राहुल गांधींसाठी सहा महिने महत्वाचे
सोमवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत सोनिया गांधींकडेच हंगामी अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला. सहा महिन्यात निवडणुका घेउन हा निर्णय होईल असे जाहीर करण्यात आले. यावेळी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत वगैरे गरमागरम चर्चांनाही उत आला. पण एकंदर सगळ्याच हालचाली पाहिल्या तर काँग्रेसकडे राहुल गांधी यांनाच अध्यक्ष करण्याशिवाय पर्याय नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे सहा महिन्यांनी का होईना राहुल गांधींना हे पद स्वीकारावे लागणार हे दिसते.
आता डिसेंबरमध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यापार्श्वभुमीवर या निवडणुका होईपयर्र्त कोणताही नवा चेहरा न देता सोनिया गांधींनाच कायम केले गेले. पण सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो चेहर्याचा. काँग्रेसचा चेहरा हा राष्ट्रीय पक्षाचा आहे, प्रादेशिक पक्षाचा नाही. त्यामुळे त्यांना सर्वात मोठी लढत द्यायची आहे ती भाजप बरोबर. त्यामुळे भाजपचा चेहरा असलेल्या मोदींसमोर कोण टिकून राहू शकेल असाचा चेहरा त्यांना पुढे आणावा लागणार आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्याशिवाय आज तरी आणि पुढची चार दोन वर्ष तरी किमान राहुल गांधींशिवाय पर्याय नाही हे नक्की. म्हणूनच राहुल गांधींचे नेतृत्व सर्वमान्य करून घेणे हे काँग्रेसपुढचे आव्हान आहे. येत्या सहा महिन्यात बिहार निवडणुकांपेक्षा राहुल गांधींचे नेतृत्व सर्वमान्य करून घेण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत. कोणत्याही विधानसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर उतरू शकत नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार देण्याची शक्ती नाही. अशा स्थितीत स्थानिक प्रादेशिक पक्षांच्या बरोबर राहण्यातच काँग्रेसला धन्यता मानावी लागणार आहे. कारण काँग्रेसला देशव्यापी जनाधार असल्याचा चेहरा तयार करायचा आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल या लालूप्रसाद यांच्या पक्षासोबतच जायचे आहे. त्यामुळे त्यात काँग्रेसला फार आशा बागळण्याचे कारण नाही. कारण नितिशकुमारांनी आपले पाय तिथे अगोदरच भक्कम करून ठेवले आहेत. त्यामुळे आज पक्षबांधणी करणे हे काँग्रेसचे उद्दीष्ट असले पाहिजे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे येत्या सहा महिन्यात राहुल गांधींना एकमुखाने मान्यता मिळाली पाहिजे. त्यानंतर पुढच्या तीन वर्षात पक्षबांधणी करून 2024 च्या लोकसभा निवडणुका लढवण्याची ताकद काँग्रेसमध्ये असेल.
2019 च्या निवडणुकांपूर्वी छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेस जिंकलं. गुजरातमध्येही जवळपास जिंकलं. यात राहुल गांधींचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभे करण्यासाठी राहुल गांधींनाच जबाबदारी घ्यावी लागणार हे नक्की.
आज बर्यापैकी काँग्रेस नेत्यांना राहुल गांधीच अध्यक्ष व्हावेत असं वाटतं? अनेकवेळा अपयश येउनही तेच नेते असावेत अशा मतांचा एक प्रवाह काँग्रेसमध्ये आहे. या प्रवाहाचाच सोमवारी बैठकीत विजय झाला आहे. त्यामुळेच त्यांच्या ताकदीवरच राहुल गांधी यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी पत्र पाठवणार्या 23 जणांचा समाचार घेतला. तसं पाहिलं तर 2014 नंतर काँग्रेसचा अनेक ठिकाणी पराभव झाला आहे. 2019 नंतर राहुल गांधी यांनी लगेचच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी दोन दशकांपासून राजकारणात आहेत. ते अजूनपर्यंत चमक दाखवू शकलेले नाहीत अशा आशयाची मते अनेकवेळा व्यक्त केली जातात. पण वस्तुस्थिती तशी नाही. कित्येकवेळा चुकीचे साथीदार आणि कष्ट करूनही यश न मिळण्याचे प्रकार त्यांच्याबाबत झालेले आहेत. त्यांच्या आक्रमकतेपेक्षा त्यांच्या चुकीच्या वर्तनाचा गवगवा फार झाला. म्हणजे पंतप्रधान असताना मनमोहनसिंग यांच्या पत्रकारपरिषदेत घुसणे, पत्र फाडून टाकणे या प्रकारांना जास्त प्रसिद्धी मिळाली. त्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागला. पण त्याहीपेक्षा राहुल गांधी काही वेगळे आहेत हे सांगण्यात काँग्रेस कमी पडली. दोन दशकं एकूण राजकारणात आहेत. ते चमक दाखवू शकले नाहीत हा प्रचार सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाने केला, त्याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागला. दोन वषार्र्पूर्वी गुजरात निवडणुकांवेळी गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार येईल अशी परिस्थिती होती. भाजपच्या जागा खूप कमी करण्याचे त्यांनी केलेले काम महत्वाचे होते. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना भाजपचे मोदी सरकार गुजरातमध्ये येणे आणि भाजपचे सरकार केंद्रात असताना त्यांना तिथे फटका बसणे हे राहुल गांधींचे यश होते. ते त्यांना दाखवता आले नाही. म्हणजे दोन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये राहुल गांधींचं कॅम्पेन यशस्वी झालं, ते सत्तेच्या जवळ आले. ते गुजरात जिंकू शकले नाहीत पण ते सत्ता मिळवण्याच्या इतक्या जवळ येतील अशी कल्पना कोणी केली नव्हती, हे नाकारता येणार नाही. तो त्यांनी भाजप आणि मोदींना दिलेला फार मोठा दणका होता.
कारण भाजप गुजरातमध्ये आपल्याला दीडशे जागा मिळतील असे गृहीत धरत असताना शंभर जागाही त्यांना मिळाल्या नव्हत्या. पण पराभवातून सावरणे काय असते त्यासाठी केवळ काँग्रेसच नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी भाजपकडून शिकले पाहिजे. शून्यातून विश्वनिर्मिती म्हणतात तोच प्रकार भाजपने करून दाखवला. तो आत्मविश्वास काँग्रेसमध्ये नाही, आपल्या नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाही त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. म्हणूनच पुढचे सहा महिने राहुल गांधींना पक्षात मान्यता मिळवावी लागेल आणि मग अध्यक्षपद घ्यावे लागेल.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या राजीव लाटेत भाजपचे पानीपत झाले होते. आज काँग्रेसची अवस्था आहे त्यापेक्षा वाईट अवस्था भाजपची होती. वाजपेयी स्वत: हरले होते. ते सत्तेत नव्हते पण त्यांनी उमेद दाखवली. सत्तेत नसलो तरी लढायला तयार आहोत, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आज राहुल गांधींनी तो आशावाद ठेवायची गरज आहे. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी त्यांना पुरेसा आहे. पुढच्या काळात 2021 पासून त्यांना 2024 ची तयारी करायला पुरेसा वाव मिळणार आहे.
x
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा