नाती ही जन्माने चिकटत असतात. ती निवडण्याचा माणसाला अधिकार नसतो. पण मैत्रिचे नाते हे असे नाते असते की ते आपले आपण निवडलेले असते. त्यामुळे ते आपण मनापासून स्वीकारलेले असल्याने या नात्याचे रंग अधिक गहिरे असतात. मैत्री कोणातही असली अगदी दोन मुलांमधील, दोन मुलींमधील किंवा भिन्नलिंगी मैत्री असली तरी त्यात परस्परांचा आदर करणे, दुसर्यासाठी काहीपण याच भावना असतात. त्यामुळेच कोणतीही कामे पैशाच्या जोरावर होत नाहीत ती मैत्रीखातर होऊ शकतात. आज 2 ऑगस्ट हा जागतीक फ्रेंडशिप डे असल्यामुळे चित्रपटातील काही मैत्रीची उदाहरणे आपण पाहणार आहोत.
मराठी हिंदी अशा दोन्ही चित्रपटात दोस्ती हा शब्द असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. दोस्तीवरची गाणीही भरपूर येऊन गेली. दोस्ताना, याराना, दोस्त, 5 दोस्त, दोस्ती या सर्वच चित्रपटांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवून सोडली आहे. राजश्री प्रॉडक्शनच्या ताराचंद बडजात्या यांनी काढलेल्या चित्रपटात एका आंधळा आणि लंगडा असलेल्या गरीब मित्रांची कथा होती. सुपरहिट गाण्यांनी आणि सुशीलकुमार- सुधीरकुमार या कलाकारांनी आपल्या अभिनयाने हा चित्रपट गाजवला. राही मनवा दुख की चिंता क्यू सताती है, आवाज मैं ना दुंगा, मेरी दोस्ती मेरा प्यार या सुमधूर गाण्यांना मोहम्मद रफींच्या आवाजाने अजरामर केले आहे.
1974 मध्ये दुलाल गुहा दिग्दर्शीत दोस्त या चित्रपटात धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या मैत्रीची कथा आहे. धर्मेंद्र हा मानव नावाचा सामान्य तरुण तर शत्रुघ्न सिन्हा गोपी नावाचा चोरी करुन जगणारा. त्याच्या वागण्याने बायकोपासून दुरावलेला गोपी मानवशी झालेल्या मैत्रीमुळे आपले नवे जीवन सुरु करतो. मैत्रीची छान कथा धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा आणि हेमामालिनी या कलाकारांनी सुपरहिट केली होती. यातील गाडी बुला रही है, सीटी बजा रही है हे गाणे अजूनही आपल्या ओठांवर रुळते.
दोस्ताना नावाचे दोन चित्रपट हिंदीत आले. यात एक दोस्ताना आहे अमिताभ बच्चन याचा तर दुसरा आहे अमिताभ बच्चनचे पुत्र अशी ओळख असलेल्या अभिषेकचा. यातील 1980 साली आलेल्या अमिताभ बच्चन यांचा दोस्ताना हा चित्रपट यश जोहरनी निर्मित केलेला आणि राज खोसला दिग्दर्शित केलेला आहे. यात अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील दोस्तीची कथा आहे. एक आहे वकील तर दुसरा आहे पोलीस अधिकारी. यांच्यातील बने चाहे दुष्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा हे गीत तुफान गाजले. चित्रपटालाही चांगले यश मिळाले होते. अभिषेक बच्चन याचा दोस्ताना तसा वादग्रस्त ठरला. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला करण जोहरचा हा चित्रपट तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केला होता. अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम यांच्यातील मैत्रीची ही विनोदी वळणाने जाणारी कथा आहे. पण या कथेला समलिंगी संबंधाचा स्पर्श झाल्याने तो वादग्रस्त निघाला. यातील चुंबनदृष्य विशेष गाजले आणि हा चित्रपट चर्चेत राहिला. पण अशीही दोस्ती असते यावर कटाक्ष टाकण्यात करण जोहर यशस्वी झाला.
1981 मध्ये आलेला याराना हा चित्रपट एम ए नादियाडवाला यांची निर्मिती होती. राकेशकुमारने दिग्दर्शीत केलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अमजदखान या दोन मित्रांची ही कथा. शोलेपासून खलनायक म्हणून भूमिका करणार्या अमजदखानला सेकंड हिरो बनवणारा हा चित्रपट. आपल्या गावाकडच्या भोळ्या मित्राचा आवाज चांगला आहे त्यामुळे त्याला यशस्वी गायक करण्यासाठी धडपणारा मित्र अमजदखानने यात रंगवला आहे. त्यासाठी स्वत:चे सर्वस्व पणाला लावणारा हा मित्र आणि संकटात सापडलेल्या या मित्राला सोडवणारा अमिताभ अशी रंजक कथा यारानाची आहे. संगीतप्रधान चित्रपट असल्यामुळे डिस्कोच्या जमान्यातील सगळी गाणी हीट ठरली. यातील मैत्रीचे गाणे म्हणजे, तेरे जैसा यार कहा हे गीत. दोस्ती, याराना या शब्दांना घेऊन अनेक चित्रपट आले तर मैत्रीची कथा असलेल्या चित्रपटांमध्ये प्रेमाचा त्रिकोण असलेले चित्रपट खूप होऊन गेले. यात एका मित्रासाठी दुसर्या मित्राने आपल्या प्रेमाचा त्याग करणे ही त्रिकोणी प्रेमाची कथा हिंदी चित्रपटसृष्टीला कायमच आवडत राहिली. असे कितीतरी चित्रपट हिंदीत येऊन गेले. राजकपूरच्या संगम या चित्रपटात राजकपूर राजेंद्रकुमार आणि वैजयंतीमाला या प्रेमाच्या त्रिकोणात राजेंद्रकुमार आपले बलिदान करतो. 1964 च्या राजकपूर निर्मित आणि दिग्दशींत चित्रपटावरील प्रेमाच्या त्रिकोणातील दोस्तीवरचे विरहगीत म्हणजे दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा..हे गीत.
1978 मध्ये आलेला प्रकाश मेहरा निर्मित आणि दिग्दर्शीत मुकद्दर का सिकंदरमध्ये असाच प्रेमाचा त्रिकोण आहे. यात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि राखी यांच्या त्रिकोणाची कथा आहे. पोलीसांना मदत करणारा खबर्या असलेला आणि गरीबीवर मात करून श्रीमंत झालेला अमिताभ आणि वकीलीचे शिक्षण घेऊनही संधीच्या शोधात असलेल्या विनोद खन्ना यांची मैत्री आणि त्यातून निर्माण झालेली गुंतागुंत प्रेमाची कथा. यात विनोद खन्नासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करणारा अमिताभ असा कथाभाग आहे.
जी पी सिप्पी रमेश सिप्पी या मोठ्या बॅनरचा सागर हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला. यातही ऋषि कपूर डिंपल आणि कमल हसन या तिघांच्या मैत्रीचा आणि प्रेमाचा त्रिकोण. तिघांच्याही सुंदर अभिनयाने गाजलेल्या चित्रपटात कमल हसन भाव खाऊन जातो. ऋषि डिंपलसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करुन मैत्रीसाठी तो जागतो. यात एका फिशिंग कंपनीचा मालक ऋषि कपूर आणि मच्छिमार कमल हसन यांच्यातील मैत्रीची रम्य कथा या चित्रपटात आहे. असे असंख्य मराठी हिंदी चित्रपट आहेत जे दोस्तीवर आहेत. त्या सर्वाचा उल्लेख शक्य नाही. काही प्रातिनिधीक चित्रपटांचा उल्लेख याठिकाणी केला आहे. दोस्तीवरची असंख्य गाणी सुपरहिट आहेत. शोलेसारख्या चित्रपटात कथानक महत्वाचे असतानाही ये दोस्ती, हम नही छोडेंगे, छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे हे गाणे चित्रपटाचा परिणाम साधते. याच गाण्याची प्रेरणा घेउन महेश कोठारे यांनी आपल्या धडाकेबाज या चित्रपटात ही दोस्ती तुटायची नाय हे अजरामर गाणे तीन मित्रांसाठी घेतले आहे. आज मैत्री दिनानिमित्ताने थोडक्यात यावर कटाक्ष मारला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा