बुधवार, १३ जून, २०१८

अपेक्षाभंगातून निर्माण होते नैराश्य

राष्टÑसंत किंवा राजकीय गुरु म्हणून ख्याती असलेल्या आणि प्रसन्न चेहरºयाच्या भय्यूजी महाराज यांची आत्महत्या राजकीय, सामाजिक क्षेत्राला फार मोठा धक्का आहे. अत्यंत शांत, संयमी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व अशी ख्याती असलेल्या एका अध्यात्मिक गुरुने केलेली आत्महत्या हा अध्यात्मिक क्षेत्राला बसलेला फार मोठा हादराच म्हणावा लागेल. माणूस अध्यात्माकडे का झुकतो? त्याची काय अपेक्षा असते? प्रत्येकाला सुख, शांती आणि समाधान हवे असते. एवढेच मागण्यासाठी सामान्य माणूस देव, गुरु, बाबा, महाराज यांच्याकडे जात असतो. आपल्या चित्तवृत्ती स्थिर करून मानसिक समाधान लाभावे आणि तणावमुक्त जीवन जगता यावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. कसल्यातरी तणावातून, अपेक्षाभंगातून माणसाच्या मनात नैराश्य उत्पन्न होते. या नैराश्यातून आत्महत्येचे विचार डोकावतात. हे नैराश्य दूर करण्याचे काम गुरु, महाराज करत असतात. अशा परिस्थितीत भय्यूजी महाराजांसारख्या पोहोचलेल्या संतात्म्याने आत्महत्या करावी हे फार मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल. सर्वांना तणावमुक्त करण्याची ज्या व्यक्तिमत्वात ताकद होती, ज्यांच्या प्रसन्न आणि हसºया चेहºयाने समोरचा मनुष्य संतापलेला असेल तरी शांत होईल इतकी ताकद होती. तीच व्यक्ती अशी टोकाची भूमिका घेते हे अत्यंत वाईट म्हणावे लागेल. सध्याचे जग हे प्रत्येकाला तणावात ठेवणारे जग आहे. आज प्रत्येकजण कसल्यातरी तणावाखालीच जगतो आहे. सकाळी उठल्यापासून या तणावाचे ओझे घेऊन प्रत्येकजण जगतो आहे. कामावर वेळेवर पोहोचू की नाही? लोकल वेळेवर येईल की नाही? लोकलचा काही घोटाळा होऊन लेटमार्क तर लागणार नाही ना? इथपासून ते पगार वेळेवर होईल की नाही? मिळणाºया पगारात सगळे खर्च भागतील की नाही? कामाचे दिलेले टार्गेट पूर्ण होईल की नाही? पदोन्नती होईल की नाही? कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जातील की नाही? मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण, त्यांचे करीअर, घराचे बांधकाम, आई वडिलांची काळजी या सगळ्या वातावरणात आपण सगळयांना वेळ देऊ शकू की नाही? अशी असंख्य टेन्शन माणसे आपल्या मनावर घेऊन जगत असतात. व्यापारी उद्योजक आपला धंदा व्यवस्थित चालेल की नाही? मार्केटमध्ये स्पर्धकांकडून कोडी होणार नाही ना? अशा तणावात जगत असतात. शेतकºयांना कायमचीच चिंता असते. पाऊस वेळेवर पडेल का? पीकपाणी चांगले होईल का? भरपूर पीक आले तर भाव पडेल का? कमी आले तर भाव चढेल का? दोन पैसे हातात लागतील का? बँकांचे, सोसायटीचे, सावकाराचे कर्ज फिटेल का? सातबारा कोरा होईल का? सरकारी मदत जाहीर झाली तरी ती आपल्याला मिळेल का? अशा असंख्य चिंता प्रत्येकाच्या मनात तणाव निर्माण करत असतात. या तणावातून मनात नकारात्मक भावना निर्माण होऊन नैराश्य उत्पन्न होते. या नैराश्येतूनच आत्महत्येचे विचार डोकावत असतात. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. पण नैराश्यात जातो तेंव्हा तो एकटा पडतो. प्रत्येकजण आपापल्या नादात आहेत, कामात गुंतले आहेत, आपल्याकडे बघायलाही कोणाला वेळ नाही, आपण असलो काय नसलो काय कोणाला काही फरक पडत नाही असे विचार मनात घोंगावू लागतात. त्यातूनच आत्महत्येचे प्रकार घडतात. त्यामुळे घरात एकटेपणाने वावरणाºया माणसांची प्रत्येकाने विचारपूस केली पाहिजे. घरातल्या माणसांनी एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे. एका घरात राहुनही जर स्टेशनवर बसल्याप्रमाणे किंवा प्रवासात भेटलेल्या सहप्रवाशाप्रमाणे संवादहीन होत असू तर त्यातून असेच प्रकार घडत राहणार. माणसाला व्यक्त होता आले पाहिजे. ते व्यक्त होता आले नाही तर माणूस एकाकी पडतो. कुढत बसतो. खूप उंच्च पदाला पोहोचलेल्या व्यक्ती या बºयाचवेळा समाजाच्या फाजील अपेक्षांमुळे किंवा पद प्रतिष्ठेसाठी व्यक्त होऊ शकत नाहीत आणि आपल्या भावनांचा कोंडमारा करतात. त्यातून तणाव नैराश्य उत्पन्न होत असते. माणसाला मन आहे. मन आहे म्हणून तो मानव आहे. मनाला भावना आहेत. त्या भावनांना साठवून न ठेवता त्या योग्यमार्गाने मोकळ्या होणे आवश्यक असते. त्यासाठी त्याला मनापासून खळखळून हसता आले पाहिजे. रडता आले पाहिजे. अध्यात्मात आपल्या भावनांवर विजय मिळवत त्यांना वाट मोकळी करून देण्याचेच शिकवले जाते. भावनेच्या आहारी जायचे नाही तर भावनांना वाट करून मन भावनाविरहीत करायचे. प्रेमाची भावना निर्माण झाली तर तुम्ही परमेश्वरावर करा, माणसांवर करा, प्राणीमात्रांवर करा. त्यामुळे मिळणारी प्रतिक्रिया ही तुमचा आनंद द्विगुणीत करते. आनंदातून समाधान प्राप्त होते. हीच ती श्रृंखला असते. या Þश्रखलेतून माणसाला जगायचे असते. आपल्याकडे सुभाषितात सांगितले आहे की, ‘‘आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला । यया बद्धा:प्रधावन्ति मुक्तास्तिष्टन्ति पंगुवत॥ ’’ ही जी आशा नावाची बेडी आहे ती आपल्याला गुंतवून ठेवते. त्या बेडीतून मुक्त होणे हे सोपे नसते. त्यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड द्यावी लागते. अध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही ते अध्यात्म. त्यासाठी ‘‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम ।अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम॥’’ या नवविधा भक्तीचा मार्ग आपल्याला सांगितला आहे. त्यातून आपल्याला मानसिक समाधान मिळते आणि नैराश्य दूर होते. ताणतणाव मुक्तीसाठी आत्महत्या हा उपाय नव्हे तर आत्म्याला, मनाला शांती देणारा असा भक्तीमार्ग निवडणे. ती भक्ती देवाचीच असली पाहिजे असे नाही तर आपल्या कर्माशी कामाशी असली तरी आपोआप तणाव दूर होतो. तणाव हा संचितामुळे होतो. साचल्यामुळे होतो. नालेसफाई जर वेळीच झाली तर मुंबई तुंबणार नाही. तसेच प्रत्येकाची कामे वेळेवर झाली तर मनातला गाळ साचणार नाही. हा मनातला गाळ दूर करण्यासाठी कर्म करणे आणि ते कर्म करण्यासाठी भक्तीमार्ग अवलंबणे याला अध्यात्म म्हणतात. यासाठी गुरु लागतो. पण त्या गुरुलाही जर आपण तणावात ठेवत असू तर त्यांचाही भार हलका करण्याचे काम प्रत्येक समर्थकाने, शिष्याने केले पाहिजे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: