लॉकडाउनच्या काळात चित्रिकरण थांबल्याने आणि अनेक कलाकारांना चित्रिकरण स्थळी पोहोचता न आल्याने सध्या विविध मालिकांमध्ये जो तडजोडीचा धुडघूस चालला आहे तो अत्यंत भयानक आणि हास्यास्पद असाच आहे. वेळ काढूपणा करण्यासाठी काय वाटेल तशी कथानके फिरवली जात आहेत. प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचा चंगच अनेक मालिकांनी मांडला आहे.
कलर्स वाहिनीवर स्वामीनी ही मालिका सध्या गाजते आहे. पंधरा दिवसांपूर्वी तिचे पुन:प्रक्षेपण सुरू झाले. रमा मोठी होणार, कोण असणार ही प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण त्या रमेचे दर्शन घडवण्यासाठी तब्बल आठवडा घालवला. कधी, कान, तर कधी पाय, कधी पाठमोरी अशी दाखवत तब्बल आठवडा घालवला. प्रत्यक्ष मुखदर्शन झाल्यावर सगळ्यांचाच भ्रमनिरास झाला. डोंगर पोखरून उंदीर काढावा तसाच प्रकार होता तो. पण काय या रमेचे स्वरूप दाखवले आहे? म्हणजे आजवर ऐकलेल्या आणि यापूर्वी याच विषयावर आलेल्या मालिकांमधून माधवराव पेश्व्यांच्या पत्नी रमाबाई या हुषार होत्या, प्रेमळ होत्या असे चित्र होते. पण कलर्सवरच्या स्वामीनीमधील कथा नायिका असलेल्या या रमाबाई म्हणजे अगदी दीव्य दाखवल्या आहेत. अत्यंत बावळट अशी बाई या मालिकेत उभी केलेली आहे. सारख्या उचक्या देताना दाखवली आहे. उचक्या देण्याशिवाय या बाईना काही येत नव्हते असेच चित्र रमाबाईबाबत उभे केले आहे. रमा लहान असताना जशी गोंडस आणि चुणचुणीत होती तशी मोठी झाल्यावर मात्र राहिली नाही. साधारणपणे मुलं लहानपणी बावळट असतात, पोरकट असतात. मोठी झाल्यावर हुषार होतात. पण रमाबाईंच्या बाबतीत उलटच घडताना दिसते आहे. माधवरावांच्या अंगावर दुध काय सांडतात, अडखळून पडतात काय आणि सारखी उचकी काय देतात. हे पाहून अक्षरश: कीळस आली. रमाबाईंचे असे चित्र कसे काय उभे केले जाउ शकते? पण तडजोड आणि वेळकाढूपणामुळे कशीबशी 23 मिनीटे भरायची यामुळे काहीही दाखवले जात आहे. राघोबादादांच्या पत्नी आनंदीबाई यांना तर बीआर चोप्रांच्या महाभारत मालिकेतील शकुनीप्रमाणे सतत जुगाराचा पट खेळणारीच करून टाकली आहे. त्यामुळे सतत हातात फासे घेउनच ती बसलेली दाखवली आहे. हे संपूर्ण चित्र अत्यंत बिभत्स असे निर्माण केले आहे. अर्थात पेश्व्यांच्या बायांबद्दल असे चित्रिकरण असल्याने त्यावर कोणी आक्षेप घेणार नाही, याची खात्री असल्यानेच हे काहीही दाखवले जात आहे. अन्य कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिचे असे घाणेरडे दर्शन झाले असते तर विविध समाज पेटून उठले असते. पण एक घाणेरडी मालिका असे चित्र सध्या दिसत आहे.झी मराठीवरही धुमाकूळ जोरात चालला आहे. माझ्या नवर्याची बायकोत चाललेल्या अतर्क्य गोष्टी तर भन्नाट आहेत. सध्या गुरूनाथ त्या मायाला जाळ्यात गुरफटवतो आहे. तिच्याच खात्यातील पैसे काढून लुटतो आहे. पण एका कंपनीची मोठी अधिकारी असलेली आणि सीईओ होण्याचे स्वप्न पाहणारी ही माया, तिला बँकेचे अकौंट सांभाळता येत नाही. तुझ्या खात्यातून गुरू अपहार करतो आहे असे राधिका तिला सांगते तेंव्हा ती चेकबुक काढून दाखवते. आता चेकबुक दाखवायचे की पासबुक हे पण ज्या बाईला कळत नाही ती सीईओ कशी होणार? पण लेखक, दिग्दर्शक, निर्माते सगळेच अडाणी असल्याने प्रेक्षकांना काय वाटेल ते दाखवत आहेत. बोंब्या फकीर असणारा गुरू आपल्याला फसवत आहे हे कळत असूनही माया त्याच्या प्रेमात कशी काय पडू शकते? दोन दोन लग्न अगोदरच झालेली आहेत हे माहिती असूनही ती गुरूच्या मागे कशी काय धावू शकते? पण काहीही दाखवण्याच्या नादात मालिका भरकटत आहे. शनाया आणि राधिका पिंकी चिंकी नावाने एक़मेकांना गुप्तपणे हाका मारतात. ही पिंकी कोण आहे याची गुरूला चिंता लागली आहे. समोर सौमित्र आणि राधिकाच्या टीमला तो घाबरत नाही, पण काल्पनीक पिंकीचे टेन्शन त्याने घेतले आहे. ही पिंकी कोण आहे याचा तो शोध घेतो आहे. त्यामुळे आपणच पिंकी नाही हे भासवण्यासाठी राधिकाचे चाललेले प्रयत्न अत्यंत पोरकट आहेत. आता दुसरी पिंकी मिळत नाही म्हणून सौमित्रला पिंकी बनवण्याचा आणि विनोदाच्या नावाखाली गलिच्छ धुडघूस घालायचा प्रयत्न निर्माता, दिग्दर्शक, लेखकाने चालवला आहे. अत्यंत सुमार दर्शन होताना दिसत आहे. दुधात पाणी तरी किती मिसळणार? दुधाचा पांढरेपणा तरी आला पाहिजे. मालिकेचे कथानक केंव्हाच संपले होते. पण वाढवत न्यायची म्हणजे फक्त कुरघोड्या. माझ्या नवर्याची बायको म्हणता म्हणता माझ्या बायकोचा नवरा इतका बदल झाला. घटस्फोट झाला, त्याने तिला सोडले, तिने त्याला सोडले. तिने दुसरे लग्न घडवले. गृहीणीची यशस्वी उद्योजक बनली, नवीन लग्न केले, इथे मालिका संपली होती. पण पुन्हा आपल्याच नवर्याच्या कंपनीत जुन्या नवर्याला कामाला लावले जाते. जुन्या माजी नवर्याला धडा शिकवण्यासाठी चालू नवर्याला बाईचे कपडेे घालायला लावण्याइतके खालच्या थराला कथानक कसे जाउ शकते? तो एका कंपनीचा मालक आहे, तो असले फालतू धंदे करेल का? त्याची तशी काही बॅगराउंड दाखवली आहे का? ज्याचा बाप अतिशय कर्तव्यदक्ष बिझनेसमन आहे तो असले फालतू धंदे करेल काय? पण काहीही दाखवले जात आहे.
तिकडे पाठकबाईची वेगळीच तर्हा. तुझ्यात जीव रंगलामध्ये राणाला पकडून देण्यासाठी त्यांची धडपड चालली आहे. राणा पेहेलवान विविध वेशभूषा करून फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम करत आहे. पेहेलवान ते पोलीस इतपत प्रवास संपल्यावर, पहिली खलनायिका नंदीताला शिक्षा झाल्यानंतर तो विषय संपला होता. पण आता बाकीसगळे कलाकार नसताना, राणा अंजलीची मुलगीही जवळ नसताना फक्त पकडापकडीचा खेळ चालवला आहे. या बाई शेतात जाउन पेरणी करतात. मग त्या शाळेत शिकवायला का जात नाहीत? तर लॉकडाउनमुळे म्हणे शाळा बंद आहेत. वर्क फ्रॉम होम म्हणून त्या शेेती करतात. कसलीही संगती नसलेली कथानके प्रेक्षकांच्या माथी मारण्याचा आचरटपणा आज सर्वच वाहिन्यांवर चालला आहे. अर्थात निर्माता आणि वाहिन्यांना याची जाणिव झालेली आहे. त्यामुळेच आपला टीआरपी टिकवण्यासाठी झी मराठीला होणार सून मी या घरची ही मालिका दाखवावी लागली आहे. तर कलर्सने पुन्हा एकदा चार दिवस सासूचे आणले आहेत. पण बाकी सगळा धुडघूस सुरू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा