हिंदुस्थानी संगिताचा दीपस्तंभ अशी ख्याती मिळवलेल्या पंडित जसराज यांचे नुकतेच निधन झाले. बुधवारी त्यांचा मृतदेह भारतात दाखल झाला आणि त्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतीय संगिताची फार मोठी हानी झालेली आहे. पंडित जसराज हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारतीय केंद्रशासनाने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराजांना गौरवले होते. ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे ते मानत. अहंकारावर मात केलेले आणि आपल्या लोभस अशा व्यक्तिमत्वाने वागणारे पंडितजी हे निगर्वी होते. माझा नोहे धन्याचा हा माल, मी तर हमाल भारवाही ही भावना त्यांनी बाळगली होती. त्यामुळे ते स्वत:ला गायक, पंडित मानत नव्हते तर ईश्वराचे दूत आहोत असे म्हणायचे. लोकांपर्यंत हे ईश्वरी सूर आणि स्वर पोहोचवायचे आहेत, हीच आपली जबाबदारी आहे असे म्हणायचे. हे मोठेपण फार कमी लोकांत असते. अशा ईश्वरी दूताचा अंत सातासमुद्रापार झाला.
पंडित प्रसाद दुसाने, पंडित संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी, कला रामनाथ, पंडित रतन मोहन शर्मा, अंकिता जोशी आणि श्वेता जव्हेरी हे त्यांचे शिष्य आहेत. त्यांनी गुरुकुल पद्धतीने शिष्यांना संगीत शिक्षण दिले. पंडितजींच नाव हे सर्वच शिष्य उज्वल करत आहेत.
भारतीय संगिताला पंडितजींनी साता समुद्रापार पोहोचवले होते. भारताबरोबरच ते अमेरिका, कॅनडा येथे संगीत शिक्षण देत असत. 1995 मध्ये त्यांनी पंडिता तृप्ती मुखर्जी यांच्याबरोबर न्यू जर्सी येथे पंडित जसराज इन्स्टीट्यूट फॉर म्युझिकची स्थापना केली. त्या न्यू जर्सीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कलेला भाषा, प्रांत आणि कसल्याही भिंती अडवू शकत नाहीत. विद्वान सर्वत्र पुज्यते हे सुभाषीत त्यांनी खरे करून दाखवले होते.
वादन आणि गायन अशा दोन्ही क्षेत्रातील अजरामर कलाकृतीतून संगीतक्षेत्राला श्रीमंती बहाल करणारा जयपुरातील मेवाती घराण्यातला दीपस्तंभ हरपला. सौंदर्यदृष्टी असलेले, उच्चकोटीचे रसिकत्व ल्यालेले, संगीत क्षेत्रातील एक चालते-बोलते संस्थान असलेले संगीत मार्तंड अशी पंडितजींची ख्याती होती. ती ख्याती चिरंतन ठेवून त्यांनी ईहलोकाचा निरोप घेतला आहे.
विश्वख्यातीच्या या कलावंताचा मृत्यू सातासमुद्रा पलीकडे, न्यू जर्सीत झाला; पण पोरकेपण मात्र भारतीय संगीत जगताच्या वाट्याला आले. कलासाधनेत गायनाइतकेच महत्त्व असलेल्या वादनाला कमी लेखण्याची ही प्रथा पंडितजींना नेहमीच चटका लावून जायची. शेवटी एक दिवस त्यांनी ठरवलं. आपणही गायचं. मग त्यांचे थोरले बंधू मणिरामजी जसराज तेवढ्याच खंबीरपणे त्यांच्या साथीला उभे राहिले. गायनाच्या जगतातले बारकावे त्यांनी शिकवले आणि मग सुरू झाला, एका तबलावादकाचा गायनाच्या वाटेवरचा प्रवास. त्यानंतर मात्र त्यांच्या गळ्यात भिजलेला सूर कमाल दाखवू लागला होता. एका तबला वादकातला गायक, वेगवेगळ्या रागांमधून शब्दांची बांधणी रसिकजनांसाठी आगळ्या पद्धतीनं मांडू लागला. एक तबलजी म्हणून ताल आणि लयीचा झालेला अभ्यास त्यांना गायनासाठी साह्यभूत ठरू लागला. कालपर्यंत गाणार्यांच्या सूरात तबल्याची साथ बंदिस्त करणारा वादक आता स्वत:च गायक झाला होता. हा बदल फार आश्चर्यकारक असा होता. संगितक्षेत्राला बरेच काही सांगणारा होता. याप्रकारे आपल्या गायन आणि संगिताचा अभ्यास त्यांनी इतका अखंड केला की ते एक महान गायक, संगितकार बनले. त्यानंतर त्यांना संगीत मार्तंडाची उपाधी बहाल झाली ती, घनगंभीर गायकीसाठी. या क्षेत्रातील त्यांच्या कित्येक दशकांच्या साधनेसाठी. जसराजांना संगिताचा वारसा लाभला होता. राजस्थानातील मेवाती घराणं त्याचसाठी प्रसिद्धी पावलं होतं. वडील पंडित मोतीराम राजदरबारात गायचे. भावाने तर त्यांना गायकीचे धडे दिले होते. इतर बंधूवर्गही उत्तम गायक आहेत. फक्त व्यावसायिक वाटेनं त्यापैकी कोणीच गेले नाहीत. पंडितजींचा मुलगा शारंगदेव आणि मुलगी दुर्गाही कलेच्या याच दरबारात साधना करताहेत. संस्कृत श्लोक असोत, वेदांतील ऋचा असोत की, पुराणातील मंत्र, पंडितजींनी ते आपल्या मधूर गायकीतून अजरामर केले आहेत. नव्या युगात, पैसा कमावण्यासाठी म्हणून वाटेल ते आणि वाटेल तसे गाण्याची तयारी असलेले कलावंत वेगळे आणि ज्या काळात ‘यातून’ पैसा मिळेलही की नाही सांगता येत नव्हते, अशा स्थितीत शास्त्रीय आणि भक्तीसंगीतासाठी आपली अभिजात कलासंपन्नता पणाला लावण्याचे धाडस जसराजांनी केले. खर्या अर्थाने संगितासाठी ते जगले. असे स्वर गात ते स्वर्गात गेले.
आपल्या अमोघ वाणीतून, गोड गळ्यातून, संगीताच्या सखोल ज्ञानातून, तपश्चर्येतून त्यांनी भक्तीसंगीत एका उंचीवर नेऊन ठेवले. “और राग सब बने बाराती, दुल्हा राग बना बसंत” असो की , भैरवी रागातले “सुमिरन कर ले”, “ ओम नमो भगवते...” असो की हनुमान चालीसाचे आगळ्या रीतीने त्यांनी केलेले सादरीकरण असो... देवी कालिकेचे भजन असो की शिवाची आराधना, तीच तल्लीनता, तीच भावोत्कटता त्यांच्या गायकीतून प्रकट होतात. असे दीव्य स्वर चिरंतन आपल्याला देउन ईश्वराचा हा दूत स्वर गात गात स्वर्गात गेला असेच म्हणावे लागेल. भारतीय संगितातील या चमत्काराला भावपूर्ण आदरांजली. तबला सोडून गायनविश्वात मुशाफिरी करताना सर्वात खालचा स्वर म्हणजे खर्ज कसा लागतो, याचा अभ्यास करण्यात तासन्तास घालवणारे पंडित जसराज नंतरच्या काळात संगीत अकादमीपासून ते पद्मविभूषणपर्यंतच्या कितीतरी पुरस्कारांचे मानकरी ठरले. मंगळ आणि गुरूच्या मध्ये असलेल्या एका नव्या ग्रहाला त्यांचे नाव देण्याचा आंतरराष्ट्रीय खगोल संघाचा निर्णय, पंडितजींचे संगीत जगतातील योगदान अधोरेखित करणारे आहे. अशा या संगितातील तार्याला आमची भावपूर्ण आदरांजली.