शुक्रवार, २२ जून, २०१८

पुलाला नाव देण्यासाठी त्यांचे योगदान काय?

भाजपचे नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी मुंबईतील एका उड्डाणपुलाला दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे. त्यांच्या या भाबडेपणाचे कौतुकच करावे लागेल. कदाचित ऐन उमेदीत श्रीदेवीचे भरपूर चित्रपट पाहिल्याने प्रभावीत होऊन त्यांनी ही मागणी केली असेल, पण या पुलासंबंधी श्रीदेवीचे योगदान काय याचे उत्तर दाभाडकरसाहेबांनी दिले पाहिजे. विनाकारण नामकरणाचा आग्रह, वाद निर्माण करण्याचे कारण काय? त्यापेक्षा पुलाला नाव देण्याअगोदर श्रीदेवींचे त्यासाठी योगदान काय याची माहिती जाहीर व्हावी.मुंबईच्या महापौरांना एक पत्र लिहून योगीराज दाभाडकर यांनी अशी मागणी केली आहे. अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील उड्डाणपुलाला श्रीदेवीचं नाव देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. या लोखंडवाला पुलावरून किंवा आसपासच्या रस्त्यावरून अभिनेत्री श्रीदेवी असंख्य वेळा आपल्या गाडीतून फिरल्या असतील. पण रस्त्यावरच्या समस्येसाठी त्या कधी रस्त्यावर उतरल्या आहेत काय? याची माहितीही सन्माननीय दाभाडकर साहेबांनी द्यावी असे वाटते. कोणत्याही गोष्टीला, वास्तूला, संस्थेला एखाद्या व्यक्तीचे नाव द्यायचे असेल तर त्या क्षेत्रातील त्या व्यक्तीचे नेमके योगदान काय याचा विचार मनात येतो. म्हणजे तसे योगदान असेल तर नाव देण्यास काहीच हरकत नाही. फक्त आमच्या माहितीसाठी आणि मुंबईकरांच्या माहितीसाठी नगरसेवक महोदयांनी त्याची माहिती दिली तर आमचे अज्ञान दूर होईल. म्हणजे पुणे विद्यापीठाला क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले याचे कारण शिक्षण क्षेत्रासाठी त्यांचे कार्य अतुलनीय आहे. पुण्यात स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी घातला आहे. त्यामुळे विद्येचे माहेरघर असलेल्या विद्यापीठाला त्यांचे नाव दिले गेले. त्याचप्रमाणे त्या त्या कार्यक्षेत्रातील मान्यवरांचे नाव विविध विद्यापीठांना दिले आहे. यामध्ये बहिणाबाई चौधरी, अहिल्याबाई होळकर अशा विशेष आणि अतुलनीय कामगिरी करणा-यांची नावे दिली गेली आहेत. या लोकांनी अत्यंत नि:स्वार्थपणे कार्य केलेले आहे.राज्यातील विविध नाटय़गृहांनाही अशीच नावे आहेत, यामध्ये विष्णुदास भावे, कालिदास, बालगंधर्व, गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर, केशवराव भोसले वगैरे वगैरे त्या त्या क्षेत्रातील योगदानामुळे त्यांची नावे दिली गेली आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करणा-या अनेकांची नावे रस्त्यांना दिली गेली आहेत. पण या लोकांनी तत्कालीन काळात आपले योगदान दिलेले असते. परंतु एका उड्डाणपुलाला श्रीदेवीचे नाव देण्याइतके त्यांचे नेमके कार्य काय आहे हे समजणे आवश्यक आहे. त्यांनी शेकडो चित्रपटांतून भूमिका केल्या त्या त्यांच्या करिअरसाठी केल्या. त्यातून त्यांनी नाव आणि पैसा कमावला. पण त्याचा नेमका संबंध रस्त्याला नाव देण्यासाठी कसा काय येतो हे मात्र लक्षात येत नाही. यासाठी सन्माननीय नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी याबाबत स्पष्ट माहिती द्यावी. तसे लोखंडवाला कॉम्प्लेक्स या भागात अनेक मान्यवर आहेत. मग त्यांची नावे का नको? श्रीदेवीचेच का? असा प्रश्न यातून निर्माण होतो. यासाठी हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. दाभाडकर हे ‘क’ प्रभाग समितीचे चेअरमनही आहेत. लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेलिब्रेश क्लबजवळील उड्डाणपुलाला अभिनेत्री श्रीदेवी उड्डाणपूल असं नाव देण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे हा प्रश्न पडतो की तिथल्या स्थानिक प्रश्नांसाठी श्रीदेवी या किती वेळा रस्त्यावर उतरल्या होत्या? रस्त्यावरून बंद काचा खाली करून त्यांनी किती वेळा येणा-या-जाणा-या आणि सामान्यांच्या प्रश्नांकडे पाहिले आहे? त्यांचे तसे महत्त्वाचे योगदान असेल तर नाव देण्यास हरकत नाही, फक्त चित्रपटातील योगदानाव्यतिरिक्त त्यांचे योगदान काय हे जरा स्पष्ट झाले तर बरे होईल.दाभाडकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, श्रीदेवीनी त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरुवात जुली चित्रपटात बालकलाकार म्हणून केली. अनेक प्रसिद्ध हिंदी चित्रपटांशिवाय त्यांनी कन्नड, मल्याळी आणि तामीळ चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल म्हणून २०१३ मध्ये केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान केला. त्यामुळे देशातल्या दिग्गज अभिनेत्रीची आठवण म्हणून उड्डाणपुलाला त्यांचं नाव द्यावं अशी या नगरसेवकांची मागणी आहे. पण चित्रपटांतील भूमिकांच्या रूपाने त्या लोकांच्या स्मरणात कायम राहतील की. त्यासाठी त्यांचे रस्त्याला, पुलाला नावच कशाला द्यायला पाहिजे? सोमवारी नागरी गट नेत्यांच्या बैठकीत दाभाडकरांच्या पत्रावर चर्चाही झाली, असे म्हणतात. त्यानंतर अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवण्यात आला आहे. जर प्रस्ताव मंजूर झाला तर लवकरच उड्डाणपुलाचं नाव बदललं जाऊ शकतं.पण श्रीदेवी या त्यांच्या चित्रपटातील भूमिकांमुळे लक्षात राहतील की त्यांच्या रस्त्याला, पुलाला नाव देण्याने याचाही विचार व्हावा. मुंबईकरांना श्रीदेवीच्या मार्गावरून जायला लागावे असे आजतरी बिलकूल वाटत नाही. त्यांच्या निधनानंतर त्या प्रकारे  बातम्या बाहेर येत होत्या, त्या कोणत्या अवस्थेत होत्या, मृत्यू कशाप्रकारे झाला हे सगळे वादग्रस्त असताना त्यांच्या मार्गावरून जनतेने जाण्याचा आग्रह नसावा असे वाटते. त्यापेक्षा अन्य काही नावे सापडतात का बघा. श्रीदेवीचे समाजाशी काहीच देणे-घेणे नसेल तर केवळ त्यांचा फॅन आहे म्हणून आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ता, पुलाला नाव देणे हे तितकेसे योग्य वाटत नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: