यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाउस पडला आहे. राज्यातच नाही तर संपूर्ण देशात यावर्षी मानसूनची कृपा झालेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात ही दिलासा देणारी बाब आहे. बहुतेक सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून त्यातील अतिरीक्त पाण्याचा विसर्गही केला गेला आहे. त्यामुळे सुजलाम अशी परिस्थिती यावर्षी आहे. साहजिकच सुफलामची अपेक्षा आता केली जाणार हे निश्चित. भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान असल्याने इथली सगळी आर्थिग गणिते पावसावर मापली जातात. आपल्याकडे शेतीच्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न पावसाने सुटत असतो. त्यामुळे पावसाची कृपा झाली तर आर्थिक घडी बसते. म्हणूनच यावर्षी नागरीकरण संकटात असताना, उद्योग संकटात असताना कृषी आणि ग्रामीण भागाकडून अर्थव्यवस्थेला हातभार लागेल असे दिसते.
यावर्षी जूनमध्ये 15 टक्क्यांनी जास्त पाऊस पडला. सुरूवात चांगली झाली की सगळे व्यवस्थीत होते. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला पण पावसाने अवकृपा केली नाही हे महत्वाचे होते. हा 2013 नंतरचा सर्वाधिक पाऊस होता. त्यामुळे खरीपाची विक्रमी पेरणी, बंपर उत्पादनामुळे ग्रामीण भागात मागणी वाढेल असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. ग्रामीण भागावर यावर्षी अर्थव्यवस्थेची भीस्त आहे.सगळीकडे लॉकडाउन आणि बेरोजगारीचे संकट असताता यावर्षी मे महिन्यात देशांतर्गत बाजारात टॅ्रक्टरची विक्री 4 टक्क्यांनी वाढली, ही माहिती आश्चर्यकारक होती. पण ते अर्थव्यवस्थेला ग्रामीण भाग, कृषी क्षेत्र हातभार लावणार असल्याचे ते संकेत होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती असल्याचे हे द्योतक होते. ग्रामीण भागात वाढत्या मागणीमुळे अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकते असे यातून चित्र आहे.
जूनमध्येच अगदी वेळेत संपूर्ण देशात मान्सून पसरला आणि कोरोेनाच्या संकटाचे ढग झाकोळले गेले. सर्वसामान्यांना कुठेतरी दिलासा दिला गेला. या तीन महिन्यात ऑगस्ट अखेर या पावसाने सातत्य राखून कृषीक्षेत्राला खूष केले.
आपल्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जूनमध्ये यावेळी सामान्यपेक्षा 15 टक्के जास्त पाऊस झाला. 2013 नंतर यावर्षी जूनमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. हिमालयीन राज्ये आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भाग वगळता देशाच्या इतर भागात जोरदार पाऊस पडला आहे. हवामान खात्याने यंदा सामान्य पावसाळ्याचा अंदाज वर्तविला होता. पण नेहमीप्रमाणेच तो खोटा ठरवत चांगला पाउस झाला आणि जनतेची चिंता मिटवली आहे. विशेषतः ग्रामीण भागात या पावसाने बयाचशा आशा पल्लवित केल्या आहेत. कोविड -19 साथीच्या आजारामुळे देशाची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे आणि शहरी भागात विकासाचे चाके रखडले आहेत. अशा निराशेच्या वातावरणात ग्रामीण भागातून मागणी वाढून अर्थव्यवस्था सावरण्याची अपेक्षा आहे.
अर्थशास्त्रज्ञ आणि कॉर्पोरेट दिग्गजांचा असा विश्वास आहे की आता मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ग्रामीण भागातून नवी उर्जा मिळेल. शहरी अर्थव्यवस्थेपेक्षा ग्रामीण अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे संकेत देशातील बाजारपेठेतील झालेल्या बदलांवरून दिसून आले.
केवळ चांगल्या पावसाळ्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेची अपेक्षा करीत नाहीत. ते यासाठी तीन प्रमुख कारणांवर विचार करतात. पहिले कारण असे आहे की 25 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन असूनही, शेती चालूच राहिली, तर उत्पादनाला मोठी मागणी येईल. दुसरे, सरकारी एजन्सीच्या मते, यावेळी जास्त पेरणी झाली आहे. तिसरे कारण म्हणजे जे शहरांमधून आपल्या खेडयात परतले ते कामगार आता शेतीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे गेल्या तीस चाळीस वर्षात जो कृषीक्षेत्रावरचा रोजगाराचा भार सार्वजनिक आणि सेवा उद्योगाकडे वळला होता तो पुन्हा एकदा कृषीक्षेत्राकडे वळल्याचे चित्र यावर्षी दिसून आले. त्यामुळे आता कृषीक्षेत्रावरच्या अर्थव्यवस्थेवर यावर्षी भार पडला आहे, वाढला आहे. कृषीक्षेत्राकडूनच फार मोठी अपेक्षा आहे.
विशेष म्हणजे यावर्षी पेरणीने एक नवीन विक्रम केला आहे. त्यावेळी खरिपाचे भरपूर पीक होईल. यामुळे ग्रामीण भागात मागणी वाढेल. यावर्षी सगळे निकष या कोरोनाने बदलल्यामुळे उद्योग आणि बाजारपेेठेला वेगळीच सवय या काळात लागली आहे. बाजारपेठेचा मूड आणि आवड बदललेली आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून स्वच्छता व कल्याण विभागात 5 नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. स्वच्छता आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या जंतुनाशकांच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे. आता ग्रामीण भागातही अशा उत्पादनांना मोठी मागणी आहे. ग्रामीण भागातील नागरिक शहरी ग्राहकांपेक्षा वेगळा आम्ही मानत नाहीत. आता हा फरक अगदी किरकोळ आहे.
जी उत्पादने पूर्वी फक्त शहरातच वापरली जात होती ती आता ग्रामीण भागातही वापरली जात आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातून अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. केंद्र सरकारने कृषी विपणन सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परंतु राज्ये त्याची अंमलबजावणी कशी करतात यावर परिणाम अवलंबून असेल.
कोरोना साथीच्या आजारामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आर्थिक परिस्थिती अधिक वाईट आहे. या परिस्थितीच्या काळात ग्रामीण भागातील आपली मागणी शहरी भागापेक्षा चांगली कशी राहील याकडे कंपन्या प्रयत्न करताना दिसत आहेत. क्रयशक्ती महत्वाची असते. ग्रामीण भागात पैसा असल्याने त्यांचा पैसा कसा काढता येईल याकडे बाजारपेठेचे आणि उत्पादकांचे लक्ष असल्याने ग्रामीण ग्राहक शोधण्याचे तंत्र आता विकसीत झाले आहे. हे सगळे चित्र संपूर्ण अर्थव्यवस्थेला ग्रामीण कृषी क्षेत्राकडूनच अपेक्षा असल्याचे स्पष्ट करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा