सध्या ज्या प्रकारे विविध देशांनी आणि संशोधन संस्थांनी कोरोनावरील औषधे, लसी यांचे दावे केले आहेत, त्यावरून आता नवे औषध युद्ध पेटणार असे दिसू लागले आहे. अमेरिका इंग्लंडने रशियाच्या औषधावर घेतलेला आक्षेप, चीनबाबत व्यक्त केलेली शक्यता, विविध देशांनी केलेले दावे आणि जागतीक आरोग्य संघटनेची भूमिका. हे पाहता आता या औषधांवरून आणि संशोधीत संभाव्य लसीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण पेटणार का? का औषध कंपन्यांमध्ये नवे वॉर निर्माण होणार असा प्रश्न निर्माण होतो आहे. यामध्ये सर्वसामान्यांचा बळी दिला जाणार का?
आज कोरोना विषाणूचा अनियंत्रित फैलाव पाहता याला रोखू शकणा़र्या एखाद्या औषधाकडे तसेच लस संशोधनाकडे आता संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. त्याची जोरदार चर्चाही सुरू आहे. वास्तविक संशोधन ही संघटित प्रक्रिया असते. संशोधनामध्ये विशेषतः विज्ञानातील संशोधनांमध्ये विविध चाचण्या आणि प्रयोगातील निष्कर्षांचे आदानप्रदान होत असते. सरतेशेवटी याचा फायदा आपले एकंदर जीवनमान सुधारण्यासाठीच होत आला आहे. मानव कल्याणासाठी हे संशोधन आहे हे लक्षात घेउन त्यासाठी सवार्र्नी एकत्र आले पाहिजे. पण आज हे संशोधन किंवा संभाव्य औषध हे स्पर्धेतून निर्माण होत आहे हे वाईट आहे. विविध राष्ट्रांमधील जागतिक वाद, हेवेदावे, स्पर्धा यापलीकडे जाऊन जगभरातील संशोधकांनी समस्त मानवी कल्याणासाठी एकत्र येण्याची गरज आहे. लस संशोधनाच्या माध्यमातून यापूर्वी मानवजातीची अमूल्य सेवा घडली आहे हे विसरून चालणार नाही. आज संपूर्ण जग कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याच्या मागे धावत आहे. मोठे आव्हान असूनही संशोधक एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहेत. त्यांची निरीक्षणे आणि निष्कर्ष उत्साहवर्धक आणि समाधानकारक आहेत. त्यादृष्टीने विचार करता लस संशोधनात गुंतलेले शास्त्रज्ञ, संशोधन संस्था यांचे कौतुकच करायला हवे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या ताज्या यादीनुसार पहिल्या व दुस़र्या टप्प्यात असणा़र्या लस विकसित करणाऱयांची संख्या आजच्या घडीला तब्बल 165आहे. पण चिंतेची बाब अशी की, कोरोना प्रतिबंधक लस शोधताना जगभरातील विविध संशोधन संस्था आणि कंपन्यांदरम्यान सहयोग आणि सहकार्य दिसत नाही तर स्पर्धा दिसते आहे. परिस्थिती अशी आहे की संशोधनाच्या निमित्ताने सहकार्याऐवजी विविध राष्ट्रांमध्ये ईर्षा आणि स्पर्धा सुरू आहे. ही बाब निश्चितच मारक आणि हानीकारक ठरू शकते. म्हणूनच या मुद्याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. लस संशोधन सध्या ज्या टप्प्यावर आहे तिथे रुग्णांच्या सर्व दुष्परिणामांच्या कसोटीच्या पातळीवर ते अजूनही सिद्ध झालेले नाही, हे वास्तव आहे. त्या दृष्टीने विचार करता अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. लस संशोधन ही अतिशय गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. अनेक क्लिष्ट अशा वैद्यकीय चाचणीतून त्याला जावे लागते. सर्वप्रथम उंदीर, मांजर यासारख्या प्राण्यांवर चाचणी केली जाते. मग मानवी छोटा गट त्यानंतर आणखी थोडा मोठा गट अखेर हजारो जणांवर चाचणी घेतली जाते. रोगप्रतिकारकशक्ती, दुष्परिणाम याची दीर्घकाळ तपासणी केली जाते. याचाच अर्थ सध्या सर्व लसी या प्रयोगाच्या पातळीवरच आहेत. सर्वच प्रक्रिया जोखमीची असल्यामुळे यशस्वी होण्याची शक्यताही कमी असते. चाचणीचे सर्व टप्पे पार केल्यानंतर शंभरातील एखाद दुसऱया लसीला सामूहिक उपचार करण्यास मान्यता मिळू शकते. अशा परिस्थितीत या प्रक्रीयेकडे कोणीही स्पर्धा म्हणून न बघता कोणालाही यश आले तरी त्याचे स्वागत केले पाहिजे. पण क्रेडिट मिळण्यासाठी, श्रेयवाद आणि वर्चस्ववादासाठी प्रत्येक देश धडपडतो आहे हे फार वाईट आहे. त्यामुळे आपले औषध मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी अन्य देशांच्या उत्पादनाला खोटे ठरवण्याचे, बरबाद करण्याचे तंत्र विकसीत होउ शकते. अमेरिका इंग्लंडने आपले तंत्र रशियाने चोरल्याचा केलेला आरोप हा त्याचाच एक भाग आहे. खरं तर कोरोना प्रतिबंधक लस विकसित करू इच्छिणाऱया 165 पैकी केवळ 23 जण तिस़र्या टप्प्यात आहेत. म्हणजेच त्यांना मानवी चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस लवकरच बाजारात येईल असे सांगितले जाते. पण अद्याप ऑक्सफर्डच्या चाचण्या तिसऱया टप्प्यात आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा आणि अवघड टप्पा मानला जातो. ऑक्सफर्ड विद्यापीठ देखील अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही, हे त्यांचे संशोधकही मान्य करतात. या स्पर्धेत रशियाने तर सर्वांवर कडी केली. येत्या दोन आठवडयातच आपल्या देशाची स्वतंत्र लस बाजारात येत असल्याची घोषणा रशियाने केल्याने जगाच्या भुवया उंचावल्या. कोविड-19 च्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्याचा त्यांनी दावा केला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयापासूनच सामूहिक लसीकरण कार्यक्रम रशियात राबवत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. काही कंपन्या आपली लस 250 रूपयात देणार असे सांगत आहेत तर त्यावर कुरघोडी करण्यासाठी कोणी आपले औषध 225 रूपयात मिळेल असे दावे आत्ताच करत आहेत. हे नक्की काय चालले आहे? खरं तर अशा संशोधनाच्या औषधांचा प्रसार हा मोफत असायला पाहिजे. त्याचे पैसे कसे घेतले जातात? ते जर मोफत वाटले तरच ही स्पर्धा आणि औषधकंपन्यांमधील युद्ध थांबेल असे वाटते. नाहीतर ही जीवघेणी स्पर्धा माणसांचा बळी घेईल. जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या या कोरोना लसीबाबत शंका उपस्थित केली आहे. लस संशोधन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करीत रशियाने अक्षरशः घाईघाईने लस बाजारात आणल्याचा आरोप करून ही लस धोकादायक ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावरून कोरोना लसीबाबत जगभरात सध्या संशयाचे वातावरण असल्याचे स्पष्ट होते. ही बाजारपेठ काबीज करण्याची स्पर्धा विविध राष्ट्रांदरम्यान सुरू झाली आहे. त्यामुळे मनुष्य हितापेक्षा आर्थिक लाभासाठी चाललेली ही कुरघोडी फार घातक आहे. यातून गैरप्रकार जन्माला आले तर नवा कोरोनासारखा व्हायरस निर्माण होईल. ही जागतीक चिंता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा