लोकल मीडिया म्हणजे लोकलमधून नियमित प्रवास करणारे प्रवासी. घडणाºया घटनांवर ते जे रोज आपल्या डब्यात बसून चर्चा करत असतात, तो मीडियाही तसा प्रभावी आहे. आपल्याकडे प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडियाची नेहमीच चर्चा होते, पण या लोकल मीडियात होणाºया चर्चांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही, किंबहुना हा एक मीडिया आहे, याचीच जाणीव कोणाला नसते. टीव्ही वाहिन्यांवरील रटाळ आणि भांडखोर चर्चांपेक्षा लोकलमध्ये बिनधास्त मते मांडणारे प्रवासी खरोखरच खूप छान मते मांडत असतात, म्हणून हा मीडिया खºया अर्थाने मुद्रित माध्यमाप्रमाणे विश्वासार्ह आहे, असे म्हणायला हरकत नाही.
आपल्याकडे सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअॅप, एक्स किंवा ट्विटर, टिकटॉक अशांवर खूप चर्चा होते. तिथे कसलेच बंधन नसल्याने वाटेल ते बोलले जाते, पण लोकलमध्ये होणाºया चर्चा या मात्र सामान्यांना भोवतील अशा असतात, म्हणून हा माहीत नसलेला नवा मीडिया फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याकडे अफवा पसरवायला व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक पुरेसा आहे, पण तेवढीच ताकद लोकलने नियमित प्रवास करणाºया प्रवाशांच्या गप्पांमध्ये आहे, याची जाणीव आमच्या राजकीय पक्षांना झाली, तर ते नक्कीच लोकलने प्रवास करायला लागतील आणि प्रवाशांशी संपर्क साधतील, म्हणजे किती सहजपणे आमच्या लोकलमधील प्रवासी खोटेपणाचा बुरखा उतरवतात पाहा.
केंद्रात यूपीए सरकार असताना काही वर्षांपूर्वी राहुल गांधींचा मुंबई दौरा होता. त्यावेळी त्यांनी लोकलमधून प्रवास केला होता. घाटकोपरला आले. तिथे एटीएममधून पैसे काढले. रांगेत उभे राहून तिकीट काढले. लोकलमध्ये शिरले. सगळा मीडिया, पत्रकार कौतुक करत होते. किती साधे आहेत राहुल गांधी, वगैरे, वगैरे, पण आमच्या लोकलमधून प्रवास करणाºया प्रवाशांना यातील खोटेपणा लगेच लक्षात आला. राहुल गांधी उतरून बाहेर पडल्यावर लगेच चर्चा सुरू झाली.
एक प्रवासी : किती साधे आहेत ना राहुल गांधी?
दुसरा प्रवासी : का? काय केले विशेष त्यांनी?
तिसरा प्रवासी : तिकीट काढून प्रवास केला.
चौथा प्रवासी : तेही रांगेत उभे राहून.
पाचवा प्रवासी : आणि स्वत:च्या पैशांतून एटीएममधून पैसे काढून तिकीट खरेदी केले.
सहावा प्रवासी : नौटंकी साला. सगळे अवाक होतात आणि विचारतात, ‘का? काय झाले?’
सहावा प्रवासी : एक स्टेशन प्रवास केला, पाच रुपये खिशात नव्हते? त्यासाठी एटीएमवर जायची गरज काय होती?
दुसरा प्रवासी : गाडीत पाकीट राहिले असेल, नसतील पैसे जवळ.
सहावा प्रवासी : मग एटीएम कार्ड कुठे ठेवले होते? पाकीट असणारच ना जवळ.
चौथा प्रवासी : पण रांगेत उभे राहून तिकीट काढले, घुसला नाही मध्ये.
सहावा प्रवासी : मुंबईत घुसखोरी केली तर काय होईल हे माहिती आहे त्यांना.
पाचवा प्रवासी : पण काही का होईना प्रवाशांशी संवाद साधला ना?
सहावा : नौटंकी साला.
तिसरा प्रवासी : तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे?
सहावा : ते खासदार आहेत, त्यांना रेल्वे लोकल फ्री असते. तिकीट काढायचे नाटक कशासाठी केले? थेट येऊ शकले असते लोकलमध्ये, पण त्यांच्याबरोबर पोलिसांची फरफट झाली. तिकीट एकच काढले, पण पाच-पंचवीस कार्यकर्ते तिकीट न काढता घुसले त्याचे काय? संवाद फक्त कार्यकर्त्यांशी साधला, प्रवाशांशी नाही.
बस्स, हा मेसेज लोकल मीडियातून वाºयासारखा पसरला आणि राहुल गांधींचा पप्पू झाला. ही ताकद या लोकल मीडियात आहे, याची जाणीवही कोणाला झालेली नाही. मुंबईची लोकल ही भारतीय रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न देणारीच नाही, तर सर्वाधिक विचार देणारीही आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
आजही लोकलमधून अनेक प्रवाशांच्या हातात विविध वर्तमानपत्रे असतात. पहिली दोन-तीन स्टेशन पेपरमध्ये नजर मारतात आणि नंतर यातील महत्त्वाच्या बातमीवर चर्चा सुरू होतात. या चर्चा इतक्या सुंदर असतात की, वृत्तवाहिन्यांवर सतत झळकणारे पोपट, बोलक्या बाहुल्या आणि पढत मूर्ख लोकांपेक्षा ही सामान्य माणसे कशी निर्णयापर्यंत येतात हे सीएसएमटी किंवा चर्चगेट येईपर्यंत समजते, म्हणजे लोकल मीडियाची सेंट्रल लाइन, वेस्टर्न लाइन आणि हार्बर लाइन ही मोठी चॅनेल आहेत. या प्रत्येक चॅनेलवर चांगल्या चर्चा होत असतात. त्यातून एक मतप्रवाह तयार होत असतो. तो इतका बळकट होतो की, कोणाच्याही ऐनवेळच्या सभेचा त्यावर परिणाम होत नाही.
पुलवामा हल्ला झाल्यानंतर लोकलमध्येच प्रवाशांनी ठरवले होते की, पुन्हा एकदा मोदींना निवडून द्यायचे आहे. त्यामुळे कितीही राफेल विमाने उडवली, जीएसटी, नोटा बंदीवरून रान पिंजून काढले आणि वाहिन्यांनी निवडणूकपूर्व अंदाजात मोदींना यश मिळणार नाही, भाजपला २०० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे अंदाज व्यक्त केले, तरी या लोकल मीडियाने भाजपला ३०३ची गोळी अगोदरच दिली होती. कारण देशातला प्रत्येक कानाकोपºयातला माणूस मुंबईत आला आहे. त्याचे कोणी ना कोणी तरी मुंबईत आहे. त्यामुळे कानोकानी संदेश या लोकल मीडियाने अगोदरच पोहोचवला होता. मुंबईची लोकल ही नुसती मुंबईकरांची लाइफलाइन नाही, तर देशाचा तो लोकल मीडिया आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अशीच एक गोष्ट. सगळ्या वर्तमानपत्रांत आणि मीडियात बदलापूर, कल्याण येथे झालेल्या बलात्काराच्या बातमीची चर्चा होत होती. चर्चा चांगलीच रंगत गेली. हिंमतच कशी होते अशा गुन्हेगारांची? वगैरे, वगैरे. पण त्यातील एक मत असे होते की, आधीच्या गुन्हेगारांना अजून शिक्षा होण्याचे नाव नाही. त्यामुळे आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, असा संदेश अशा गुन्हेगारी जगतात जात आहे. त्यामुळे फाशीच्या भानगडीत न पडता एन्काऊंटर करावे असाच विचार अनेकजण व्यक्त करत होते. कारण शिक्षा सुनावली तरी तीची अंमलबजवणी होत नाही. अगदी फाशी सुनावली तरी ती वेळेत दिली नाही म्हणून माफ होण्याचे प्रकार आपल्याकडे घडलेले आहेत. त्यामुळे शिक्षेची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे, यावर सर्वांचे एकमत या मीडियात झाले. आमच्या कोणत्याही वाहिन्यांवर कोणत्याही विषयावर एकमत होत नाही आणि चर्चेची नुसतीच एरंडाची रटाळ गुºहाळे चालतात, पण लोकल मीडियामध्ये मात्र निर्णयापर्यंत चर्चा चालतात.
प्रफुल्ल फडके/अन्वय
९१५२४४८०५५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा