणि परप्रांतिय मोठे झाले.
ज्ञानोबा माउली, तुकाराम तुकाराम,‘ग्यानबा-तुकाराम’चा
गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून निघालेल्या दिंडया आता सोलापूर
जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. लवकरच त्या पंढरपूरच्या वेशीवर येऊन पोहोचतील.
आज बरोबर पंधरा दिवस झाले. अष्टमी ते अष्टमी या पंधरा दिवसात पंढरपुराच्या
दरवाजात वारकरी दाखल होत आहेत. हे दरवर्षीचे चित्र असते. यावर्षी फक्त
कल्पना करायची आणि दिंडी पोहोचली आहे असे समजायचे. कोरोनामुळे आपल्याला
कल्पनेतून वारी करण्याची संधी मिळाली आणि मानसपूजेची, मानस दिडीची दीक्षा
मिळाली असे समजायचे आहे. यापूर्वीचे चित्र आठवयाचे, नियम आठवायचे, दिनक्रम
आठवायचा आणि पुढचे चित्र निर्माण करायचे.
दरवर्षी नाही तर वर्षानुवर्षे,
दशकानुदशके, शतकानुशतके ऊन-वारा अंगावर झेलत पांडुरंगाच्या भेटीसाठी
व्याकूळ झालेला वारकरी आता त्या सावळया रूपाशी एकरूप होण्याच्या ओढीने
झपाझप पावलं टाकत आहे. भेटीलागी जीवा, लागलीसे आस या ओळीचा शब्दश: आनंद आता
वारकरी घेत आहेत, त्याचा प्रत्यय प्रत्येकाला येत आहे. पंढरीची वारी हा
महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. हा ठेवा आता मोठ्या प्रमाणात
समाजजागृतीचं व्यासपीठ ठरू लागलं आहे. पंधरा वीस दिवसांच्या प्रवासात
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील लाखो भाविक सहभागी होतात. यानिमित्ताने
अनेक संस्था समाजातील वेगवेगळया अनिष्ट गोष्टींबाबत जागृती करण्यासोबतच
व्यसनमुक्तीचा प्रचारही करताना दिसतात. या वारीत अनेक वारकरी हे केवळ
समाजजागृतीसाठी आणि अंधश्रद्धेवर हल्ला करण्यासाठी येत असतात. हे समाजभान
फार महत्त्वाचे असते.
संपदा सोहळा नावडे मनाला।लागला टकळा पंढरीचा॥ जावे पंढरीशी आवडी मनाशी। कधी एकादशी आषाढी ये॥
अशा
आर्त भावनेने वाटचाल करणारी लाखो पावलं आता पंढरपूरच्या वेशीवर येऊन ठेपली
आहेत. प्रत्येकाच्या मनात विठ्ठल भेटीची ओढ लागलेली आहे. परंतु
प्रत्येकाचे या पंधरा वीस दिवसात परिवर्तनही घडलेले आहे. त्याच्यात जणू
काही परकाया प्रवेश झाला आहे इतके अमूलाग्र बदल त्याच्यात जाणवतात. हा
वारीचा महिमा आहे.
‘डोळे भरोनिया पाहीन तुझे मुख। हेचि मज सुख देई
देवा॥ अशी हृदयापासून साद आता घातली जात आहे. खरोखरच त्या सावळ्या
विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर डोळ्यातून येणारे आनंदाश्रू, ते भरून येणे हे
फार दुर्मिळ असते. डोळ्यातून येणारे ते पाणी म्हणजे साक्षात माउलींना
घातलेला गंगेच्या पाण्याने अभिषेक असतो. ऊन-वा-याची तमा न बाळगता या दिंडीत
चालताना प्रत्येक क्षण एक वेगळी ऊर्मी देऊन जातो. कोणत्याही अपेक्षेविना
इतक्या आर्त भावनेने केवळ आपल्या दैवताच्या दर्शनासाठी निघालेला भोळया
भाविकांचा मेळावा हा जणू जगात एकमेव असतो.
वारीच्या या प्रवासात
येणार्या अनेक अडचणी, गैरसोयी, समस्या यांची तीळमात्र तमा न बाळगता ही
वाटचाल होतच राहते. एकाच वेळी एकाच ठिकाणी इतक्या मोठया प्रमाणात लोक जमत
असल्याने काही सामाजिक संस्थांनी गेल्या काही दिवसांपासून ‘वारी’चा ‘समाज
जागृतीचे व्यासपीठ’ म्हणूनही उपयोग सुरू केला आहे.वारकर्यांमध्ये बहुतेक
लोक हे माळकरी असतात. माळकरी अभक्ष्य भक्षण (मांस-मच्छी) आणि अपेयपान
(दारू) करीत नाहीत. मात्र यातील बहुतेक जण शेतकरी आणि कष्टकरी असल्याने
त्यांना तंबाखू आणि विडीसारखी व्यसनं मात्र असतात. कळत-नकळतपणे या दोन्ही
व्यसनांचा त्यांच्या शरीरावर आणि संसारावर परिणाम होत असतो. गेल्या अनेक
वर्षापासून सर्व व्यसनांपासून मुक्तीसाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या
मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त संघाच्या वतीने दिंडीत समाज जागृती केली जाते.
पंढरपूरची वारी हे सर्व दोष दूर करणारे माध्यम आहे हे वारंवार
सांगितले ते यासाठीच. सर्व पापांपासून मुक्त करणारी आहे हे सांगितले ते
यासाठीच. म्हणजे दारू, गांजा, अफीम, गर्द या व्यसनांपासून ते तंबाखू,
गुटखा, विडी, सिगारेट यांच्या सेवनाने होणार्या दुष्परिणामांबाबत या वारीत
जागृती केली जाते. अशी व्यसने म्हणजेच पापकर्म आहे. प्रत्येक मुक्कामाच्या
ठिकाणी या व्यसनांपासून होणार्या रोगांच्या परिणामाचं प्रदर्शन भरवलं जातं.
त्याशिवाय दिंडीच्या वाटेवर एका ट्रकमध्ये अखंड पथनाटय सुरू असतं.
व्यसनाचा राक्षस कसा समाजाला गिळंकृत करतोय, ते या पथनाटयातून दाखवलं जातं.
त्याचप्रमाणे पर्यावरण ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण
जगाची समस्या होऊ पाहत आहे. पर्यावरण जागृतीबाबत अनेक संस्थांच्या
माध्यमातून जागृती केली जाते. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे तर गेल्या
कित्येक वर्षापासून पालखी सोहळयात पर्यावरणाची दिंडी काढतात. त्याशिवाय
भारूड सम्राज्ञी चंदाबाई तिवाडी याही भारुडाच्या माध्यमातून समाज जागृती
करतात. वारक-यांचा संत वचनांवर विश्वास असल्यामुळेच संत वचनांच्या
माध्यमातूनच ही जागृती केली जाते. संत तुकारामांनी साडेतिनशे वर्षांपूर्वी
वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी सांगितले ते या पर्यावरणाच्या रक्षणासाठीच.
त्यामुळे त्यांचीच दिंडी पंढरीला नेताना, त्यांचा जयघोष होत असताना
पर्यावरणाचे महत्त्व हे दिेलेच पाहिजे.
नगरेची रचनावी। जलाशये
निर्मावी। महा वने लावावी। नानाविध॥ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे.
त्यांचा विचार हा समाजजागृती आणि सुधारणेचा होता. त्यामुळेच याचा प्रसार
करणारे कार्य, प्रबोधन हे दिंडीतून होत असते. म्हणूनच वारी ही परिवर्तनाची
आणि आत्मशुद्धीची वारी असते. अशी ही वारी आता पंढरीच्या दर्शनासाठी आतूर
झालेली आहे.
भारतात ‘बॉयकॉट चायना’ या आंदोलनाने जोर पकडल्यामुळे, चिनी कंपन्या आता
आपली नावं बदलण्यासाठी पळापळ करू लागल्या आहेत. भविष्यातील संकटांचा
मुकाबला करण्यासाठी त्यांनी आपली ओळख बदलण्याची मोहीम सुरू केली आहे. हा
मुखवटा बदलण्याचा प्रकार म्हणजे चीनच्या युद्धनीतीचाच एक प्रकार आहे.
एकप्रकारे चीनविरोधात उपसलेल्या बहिष्कारास्त्राचे हेे प्रारंभिक यश आहे.
भारतात
चीनविरोधी संतापाची लाट आहे. गलवान घाटीत भारतीय सैनिकांच्या
हौतात्म्यानंतर आणि तत्पूर्वीही देशभरात चिनी वस्तू आणि उत्पादनांवर
बहिष्काराची मोहीम सुरू करण्यात आली. चीनच्या वुहानमधून निघालेल्या कोरोना
व्हायरसने जगभरात घातलेला कहर, हे यामागचे सर्वात मोठे कारण होते. चिनी
मोबाईल फोन्स, धुमाकूळ घालणारे मोबाईल अॅप्स, छोटी-मोठी चिनी उत्पादने,
इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी आदींवर बहिष्कार घालण्याचा निर्णय भारतीयांनी
घेतला. ‘द कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ या, व्यापार्यांच्या अखिल
भारतीय संघटनेने चीनमधून आयात होणार्या 500 श्रेणीतील वस्तूंची यादी जाहीर
करून बहिष्काराची हाक दिली. बहिष्काराची मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी
चित्रपट कलाकार आणि क्रिकेटपटूंना चिनी उत्पादनांच्या जाहिराती न करण्याचे
आवाहनही सीएआयटीने केले. आंदोलनाने गती पकडली आणि चीन समर्थक मंडळी, तसेच
बहिष्काराने काय साध्य होणार, असे प्रश्न विचारणार्यांची बोलती बंद होऊ
लागली. अत्यल्प भांडवलात नाना वस्तू निर्मित करून चीनने जगभरातील
बाजारपेठांमध्ये त्या साठवून ठेवल्या. पण, ‘बॉयकॉट चायना’ मोहिमेमुळे चिनी
कंपन्यांची पळापळ सुरू झाली आहे. त्यांच्या ब्रॅण्डस्पुढे नवी आव्हाने उभी
राहू लागली आहेत. त्यामुळे किरकोळ बाजाराच्या बादशहा समजल्या जाणार्या या
कंपन्या, अडचणीच्या स्थितीत आपली ओळख लपवून ‘मेड इन इंडिया’ असे लेबल लावू
लागल्या आहेत. हे लेबल, हे मुखवटे म्हणजे आर्थिक युद्धनिती आहे. यात आपली
फसगत होणार नाही याची काळची प्रत्येक भारतीयाने घेतली पाहिजे. भारतीय
ग्राहकराजाने उघडलेल्या तिसर्या डोळ्याचीच ही कमाल आहे. अजूनही मोजक्याच
ग्राहकांनी आपला डोळा उघडलेला आहे. बॉयकॉटच्या मोहिमेला जर जनआंदोलनाचे
स्वरूप आले, तर चिनी कंपन्या अक्षरशः रडकुंडीला येतील. चीनला नमवायचे हे
फार मोठे शस्त्र आहे. चीनचा बुरखा, मुखवटा काढण्यासाठी हे शस्त्र प्रत्येक
नागरिकाने वापरले पाहिजे. हे युद्ध सैनिकांकरवी किंवा राजकीय पक्षांच्या
आवाहनाने जिंकता येणार नाही, तर आपल्या पुढाकाराने ते जिंकावे लागेल हे
लक्षात घेतले पाहिजे.
सध्याच्या सरकारनेही चिनी कंपन्यांना वेसण
घालण्याची तयारी सुरू केली आहे. सरकारी पातळीवरही चिनी गुंतवणूक
रोखण्यासाठी निर्णय घेतले गेले आणि त्या दिशेने पावले टाकली गेली.
मध्यंतरीच्या काळात चीनबाहेर पडणार्या परदेशी कंपन्यांना आकर्षित करून त्या
देशाच्या अर्थव्यवस्थेला धडका मारण्याचे काम भारताने केले. त्याच वेळी
एचडीएफसी या खाजगी बँकेत चिनी कंपनीने एक टक्का शेअर घेतल्याची बाब ध्यानात
येताच भारत सरकारने, आमच्या परवानगीशिवाय कुठल्याही भारतीय कंपनीत चिनी
कंपन्यांना गुंतवणूक करता येणार नाही, असा आदेश जारी केला. त्यामुळे भारतीय
अर्थव्यवस्थेत शिरकाव करून ती डळमळीत करण्यासाठी उचललेल्या चीनच्या
उद्देशालाच पायबंद घातला गेला. मुखवटा धारण करून कोणत्याही रूपात एखाद्या
व्हायरसप्रमाणे चीन भारतात घुसू पहातो आहे.कारण सीमेवर ताकद दाखवली तरी
भारतीय बाजारपेठ त्यांना गमवायची नाही. म्हणूनच त्यांना फायदा होणार नाही
हे प्रत्येकान ठरवण्याची गरज आहे. केंद्र सरकारने एमएसएमई मंत्रालयांतर्गत
200 कोटी रुपयांपर्यंतचे सरकारी कामातील कंत्राट भारतीय कंपन्यांना
देण्याची घोषणा यापूर्वीच केलेली आहे. सोबतच लडाख सीमेवरील वादाच्या
पार्श्वभूमीवर, सरकारी कंपन्यांत चिनी सामान आणि चिनी कंपन्यांना कंत्राट
देण्यावरही बंदी घालण्यात आली. दरम्यानच्या काळात हरयाणा सरकारने त्यांच्या
राज्यातील दोन ऊर्जा प्रकल्प, जे चीनच्या सहकार्याने बांधले जाणार होते,
त्यांची कंत्राटे रद्द करून चिनी कंपन्यांना जबरदस्त धक्का दिला.
त्याचप्रमाणे काही राज्य सरकारांनीही त्यांच्या राज्यातील चिनी प्रकल्पांना
पायबंद घालण्यासाठी पुढाकार घेतला. रेल्वेनेही चिनी कंपन्यांना दिलेली
कंत्राटे रद्द केली. या सार्या कारणांमुळे चिनी कंपन्यांमध्ये घबराटीचे
वातावरण पसरणे स्वाभाविक आहे. ‘शाऊमी’ या मोबाईल बनविणार्या कंपनीने तर
त्यांच्या मोबाईलवर ‘मेड इन इंडिया’ असे छापे मारण्यास प्रारंभ केला आहे.
अशी कितीतरी चीनी उत्पादने अचानक मेड इन इंडियाची मुखवटे लावून येतील. ते
लक्षात घेतले पाहिजे. इतरही अनेक चिनी कंपन्या त्याच मार्गाने पावले
टाकण्याची शक्यता आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतील या आंदोलनामुळे
चिनी आयातीमध्ये एक लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. या बहिष्कारास्त्रात
ट्रान्सपोर्टर, शेतकरी, हॉकर्स, लघु उद्योजक आणि महिला उद्योजकांचा वाटाही
महत्त्वाचा ठरला. सध्या दिल्लीत तर चिनी उत्पादकांविरुद्ध रोष आहेच, पण
तेथील हॉटेल व्यावसायिकांनी चिनी व्यक्तींना हॉटेलमध्ये उतरू न देण्याचा
निर्णय घेऊन चीनविरोधी आंदोलनाला बळकटी प्राप्त करून दिली. त्यामुळे यापुढे
दिल्लातील तीन हजार हॉटेल्समध्ये ना चिनी वस्तू दिसतील, ना चिनी नागरिक.
महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये चिनी यंत्रमागावर बंदीची तयारी झालेली आहे.
हे फार मोठे युद्ध आपल्याला जनतेकडून जिंकता येणार आहे. त्यावेळी वापरले
जाणारे चिनी मुखवटे फक्त ओळखले पाहिजेत.
आपली ही पंढरीची वारी आता पंढरपुराच्या
अगदी समीप येउन पाहोचली आहे. आता फक्त रांगा लावून एकादशीला दर्शन
घ्यायचे. बुधवारी 1 जुलैला एकादशी म्हणून आतापासूनच आपण रांगेत उभे राहणार
आहोत. दरवर्षी अगोदर दोन दिवसच ही रांग लागत असते. या रांगेत विठ्ठलाचे
नामस्मरण हेच ध्येय असते. बाकी सगळे विठ्ठलमय झालेले असते.
भजन,
कीर्तन, नामस्मरण हे वारीसाठी फार महत्त्वाचे आहे. वारीत ते सतत घडत असते.
या भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या जयघोषातच वारी पुढे सरकत असते. या
वारीमध्ये हरीनाम घेणे, हरीकथा निरूपण आणि हरीभजन याला फार महत्त्व आहे.
त्यामुळे प्रत्येक वारकरी हा नित्यनेमाने हरिपाठ करीत असतो. अतिशय एकरूप
होऊन हरिपाठाचं मनापासून वाचन करणारे भक्त तसे वास्तव जीवनात फारच कमी
आहेत. पण रममाण होवून जे करतात, त्यांना काळाचं भय राहत नाही. हरिपाठ वाचत
असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असते इतके ते त्यात रमून जातात. अशा
प्रकारे हरिपाठ करतात त्यांना जीवनाचा अर्थ समजतो. हरिपाठाचं महत्त्व हे
शिवशंकराला होतं. विविध वाहिन्यांवर जे शंकर आणि विष्णूंच्या भक्तीच्या
मालिका लागतात त्यात हरी आणि हर हे दोन नाहीत हेच सांगितले आहे. झी मराठी
वाहिनीवर गाजलेल्या जय मल्हार मालिकेतही हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर
यांच्या परस्परांवरील भक्तीचे वर्णन केलेले आहे. जेंव्हा जेंव्हा विष्णूने
अवतार घेतला आहे तेव्हा शंकर या ना त्या निमित्ताने आलेला आहे. राम मारूती
ही भक्तांची जोडी सर्वश्रेष्ठ आहे. पण तरीही अनेकजण शिव आणि विष्णू असा
भेदभाव करतात. शैव वेगळे, वैष्णव वेगळे असे समजतात ते खरे अज्ञानी आहेत.
साक्षात शिवशंकरच हरिनाम जपत असतात. हरिपाठात, हरिनामात इतकी जबरदस्त ताकद
आहे की, आपल्याला निजधामापर्यंत सहज पोहोचता येतं. त्यामुळे ज्ञानदेवांनी
हरिनामाचा जप तरी करा, असं सांगितलं आहे.
नित्य सत्य मित हरीपाठ ज्यासी। कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी॥
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप। पापाचे कळप पळती पुढे॥
हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा। म्हणती जे वाचा तया मोक्ष्॥
ज्ञानदेव पाठ नारायण नाम। पाविजे उत्तम निजस्थान॥
म्हणजे हरिपाठात जीवन जगण्याचं सार सांगितलं आहे. जो हरिपाठ एकरूप होऊन
वाचतो, त्याला जगण्याचं सार आपसुकच समजतं. त्याला काळाचंही भय राहात
नाही.अशा हरिपाठाचे वाचन, मनन, चिंतन आणि कीर्तन हे वारीमध्ये सातत्याने
होत असते. त्यामुळे वारकर्याला ही वारी नुसतेच पांडुरंगाचे दर्शन घडवीत
नाही, तर त्याला मुक्तीचा मार्ग दाखवते. वैकुठात नेवून पोहोचवते.
आज
जगात एकही वस्तू अशी नाही की, जिला काळाचं भय नाही. त्यामुळे ‘हरिपाठ
वाचल्यावर काळाचं भय राहत नाही,’ यावर ज्ञानदेवांचा ठाम विश्वास आहे.
हरिपाठ करतात त्यांच्यातला अहं ब्रह्मास्मी भाव जागृत झालेला असतो. द्वैत
संपलेलं असतं. ‘भक्त आणि देव दुजा नाही भाव। ’ याची खात्री पटलेली असते. मी
आणि देव वेगळा नाही, ही धारणा ज्यावेळेला पक्की होते, तेव्हा ‘कळीकाळा’चं
भय उरत नाही.
जगात आलेल्या प्रत्येकाने जो आकार धारण केलेला आहे, तो
आकार कधी ना कधी सोडावाच लागतो. हेच तर खरे गीतेचे सार आहे. ते समजणे नाही
तर श्वासाश्वासात, रंध्रारंध्रात बिंबवण्याची ताकद या वारीमध्ये आहे. इथे
कळीकाळाचं भय नाही किंवा कळीकाळ त्यांच्याकडे पाहत नाही, असं म्हणणार्या
ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ‘भावार्थदीपिका’ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ या
ग्रंथांमध्ये, ‘जे निर्माण होते त्याचा नाश होतो, ज्याचा जन्म होतो त्याचा
मृत्यू होतो,’ हे भगवत गीतेमधील विचार ठामपणे सांगताना नमूद केलंय की,
उपजे ते नाशे। नाशे ते पुनरपि दिसे।
हे घटिका यंत्र जैसे। परिभ्रमे गा॥
म्हणजे
उपजणार्याला नाश असली तरी हरिपाठ करणार्यांना मात्र कळीकाळाचं भय राहात
नाही. कारण धारण केलेला देह जरी कालपरत्वे नष्ट होत असला तरी आत्मा हा
कधीही नष्ट होते. तो अमर आहे. या विचारांवरची श्रद्धा पक्की झाली की,
त्याला काळाचं भय राहात नाही. तो काळ आपल्याकडे वाकडया नजरेने पाहू शकत
नाही, हा विचार पक्का होतो. आत्मा देहाची आदलाबदल कशी करतो, हे सांगताना
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
जैसे जीर्णवस्त्र सांडिजे। मग नूतन वस्त्रे लेईजे।
तैसे जन्मांतराते स्वीकारीजे। चैतन्य नाथे॥
हरिपाठावरील श्रद्धाभाव दृढ झाल्यावर ही भूमिका पटते. म्हणूनच मग
रामकृष्ण नामाचा उच्चार केला की, अनंत राशी तप निर्माण होतं. राशी म्हणजे
संचय. रामकृष्ण नामाच्या उच्चाराने अनंत राशी तप निर्माण झाल्यावर काय
होतं? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘पापाचे कळप पळती पुढे. नुसते पाप
म्हणलेलं नाही. तर त्याचे कळप म्हणजे समूह पळून जातो,’. महाराजांना
विचारलं, ‘या भगवंतांच्या नामाचं तुम्ही एवढं महत्त्व सांगता. परंतु
यापूर्वी ते कुणी घेतलं आहे का,’ महाराजांनी हरिनाम हे किती पुरातन आहे हे
सांगताना चक्क शिवशंकराचाच दाखला दिला. ‘साक्षात भगवान श्रीशंकरसुद्धा सतत
हरिनामाचा जप करतात. जेवढी निष्ठा श्रीशंकाराची हरिनामावर आहे, खचितच ती
दुसर्या कुणाची असेल.’ तितकीच श्रद्धा हरिचीही हरावर आहे. हा हरी हरातील
भेद नष्ट करणारा भाव हरिपाठात आहे. याचा पाठ सतत केल्याने वारकरी हा भेदभाव
विरहीत असा स्वच्छ आणि निर्मळ असतो. आता फक्त विठ्ठलभेटीची ओढ लागली आहे.
त्यासाठी संपूर्ण पंढरपूर सजले आहे. आज जरी कोरोनामुळे याठिकाणी कर्फ्यू
लागला असला, येण्यास बंदी असली तरी आपण मनाने तिथे पोहोचलो आहोत, असा भाव
प्रत्येकाच्या मनात आहे.
30
जूनला लॉकडाउन उठून 1 जुलैपासून सर्वकाही सुरळीत होईल अशी अपेक्षा होती.
अर्थात महाराष्ट्र सुरू होणे म्हणजे मुंबई सुरू होणे. किंबहुना मुंबई सुरू
होणे म्हणजे संपूर्ण देशाची गाडी रूळावर येणे. म्हणूनच मुंबई रूळावर
येण्यासाठी मुंबई लोकल सुरू होणे आवश्यक आहे. परंतु येत्या 12 ऑगस्टपर्यंत
रेल्वेगाडया आणि लोकल्स सुरू होणार नाहीत, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर
करून मुंबईतील 80 लाख लोकल्स प्रवाशांना एक जोरदार झटका दिला. विशेष म्हणजे
मुंबई महानगर प्रदेशातील तमाम जनता उपनगरी लोकल कधी सुरू होणार, याची
चातकासारखी वाट बघत आहे. लोकल्स सुरू झाल्या की मुंबईकरांची गर्दी पुन्हा
जमेल, लोकलमधे सोशल डिस्टन्सिंग पाळता येणार नाही, कोरोनाग्रस्तांची संख्या
बेफाम वेगाने वाढेल, अशी गणिते मांडण्यात येत आहेत. त्यामुळे सगळा कारभार
ठप्प केला जात आहे. हे किती दिवस सहन करायचे असा प्रश्न सामान्यांना पडलेला
आहे. प्रत्येकाला आपल्या कामाची, रोजगाराची ओढ लागलेली आहे. याचे कारण
सरकारने या दोन तीन महिन्यात केलेल्या कोणत्याच घोषणा खर्या ठरलेल्या
नाहीत. सरकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका कोरोना कर्ज नावाची योजना राबवत
आहे. त्याचा फायदा कर्मचारी आणि व्यावसायिकांना होईल असे सांगितले गेले
होते. पण बँकांकडूनही मदत मिळेनाशी झालेली आहे. ही मदत कर्जरूपी हवी होती,
पण तीही बँका देण्यास तयार नाहीत. होती ती पुंजी संपत आली आहे तर काहींची
संपूनही गेलेली आहे. त्यामुळे आता आपला रोजगार सुरू झाला पाहिजे म्हणून
प्रत्येकजण चिंतीत आहे. रविवारपासून काही अटीशर्तींवर सलून सुरू केली गेली.
त्यामुळे आता आपलाही रोजगार सुरू होईल अशी प्रतिक्षा प्रत्येकाला आहे. पण
या अपेक्षांवर कालही पाणी फेरले गेले. आज नाईलाजाने म्हणावे लागते आहे की,
महाराष्ट्रात कोरोना रोखण्यात सर्व यंत्रणांना अपयश आलेले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दीड लाखांवर गेली, हे काय राज्याला
भूषणावह आहे का..? गेले तीन महिने रेल्वे लोकल्स बंदच आहेत ना, मग ही
संख्या एवढी लाखा लाखांवर कशी गेली..? केवळ लोकल्स किंवा रेल्वे बंद ठेवून
किंवा रस्त्यावर रिक्षा-टॅक्सीला बंदी घालून कोरोना कसा रोखता येईल..? जे
लोकल्समधून फिरत नाहीत, जे लोकल्समधून प्रवासच करीत नाहीत तेच लोक लोकल्स
बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. एसी लोकल नसली तरी चालेल किमान सामान्य
लोकल तरी सुरू होणे आवश्यक आहे. आजमुंबईकर जनतेच्या सुरक्षिततेसाठी’ असे
कारण दाखवत मुंबईच्या जीवनवाहिनीपासून मुंबईकरांनाच वंचित ठेवले जात आहे.
सरकारी कर्मचार्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे, हे चांगलेच केले.
परंतु सरकारी कार्यालयात कामाचा किती उरक होतो आहे, हेही एकदा जाहीर करावे.
सरकारी कर्मचार्यांना एक न्याय व सामान्य जनतेला दुसरा, हा भेदभाव
कशासाठी..? सरकारी कर्मचार्यांचे काम जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच खाजगी
कंपन्या, कार्पोरेट समूह, दुकाने, व्यापार, लहानमोठे उद्योग, येथे काम
करणार्या लोकांचेही काम महत्त्वाचे आहे. काम करणार्या व उद्योग व्यवसाय
करणार्या लोकांकडूनच सरकारला महसूल मिळत असतो. मग त्या करदात्यांना
त्यांच्या कामावर जा-ये करण्यासाठी लोकल सेवा नको काय..? सरकारी कर्मचारी
आणि अत्यावश्यक सेवा यांना जास्त महत्व दिले गेले आहे. पण हातावर पोटे
असणारांचे काय? जर सरकार शंभरटक्के रोजगार देउ शकत असते तर सर्वांनाच या
सेवा मिळाल्या असत्या. आरामातली सरकारी नोकरी प्रत्येकाने केली असती. पण
त्यांनी दुसरा मार्ग स्विकारला आहे ना? मग त्यांना कामावर जाण्यापासून का
रोखले जात आहे? त्यांच्या कामावर जाण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे मुंबई
लोकल. ती बंद ठेवून सगळे कैदी केले आहेत. आज कर्जत, कसारा, विरार, वसई,
पनवेल, डहाणूपासून सामान्य जनता लोकलने आपल्या नोकरीवर, कामाच्या ठिकाणी
किंवा व्यवसाय रोजगाराच्या ठिकाणी जात असते. महामुंबईतील जनतेला गेले तीन
महिने लाकडाऊनमधे घरी बसून काढावे लागले आहेत. घरी बसून संसार कोणाचा चालू
शकतो काय..? मुळातच मुंबई हे वर्किंग कल्चर असणारे महानगर आहे. काम भरपूर
करा व पैसे कमवा हा या शहराचा मंत्र आहे. 24 तास अहोरात्र चालू असलेले शहर
लोकलसेवा बंद असेल तर कसे चालू राहील..? म्हणजे एकीकडे मुंबईत नाईट लाईफचे
स्वप्न पहायचे आणि दुसरीकडे मुंबई बंद करायची. हे नाईट लाईफचे स्वप्न
कावळ्याच्या छत्री इतके दिवस तरी टिकले का? जोपर्यंत लोकलसेवा सुरू होत
नाही तोपर्यंत मुंबई महानगराचे जनजीवन सुरळीत होणार नाही. सरकारी कर्मचारी,
पोलीस, इस्पितळातील कर्माचारी, आरोग्य सेवेशी संबंधित या सर्वांना सरकारने
लोकल प्रवासाला परवानगी दिली. अशी परवानगी देताना बँक कर्मचारी किंवा
मीडियातील पत्रकार व कर्मचारी यांची सरकारला आठवण करावीशीसुध्दा वाटली
नाही. लाकडऊनच्या काळात बँक कर्मचारी व पत्रकार हे कोणताही गवगवा न करता
आपले कर्तव्य पहिल्या दिवसापासून बजावत आहेत. परंतु सरकार नावाच्या
यंत्रणेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असेच म्हणावे लागेल.
आज
शिस्तीपेक्षा निर्बंधांनाच महत्व आले आहे. नियमापेक्षा निर्बंध जास्त.
निर्बंध ठेवून आणि पोलिसांचा दंडुका दाखवून कोरोना आटोक्यात येत नाही, हे
गेल्या तीन महिन्यांत दिसून आले. देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मुंबई व दिल्ली
ही दोन महानगरे सर्वोच्च स्थानावर आहेत. केवळ प्रशासकीय आकडेवारीवर
विसंबून निर्णय घेणे सोपे असले, तरी त्यामागे जनतेला नेमके काय हवे आहे हे
कधीच समजणार नाही. शाळा सुरू करणे किंवा परीक्षा घेणे, रिक्षा-टॅक्सी सुरू
करणे यासंबंधी निर्णय घेण्यात सरकार कशासाठी दिरंगाई करीत आहे. बाहेरच्या
राज्यात जाण्यासाठी व मुंबईला परत येण्यासाठी रेल्वे गाडया धावत आहेत, पण
मुंबईतील चाकरमानी, श्रमिक, दुकानदार, व्यापारी, यांच्यासाठी लोकल्स सेवा
नाही. पुणे, नाशिक, कोकण आणि सुरतहून रोज मुंबईला जा-ये करणार्या हजारो
लोकांनाही गेले तीन महिने कोणतेच साधन नाही. सरकारने ही कोंडी लवकर फोडावी
अशी अपेक्षा असून त्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील लोकलसेवा सुरू
करण्यासाठी केंद्राला शिफारस करावी. बिहार, युपी ही राज्ये केंद्राकडे
मागण्या करून आपली कामे करून घेतात. मग महाराष्ट्र सरकार तसा दबाव वजा
मागणी का टाकत नाही? राज्य सरकारने केंद्राला आग्रह केला पाहिजे.
उद्या 1 जुलै रोजी देवशयनी किंवा
मोटी आषाढी एकादशी. संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे आज पंढरपूरकडे लागलेले
आहेत. आजच्या दिवशी दरवर्षी आठ-दहा लाख लोक वारकरी पंढरपुरात जमतात. म्हणजे
ते शरीराने आणि मनाने तिथे आहेत आणि जे शरीराने तिथे नाहीत, तेही मनाने आज
पंढरपुरात आहेत. आजचा हा दिवस भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणा-यांचा
सगळ्यात मोठा सण आहे. पण, सण असूनही तो चित्त शुद्धीशी जोडलेला आहे. आषाढी
उपवासाचा सगळयात मोठा अर्थ शरीरशुद्धी आणि चित्तशुद्धीतून विठुरायाच्या
पावलांशी लीन होणे आणि नामदेवाच्या भाषेत ‘विठ्ठल पाहणे’ असा आहे. त्या
विठ्ठलाच्या नामस्मरणाचा हा दिवस आहे. जगातल्या सगळया धर्मात उपवास आहेत.
ते चित्तशुद्धीकरिता आहेत, शरीरशुद्धीकरिता आहेत. आजचा उपवास हा
चिंतनाकरिताही आहे. म्हणून आषाढीचे विशेष महत्त्व आहे.
आपल्याकडले
सणवार आणि उपवास हे निसर्गाशी जोडलेले आणि निसर्गाशी नाते सांगणारे असे
आहेत. चिंतन, मनन आणि भजन यातून आत्मशुद्धी होत असते. हा उपवास विठुरायाशी
जोडलेला आहे. या उपवासाची जी रचना आहे, ती बघितली तर आषाढी, कार्तिकी आणि
महाशिवरात्र हे तिन्ही उपवास बरोबर 120 दिवसांच्या फरकाने आलेले
आहेत.आषाढीच्या आधी शेतीची कामे आटोपलेली आहेत आणि मग श्रमशक्तीला
विश्रांतीची जोड दिलेली आहे. शिवाय बदलत्या ऋतुचक्रात पचनशक्तीला विश्रांती
हा आणखी एक महत्त्वाचा शास्त्रीय उद्देश आहे. दुसरा उपवास कार्तिकीचा, तो
शिशिर ऋतूच्या म्हणजे हिवाळयाच्या टप्प्यावर आणून ठेवलेला आहे. तिसरा उपवास
महाशिवरात्रीचा. तो उन्हाळयाच्या टप्प्यावर आलेला आहे. या प्रत्येक
उपवासाचे अंतर 120 दिवसांचे आहे आणि ते शास्त्रीय आहे. त्याला धर्माचा
संदर्भ घातला ते त्याचे पालन व्हावे म्हणून. पण, तिन्ही उपवासांचा संदर्भ
शास्त्रीय आहे. निसर्गाच्या बदलत्या ऋतुचक्राशी जोडलेला आहे. म्हणून
आपल्याला सण आनंद देतात, उपवास आनंद देतात.
आषाढी एकादशीचा मुख्य
उद्देश नामस्मरणाशी जोडलेला आहे. विठूचा गजर करण्याशी जोडलेला आहे.
आत्मज्ञान होण्याशी जोडलेला आहे. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणारी ही
जी संत मंडळी आहेत, त्यांना आदराने, सन्मानाने आणि भावनेने संत म्हटले तरी
मुळात ते सर्व तत्त्ववेत्ते आहेत. शिकलेले नसले, तरी हरिनामाच्या
सामर्थ्यांने त्यांना आलेले जीवनातील अनुभव जीवनाचे तत्त्वज्ञानच बनले आणि
त्यांच्या वाणीतून आत्मज्ञान प्रकट झाले.
ज्ञानोबा, तुकोबा यांची गोष्ट
फारच वेगळी आहे.संत परंपरेचा पाया ज्ञानोबांनी रचला आणि तुकोबा कळस झाला.
मधल्या चारशे वर्षात नामदेव आले, त्यांनी ‘पाहावा विठ्ठल’ सांगून
द्वैत-अद्वैताचा भ्रम दूर करून टाकला. म्हणून या परंपरेत नामदेव खूप मोठे
झाले. विठूच्या गजरात नामाचाही गजर आहे. बाकी अठरापगड जातीतले जे संत
निर्माण झाले, ते कोणत्या विद्यापीठात शिकले होते? पण, त्यांच्या
तत्त्वज्ञानाला आत्मज्ञानाचे केवढे मोठे सामर्थ्य होते. गोरा कुंभार होता.
मडकी करत होता. कच्चे मडके भाजत होता, पक्के करत होता आणि अंगठयाजवळच्या
दोन बोटांनी त्या भाजक्या मडक्यावर ठोकून ‘मडके कच्चे की पक्के’ असे विचारत
होता. हे विचारता, विचारता गोरोबाला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. आपल्याच
डोक्यावर दोन बोटे आपटून एक प्रश्न विचारला, ‘अरे, मी इतकी मडकी भाजतो आहे.
कच्चे की पक्के विचारतो आहे. पण, माझे हे मडके कच्चे की पक्के?’ कसे
कळणार? तिथे गोरोबाला आत्मज्ञान झाले. सावता माळी मळयातल्या भाजीमध्ये
आलेले तण उपटणारे. ते आत्मज्ञानाची भाषा बोलू लागले. ‘कांदा, मुळा, भाजी
अवघी विठाई माझी.’ आणि मग ते म्हणतात, जमिनीतले तण मी उपटले. पण, माझ्या
मनातल्या अविचारांचे तण मी उपटले काय? ते तसेच आहेत. हा विचार येणे हीच
आत्मज्ञानाची पायरी असते. संत सेना महाराज त्यांच्या व्यवसायाप्रमाणे
लोकांची डोकी साफ करीत. ती करता-करता ते तत्त्वज्ञान सांगून जातात की,
‘माझ्या डोक्यातला मळ मी साफ केला आहे का?’ गोरा, सावता, सेना, रोहिदास
महाराज या विविध जाती-जमातीतल्या संतांना आत्मज्ञान झालेले आहे.तुकोबा तर
त्याच्या पुढे गेले? आणि त्यांनी विठ्ठल मनामनात बसलेले असल्याचा दृष्टांत
दिला. गाडगेबाबा त्यांच्या पुढचे. गाडगेबाबांनी सांगितले की, अरे, तू
म्हणजेच देव. गाडगेबाबा कीर्तनातून सांगायचे, देवळात गेलो, देवाच्या
गाभा-यात काळोख, देव दिसेना. मग बापुरावाला सांगून दिवा आणला. देव दिसला.
कोणामुळे दिसला, दिव्यामुळे दिसला. मग देव मोठा की दिवा मोठा? गाडगेबाबांचे
हे तत्त्वज्ञान देव एक आहे. त्याची रूपे अनेक असतील. धर्म अनेक आहेत, पण
त्यांची शिकवण एक आहे. हेच आत्मज्ञान. त्यांची शिकवण देणारी परंपरा म्हणजेच
वारकरी परंपरा. या आत्मज्ञानाच्या ओढीने प्रत्येकजण पंढरपुरात जमतो.
आत्मज्ञान झालेल्यांमुळे मग अवघी विठाई एक होऊन जाते. जगाची सूत्रे
चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे, असे एकदा मान्य केले, तर मग त्याला नाव
काहीही द्या. त्या अदृश्य शक्तीचा धाक हाच तुम्हाला सरळ मार्गाने चालायला
प्रेरित करणार आहे. शेवटी अहंकाराने भरलेले आपण सर्व काही इथे टाकून जाणार
आहोत. जगाचा सगळयात मोठा अनर्थ तेव्हा झाला असता, जर माणसाला मरणाची तारीख
समजली असती. आपली मालमत्ता वर घेऊन जायला परवानगी असती. या दोन गोष्टींचे
बंधन नसते, तर माणसाने कुणालाच जुमानले नसते. ते जुमानण्यासाठी हरिनाम आणि
त्याकरिता उपवास. आपले दैनंदिन जीवन शुद्ध ठेवायचे, असे संत शिकवतात. जेवढे
जीवन हातात आहे, ते सत्प्रवृत्तीने जगा, असे आषाढी सांगते. संयमाने जगा.
आहारामध्ये, विहारामध्ये, बोलण्यामध्ये, खाण्यामध्ये संयम आणि सभ्यता ठेवा.
मग एका आत्मिक बळाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या आषाढीचा
तोच खरा अर्थ आहे. दहा इंद्रिये आणि अकरावे मन अशा एकादश वासनांना
शमविण्यासाठी ही एकादशी असते. ही सर्व एकादश अंगे तृप्त झाली की, माणूस
माणूस नाही, तर विठ्ठल होतो.
अशा विठ्ठलाचे, स्वत:चे दर्शन आज
आपल्याला घडणार आहे. मग त्यासाठी पंढरपुरात जाण्यापासून कोरोनाने रोखले
असले तरी आम्ही तिथे पोहोचलोच, विठ्ठलमय झालो, पाहिंला विठ्ठल असा अभिमान,
आनंद बाळगण्याचा दिवस अखेर आज उजाडला. आमची वारी अशाप्रकारे पूर्ण झाली.
कोणतेही
संकट आले की आपल्याकडे देवाला साकडे घालण्याची परंपरा आहे. पण देवाला
घातलेेले साकडे हे फक्त त्या संकटातून तरण्याची, संकटाशी सामना करण्याची
ताकद मिळावी यासाठी असते. देव तुमचे कोणतेही संकट दूर करत नसतो. संकटाशी
मुकाबला हा करावाच लागतो. जे भोग आहेत ते भोगण्याशिवाय कोणताही पर्याय
नसतो. पण कोरोनाच्या निमित्ताने आता देशात अंधश्रद्धा पसरवली जात आहे. काही
हौशे गवशे नवशे याचा गैरफायदा घेत आहेत. महाराष्ट्रात त्याचा फारसा
परिणाम होणार नाही कारण महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. पण
सध्या आलेल्या कोरोनाच्या संकटात अन्य राज्यात अंधश्रद्धेचे स्तोम माजत
चालले आहे. विशेषत: उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि आसाम यांसारख्या
राज्यांमधील महिलांनी तर कोरोनाला देवीचे रूप मानले आहे. कोरोनामातेचा कोप
झाला आहे आणि तो दूर करण्यासाठी तिची पूजा केली जात आहे. यावरून आपल्याला
देशात जागरूकता किती आहे, हे सहज लक्षात येईल. कोरोनामातेची पूजा केली तर
देवीचा कोप संपुष्टात येईल आणि ती आपल्यातून निघून जाईल, अशी जी भावना तयार
झाली आहे आणि त्यातून कोरोनामातेचे जी पूजाअर्चा सुरू आहे, हे फार घातक
आहे. कोणतीही अंधश्रद्धा पसरत जाणे हे घातक असते. आपल्याकडे याचा प्रसार
फार वेगाने होतो. म्हणजे रोगापेक्षा आणि साथीपेक्षाही प्रचंड वेग अशा
घटनांना असतो.
खरं तर कोरोनाला हरवायचे असेल, तर वैज्ञानिक दृष्टिकोन
ठेवणे आवश्यक आहे. त्याऐवजी अंधश्रद्धा पसरवली जाणार असेल, तर संकट दूर कसे
होईल? कोरोनापासून बचाव करण्यासाठी मन पक्के असणे हा लढाईचा एक पैलू आहे.
ईश्वराची आराधना केल्यास मानसिक बळ मिळते, ही आपली श्रद्धा आहे. त्यामुळे
या श्रद्धेचे पालन करून मानसिक बळ वाढविणे यात चूक काहीच नाही. पण,
कोरोनाला देवीचे रूप मानून, ती कोपली आहे असे समजून जी अंधश्रद्धा पसरवली
जात आहे, तिला कुठेतरी आळा घातला जाणे गरजेचे आहे. कोणताही देव किंवा देवी
ही माणसाचे गैर कसे काय करेल? असे करत असेल तर त्यांना देव कसे म्हटले
जाईल? देव संकट दूर करत असता तर राम कृष्णांना संघर्ष करावा लागला नसता.
संकटांशी आपणच लढा द्यायचा असतो हे राम कृष्ण यांनी दाखवून दिले आहे. ते तर
ईश्वराचे अवतार असूनही त्यांना संघर्ष करावा लागला आहे, आपण तर सामान्य
माणसे आहोत. त्यामुळे हा लढा आपल्याला द्यायचा आहे. कसल्याही अंधश्रद्धा न
बाळगता काम करणे गरजेचे आहे. पण यूपी, बिहारसारखी मागास राज्ये, अविकसीत
राज्ये हा प्रकार करत आहेत आणि त्याचा प्रसार देशभर होण्याची भिती आहे.
आपल्यापैकी
प्रत्येकाने पावलोपावली सतर्क राहणे आणि आणि इतरांना सतर्क करणे गरजेचे
असताना अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाते, हे समाजविघातक कृत्य मानले पाहिजे.
सरकारच्या पातळीवरून जागरूकता अभियान जोरात सुरू आहे. विविध सामाजिक
संघटनाही आघाडीवर आहेत. वर्तमानपत्रांमधूनही बातम्या दिल्या जात आहेत,
टीव्हीवर तर उपायांचे प्रात्यक्षिकच बघायला मिळते आहे. असे असतानाही उपाय
प्रभावी का ठरत नाहीत, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. जागरूकता
निर्माण करण्यासाठी जे अभियान प्रशासनाकडून राबविले जात आहे, इतरांकडून
राबविले जात आहे, त्यात काही त्रुटी तर नाहीत ना, याचाही शोध तातडीने घेतला
पाहिजे आणि प्रभावी उपाय अंमलात आणले पाहिजेत. ज्या गतीने कोरोनाच्या
रुग्णांची संख्या भारतात वाढत आहे, ती चिंता वाढविणारी आहे. काय होणार,
परिस्थिती कधी सुधारणार, सुधारणार की आणखी बिघडणार, रोजगाराचे काय होणार,
मुलांच्या शिक्षणाचे काय होणार... असे अनेक प्रश्न सतावू लागले आहेत. पण
त्यासाठी वाट पाहणे, काम करणे हेच आपल्या हाती आहे. कोणाही बुवा, बाबाला
साकडे घालून हा प्रश्न सुटणार नाही.
आता कोरोना व्हायरस किती घातक आहे,
कसा संक्रामक आहे, संक्रमण होते कसे, मनुष्यावर हा व्हायरस कसा आक्रमण
करतो, याबाबत देशातील बहुसंख्य लोक अजूनही अज्ञानी आहेत, हे सगळ्यात मोठे
दुर्दैव आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वेळोवेळी जनतेला माहिती देण्याचा
आटोकाट प्रयत्न केला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काय उपाययोजना
केल्या पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन केले. असे असतानाही लोकांना संकटाचे
गांभीर्य कळू नये, हे अनाकलनीय आहे. कोरोनामुळे देशात प्राणहानी होऊ नये
यासाठी अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करून केंद्र सरकारने लॉकडाऊन
घोषित केले. या लॉकडाऊनच्या काळात उद्योग-व्यवसाय ठप्प होते. मजुरांच्या
हाताला काम नव्हते. कारखाने बंद असल्याने अनेक ठिकाणी कामगार कपात झाली,
अजूनही सुरू आहे. शाळा-महाविद्यालये बंद आहेत. सगळीकडून प्रचंड नुकसान होते
आहे. अशा स्थितीत नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन करणे
अपेक्षित होते. कोरोनापासून स्वत:चा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी आवश्यक ती
काळजी घेणे अपेक्षित होते. परंतु, या आघाडीवर नागरिक अपयशी ठरले असल्याचे
दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी
कोरोनाला थोपविण्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न केलेत, त्यावर आपणच पाणी
फेरले आहे. कोरोना नियंत्रित ठेवण्यात भारताने मोठे यश मिळविल्याबद्दल
संपूर्ण जगाने भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरुवातीला कौतुक
केले होते. पण, आज कौतुक करण्यासारखी परिस्थिती राहिली आहे काय, याचा
नागरिकांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. प्रश्न असा पडतो की, लोकांना
कोरोना व्हायरस किती घातक आहे याचीच नीट माहिती अजूनही नसेल, तर त्यांनी
काळजी घ्यायचीच कशी? सुरक्षेचे कोणते उपाय केले पाहिजेत, याबाबत सरकार
दिवसरात्र नागरिकांना समजावून सांगत आहे. पण, त्याचा उपयोग होताना दिसत
नाही. मास्क लावूनच घराबाहेर पडावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, काम नसेल
तर घरीच सुरक्षित राहावे, हात साबणाने सतत धुवावेत, सॅनिटायझरचा वापर
करावा, अन्न शिजविताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सगळी तपशीलवार माहिती
सरकारकडून दिली जात असतानाही नागरिक त्या माहितीचा उपयोग करताना दिसत
नाहीत, याला काय म्हणायचे? हे सगळं बाजूला ठेवून जर कोणी अंधश्रद्धा पसरवत
असेल तर ते फार घातक आहे. अंधश्रध्देचा हा बाजार चीनी बाजारापेक्षा घातक
असेल. म्हणून अंधश्रद्धांना रोखण्याचे काम केले पाहिजे. कोरोना हा
कोणत्याही कोपाने निर्माण झालेला रोग नाही तर तो चीनच्या पापाने झालेला आहे
त्यावर उपाय म्हणजे चीनी मालावर बहिष्कार टाकणे हाच आहे.
पाकिस्तान
आणि चीन ही दोन भारताची शेजारी राष्ट्रे आहेत. या राष्ट्रांसोबत वर वर
पाहता भारताचे संबंध चांगले दिसत असले तरी भारताला कमी कसे लेखता येईल,
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची अडचण कशी करता येईल, भारताच्या विधायक
कार्यांमध्ये अडथळे कसे निर्माण करता येतील, भारतामध्ये अस्थिरता कशी
माजविता येईल याचाच हे दोन्ही देश सतत विचार करीत असतात. तशा क्लृप्त्याही
करीत असतात. असे असूनही भारत आज जागतिक पातळीवर खंबीरपणे केवळ उभाच आहे.
हीच खरी आज चीनची पोटदुखी आहे. त्यामुळेच कोरोनासारखा जैविक हल्ला चीनने
केला असावा. या हल्ल्यात भारताला त्रास होईल आणि त्याचा फायदा चीनी
अर्थव्यवस्थेला होईल असा चीनचा कयास असावा, पण तो त्रास संपूर्ण जगाला झाला
आणि चीनच्या पाचावर धारण बसली अशी अवस्था झाली.
आज कोरोना ही चीनने
सार्या जगाला दिलेली देणगी आहे. या कोरोना नावाच्या विषाणूचा फटका
भारताप्रमाणेच जगातील बहुतांश देशांना बसला आहे. या रोगापासून सुटका मिळावी
म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपायामुळे असंख्य देशांचे आर्थिक
कंबरडे मोडले आहे. कोणी म्हणतो की हा विषाणू मांस विक्रीच्या ठिकाणाहून
आला, तर कोणी म्हणतो की चीनच्या प्रयोगशाळेतून आला. परंतु, नेमका कोठून आला
याबाबत अजून तरी अधिकृत माहिती समोर आली नसली तरी चीनमधून हा विषाणू
सार्या जगात पसरला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज अमेरिकेसह जगातील
बहुतांश देशांनी चीनला एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यामुळे चीनने
भारतासाठी केलेला खड्डा त्यांच्याच नशिबी आला. त्या खड्ड्यात जाण्याची वेळ
आज चीनवर आलेली आहे.
यामुळे बहुतेक देशांनी चीनमधील उद्योगधंदे बंद करून
अन्यत्र हलविण्यासाठी विविध देशांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या एकूणच
परिस्थितीत भारताची अमेरिकेसोबतची वाढती जवळीक पाहता चीन थोडा
बावचळल्यासारखा झाला आहे. या कोरोना विषाणूचा फायदा होऊन आपले विविधांगी
सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करीत असलेला चीन भारताला खिजविण्याचा प्रयत्न
करीत आहे. त्यासाठी मग भारताचा परंपरागत शत्रू पाकिस्तान आणि छुपा शत्रू
नेपाळ यांची मदत घेतली जात आहे. सीमेवर आपल्या कारवाया वाढवून भारतावर दबाव
आणण्याचा चीनचा प्रयत्न सुरू असून भारतही त्याला तेवढ्याच खंबीरपणे उत्तर
देत आहे. दोन्ही देशांच्या सीमेवरील वाढती तणावाची स्थिती आणि आतून
कोरोनाने पोखरलेली अर्थव्यवस्था यामुळे चिंतेत असलेले दोन्ही देश आता तणाव
कमी करण्यासाठी एका टेबलावर बसून चर्चा करू लागले आहेत. चर्चेच्या दोन
फेर्या आटोपल्या आहेत.
पण त्या दरम्यान भारतात काँग्रेसने चालवलेले
राजकारण हे काही चांगले नाही. चीनने मोदी सरकारच्या काळात भारताचा भूभाग
बळकावला आहे असा आरोप अप्रत्यक्षपणे काँग्रेस करत आहे तर भाजप तो भूभाग
काँग्रेसच्या काळातच कसा बळकावला होता याचे दाखले देण्यात भाजपेयी गुंतले
आहेत. त्यामुळे या वादाचा कुठे फायदा चीनसारखा देश उठवणार नाही ना याचा
राजकारण्यांनी विचार केला पाहिजे.
सुदैवाने केंद्रात भाजपचे स्वबळावरचे
सरकार आहे. त्यामुळे निर्णयक्षम सरकारकडून काहीतरी चांगले होण्याची
अपेक्षा असते. देशात बहुमताचे सरकार असले म्हणजे त्याचे कसे फायदे होतात,
निर्णय कसे खंबीरपणे घेतले जाऊ शकतात, हे आपण अलिकडच्या काळात बघतोच आहोत.
देशात भाजपाच्या नेतृत्वाखालील बहुमताचे सरकार आहे. या सरकारचे नेतृत्व
करणार्या पंतप्रधान मोदी यांच्या काळात भारताची स्थिती आंतरराष्ट्रीय
पातळीवर मजबूत झाली आहे, शिवाय अतिरेक्यांना पाठबळ देणार्या पाकिस्तानला
एकाकी पाडण्यातही या सरकारला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. अशा या
खंबीर आणि गंभीर नेतृत्वामुळेच आज चीनला नमते घ्यावे लागत आहे. पाकिस्तान व
नेपाळची मदत घेऊन कुरापती काढत भारताला शह देण्याचा प्रयत्न करीत असलेल्या
चीनला भारताने हाँगकाँग, म्यानमार, फिलिपाईन्स आणि इतरही देशांना मदत करून
आपल्या बाजूने वळवून घेत काटशह दिला आहे. ही फार मोठी खेळी पंतप्रधान मोदी
सरकारने केलेली आहे. याचे कौतुक करून त्यांच्या पाठिशी राहण्याचे शहाणपण
विरोधकांनी दाखवले पाहिजे. राजकारण असले तरी ते देशापुरते मर्यादीत असले
पाहिजे. बाहेरचा शत्रू आल्यावर सगळ्यांनी एक व्हायचे असते हे काँग्रेसला
शिकवायची वेळ आली आहे.
आज चीनचा भारताबाबत जळफळाट होण्यामागे आणखी
एक विषय कारणीभूत आहे तो म्हणजे भारतात चिनी वस्तूंवरील बहिष्काराच्या
अवाहनाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद. चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे
आवाहन तसे भाजप सरकारच्या काळात अनेकवेळा झालेले आहे. गेल्या तीस वर्षातील
चीनची भारतीय बाजारपेठेतील घुसखोरी तशी चिंताजनकच होती. इतकी की अगदी आपले
सणसमारंभही चीनी शास्त्रानुसार होउ लागले होते. आपले ज्योतिष,
वास्तूशास्त्रही चीनी बाजारपेठेने खेचले होते. हा सांस्कृतिक हल्ला फार
भयानक होता. त्यामुळे चीनला कुठेतरी खिंडीत पकडण्याची गरज निर्माण झालेली
होतीच. आता ती संधी कोरोनाच्या निमित्ताने भारताला प्राप्त झाली असेल तर
त्याचा फायदा मोदी सरकार घेणे स्वाभाविक आहे. पण त्याचे राजकारण होणे
अपेक्षित नाही. आता कोरोनाच्या पृष्ठभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात
आले. त्यामुळे बहुतांश व्यवहार ठप्प पडले. आर्थिक घडी विस्कटली. रोजंदारीची
कामे करून हातावर कमावून खाणार्यांचे हाल झाले. कोरोनाची भीती आणि
बेरोजगारी यामुळे असंख्य मजूर व कामगारांनी आपापल्या गावांकडे पलायन केले.
त्यामुळे गावांवरील आर्थिक बोझाही आता वाढणार आहे. या सार्या पृष्ठभूमीवर
पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना आत्मनिर्भर होण्याचा
मंत्र दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्याप्रमाणे विदेशी वस्तूंची होळी
करण्यात आली होती आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले
होते, तशीच परिस्थिती आता उद्भवली आहे. शहरांप्रमाणेच गावांचीही
अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर स्वावलंबी होऊन स्वदेशी वस्तूंचा
अंगीकार करणे आवश्यक आहे. चिनी वस्तूंनी आज मोठ्या प्रमाणावर भारतीय
बाजारपेठ व्यापली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार
टाकण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणेच अलिकडेच पुण्यात रस्त्यांवर चादरी पसरवून
त्यावर चिनी वस्तू टाकण्याचे आवाहन करण्यात आले, नागरिकांनी त्याला
प्रतिसादही चांगला दिला आणि या चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. स्वदेशी
वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी हे आंदोलन आपल्या देशात राबविले जाणार असले
तरी त्यामुळे चीनचीही अर्थव्यवस्था डळमळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे
भारताबरोबर संबंध बिघडवणे चीनला परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना पडते
घेण्याशिवाय पर्याय नाही.
तरीही भारतावर दबाव वाढवून हे आंदोलन मागे
घेण्यासाठीही चीन काय काय करेल, हे सांगता येत नाही. आज सर्वसामान्य
वस्तूंप्रमाणेच भारतीय सणावारांच्या वस्तूही चीनने तयार करून भारतीय
बाजारपेठेत आणल्या आहेत. वस्तूंच्या कमी किमती आणि व्यापार्यांना मिळणारा
मोठा नफा यामुळे या वस्तूंनी बाजारपेठेवरही चांगला कब्जा मिळविला आहे. हे
सारे आपल्याला मोडून काढायचे आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी
आपल्यामुळे मजबूत होणारी इतर देशांची मुख्यत्वे करून चीनची अर्थव्यवस्था
खिळखिळी करायची आहे. त्यांचे पाकिस्तानला असलेले समर्थन आणि केली जाणारी
आर्थिक रसदही रोखायची आहे.
एकीकडे चीनकडून होणारे कोरोना, सीमावाद
असे हल्ले, दबावतंत्र तर दुसरीकडे पाकीस्तानी कारवायांना प्रोत्साहन देणे.
हे शस्त्र चीनने अवलंबले आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोर्यात
पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. भारतीय सैन्यही त्याला
प्रत्युत्तर देऊन गेल्या काही दिवसांपासून रोजच अतिरेक्यांचा खात्मा करीत
आहे. स्वत:चे सामर्थ्य वाढविणे, आपल्या देशाला विकसित करणे यापेक्षा
भारतासमोर अडचणी निर्माण करणे, हा जणू एक कलमी कार्यक्रम पाकिस्तानात, मग
सरकारचे कोणाचेही असो, राबविला जात आहे. या शेजार्याला आधी अमेरिकेचे पाठबळ
होते. आता मात्र अमेरिकेलाही पाकिस्तान काय चीज आहे, हे कळल्यामुळे
त्यांनी रसद बंद केल्यामुळे हा देश चीनच्या दावणीला बांधला गेला आहे. चीन
म्हणेल ती पूर्व दिशा, हेच त्यांचे धोरण आहे. पाकिस्तानप्रमाणेच
कोणेएकेकाळी सख्खा शेजारी असलेला नेपाळही आता भारताच्या कुरापती काढत आहे.
अर्थातच त्याला चीनचे पाठबळ आहे. त्यामुळे आता कोणत्या शेजार्यावर भरवसा
ठेवावा आणि कोणत्या नाही, अशा मन:स्थितीत भारत आला असला तरी मोदींसारख्या
खंबीर नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर डावपेच आखून या समस्यांमधून,
अडचणींमधून मार्ग काढता येईल, हे निश्चित आहे.
मात्र सरकारने जे निर्णय घेतले आहेत त्यात त्याला यश यायला लागले आहे हे नक्की.
कोरोना
रूग्णांचा वाढता आकडा, लोकांची होणारी गर्दी पाहता पुन्हा लॉकडाउन घोषीत
केला जाईल अशी भिती सध्या निर्माण केली जात आहे. कोणी नेतेमंडळीही तसे
संकेत देत आहेत तर आतल्या आवाजात अनेक लोक तशी शक्यताही व्यक्त करत आहेत.
पण राज्याला आणि देशाला आता पुन्हा कठोर लॉकडाऊन परवडणारा नाही, याचे भान
केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्यासोबतच नागरिकांनी ठेवण्याची नितांत
आवश्यकता आहे. आपल्याला यातून बाहेर पडायचे आहे आणि नव्याने सुखी जीवन सुरू
करायचे आहे याचे भान प्रत्येकाने राखले पाहिजे. त्यामुळे मिळालेल्या
किरकोळ सवलतीत कधी नवे ते मिळालं आणि गटकन गिळालं अशी अवस्था न करता थोडा
संयम बाळगणे गरजेचे आहे. आज जी गर्दी दिसत आहे त्याकडे पाहिल्यावर अनावश्यक
लोकच खूप गर्दी करत असल्याचे दिसून येते आहे.
जगभरात कोरोनाचे संकट
अजूनही घिरटया घालत आहे. जागतिक महासत्ता सोडाच, परंतु बडया बडया विकसित
देशांनाही कोरोनावर निर्णायक मात करता आलेली नाही. आपल्याकडे औषधे
निघाल्याचे, लसी सापडल्याचे दावे अनेकांनी केले आणि ते फोलही ठरले. कोणत्या
महिन्यात, कोणत्या वर्षात यावर लस सापडेल, हा रोग आटोक्यात कधी येईल
याबाबत रोज नवे दावे केले जात आहेत. पण सारेच कोरोना लसीच्या शोधात आहेत.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनांनी काही अटी नियम घालून
दिले आहेत. तोंडावर मास्क बांधा, सुरक्षित अंतर ठेवा, वारंवार हात साबणाने
धुवा अशा उपाययोजना करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनांनी दिल्या आहेत.
या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारने वारंवार केले
आहे.किंबहुना कोणालाही फोन लावला तर अगोदर दीड मिनिटापर्यंत ती रिंगटोन
ऐकूनही आता लोकांना कंटाळा आला आहे. गेले दोन अडीच महिने आपण कोणालाही फोन
लावला तर त्याच सूचना ऐकायला मिळत आहेत. कुठेही रस्त्यावर टीव्हीवर तेच
विषय चघळले जात आहेत. त्याच्याच जाहीराती होत आहेत. टीव्ही सुरू केला की
कोरोनापासून संरक्षण करण्याच्या जाहीराती अन फोन लावला की त्या सूचना तोंडी
ऐकायला मिळतात. म्हणजे यासाठी आम्ही लॉकडाउन झालो का? लोकं टिव्ही पहात
नव्हते म्हणून सक्तीच्या जाहीराती पाहण्यासाठी हा लॉकडाउन करून आम्हाला
डांबून ठेवले आहे काय? असंख्य प्रश्न आहेत. कारण माणसं लॉकडाउनला जाम
वैतागली आहेत. त्या वैतागाचा विस्फोट झाला तर तो रोखणे अवघड आहे. म्हणूनच
आता लॉकडाअन नको रे बाबा म्हणायची वेळ आलेली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव
वाढू नये, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. दोन
महिन्यांच्या काटेकोर अंमलबजावणीनंतर हळू हळू लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करून
देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न आहे. या कोरोनाने
नागरिकांचे केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आणले नाही तर त्यांचे
आर्थिक आरोग्यही धोक्यात आणले आहे. या दुहेरी संकटांची कोंडी फोडण्याचे
प्रयत्न सर्वच स्तरातून सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लॉक डाऊनमध्ये
टप्प्याटप्प्याने सूट देण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली आहे.
कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावे
लागणार आहे. जे सरकार अतिशय सावधतेने पावले टाकत असून कुठेही गडबड न करता
लॉक डाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथीलता आणण्यात येत आहे. तथापि, अनलॉक
होताच रस्त्यावर, बाजारांमध्ये लोकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. ही
उघडीप जीवघेणी ठरतेय असे वाटले तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा
लागू शकतो, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. म्हणूनच आता
कोंडून घेण्याची वेळ येउ नये असे वाटत असेल तर विनाकारण घराबाहेर
पडणारांनी, गर्दी करणारांनी थोडा संयम ठेवला पाहिजे.
घराबाहेर पडताना
मास्क वापरणे, शारीरिक सुरक्षित अंतर राखणे आणि स्वच्छता राखणे ही
त्रिसूत्रीच कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे, असे
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, मुंबईकरांची गरज लक्षात घेता,
उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याची अपेक्षाही त्यांनी रेल्वे मंत्रांकडून
व्यक्त केली आहे. राज्यात आणि देशात कोरोना मुक्तीची पहाट व्हावी, याबद्दल
कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. राज्यासह देशात कोरोना मुक्तीची पहाट होत
असताना, नागरिकांना भेडसावणार्या प्रश्नांकडेही डोळसपणे पाहण्याची गरज
निर्माण झाली आहे. आज माणसं घरी आहेत, मुलं घरी आहेत. शाळा कॉलेजचा पत्ता
नाही. अशा अवस्थेत किती दिवस आपण बसणार आहोत? म्हणूनच लॉकडाउन पूर्णपणे
उठण्यासाठी आता अनावश्यक फिरणारांनी याची काळजी घेतली पाहिजे. राज्य आणि
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना नोकरीत
रुजू होण्याचे आदेश एकीकडे देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या अत्यावश्यक
सेवेतील कामगार, कर्मचार्यांनी आपल्या कार्यालय आणि कचेरीत पोहोचायचे कसे,
हाच रोकडा सवाल आहे. मुंबईतल्या नरिमन पॉईंट भागात मंत्रालय, विधानसभा
आहे. फोर्ट भागात महानगरपालिकेचे मुख्यालय आहे. बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली
कल्याण, वसई विरार या भागात राहत असलेल्या अत्यावश्यक सेवेतील
कर्मचार्यांना मुंबईच्या दक्षिण टोकाकडे असलेल्या या कार्यालयांमध्ये
पोहोचण्यासाठी बेस्ट बसेस आणि एसटीला दोन - दोन चार - चार तास लागणार
असतील, या प्रवासात सुरक्षित अंतर राखले जाणार नसेल तर त्याचा फायदा ना
कामगारांना ना सरकारला. उलट अशा द्राविडी प्राणायामातून कोरोनाचा
प्रादुर्भाव वाढण्याचा धोका अधिक. अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील कामगारांना
त्यांचे घर आणि कार्यालय यामध्ये ये जा करण्यासाठी बेस्ट आणि एसटी बसेस
अपुर्या ठरत आहेत. या बसेसमध्ये अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील कामगारांची
प्रचंड गर्दी उसळत आहे. त्यामुळे सुरक्षित अंतराच्या नियमांचे तीन-तेरा
वाजत आहेत. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस यांना
एकीकडे कोविड योद्धा म्हणून गौरवायचे आणि दुसरीकडे त्यांच्या
येण्याजाण्याच्या हाल-अपेष्टांकडे दुर्लक्ष करायचे, हे काही बरोबर ठरणार
नाही. अत्यावश्यक सेवेतील कामगार-कर्मचार्यांना भेडसावणार्या मूलभूत
प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कोरोना विरुद्धची लढाई लढता येणार नाही. एकीकडे
नोकरी जाण्याचे तर दुसरीकडे कोरोना होण्याचे भय अत्यावश्यक सेवेतील कामगार
कर्मचार्यांना परवडणारे नाही. अत्यावश्यक सेवेतील या कर्मचार्यांना आपला
जीव धोक्यात घालून गर्दीतून प्रवास करण्याची काही हौस नाही, हेही
सत्ताधार्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवा क्षेत्रातील
कामगार आणि कर्मचार्यांसाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा टप्प्याटप्प्याने सुरू
करणे हाच योग्य उपाय आहे. तेव्हा केंद्र सरकारने विशेषतः रेल्वे
मंत्रालयाने या उपायाची तातडीने अंमलबजावणी करणे देशहिताचे ठरेल. त्याच
बरोबर तोंडावर मास्क आणि शारीरिक सुरक्षा न पाळणार्या चुकार नागरिकांवर
कठोर कारवाई केली जाणे आवश्यक आहे. राज्याला आणि देशाला आता पुन्हा कठोर
लॉकडाऊन परवडणारा नाही, याचे भान केंद्र सरकार आणि राज्य सरकार
त्यांच्यासोबतच नागरिकांनी ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आता पुढचे
लॉकडाउन लागले तर फार वाईट अवस्था असेल. तीच ती परिस्थिती पुन्हा नको असेल,
नव्या संकटांना तोंड द्यायला नको यासाठी आता आपण सावध राहिले पाहिजे.
गेल्या
काही दिवसांपासून महाराष्ट्रातील त्यातही विशेषत: मुंबई, ठाणे आणि
पुण्यातील कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वाढते आहे. ही चिंतेची बाब आहे.
माध्यमांनी या वाढत्या रूग्णसंख्येचा इतर देशांशी तुलना करायला सुरूवात
केली. महाराष्ट्रात चीनपेक्षा जास्त रूग्ण, महाराष्ट्रात अमेरिकेपेक्षा
जास्त रूग्ण वगैरे वगैरे. पण आपली लोकसंख्याच जास्त असल्याने ती
रूग्णसंख्याही जास्त असणे क्रमप्राप्त आहे. पण त्याचा विचार न करता
एकप्रकारची भिती निर्माण केली जात आहे.
आता मुंबई, ठाण्यातील सरकारी
दवाखान्यात कोरोना रुग्णांना ठेवायला बेड्स उपलब्ध नाहीत, त्यामुळे
रुग्णांना प्रवेश नाकारला जात आहे. ज्यांना कोरोनाशिवाय इतर आजार आहेत, अशा
रुग्णांचे अत्यंत दुर्दैवी हाल होत आहेत. याविषयीचे सत्य सांगणारा
मनसेच्या संदीप देशपांडेचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सध्या
महाराष्ट्रातील खासगी दवाखान्यातील 80 टक्के बेड्स कोरोना रुग्णांच्या
उपचारासाठी सरकारने ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जाते, तर बांद्रा
कुर्ला कॉप्लेक्स आणि इतर काही मैदानात सुमारे एक हजार बेड्सची उपलब्धता
असल्याचेही वारंवार समोर आणले जात आहे. ठाण्यातील जोशी बेडेकर कॉलेजची
इमारतही कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ठाणे पालिकेने नुकतीच ताब्यात घेतली
आहे. ही परिस्थिती जरी भयावह असली तरी त्यातील सकारात्मक बाजू कोणतेही
चॅनेल दाखवत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. म्हणजे 36 पैकी 27 जिल्ह्यात
रूग्णांचा रिकव्हरी रेट हा 50 टक्केपेक्षा अधिक आहे ही सकारात्मकता दाखवणे
गरजेचे आहे. एकुणच भारतात बर्या होणार्या रूग्णांचा आकडा हा उपचार
घेणार्या रूग्णांपेक्षा कित्येक हजारांनी जास्त आहे हे सांगायला हवेच. पण
केवळ भिती घातली जात आहे. या भितीमुळे मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी जाहीर
करावे लागले की लॉकडाउन वाढवलेला नाही. सोशल मिडीयावरून तशा पोस्ट व्हायरल
होउन 15 तारखेपासून लॉकडाउन वाढवला असल्याचे सांगितले जात होते.
मुख्यमंत्री जे बोललेच नाहीत त्याचीही चर्चा होत होती. हे रोगापेक्षा भयंकर
आहे.
त्यातच कोरोना रूग्णांना वाईट वागणूक दिली जात असल्याबाबत
सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत सरकारचे कान उपटले आहेत. त्यामुळे
नेमके काय चालले आहे हेच सामान्य माणसाला समजेनासे झालेले आहे.
म्हणजे
आज महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांच्या इमारती
सध्या कोरोनाच्या उपचारासाठी वापरल्या जात आहेत. असे असूनही रुग्णांंना
उपचारासाठी एक तर प्रवेश नाकारला जातो आहे किंवा जिथे कोरोनाबाधीत मृतदेह
ठेवले आहेत, त्यांच्याच शेजारी रुग्णांवर उपचार केल्याचे प्रकारही उघडकीस
आले आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण हॉस्पिटलमधून गायब होत असल्याच्या घटना घडत
आहेत.
कोरोनासारख्या साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारला
वेळोवेळी योग्य त्या सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
कोरोनाचे संकट आहे, सरकारला मदत केली पाहिजे म्हणून चुका दिसत असूनसुद्धा
सलग दोन-अडीच महिने विरोधी पक्ष चूप राहिला, तरीदेखील सरकारला जाग आलेली
नाही. एकीकडे सरकार योग्य ती काळजी घेत असल्याचे चित्र निर्माण केले जात
आहे, तर दुसरीकडे कोरोना नाही पण सरकारी दुरावस्थेमुळे मृत्यूला सामोरे
जाण्याचे दुर्दैव अनेकांना अनुभवायला मिळते आहे. कोरोनामुळे होणार्या
मृत्यूची संख्या देशभरात कमी असली तरी ती महाराष्ट्रात अधिक आहे. त्यामुळे
केंद्र सरकार महाराष्ट्रात काही नवीन घोषणा करेल अशीही भिती घातली जात आहे.
पण यात एकुणच शिक्षण, करीअर, रोजगार याचे वांध झालेले आहेत.
एकीकडे
कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे ठोस
औषध अद्याप उपलब्ध झालेले नाही. केवळ चाचण्या सुरु आहेत, सरकार यावर
कोणतेही भाष्य करायला तयार नाही. कोरोना रुग्ण आणि त्यांच्या
नातेवाईकांसोबत अत्यंत अपमानास्पद व्यवहार सुरु आहेत. सरकारी दवाखान्यात
नेमके किती रुग्ण दाखल होतात, त्यापैकी किती बरे होतात आणि कितीजणांचा
मृत्यू होतो याबाबतची सत्यता लपवली जात आहे. मुंबईतून अधिकृत आणि
अनधिकृतपणे पॉझिटिव्ह रुग्ण गायब होत असल्याचे समोर येते आहे. विशेष म्हणजे
चाचणी निगेटीव्ह की पॉजीटीव्ह याचा काहीच परिणाम होत नाही. एकेठिकाणी
निगेटीव्ह तर दुसरे ठिकाणी पॉजीटीव्ह येते. खुद्द मंत्री असलेल्या धनंजय
मुंडे यांचीही चाचणी अगोदर पॉजीटीव्ह होती पण त्यांना कोरोनाची लागण
झाल्याचे जाहीर केले गेले. त्यामुळे एकुणच या रोगाबाबत संभ्रमावस्था कायम
राहिलेली आहे.
या रोगाची विनाकारण भिती घेतली आहे. हा रोग झाला म्हणजे
जणू आपण संपलोच असा प्रकार होताना दिसत आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी
मुंबईत उपचारार्थ दाखल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने दवाखान्यातून पळ
काढला आणि त्याचा अपघातात मृत्यूही झाला. याशिवाय परस्पर रुग्णांची आणि
मृतदेहांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोन अॅम्ब्युलन्स चालकांवरही गुन्हे
दाखल करण्यात आले आहेत. हा सगळा सावळा गोंधळ आहे. एकीकडे सरकारी दवाखान्यात
रुग्णांसाठी जागा नाहीत अन् ज्यांनी मोठ्या दानशूरपणे आपली खासगी
हॉस्पिटल्स, हॉटेल्स पालिकेला वापरण्यास हस्तांतर केलीत त्यांनी आता
अव्वाच्या सव्वा भाडे मागणीचा तगादा सुरु केला आहे. खासगी दवाखान्यात
कोरोनाच नाही, तर इतर आजारानेही दाखल होण्यास विलंब होतो आहे. प्रत्येक
रुग्णाकडे कोरोनाच असेल या संशयाने पाहिले जाते आणि वैद्यकीय उपचाराचे
शुल्कही वाढवले जाते. नुकतेच हायकोर्टाने याबाबत निर्देश दिले होते की, या
काळात खासगी दवाखान्यांच्या शुल्कावर नियंत्रण आणले जावे, संपूर्ण
राज्यातील खासगी दवाखान्यांनी एकच एक शुल्क आकारावे. मात्र सध्या एक तर
खासगी दवाखाने बंद आहेत, तेथे फक्त ओळखीच्या रुग्णांवरच उपचार केले जातात.
प्रत्येकच दवाखान्यात शुल्क वाढवण्यात आले आहेत. कोरोना उपचाराबाबत दर
दिवशी 5 ते 7 हजारापेक्षा अधिक रक्कम आकारली जावू नये असे आदेश असताना
दिवसाला 15 ते 25 हजार इतके शुल्क आकारले जात आहे.
एकट्या
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने चीनलाही मागे टाकले आहे.
त्यातच मुंबई-पुण्यासह राज्यातील इतर अनेक ठिकाणी वाढत असलेली कोरोना
रुग्णांची संख्या आरोग्य यंत्रणेसमोर नवी आव्हाने उभी करत आहेत.
आता
पावसाळा सुरु झाला असून येत्या एक दोन दिवसात राज्यात मुसळधार बरसण्याचा
अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. ज्या मैदानात कोरोना उपचारार्थ बेड्सची सोय
केली आहे, ती मैदाने पावसाळ्याला तोंड देण्यास सक्षम आहेत का? ऐन
पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणारे साथीचे आजार आणि कोरोनाचे रुग्ण या सर्व
पातळीवर सक्षमपणे लढा देण्यासाठी खरेच मुंबई पालिका आणि राज्यातील आरोग्य
यंत्रणा सक्षम आहे का? राज्यात सर्वत्रच तुंबलेले कचर्याचे ढीग, सफाई
कामगारांना देण्यात येणार्या अपुर्या सुविधा अशा अनेक प्रश्नांची मालिका
सध्या अनुभवायला मिळते आहे.
डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सुरक्षा रक्षक
आणि दवाखान्याशी संबधित कार्यरत असणारा कर्मचारी विभाग यांना योग्य आणि
परिपूर्ण सुविधा देण्यास अद्यापही राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आजही अनेक
टिकाणी या वर्गात असंतोषाचे वातावरण आहे.
हा गोंधळ संपवला पाहिजे. या
रोगाची मुंबईत, महाराष्ट्रात, देशात नक्की काय परिस्थिती आहे, तो कधी
आटोक्यात येईल याची खरी, सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे. हे जे घोषणांचे
आणि अफवांचे पिक पिकत आहे त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. याला कुठेतरी आळा
बसला पाहिजे. त्याशिवाय ही परिस्थिती सुधारणार नाही. लोकांना करोनापेक्षा
घाबरवून मारण्याचे तंत्र विकसीत केले गेले आहे ते बंद झाले पाहिजे.
आज
15 जून. शैक्षणिक वर्षांच्या नियोजनाप्रमाणे दरवर्षी 15 जूनला शाळा सुरू
होतात. पण आज कोरोनाच्या संकटामुळे शाळा आणि शिक्षणाचे भवितव्यच अंध:कारमय
झालेले आहे. एक ज्येष्ठ नागरिक नुकतेच बोलताना म्हणाले होते की जेंव्हा या
देशात प्लेगची साथ आली होती. तेंव्हा या देशातील शाळा तीन वर्ष बंद ठेवल्या
होत्या. तशाच आता दोन वर्ष शाळा बंद ठेवल्या तर सगळे ठिक होईल. पण ही
कल्पनाच किती भीषण आणि भयावह आहे. कारण सव्वाशे वर्षांपूर्वीचा काळ आणि
आजचा काळ यात फरक आहे. तेंव्हा शालेय शिक्षणाला फारसे महत्व नव्हते. घरगुती
कामे करता आली की सगळे जमले अशा विचाराची माणसे तेंव्हा होती. पण आज तशी
परिस्थिती नाही. आज शिक्षण ही अत्यावश्यक बाब झालेली आहे. विकासाचा आणि
प्रगतीचा शिक्षण हा एक पाया आहे. या पायालाच आपण धक्का देणार आहोत काय हा
खरा प्रश्न आहे. म्हणूनच आता शिक्षणाचे नेमके काय होणार याचा विचार केला
पाहिजे.
आज कोरोना किंवा कोविड 19 मुळे शिक्षण क्षेत्रात उद्भवलेल्या
अभूतपूर्व पेचप्रसंगामुळे जगभरातील विद्यार्थी-पालकांपासून
धोरणकर्त्यापर्यंत अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. या क्षेत्रात निर्माण
झालेल्या एकूणच अनिश्चित वातावरणामुळे प्राथमिक ते उच्चशिक्षण घेणाऱया
कोट्यवधी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षण हे
असे एक प्रभावी हत्यार आहे की ज्याचा वापर जग बदलण्यासाठी केला जाऊ शकतो,
अशा आशयाचे विधान नेहमी केले जाते. पण सध्या एका विषाणूनेच संपूर्ण जग
बदलून टाकल्याने कोरोनानंतरच्या शैक्षणिक जगाचा विचार करता या हत्याराला
आता नव्याने धार लावण्याची वेळ आली आहे. जगभरातील दोनशेहून अधिक देशांमधील
शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे गेले चार महिने ठप्प आहेत. परीक्षांचे
तर बाराच वाजले आहेत. विद्यापीठ परीक्षा, विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश
परीक्षा, स्पर्धा परीक्षा याबाबत आजही विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. कोरोनाचा
धोका अजूनही कायम आहे. कोणत्या दिशेला सर्व व्यवस्था निघाली आहे, हे समजत
नाही. शाळा कधी सुरू होणार, त्यांची कार्यपद्धती काय राहणार याबाबत
सर्वांच्या मनात प्रश्नचिन्ह कायम आहे. जवळजवळ 50 टक्क्याहून अधिक देशांनी
शाळा सुरू करण्याच्या अद्याप तारखाच जाहीर केल्या नाहीत. समजा सुरू झाल्या
तर पुन्हा समूह संसर्गाचा धोका कायम. याच पार्श्वभूमीवर जगातील 30 हून अधिक
देशांनी पुढील शैक्षणिक वर्ष ऑनलाईन घेणे पसंत केले आहे. पण हे
भारतासारख्या विषम परिस्थिती असलेल्या देशात कसे शक्य आहे हेच समजत नाही.
म्हणजे हवामान, आर्थिक परिस्थिती, विकास या सगळ्याच बाबतीत इथे इतकी
पराकोटीची विषमता आहे की ऑनलाईन शिक्षण हे इथे इतक्या पटकन रूजणे अवघडच
वाटते.
एकमात्र निश्चित की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड
पडला तर भविष्यात त्याची फार मोठी किंमत जगाला चुकवावी लागेल. सध्याच्या
गोंधळलेल्या परिस्थितीत कोटयवधी गरीब मुले पुन्हा शाळेत गेली नाहीत तर ती
शिक्षण प्रवाहातून कायमची बाहेर फेकली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. एका
पाहणीनुसार, शाळा बंद असल्याने सध्या तब्बल 37 कोटी मुले शालेय भोजनापासून
वंचित आहेत. जगभरातील निम्म्या मुलांच्या घरी संगणकाची सुविधा नसल्याने
ऑनलाईन वर्गाला देखील मोठे आव्हान आहे. परिस्थिती गुंतागुतीची आणि
आव्हानात्मक आहे. म्हणूनच यांचे भवितव्य काय हा खरा प्रश्न आहे. परंतु
सामाजिक समानता आणि आपल्या मूलभूत हक्कांबाबत जाणिवा निर्माण करण्यासाठी
शिक्षण हे आवश्यकच आहे. जगभरात अशी कठीण परिस्थिती असताना आपल्या पण
देशातील तब्बल 30 कोटी विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या अनिश्चिततेच्या
भोवर्यात अडकले आहे. परीक्षा कशा घ्यायच्या आणि शाळा सुरू करण्याबाबत
विविध राज्य सरकारांमध्ये संभ्रम व एकसमान धोरण नसल्याने विद्यार्थी आणि
पालक गोंधळून गेले आहेत. आर्थिक व सामाजिक भवितव्यामध्ये महत्त्वाची भूमिका
बजावणाऱया उच्च शिक्षणातील विद्यार्थी वर्गाला याचा लक्षणीय फटका बसला
आहे. एकूणच आपल्या शैक्षणिक धोरणाविषयी फार काही चांगले लिहावे अशी
परिस्थिती नाही. सध्या देशातील तब्बल 4 कोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची
परीक्षा विविध प्रश्नांच्या आणि शंका-कुशंकाच्या भेंडोळयात अडकली आहे.
काही शैक्षणिक संस्थांनी परीक्षाच न घेण्याचा, काहींनी ऑनलाईन तर काहींनी
जुलै-ऑगस्टमध्ये लेखी परीक्षा घेण्याचा मनोदय जाहीर केला आहे. कोविड
विषाणूपेक्षा विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबतच्या अनिश्चित आणि धरसोड धोरणाची
सध्या जास्त धास्ती घेतली आहे. मुळात परीक्षेला सामोरे जावे लागणार की
नाही? परीक्षेचा निर्णय झाल्यास ऑनलाईन की ऑफलाईन होणार? रद्द झाल्यास
निकाल कसा देणार? मागील सत्रातील परीक्षेमधील गुणांची सरासरी काढून की
श्रेणी तत्त्वावर? किंवा त्या परीक्षेतील गुणांवर आधारित विद्यार्थ्याला
उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण ठरवणार? अशा प्रकारे जर शंभर टक्के निकाल लागला
तर त्याची गुणवत्ता कशी असणार आहे? त्यामुळे एकुणच सगळो गोंधळ झालेला आहे.
आज ऑनलाईन परीक्षेसाठी दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या
इंटरनेट कनेक्शनचे काय? त्यांच्याकडे संगणक, लॅपटॉप व स्मार्टफोनची सोय
असणार आहे का? विद्युत पुरवठयाची हमी कोण घेणार? लेखी परीक्षा झाल्यास रेड
किंवा कन्टेंमेंट झोनमधील विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचणार कसा असे
अनंत प्रश्न परीक्षा या मुद्याभोवती घोंघावत आहेत.
आता महाराष्ट्र
शासनाने अंतिम वर्षाची परीक्षा न घेण्याचे जाहीर केले. गुणांच्या सरासरीवर
निकाल देण्याची घोषणा केली. कुलपती या नात्याने अशा प्रकारचे निर्णय
घेण्याचा आपला अधिकार असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला
खडसावले. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सत्तासंघर्ष परीक्षा
मुद्याभोवती उफाळून आला. विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाची परीक्षा न
घेतल्यास त्याचे भवितव्य धोक्यात येईल असा इशारा राज्यपालांनी दिला. या
निमित्ताने राज्यातील परीक्षा धोरणातील मतभेद आणि गोंधळ उघड झाला. हे सगळे
शिक्षणातील अंदाधुंदी माजल्याचे प्रकारच आहेत.
यंदाच्या शैक्षणिक
वर्षापासून ऑनलाईन शिक्षण देणारा निर्णय राज्याच्या शालेय विभागाने घेतला.
प्रत्येकाकडे जणू लॅपटॉप, संगणक व इंटरनेट सेवा उपलब्ध आहे, असे गृहित धरून
हा निर्णय झाला. प्रगत शैक्षणिक धोरण राज्यांनी स्वीकारले पण प्रत्यक्षात
आजही कित्येक जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्षात साधे संगणकही
नाहीत. शिक्षकांना ऑनलाईन शिकवण्याचा गंध नाही. अशी अवस्था असताना ऑनलाईन
शिक्षणाचे धोरण कसे राबवणार. इकडे कर्नाटक सरकारने पहिली ते पाचवीपर्यंत
ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय रद्द केला. मुळातच सहा वर्षाखालील मुलांचा
स्क्रीनटाईम एक तासापेक्षा कमी आहे. त्यांची मानसिक स्थिती पाहता या
मुलांना ऑनलाईन शिक्षण देणे धोक्याचे आहे, अशी शिफारस जागतिक आरोग्य
संघटनेने केली आहे. वास्तविक, विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून शैक्षणिक धोरण
आखायला हवे पण आपल्याकडे हे घडताना दिसत नाही. परीक्षा आणि शैक्षणिक
वर्षाबाबत प्रत्येक राज्य आपापल्या सोयीनुसार निर्णय राबवत असून परिणामी
गोंधळ अधिकच वाढत चालला आहे. शिक्षण ही केंदाची व राज्याची संयुक्त
जबाबदारी आहे. धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्याचा अधिकार केंद्राला तर
प्रशासकीय पातळीवरचे निर्णय राज्य घेते. शैक्षणिक व्यवस्थेतील फोलपणा
कोरोनाने दाखवून दिला. यासाठी एकसमान आणि बहुआयामी धोरण आवश्यक असून शिक्षण
व्यवस्था अधिक बळकट करण्याचा इशारा कोरोनाने दिला असून यामधून काहीतरी धडा
घेणे आवश्यक आहे. पण दरवर्षी 15 जूनला सुरु होणारी शाळा यावर्षी उघडण्याचे
कोणतेही चिन्ह नाही. सगळेच भवितव्य अंधारात गेले आहे.