शुक्रवार, १५ जून, २०१८

निरागस पुलंची भूमिका साकारणे अवघड

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव हा अत्यंत निष्कपटी आणि निरागस होता. त्यामुळेच त्यांच्या जीवनावर आधारित भाई- व्यक्ती की वल्ली या नावाचा चित्रपट येतो आहे म्हटल्यावर उत्सुकता वाटली. कारण पुलंची भूमिका साकारणे तितके सोपे नाही. कारण पुलंची भूमिका ही काही लाऊड नाही. ती अत्यंत निरागस आणि निष्कपट वाटली पाहिजे. म्हणूनच ही भूमिका साकारण्याचे फार मोठे आव्हान या चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेत्यापुढे असणार आहे.एखादे लहान मूल असते. त्या बालकाबद्दल सगळय़ांनाच प्रेम वाटत असते. त्याचा निरागस निष्पाप चेहरा सगळय़ांना आनंद देणारा असतो. पु. ल. देशपांडे यांनी आपल्या आयुष्यात नेमके हेच जपले. आपल्यातील निरागस बालक त्यांनी मरेपर्यंत जपले म्हणूनच तर ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व होऊन बसले. लहान मूल जसे सर्वाना हवेहवेसे वाटते तसेच पुलं हे सर्वाना हवेहवेसे वाटत होते. म्हणूनच त्यांची नाटके, प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे दशकानुदशके वाचली जात आहेत. त्याची मागणी कमी होत नाही की लोकप्रियता कमी होत नाही. ज्या पुस्तकांना एखाद्या धर्मग्रंथाप्रमाणे सदैव पारायणे करावीत असे वाटते अशी पुस्तके म्हणजे पुलंची पुस्तके. साहजिकच त्यांच्यातील प्रखर निरीक्षणकर्ता हा त्यांच्या शब्दांमधून प्रत्यक्ष व्यक्तिचित्र उभे करतो. ही अफाट निरीक्षण शक्ती पुलंचे बलस्थान होती. निव्वळ निरीक्षण शक्तीच नाही तर तर त्या निरीक्षणाचे प्रतिमेत रूपांतर करून हुबेहुब व्यक्ती उभी करण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. त्यामुळे त्यांची सगळीच पात्रे ही आपल्या अवतीभवतीचीच वाटतात. केवळ ख-या किंवा प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या व्यक्तींचेच वर्णन त्यांनी केले नाही तर काल्पनिक रेखाटलेली व्यक्तिचित्रेही तितकीच जिवंत आणि खरी वाटतात. हे निरीक्षण करणारे लुकलुकणारे डोळे एखाद्या लहान मुलासारखे असतात. लहान मुलांना प्रत्येक गोष्टीत नावीन्य दिसत असते. प्रत्येक गोष्टीत काहीतरी वेगळे दिसत असते. त्यात आकर्षण वाटत असते. त्यांना कोणतीही गोष्ट कधी वाईट दिसत नाही. तर जे दिसते त्या प्रत्येक नावीन्यावर लहान बालके ही निरागस प्रेमाने पाहत असतात. पुलंनी आपल्या आयुष्यात जी माणसे पाहिली, जी व्यक्तिचित्रणे रेखाटली ती तितकीच निरागसपणे रेखाटली.. माणसांमधले दुर्गुण ते शोधत बसले नाहीत तर त्या दुर्गुणांमधील सद्गुण शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून तर बेळगांवच्या रावसाहेबांची कथा लोकांना पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते. अत्यंत शिवराळ आणि तोंडाळ अशा रावसाहेबांना प्रत्येकजण चुकवत असताना त्यांच्यातील मोठेपण हेरून पुलंनी रावसाहेबांच्या शिवीलाही ओवीचे रूप आणले. म्हणूनच पुलंचे वेगळेपण सर्वत्र जाणवते.पु. ल. देशपांडे या व्यक्तीचा विरोधक, तिरस्कार करणारा कोणी असूच शकत नाही. कारण कोणतेही बालक पाहिल्यावर आपण त्यातील निरागस हसरा भाव पाहून पटकन कडेवर घेण्याचा मोह होतो, तसेच प्रत्येकाला व्हायचे. त्यामुळे हे नेमके काय अजब रसायन आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही. राजकीय नेतेमंडळी अगदी शरद पवारांपासून सुशीलकुमार शिंदेंपर्यंत आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत सर्वानीच पुलंवर प्रेम केले. गानकोकिळा लता मंगेशकर असोत की सुनील गावसकर असो, सर्वाना पुलं हे हवेहवेसे वाटायचे. आनंदाने आणि समाधानाने आयुष्य जगणारा हसरा तारा अखेपर्यंत निरागस होता. त्यांच्या निरीक्षण शक्तीमुळेच काल्पनिक असलेली वास्तवातील व्यक्तिचित्रेही तितक्याच ताकदीने उभी राहिली. नारायण हा सार्वजनिक नमुना म्हणून प्रत्येक लग्नातला नमुना जो त्यांनी उभा केला आहे तो प्रत्येकाला आपल्या जवळचा वाटतो. हरितात्या, सखाराम गटणे, चितळे मास्तर हे प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कुठेतरी आल्यासारखे वाटतात. म्हैससारख्या कथेतून किंवा अंतुबर्वातून कोकणी माणसातला स्पष्टपणा त्यांनी अगदी स्पष्टपणे मांडून सर्वाची मने जिंकली आहेत.वा-यावरची वरातसारख्या रंगमंचकीय आविष्कारातून तत्कालीन परिस्थितीवर ज्या प्रकारे त्यांनी कटाक्ष टाकलेला आहे तो अफलातून असाच आहे. सुंदर मी होणार, अंमलदार या नाटकातील व्यक्तिरेखा किंवा  तुझे आहे तुजपाशी या नाटकातील अहंकाराला डिवचण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे तो सर्वाना अंतर्मुख करणारा असाच आहे. हे अभ्यासाने आणि प्रचंड निरीक्षणाने निर्माण झालेले आहे. ती फुलराणी या नाटकाची निर्मिती मूळच्या पिग्मीलियन्सवरून आलेली आहे हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. त्यामुळे भाषासौंदर्य आणि संस्कार याचा अनोखा संगम या ठिकाणी दिसून येतो. त्यांची प्रवासवर्णने पूर्वरंग, अपूर्वाई यातून दाखवलेले जग म्हणजे पु. ल. आपले डोळे प्रत्येकाच्या खोबणीत बसवतात आणि आपल्यालाच  ते दाखवतात इतके सुरेख आहे. त्यामुळे अशा हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवणे सोपे नाही. जे स्वत: लेखक, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद लिहीतात, संगीत देतात आणि अभिनयही करतात त्यांना दोन तासात बंदिस्त करणे हे सोपे नाही. म्हणूनच या चित्रपटाला नाव भाई व्यक्ती की वल्ली असे दिले असावे. त्याचे उत्तर प्रेक्षकांवर सोडले पाहिजे असाच यामागचा हेतु असावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: