सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांना लोकसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.काँग्रेस बॅकफूटवर गेल्यामुळे आणि अन्य पक्षांचे स्तोम वाढू नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून भाजपविरोधी आघाडीला बळ देण्यासाठी शरद पवार पुढाकार घेताना दिसून येत आहेत. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये शरद पवार यांचा दबदबा असून त्यांचा शब्दाला मान मिळू शकतो. याची जाणीव पवारांनाही असून प्रसंगी मनातील पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा यानिमित्ताने पूर्ण होण्याची संधी मिळू शकते, असा पवारांचा यामागचा होरा दिसून येतो. त्यामुळेच शरद पवार आता भाजप आणि मोदींना धक्का देण्यासाठी शड्ड ठोकून मैदानात उतरताना दिसत आहेत. सर्व समाजांची एकजूट केली तर मतविभाजनावर विश्वास असलेल्या भाजपला रोखता येईल हे समीकरण लक्षात घेऊनच शरद पवारांनी ‘सोशल इंजिनीअरिंग’चा प्रयोग सुरू केलेला आहे. दहा वर्षापूर्वी बसपाच्या मायावतींनी आपल्यावरील फक्त दलितांच्या नेत्या हा शिक्का पुसून टाकण्यासाठी असाच सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग केला होता. त्याला यश मिळाले होते. त्याचीच नवी आवृत्ती शरद पवार सादर करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील हल्लोबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पुणेरी पगडी बदलण्याच्या प्रयोगावरून हे दिसून आले. १० जून हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिन होता. यानिमित्ताने झालेल्या या सभेत राजकीय नेत्यांच्या भाषणाएवढीच चर्चा रंगली ती पगडीची. कारण शरद पवारांनी ज्याप्रकारे पगडी बदलण्याचा सल्ला दिला, त्यातून सर सलामत तो पगडी पचास हे दाखवून दिले. आपण सत्ता सलामत ठेवली, तरच या पगडीला महत्त्व आहे. पगडीचा वापर करूनच आपल्याला सत्तेचा सोपान गाठता येणार आहे. त्यामुळे विविध पगडय़ांना जवळ करण्याचा सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग करण्याचे त्यांनी या ठिकाणी सूतोवाच केले. पुण्यात कोणताही कार्यक्रम असला की सन्मान म्हणून पुणेरी पगडी वापरण्याची प्रथा आहे. पण या सभेत शरद पवारांनी त्या प्रथेला छेद देण्याचे काम केले. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी आता फुलेशाही पागोटे अर्थात पागोटय़ाने स्वागत करण्याचे आदेश शरद पवार यांनी भरसभेत दिले. त्यांनी हा फार मोठा धक्का पेशवाई प्रवृत्तीला दिला. त्यामुळे पगडी बदला याचा अर्थ हे सरकार बदला असाच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शरद पवार कृतीतून जे करतात त्याचा नेमका अर्थ लक्षात घेणे महत्त्वाचे असते. आजपर्यंत पुण्यात पार पडणा-या कार्यक्रमात पेशवेकालीन पगडीने स्वागत करण्याचा पायंडा आहे. रविवारीदेखील राष्ट्रवादीच्या सभेत छगन भुजबळ यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत पुणेरी पगडीने करण्यात आले. भुजबळ यांच्या भाषणानंतर शरद पवार यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षा वंदना चव्हाण आणि पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांचे नाव घेऊन पवार यांनी पुणेरी पगडी आपल्या पक्षाच्या व्यासपीठावर देणे योग्य नाही, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर फुलेशाही पागोटे दाखवत याच पागोटय़ाचा वापर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात झाला पाहिजे अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. त्यानंतर फुलेशाही पागोटे भुजबळ यांच्या डोक्यावर चढवल्यानंतर शरद पवार यांनी भाषणाला सुरुवात केली. हे अतिशय प्लॅनिंगने केलेले काम होते. हा पगडी बदल व्यासपीठावरच कसा काय केला गेला? तर ते उपस्थितांचे मनावर ठसले पाहिजे, यासाठी पुणेरी पगडी उतरवून फुलेशाही पागोटे बसवण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजनात हा विषय संपूर्ण महाराष्ट्रावर बिंबवण्यासाठी हे सगळे केले गेले होते हे लक्षात घेतले पाहिजे. गेली दोन सव्वादोन वर्षे छगन भुजबळ यांच्या अटकेविषयी फारसे न बोलणारे शरद पवार भुजबळ जामिनावर सुटून बाहेर आल्यावर त्यांना पायघडय़ा घालायला सज्ज झाले. बहुजन समाजाची मते गोळा करण्याचे हे राजकारण आहे. छगन भुजबळ यांच्या महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात फुले पागोटे वापरले जाते. त्याशिवाय काही पुरोगामी संघटनांच्या कार्यक्रमात आता पुणेरी पगडय़ांऐवजी फुले पागोटे वापरण्यात येते. त्यामुळेच भुजबळ यांच्या अटकनाटय़ानंतर दुखावलेला भुजबळ समर्थक बहुजन समाज आपल्यापासून दूर जाण्याची भीती शरद पवारांना वाटली असावी. भुजबळ यांचे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गप्प राहणे, संदिग्ध बोलणे यामुळे ते वेगळा विचार करतील आणि राष्ट्रवादीला धक्का देतील अशी भीतीही राष्ट्रवादीच्या गोटात होती. त्यामुळे ही मतविभागणी, गटबाजी आपल्या विरोधात जाईलच पण त्यापेक्षाही भाजपला फायद्याचे ठरेल हे चाणाक्ष शरद पवारांनी ओळखले. त्यातून भुजबळ कुटुंबाने ठाकरे कुटुंबाशी संपर्क साधणे, अन्य पक्षातल्या नेत्यांशी संपर्क साधणे यातून राष्ट्रवादीतील भुजबळ समर्थक आपल्यापासून दूर जातील अशी शंका आल्याने शरद पवारांनी भुजबळ यांना गोंजारून त्यांचे पुनर्वसन करण्याचे धोरण आखले. त्याचाच भाग म्हणून ही पुण्यातील पेशवाई पगडी दूर करून फुले पगडी जवळ करण्याचे धोरण आहे. शरद पवार यांनी फुले पगडी वापरण्याचे आदेश पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले आहे. पगडीतून नेमका काय संदेश दिला आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. पण मराठा आणि मराठेतर बहुजन समाज यांच्यात फूट पडू नये आणि त्याचा लाभ भाजपला मिळू नये ही शरद पवार यांची नवी रणनीती आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पुणेरी पेशवाई पगडी दूर करा याचा अर्थच बाह्मण्यवाद दूर करून आता सर्वसमावेशक असा पुरोगामी बहुजन समाजाचा विचार प्रत्येकाने डोक्यात घेतला पाहिजे हे शरद पवारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. आता ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे सरकार आणायचे असेल तर पुणेरी संकुचित प्रवृत्तीची पेशवाई पगडी म्हणजे विचार दूर करण्याचे आव्हान शरद पवारांनी स्वीकारल्याचे दिसून येते. आता यामुळे छगन भुजबळांना दोन वर्ष झालेल्या तुरुंगवास, बदनामी आणि त्रासामुळे दुखावलेला त्यांचा समर्थक समाज राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहील याचे गणित आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांनी आखलेले दिसते. त्यादृष्टीनेच पगडी बदलाचे, त्यातूनच मराठा आरक्षणाचे वक्तव्य छगन भुजबळ यांच्या तोंडून येण्याचे राजकारण म्हणजे नवे सोशल इंजिनीअरिंग आहे. दोनच महिन्यांपूर्वी आर्थिक आरक्षणाचा विचार सोडणारे पवार यांनी भुजबळ यांच्या तोंडून मलमपट्टी करून मराठा समाजालाही जवळ करण्याचे राजकीय हित साधले हे निश्चित.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा