शनिवार, ३० जून, २०१८

काका-पुतण्या

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि इतिहासात काका-पुतण्या या नात्याला फार महत्त्व आहे. अगदी पेशवाईच्या काळापासून सुरू असलेल्या माधवराव पेशवे आणि रघुनाथराव पेशवे यांच्यापासून ‘काका, मला वाचवा’ म्हणून पळत येणा-या नारायणराव पेशव्यांची राघोबादादाला घातलेली हाक आजही राजकारणात दिली जाते. महाराष्ट्राच्या राजकारणातील काही काका-पुतणे यांच्यात एकवाक्यता आहे, तर अनेक काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेले दिसतात. यामध्ये शरद पवार-अजित पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे, श्रीमंत अभयसिंहराजे भोसले-छ. उदयनराजे भोसले, गोपीनाथ मुंडे-धनंजय मुंडे, छगन भुजबळ-समीर भुजबळ, अनिल आ. देशमुख-आशीष देशमुख या जोडय़ांचा उल्लेख करावा लागेल.महाराष्ट्रातील राजकारणात अनेक काका-पुतण्यांच्या जोडय़ा असल्या तरी त्यातील शरद पवार आणि अजित पवार ही जोडी वगळता सर्व जोडय़ा या परस्परविरोधी ठरत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील महत्त्वाची खाती सांभाळणा-या शरद पवारांचे देशाच्या राजकारणातही महत्त्व तेवढेच आहे. काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा गेली पन्नास वर्षे राजकीय प्रवास करणा-या शरद पवारांना मानणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. शरद पवारांची स्मरणशक्ती अफाट आहे.? त्यांना देशाच्या कानाकोप-यांतील कार्यकर्त्यांचे नाव तोंडपाठ असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार नेत्यांचे वारसदार आहोत असा आभास निर्माण करतच अजित पवारांची राजकारणात एन्ट्री झाली. तशी त्यांची राजकारणात एन्ट्री झाली, तीही उलटय़ा क्रमाने. साधारणपणे कोणताही नेता नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार मग खासदार असा राजकीय प्रवास करतो; परंतु अजित पवार हे थेट लोकसभेत गेले आणि मग उलटा प्रवास करत ते विधान परिषदेत गेले. १९९१ साली सर्वात प्रथम बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांना शरद पवारांनी केंद्रीय राजकारणाचे दरवाजे खुले केले. शरद पवार मुख्यमंत्री असताना राजीव गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी सर्वस्वी त्यांच्यावर सोपवली होती. राजकारणातील ज्येष्ठता संपुष्टात येऊन काँग्रेसचे धोतर इतिहासजमा करून सुटाबुटातले चेहरे राजीव गांधींनी आणले होते. त्यातील एक तरुण, पण मराठी रांगडा चेहरा अजित पवार. शरद पवारांची महाराष्ट्रावर पकड असल्यामुळे शरद पवारांच्या नावावरच लोकसभेवर निवडून आलेले अजित पवार अर्थातच कायम शरद पवारांच्या पावलावरून चालू लागले. नंतर शरद पवार जेव्हा नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून गेले तेव्हा त्यांनी अजित पवारांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा पोटनिवडणुकीद्वारे लोकसभेवर गेले आणि त्यानंतर अजित पवारांना महाराष्ट्रात आणले ते आजपर्यंत आहेत.अर्थात दिल्लीत काही आपले जमले नसते असे अजित पवार नेहमी सांगतात. पण दिल्लीच्या राजकारणाशी त्यांच्या काकांनी मात्र जमवून घेतले. या काकांचे वागणे म्हणजे नेमके बोलावे आणि अचूक वेळ साधावी अशी. या बाण्याने या कानाचे त्या कानाला कळायचे नाही. पण पुतण्या मात्र फारच तोंडाळ आणि स्पष्टवक्ता अशी ख्याती झालेला. पवारांचे वारसदार म्हणून मुख्यमंत्रीपदाचे आपण दावेदार आहोत असा समज करून घेतलेल्या अजित पवारांना खरा दणका बसला तो काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यावर. उपमुख्यमंत्रीपदासाठी भुजबळ, आर. आर. पाटील यांना अगोदर संधी दिली, विजयसिंह मोहिते-पाटलांना संधी दिली आणि त्यानंतर अजित पवारांची वर्णी लागली. त्यामुळे थोडा रुसवा फुगवा झाला. अजित पवारांनी आपली ‘दादा’गिरी दाखवायला सुरुवात केली. पवारांचे आपण राजकीय वारसदार आहोत हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात जीभ घसरून पश्चाताप करण्याची वेळही आली; परंतु काकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या नीतीप्रमाणे कन्या सुप्रिया सुळेंना पुढे आणले. राजकारणात शह-काटशह देताना फार मोठय़ा प्रमाणावर हत्ती, घोडे, उंट हालवायची गरज नसते. कधी-कधी प्यादे एक घर पुढे घेऊनही काम भागते. त्याप्रमाणे आपले दाखवायचे सुळे आणि खायचे दात वेगळे या न्यायाने सुप्रिया सुळेंना पुढे करून अजित पवारांना शह आणि आळा घालण्याचे काम शरद पवारांनी केले. त्यामुळे घराण्यात, राजकारणात, पक्षात कसलाही वाद न होता सर्वांना एकसंध ठेवत हे काका-पुतणे एकत्रच राहिले. हा एकमेव अपवाद वगळता महाराष्ट्राच्या राजकारणात अन्य काका-पुतणे हे विरोधात गेले. त्यामुळे कधी कोणी काकाला धृतराष्ट्राची उपमा दिली, तर कोणी राघोबादादाची दिली. पण कोणताच पुतण्या हा युधिष्ठिरासारखा धर्मभास्कर नव्हता की माधवराव पेशव्यांसारखा कर्तबगार नव्हता. त्यामुळे ही घराण्यातील भाऊबंदकी सतत चर्चेत राहिली आणि परस्पर विरोधी पक्षांनी त्यांचा सोयीनुसार वापर करून घेतला.सातारच्या राजघराण्यातून १९७८ पासून १९९९ पर्यंत सातारा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आणि कॅबिनेट मंत्रीपदे भूषविणारे नेते म्हणजे श्रीमंत अभयसिंहराजे भोसले. जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रवासात ते सतत वसंतदादा पाटील आणि नंतर शरद पवारांबरोबर राहिले. संयमी कार्यशैलीने त्यांनी आपले वजन तयार केले असतानाच १९९० च्या दशकात राजकीय वयात आलेले छत्रपती शिवरायांचे थेट वंशज छ. उदयनराजे भोसले हे काकांच्या विरोधातच राजकारणात उतरले. प्रथम १९९१ साली आपल्या मातोश्री छ. कल्पनाराजे भोसले यांना शिवसेनेतून विरोधात लढवून नंतर स्वत: उदयनराजे काकांच्या विरोधात उतरले. कधी रयत पॅनेलच्या नावाने अपक्ष उमेदवार म्हणून तर कधी भारतीय जनता पक्षातून ते अभयसिंहांच्या विरोधात राहिले. परंतु जोपर्यंत अभयसिंहराजे भोसले हयात होते तोपर्यंत छ. उदयनराजे भोसले यांना कधीच विजय मिळवता आला नाही. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभयसिंहराजे भोसले हे लोकसभेवर गेले आणि त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली तेव्हा मात्र काकांच्या मुलाला अर्थात शिवेंद्रराजेंना पराभवाची धूळ चारत उदयनराजे विजयी झाले. त्यानंतर युती सरकारच्या काळात काही महिने त्यांना महसूल राज्य मंत्रीपद मिळाले. भारतीय जनता पक्षात होते तोपर्यंत छ. उदयनराजेंना चांगले यश मिळाले, गोपीनाथ मुंडेंची साथ होती. पण १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशीच लेवे खून प्रकरणात त्यांचे नाव आले आणि मतदानावर परिणाम होत पुन्हा एकदा अभयसिंहराजे यांनी उदयनराजे यांचा पराभव केला. त्यानंतर या काका-पुतण्याचे संबंध कायमच विरोधाचे तणावाचे राहिले. खून खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर छ. उदयनराजे यांनी कंबर कसली आणि सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वात प्रथम अभयसिंहराजे भोसले यांच्या ताब्यातील सातारा नगर परिषद काढून घेतली. आता एकेक सत्ता ते काढून घेणार असे वाटत असतानाच २००४ ला विधानसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी छ. उदयनराजे यांचा पराभव केला. त्यानंतर उदयनराजे यांचे राजकीय प्रवाह बदलत गेले. काही काळ काँग्रेसमध्ये जात २००९ ला राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीच्याच काकांनी त्यांचे पुनर्वसन करून लोकसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे थोडाकाळ मनोमीलन झाले. पण हा काका-पुतण्यातला संघर्ष आज भाऊबंदकीत परावर्तीत झाला आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातले आणखी एक चर्चेतले काका-पुतण्या म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे. शिवसेनाप्रमुखांचा उत्तराधिकारी म्हणून महाराष्ट्र राज ठाकरे यांच्याकडे पाहत होता. पण पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आणि काका-पुतण्यात अंतर पडले. तसे राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना कधीच दोष दिला नाही, पण क्षमता असूनही आपल्याला डावलले गेल्याची सल त्यांच्या मनात कायम राहिली. त्यात उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धती आवडत नसल्याने आणि त्यांनी जे कोंडाळे निर्माण केले त्यांच्यामुळे राज ठाकरे यांनी २००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि फेब्रुवारी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. शिवसेनाप्रमुख हयात असेपर्यंत या काका-पुतण्यामध्ये प्रत्यक्ष संघर्ष कधीच झाला नाही. संघर्षाचा बिंदू उद्धव ठाकरे हाच होता. पण याबाबत शिवसेनाप्रमुखांनी काही तरी बोलावे असे राज यांना सतत वाटत राहिले, पण बाळासाहेबांनी यावर मौनच राखले. ही नात्यातली आणि पक्षातली दरी कायमची राहिली आणि हे काका-पुतणेही राजकारणात चर्चेचे विषय ठरले.महाराष्ट्राच्या राजकारणातील भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. भारतीय जनता पक्ष किंवा तत्पूर्वीच्या जनसंघाला जो एकेकाळी ब्राह्मणी चेहरा होता, तो बदलून बहुजनांचा चेहरा देण्याचे फार मोठे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्यांनी आपला पुतण्या धनंजय मुंडे यांना सर्वकाही दिले, मोठे केले. हाताचे बोट धरून राजकारणात आणले, पण हाच पुतण्या काकाच्या विरोधात जाऊन शत्रूच्या गोटात शिरला. अर्थात अनेक धक्के पचवायची सवय असलेले गोपीनाथ मुंडे यामुळे डगमगले नाहीत आणि त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. कोणत्याही संकटावर मात करून पुढे जाण्याचा निर्धार असल्यामुळे त्यांचे महत्त्व कमी होऊ शकले नाही. गोपीनाथरावांचे सख्खे मोठे भाऊ पंडितअण्णा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांना त्यांच्या बीड जिल्ह्यातील सर्व पदे गोपीनाथरावांनीच मिळवून दिली. पंडितअण्णा मुंडे तसेच धनंजय यांनी देखील जिल्हा परिषद अध्यक्षपद, साखर कारखान्याचे चेअरमनपद, जिल्हा बॅँकेचे चेअरमनपद अशी अनेक मोठी पदे भूषवली. धनंजय मुंडे यांना तर त्यांनी विधान परिषदेवर आमदार केले, तरी देखील राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या प्रभावाखाली येऊन त्यांनी बंडखोरी केली. ही बंडखोरी पक्षांतर्गत नव्हती, तर प्रत्यक्ष गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध दंड थोपटून त्यांनी बंड केले; पण मुंडे विचलित झाले नाहीत. या परिस्थितीवरही त्यांनी मात केली आणि आपले कार्य सुरू ठेवले. गोपीनाथ मुंडे यांनी ज्यांना कायम आपला राजकीय शत्रू मानला आणि जे कायम विरोधात होते, त्यांच्याच कळपात आपला पुतण्या गेल्यामुळे हा संघर्ष महाराष्ट्राला धक्कादायक होता. पण गोपीनाथ मुंडे असेपर्यंत धनंजय मुंडे यांचे काहीही चालले नाही. काका कायमच पुतण्याला वरचढ ठरले.महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक काका-पुतण्या म्हणजे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ. छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील जोरकस व्यक्तिमत्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेला हा मल्ल अनेक पदे उपभोगल्यानंतर काँग्रेसच्या आखाडय़ात शरद पवारांच्या तालमीत दाखल झाला. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यत महत्वाची जबाबदारी सांभाळणा-या भुजबळ यांनी आपल्याबरोबर आपला पुतण्यालाही राजकारणात आणले. समीर भुजबळ यांना खासदारही करून आपली ताकद दाखवून दिली. या काकापुढेही बोलण्याची पुतण्याची कधीच हिंमत नव्हती. ‘जियेंगे भी साथ साथ, मरेंगे भी साथ साथ’ या उक्तीप्रमाणे या निष्ठावान पुतण्याने एका घोटाळयातही काकाला साथ दिली. काका-पुतण्या दोघांनाही जवळपास सव्वादोन वर्षे तुरुंगात काढावी लागली आणि आता हे काका-पुतणे जामिनावर बाहेर आलेले आहेत. पण अशाही परिस्थितीत ते एकत्र आहेत. अशी ही काही काका-पुतण्यांची राजकारणातील उदाहरणे महाराष्ट्रात नेहमीच चर्चेत राहिलेली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: