शुक्रवार, १ जून, २०१८

शिवसेनेचा पोरकटपणा

पालघरचा पराभव पचवण्यात शिवसेनेला अजूनही यश आलेले नाही. पराभवाचे खापर फोडताना शिवसेनेने जी मुक्ताफळे उधळली आहेत ती अत्यंत पोरकटपणाची अशीच म्हणावी लागतील. शिवसेनेने पालघरच्या पराभवात सर्वस्वी ईव्हीएम, पोलीस आणि निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे. हा प्रकार म्हणजे ‘नाचता येईना आणि अंगण वाकडे’ असा म्हणावा लागेल.पालघरचा पराभव पचवण्यात शिवसेनेला अजूनही यश आलेले नाही. पराभवाचे खापर फोडताना शिवसेनेने जी मुक्ताफळे उधळली आहेत ती अत्यंत पोरकटपणाची अशीच म्हणावी लागतील. किंबहुना आपल्या अकलेचे दिवाळे काढल्याची साक्षच शिवसेनेने असे विचार प्रकट करून दिलेली आहे, असे म्हणावे लागेल. याचे कारण शिवसेनेने पालघरच्या पराभवात सर्वस्वी ईव्हीएम, पोलीस आणि निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे. हा प्रकार म्हणजे ‘नाचता येईना आणि अंगण वाकडे’ असा म्हणावा लागेल. शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘पालघरचा कौल हा ‘ईव्हीएम’ बनवाबनवीचा कौल आहे व तो कौल स्वीकारण्यास पालघरची जनताच काय तर संपूर्ण महाराष्ट्र तयार नाही.’ एका पालघरच्या निकालावरून संपूर्ण महाराष्ट्राची जनता तयार नाही असे वक्तव्य करताना शिवसेनेला मुंबई बाहेरचा महाराष्ट्र जवळ करतो का, याचा तरी विचार करायला पाहिजे होता. शिवसेना आणि मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असा समज करून बाकीचा महाराष्ट्र येडा आहे, असे शिवसेना समजते काय असा प्रश्न पडतो. महाराष्ट्र सोडा ठाण्यातूनही शिवसेनेच्या या मताशी ठाणे जिल्हाही सहमत होणे शक्य नाही. पण आपली मते लादण्याचा आटापिटा करून शिवसेना मात्र स्वत:चे हसे करून घेत आहे.या मुखपत्रातील अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, ‘ऐन मतदानाच्या पहिल्या चार तासांत शंभरावर ईव्हीएम मशिन्स बंद पडल्या व मतदानासाठी उन्हात उभे राहिलेल्या पन्नास-साठ हजार मतदारांना त्यांचा हक्क बजावता आला नाही. ते मतदार कंटाळून परत गेले. हा पन्नास-साठ हजार मतदारांना परत पाठवण्याचा डावच भाजप पुरस्कृत काँग्रेस गावितांना विजयाकडे घेऊन गेला.’ हे म्हणणे धादांत खोटे आणि पोरकटपणाचे आहे असेच म्हणावे लागेल. याचे कारण मतदान हे गुप्तपणे होत असते. पहिल्या चार तासांत जर शंभरावर मशिन्स बंद पडली तर त्या मशीनवर मतदानासाठी येणारे सगळे शिवसैनिक होते, शिवसेनेचे मतदार होते असा दावा शिवसेना करते आहे का? हा दावा कोणत्या बळावर शिवसेना करते? पहिल्या चार तासांत मशीन बंद पडल्यामुळे पन्नास-साठ हजार मतदारांना परत जावे लागले, त्यामुळे आपला पराभव झाला असे रडगाणे आता शिवसेना गाते आहे. त्यांची कीव करावीशी वाटते. हे पहिल्या चार तासांत आलेले मतदार शिवसेनेचे होते, असा साक्षात्कार शिवसेना नेत्यांना कसा झाला? मशीन बंद पडलेल्या ठिकाणी रांगेत असलेले आणि परत गेलेले मतदार शंभर टक्के शिवसेनेचे होते हा दावा कोणत्या बळावर शिवसेना करते? असे म्हणणे म्हणजे शुद्ध पोरकटपणा आहे. युद्धात, परीक्षेला जाताना, निवडणुकीला सामोरे जाताना कारणे आणि निमित्त सांगून चालत नाही. तिथे कर्तबगारीच महत्त्वाची असते. परीक्षेत नापास झालो कारण मला बसायला बेंचच चांगला नव्हता, कुस्तीत हरलो कारण समोरचा पहिलवान ताकदवान होता, हे मान्य न करता आखाडय़ातील मातीच बरोबर नव्हती असली कारणे सांगून नापास किंवा हार झालेल्यांना कोणी सहानुभूती देत नसतो. हार ती हार आणि जीत ती जीतच असते. हारजीत काही असली तरी ती मोठ्या मनाने जिंकण्यातच खरा पुरुषार्थ असतो. पण शिवसेनेला आपल्या प्रत्येक अपयशाचे खापर दुस-यावर फोडायची सवय लागलेली आहे. स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी दुस-याला दोष देणे एवढाच शिवसेनेचा अजंडा आहे.आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. मुंबईत पाऊस भरपूर असतो. त्याचे पाणी व्यवस्थित वाहून जाण्यासाठी महापालिकेने कामे वेळेत करायची असतात. या महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे अनेक दशके आहे. मुंबईची स्वच्छता, नालेसफाई करून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची आहे? शिवसेनेची आहे. पण शिवसेनेचे महापौरांपासून सगळे नेते गेल्या पंधरा दिवसांपासूनच रडायला लागले आहेत. ‘पावसाळय़ात पाणी तुंबणार, तुंबणार कारण मेट्रोचे काम सुरू आहे, बुलेट ट्रेनचे काम सुरू आहे, एमएमआरडीएचे काम सुरू आहे. आता काय करणार? पाणी तुंबले तर सरकारच जबाबदार असेल, आमची जबाबदारी नाही.’ अरे मग तुम्हाला तिथे बसवले आहे कशासाठी? मुंबईत मेट्रोचे काम सुरू आहे, पावसाळा तोंडावर आल्यावर शिवसेनेच्या महापौरांना समजले काय? एमएमआरडीएची कामे सुरू आहेत, हे अचानक शिवसेनेला समजले का? मग महापालिकेच्या सत्तेच्या खुर्च्या काय उबवायला ठेवल्या आहेत? ही कामे सुरू असताना शहराची स्वच्छता करण्याचे, नालेसफाईचे काम करण्याचे आव्हान पेलण्याची धमक शिवसेनेत नव्हती का? पण सगळे रडे बैल बसले आहेत महापालिकेत. वरपासून खालपर्यंत शिवसेनेचा एकच अजंडा आहे की आपल्या अपयशाचे, नाकर्तेपणाचे खापर फोडा राज्य सरकारवर.आपले अपयश झाकण्यासाठी भाजपला दोष देत राहा. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी मोदी, मेट्रो, गुजरातला दोष देत राहा. त्याप्रमाणे मुंबईत पाणी तुंबण्याच्या भीतीसाठी महापौरांनी गळा काढला आणि आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी शिवसेनेने पालघरमधील मतदार यंत्रांना दोषी ठरवले. ते पन्नास-साठ हजार मतदार परत गेले नसते तर शिवसेनेचा विजय नक्की होता, म्हणून कागदी फटाके फोडायला सुरुवात केली आहे. पण असल्या फटक्यांचा आवाज हा फुसका बार निघाला आहे. याचे कारण मतदाराच्या कपाळावर लिहिलेले नसते की हा शिवसेनेचा, हा काँग्रेसचा, तो भाजपचा आहे म्हणून. पण अत्यंत पोरकटपणे शिवसेना दावा करते आहे की, परत गेलेले मतदार शिवसेनेचे होते. याचा अर्थ शिवसेनेला मतदारांनी नाकारले होते हे लक्षात घ्या. तुम्ही त्यांच्यासाठी काही केले असते, तुमच्यावर विश्वास असता तर मतदान यंत्र सुरू होईपर्यंत मतदार थांबले असते. पण तसे झाले नाही. शिवसेनेच्या या रडगाण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यांच्या पोरकटपणाची महाराष्ट्र कीव करेल की अरेरे काय होती शान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेची आणि काय रडे बसले आहेत आता आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी धडपडत आहेत. हा शुद्ध पोरकटपणा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: