शुक्रवार, २९ जून, २०१८

बरसात में हम से मिले तुम..

पावसाचा आणि रोमान्सचा संबंध फार जवळचा आहे. प्रेमाचा संबंध हा पावसाशी असल्यामुळे चित्रपटातील रोमँटिक मूड आणि रोमान्स दाखवण्यासाठी चित्रसृष्टीला पावसातली गाणी दाखवायला नेहमीच आवडले आहे.ही पावसातली गाणी पाहताना प्रेक्षकांनाही आंतर्बाह्य आनंद मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकालाच बरसात में हमसे मिले तुम सजन, असे वाटू लागते आणि रोमँटिक मूडसाठी ही पावसातली गाणी आनंदाने पाहिली जातात. राज कपूरपासून आजकालच्या हिरोपर्यंत सर्वानीच किमान एकदा तरी पावसाचा आनंद रुपेरी पडद्यावर घेतलेला आहे. राज कपूरला तर भिजलेली नायिका दाखवण्यासाठी धबधबा सापडेपर्यंत पावसाचाच आधार होता. अशाच काही, हो काही गाण्यांचा आढावा याठिकाणी घेऊया.चित्रपटातले पावसाळी गीत म्हटले की, सर्वाना सर्वात प्रथम आठवतो तो पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याचे आराधना चित्रपटातील गीत. रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दिवाना या गीताचे चित्रीकरण इतके रोमहर्षक घेतले आहे की, त्यातील राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर दोघेही लाजबाब दिसतात. पावसात भिजल्यानंतर भरून आलेली थंडी घालवण्यासाठी पेटवलेली शेकोटी आणि त्या शेकोटीच्या प्रकाशातील दृष्य पाहताना, जेव्हा किशोरकुमारचा श्वास सोडत येणारा आवाज ऐकायला मिळतो, तेव्हा प्रत्येकाचे भान हरपून जाते. १९७०च्या दशकातील सुपरहिट असलेल्या आणि तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्नाच्या अजरामर गाण्यांपैकीच हे गाणे एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले आहे. शक्ती सामंत यांच्या या चित्रपट गीतासाठी किशोरकुमार यांना सवरेत्कृष्ट पार्श्वगायनाचे फिल्मफेअर अ‍ॅवॉड त्यावेळी मिळाले होते.आणखी एका सुपरस्टारचे पावसातले भन्नाट गीत म्हणजे अमिताभ बच्चन यांचे. बरोबर नमक हलाल चित्रपटातील आज रपट जाये तो.. या गाण्याने १९८० च्या दशकात हंगामा केला होता. त्याकाळातील तसे ते भडक रोमँटिक गाणे होते. पावसात भिजणारे अमिताभ बच्चन आणि स्मीता पाटील यांची दृष्ये, पावसातील प्रणय यावर टीकाही झाली आणि लोकांनी कौतुकही केले. विशेषत: त्यातील पदरापासून पूर्ण साडी उलगडत आमिताभने नाचणे, नाचताना डोळे बंद करून वर पाहणे आणि त्याला प्रत्युत्तरादाखल स्मीता पाटीलने खाली बघणे. नाचत-नाचत साडीच्या नि-या सोडणे आणि बांधणे या सादरीकरणाने प्रेक्षक अवाक झाले होते. पावसात नाचता- नाचता प्रेमाची धुंदी हातगाडय़ावरून बहकत जाताना पाहायला प्रेक्षकांना अजूनही मजा येते. प्रकाश मेहरांच्या या चित्रपटाला बप्पी लाहीरी यांनी संगीत दिले होते. या गाण्यात किशोरकुमार आणि आशा भोसले यांनी अक्षरश: धमाल उडवून दिली होती. प्रेक्षकांनाही नाचायला लावले होते. या गाण्याची लोकप्रियता इतकी आहे की, काही दिवसांपूर्वी त्याचा रिमिक्सही करण्यात आला होता. पण, मूळ चित्रपटातील गाणे आणि त्यातील सादरीकरणाला तोड नाही. पावसाचा मनमुराद आनंद कसा घ्यायचा असतो, ते अँग्री यंग मॅन अशी ख्याती असलेल्या अमिताभ बच्चननी रोमँटिक होऊन दाखवून दिले होते.जंपिंग जॅक अशी इमेज असलेल्या एव्हरग्रीन जितेंद्रने किती वेळा पावसात भिजण्याचा आनंद घेतला असेल हे त्यालाही आठवणार नाही. पण, तरुणपणात आणि मध्यमवयातही त्याने पडद्यावर सादर केलेली पावसातील रोमँटिक गीते ही सदाबहार म्हणूनच वर्णन करावी लागतील. यातील पहिले गीत आहे ते १९७० च्या दशकातील हमजोली या चित्रपटातील. हाय रे हाय, िनद नही आए.. या पावसातील प्रणयगीतात जितेंद्र आणि लिना चंदावरकर यांनी प्रेक्षकांना वेड केलं होतं. नाचता-नाचता बैलगाडी खाली बसणे, पावसामुळे खेकडा बाहेर येणे या दृष्यांनी या गाण्याची लज्जत वाढवली होती. रामण्णा दिग्दर्शित लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात मोहंमद रफी आणि लता मंगेशकर यांनी धमाल उडवून दिली होती. रफी-लता यांच्या अजरामर गीतांपैकी एक गीत म्हणून या पावसाळी गीताला आजही पसंती दिली जाते.जितेंद्रचेच आणखी एक पावसाळी प्रेमगीत म्हणजे मौसमी चॅटर्जी हिच्याबरोबरचे मेघा रे मेघा रे.. आज तू प्रेम का संदेश बरसा दे.. हे प्यासा सावन चित्रपटातील गीत. संतोष आनंद यांच्या या अजरामर पाऊस गीताला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केले होते. या गाण्यात उदात्त प्रेमाची कहाणी कशी फुलत जाते, हे लता मंगेशकर आणि किशोरकुमारच्या आवाजातून दिसून येते. संघर्षमय प्रेमाला यशस्वी होण्यासाठी अशा पावसाची साथ असावी, असे तमाम प्रेमिकांना वाटावे असे हे एक गीत. अत्यंत संयमीपणे पावसात हलकेच शिडकावा घेत भिजवणारे हे प्रेमगीत तमाम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले एक गीत म्हणून त्याचे वर्णन करावे लागेल.आपल्या कल्पक आणि देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणजे मनोजकुमार. देशभक्तीबरोबरच त्याला प्रेमाची भूकही फार असायची. त्यामुळे त्याच्या चित्रपटातील पावसाचे प्रेमगीत हे नेहमीच सुपरहिट असायचे. त्याने अनेकवेळा अशी पावसातील गाणी केली आहेत, पण त्यातील दोन गीते ही प्रेक्षकांना ख-या अर्थाने लक्षात राहणारी अशी आहेत. रोटी कपडा और मकान या चित्रपटातील हाय हाय ये मजबुरी, हे त्यापैकी पहिले गीत. झीनत अमान आणि भारतकुमार अर्थात मनोजकुमारच्या प्रेमाचे ही गीत अतिशय सुंदर असे तत्कालीन तंत्रज्ञानाप्रमाणे चित्रित केलेले आहे. पहिल्यांदाच या चित्रपटात प्रणयगीतासाठी म्हणून मल्टीइमेजचा वापर केलेला होता. यातून झिनत अमानचे सौंदर्य आणि तोंडावर हात ठेवून मनोजकुमारचे प्रेम हे अप्रतिम चित्रित झालेले आहे. प्रेक्षकांना हे गीत नेहमीच पाहायला आवडले आहे. विशेषत: झोपाळय़ावर झोके घेत झिनतचे भिजणे पाहताना प्रेक्षकांना खूप आवडायचे. म्हणजे तोपर्यंत त्रिमिती म्हणजे थ्रि डायमेन्शन चित्रपटाचा शोध लागलेला नव्हता म्हणून, नाहीतर झिनतचा तो झोका आपल्यापर्यंत यावा, असे प्रत्येकाला वाटून गॉगल लावून त्या झोक्याला जोजवायचा प्रयत्न प्रत्येकाने केला असता.मनोजकुमारनेच देशभक्तीच्या चित्रपटातून आणखी एक दिलेले लोकप्रिय गीत म्हणजे क्रांती चित्रपटातील जिंदगी की ना तुटे लडी, प्यार कर लो घडी दो घडी हे गीत. ब्रिटिशांविरोधात बंडखोरी करणा-यांना गुलाम बनवून जहाजावरून नेत असताना या जहाजावर भर पावसात बेडय़ा बांधून असलेले मनोजकुमार आणि हेमा मालिनी यांच्यावरचे हे प्रेमगीत प्रेम आणि देशभक्ती दाखवून देणारे उत्तम गीत आहे. लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांचे हे गाणे प्रचंड गाजलेले आहे.अलीकडचेच निर्माते दिग्दर्शक पावसातील गीते घेतात, असे नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणतात तो कृष्णधवल चित्रपटांचा काळही पावसात भिजलेला आहे. राजकपूरच्या श्री ४२० या चित्रपटातील प्यार हुआ इकरार हुआ या गाण्याची लज्जत अजूनही कायम आहे. १९५५ साली निर्माण झालेल्या या चित्रपटातून छत्रीत राजकपूर नर्गीस यांचे जाणे आणि पाण्यातच हम ना रहेंगे, तुम ना रहेंगे फीर भी रहेंगी निशानिया या कडव्याने रेनकोट घालून जाणारी ३ बालके म्हणजे प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमाची प्रतीकेच दाखवली आहेत. अर्थात ही बालके दुसरी-तिसरी कोणी नसून राजकपूरचीच मुले होती. पण, या गाण्याची गोडी अविट राहिलेली आहे. शंकर जयकिशनने संगीतबद्ध केलेले हे गीत लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेले आहे. राज कपूर आणि मुकेश हे समीकरण असले तरी हे गीत मन्ना डे यांच्या नावावर जाते.राज कपूरला पाण्याचा मोह कायमच असल्यामुळे पावसातील त्यांचे आणखी एक खास गीत म्हणजे चोरी चोरी या चित्रपटातील १९५६ सालात प्रदर्शित झालेले ये रात भिगी भिगी. हे गीत. हे गीतही लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनीच गायलेले असून राज कपूर, नर्गीस या अजरामर जोडीवर चित्रित झालेले आहे. या गाण्याचे संगीतकारही शंकर जयकिशनच असून गीत हसरत जयपुरी यांचे आहे.कुठेही गाण्याच्या भेंडय़ा असतील किंवा अंताक्षरी असेल तर, एक गाणे हमखास असते. कारण ड अक्षर आल्यावर त्या गाण्याशिवाय अंताक्षरी पूर्णच होत नाही. ते म्हणजे राज कपूरच्या १९६० सालच्या छलीया चित्रपटातील गीत. हे पण पावसातले गीत आहे. फक्त ते द्वंद्व गीत नाही तर एकटय़ा मुकेशच्या तोंडून आलेले हे गीत आहे. ते म्हणजे डम डम डिगा डिगा, मोसम भिगा भिगा, हे गीत. याशिवाय राजकपूरने आपल्या महत्त्वाकांक्षी आणि त्यांच्या आयुष्यात उलथापालथ करणारा चित्रपट म्हणजे मेरा नाम जोकरमध्येही पावसातले गीत आहे. अंग लग जा बलमा हे गीत पद्मिनी या अभिनेत्रीवर चित्रित झालेले असून आशा भोसले यांनी ते गायलेले आहे. राज कपूरच्या चित्रपट कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बरसात. या चित्रपटाचे नावच बरसात असल्यामुळे त्यात पावसाचे गाणे असणार हे सांगायलाच नको. त्यातील हसरत जयपुरींचे नर्गिस, निम्मी, राज कपूर आणि प्रेमनाथ यांच्यावर चित्रित झालेले लता मंगेशकर यांचे गीत म्हणजे बरसात में, हम से मिले तुम.. हे गीत.याच दशकात अष्टपैलू कलाकार असणा-या किशोरकुमारची निर्मिती असलेल्या चलती का नाम गाडी या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. १९५८ सालच्या या चित्रपटात किशोरकुमार आपल्या अशोककुमार आणि अनुपकुमार या भावांसह आहे. यात त्याची नायिका मधुबाला आहे. तिच्यावर चित्रित झालेले एक लडकी भिगी भागीसी, या गाण्याचा आवाज अर्थातच किशोरकुमारचा आहे आणि त्याला संगीतबद्ध केले आहे ते एस डी बर्मन यांनी. हळुवार प्रेमाचे हे गीत पाहताना फार मजा येते. राज, देव आणि दिलीप यांच्या कारकिर्दीत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करणे तसे सोपे नव्हते. पण, त्या काळातील वेगळय़ा वाटेने गेलेला म्हणूनच महिला आणि तरुणवर्गात लोकप्रिय ठरलेला नायक म्हणजे शम्मी कपूर. १९६० साली आलेले त्याचे पावसातले गीत म्हणजे दिल तेरा दिवाना या चित्रपटातील दिल तेरा दिवाना है सनम.. हे गीत. शंकर- जयकिशन यांनी संगीत दिलेल्या या गाण्याचा आवाज होता मोहम्मद रफी यांचा. अनेक दशकांच्या या हिंदी रुपेरी पडद्यावर शेकडो पावसाची गीते आहेत. त्यातील सगळय़ाच गाण्यांचा उल्लेख करणे शक्य नाही. काही बिग बजेट कलाकारांनी थंडी वाजते म्हणून गरम पाण्याचा पाऊसही पाडून घेतल्याच्या आख्यायिका आहेत. तर काही वेळा पावसाने दगा दिल्यामुळे कृत्रिम पावसात कलाकारांना भिजायची वेळ आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: