मानवी इतिहासातील सर्वात मोठी आणि भयंकर महामारी असलेल्या कोरोनाचा सामना करणाºया जगावर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) या आणखी एका नव्या चिनी विषाणूच्या संसर्गाच्या वृत्ताने जगाला चिंतेने ग्रासले आहे. लोकांमध्ये भीती, धाक, अराजकता आणि गोंधळाचे वातावरण माजवण्याचे काम सुरू आहे. कोविड-१९ आणि इतर श्वसन विषाणूंप्रमाणे, एचएमपीव्ही खोकला, शिंकणे आणि संक्रमित लोकांच्या जवळच्या संपर्कामुळे निर्माण होणाºया थेंब किंवा एरोसोलद्वारे पसरतो. ताप, श्वास लागणे, नाक बंद होणे, खोकला, घसा खवखवणे आणि डोकेदुखी ही त्याची सामान्य लक्षणे आहेत. परंतु या संसर्गामुळे काही रुग्णांना ब्राँकायटिस आणि न्यूमोनियाचा त्रास होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एचएमपीव्हीविरुद्ध कोणतीही लस किंवा प्रभावी औषध नाही आणि उपचार हे मुख्यत: लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी आहेत. चीनमध्ये श्वसनाच्या आजारांच्या वाढत्या प्रकरणांच्या अहवालानंतर भारत सरकारने सतर्कता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेला परिस्थितीबाबत वारंवार अपडेट देण्याची विनंती केली आहे. पण यात नेमके तथ्य किती आहे हे तातडीने समोर येणे आवश्यक आहे. जगाला घाबरवणारे हे एखादे कांड, षड्यंत्र नाही ना? एखादा मेडिकल किंवा फार्मास्युटिकल कंपन्यांचा पैसे कमावण्याचा काही डाव नाही ना याचाही शोध घ्यावा लागेल. दर पाच वर्षांनी असे नवे विषाणू निर्माण करून जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी करायची, आर्थिक दरी निर्माण करायची, अनेकांनी बेरोजगार व्हायचे आणि मूठभर यंत्रणेने भ्रष्ट मार्गाने कमवायचे असे काही यात आहे का हे तपासावे लागेल.
नवीन वर्षात प्रवेश करण्याच्या शुभ मुहूर्तावर, अचानक आलेल्या या साथीच्या बातमीने जग हादरले आणि भयभीत झाले. कारण कोविड-१९ महामारीच्या पाच वर्षांनंतर चीन सध्या या नवीन विषाणूशी झुंज देत आहे. या विषाणूने चीनमध्ये हजारो लोकांना आपल्या कवेत घेतले आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे, रुग्णालयाबाहेर रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. मात्र, प्रत्येक वेळीप्रमाणेच चीनने प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे. बदलत्या हवामानाचा हा परिणाम आहे. थंडी वाढल्याने सामान्यत: लोकांना खोकला आणि सर्दीचा त्रास होतो. हवामानामुळेही हे घडत आहे. चीनच्या राज्य प्रसारक सीसीटीव्हीने अहवाल दिला आहे की, डिसेंबरच्या अखेरीस चिनी सीडीसी डेटानुसार १४ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या प्रकरणांमध्ये एचएमपीव्हीचा सकारात्मक दर अलीकडे वाढला आहे. लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक एचएमपीव्ही विषाणूमुळे जास्त प्रभावित होतात. चीनसोबतच जगातील अनेक भागांतून या साथीच्या आजाराने त्रस्त लोकांच्या बातम्या येत आहेत. चीनचा धोकादायक व्हायरस भारतातही पोहोचला आहे. ठिकठिकाणची रुग्णालये सज्ज असल्याच्या बातम्या येत आहेत. या अहवालांवर विश्वास ठेवला तर, बंगळुरूमध्ये ८ महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्ही विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. मुलाची रक्त तपासणी केल्यानंतर हा दावा करण्यात येत आहे. भारतातील एचएमपीव्ही विषाणूची ही पहिलीच घटना आहे. त्यापाठोपाठ नागपूर, मुंबईत अशा रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आले. हे एकाएकी कसे घडते?
चीनमधील सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, इन्फ्लूएंझा ए, एचएमपीव्ही, मायकोप्लाज्मा न्यूमोनिया आणि कोविड यासह अनेक विषाणू पसरत आहेत. अहवालात दावा करण्यात आला आहे की, एचएमपीव्ही प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे अचानक मृत्यूचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे आणि ४० ते ८० वर्षे वयोगटातील लोक विशेषत: प्रभावित झाले आहेत. चीनच्या जबाबदार एजन्सी या विषाणूचे दुष्परिणाम कमी करण्यात गुंतल्या आहेत आणि चीन या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात चीनलाही काही प्रमाणात यश आले आहे. पण ते इतर देशांमध्ये पसरण्यापासून रोखू शकले नाही. पण या वेळी सावध चीन मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारले आणि आपल्या देशातील कोणत्याही संशयिताला इतर कोणत्याही देशात जाऊ देणार नाही, अशी अपेक्षा केली पाहिजे. हा जर काही षड्यंत्राचा भाग असेल, तर आता लहान मुलांना लक्ष्य केले जात आहे का याचाही तपास होणे गरजेचे आहे. आपण तिसºया क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पाहत असताना असे नवे संकट आपल्याला पुन्हा मागे घेऊन जाईल. त्यासाठी यातील सत्यता काय आहे हे वेगाने समोर येणे गरजेचे आहे.
याबाबत चीनने स्पष्टपणे काहीही सांगितले नाही, परंतु असा अंदाज आहे की, गंभीर प्रकरणांमध्ये लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी हॉस्पिटलायझेशन, आॅक्सिजन थेरपी किंवा कॉर्टिकोस्टेरॉईड उपचार आवश्यक असू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेवर विश्वास ठेवला तर आॅक्टोबर महिन्यापासून या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. हा रोग हंगामी असल्याचे सिद्ध झाले आणि लोकांच्या जीवनावर कमीत कमी परिणाम झाला तर चांगले होईल. कोरोना महामारी मोठ्या विनाशाचे कारण बनली होती, तशी ही आपत्ती ठरू नये ही अपेक्षा आहे.
कोरोना महामारीमुळे चीनची प्रतिष्ठा खूप घसरली होती, जगभरातील लोकांच्या आरोग्यावर हल्ला करणारा चीन जगाच्या नजरेतून घसरला होता. शेवटी, चांगल्या मालाची, तंत्रज्ञानाची आणि उपकरणांची निर्यात करताना चीन महामारीचा निर्यातदार का झाला? असा प्रश्न यातून निर्माण झालेला होता. चीन वारंवार कोणत्या ना कोणत्या महामारीला बळी पडत आहेत आणि संपूर्ण मानवजातीला त्याचा त्रास होत आहे, त्यामुळे ही गंभीर बाब आहे. कोरोना महामारीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका समाधानकारक नव्हती. कोरोना महामारीची भीषणता असतानाही ते चीनप्रती उदार राहिले. त्यामुळे एचएमपीव्ही साथीच्या संदर्भात कोण गांभीर्य दाखवून पुरेशी पावले उचलणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी चीनला योग्य प्रश्न विचारले असते तर या रोगाचा संभाव्य धोका आटोक्यात आणता आला असता. भारतातील आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले की, एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, ज्यामुळे सर्दीसारखी लक्षणे दिसून येतात. काही लोकांना, विशेषत: वृद्ध आणि लहान मुलांमध्ये फ्ल्यूसारखी लक्षणे असू शकतात. पण हे काही गंभीर किंवा चिंताजनक नाही, असे सांगून डॉ. गोयल यांनी एचएमपीव्ही विषाणूची दहशत कमी केली असली तरी, या महामारीबाबत सरकारही सतर्क आहे, परंतु तरीही या नवीन विषाणूच्या संकटाचा सामना करण्यास सावध असले पाहिजे. एकविसाव्या शतकातील पहिले रौप्यमहोत्सवी वर्ष एका नवीन विषाणू साथीच्या रूपाने जागतिक शोकांतिकेने सुरू होणे दु:खद आहे. तसेच याची भीती घालून सर्वसामान्यांना तणावाखाली ठेवणे अधिक वाईट आहे, म्हणून सगळे सत्य समोर येणे गरजेचे आहे.
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा