राज्य सरकारने राज्यात प्लास्टिकवर बंदी घातली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही बंदी घातली हे योग्य आहे. त्याबाबत कोणतेही दुमत नाही. पण, यामुळे ख-या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे प्रेम आहे का? याबाबत हेतू कितपत शुद्ध आहे आणि भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्याचा हा नवा डाव तर नाही ना? अशी शंका आल्यावाचून राहात नाही, याचे कारण, ही बंदी घालताना कोणतीही पर्यायी व्यवस्था राज्य सरकारने केलेली नाही. कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्यापूर्वी त्याची पर्यायी व्यवस्था करणे महत्त्वाचे असते. अगदी एखादा रस्ता काही कारणामुळे अथवा दुरुस्तीसाठी बंद ठेवला असेल तर, दुसरीकडून वाहतूक वळवावी लागते. नाहीतर वाहतुकीची कोंडी होते, गर्दी वाढते आणि सगळाच गोंधळ होतो. तसेच प्लास्टिकबंदीबाबत झालेले आहे. तुम्ही बंदी घाला, पण प्लास्किटचा वापर नेमका कुठे कुठे केला जातो, त्याचा काय काय उपयोग होतो, कोण कसा करतो याचा अभ्यास ही बंदी घालण्यापूर्वी राज्य सरकारने केला होता का? का, पर्यावरण मंत्र्यांच्या मनात आले, म्हणून घाईघाईने हा निर्णय घेतला आणि पर्यावरण मंत्र्यांप्रमाणे कसलाही अभ्यास न करता त्याची अंमलबजावणी करण्याचा घाट घातला, याचा तपास करावा लागेल.प्लास्टिकचा सर्वात जास्त वापर हा पॅकिंग आणि कॅरीबॅगच्या स्वरूपात होतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्लास्टिक हा माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनला होता. त्यातील किती आणि कुठले प्लास्टिक वज्र्य करायचे, याची स्पष्ट माहिती कुठेही नाही. फक्त कॅरीबॅग आणि बाटल्यांचे प्लास्टिक घातक आणि इतर वापराचे घातक नाही, हे सप्रमाण कोणीतरी सिद्ध करायला पाहिजे. कारण, सकाळी उठल्यावर आपण दात घासतो तो ब्रशही प्लास्टिकचा असतो. आंघोळीची बादली, टब, मग, टॉयलेटमधील सर्व वस्तू इथपासून ते सोपकेस या सकाळच्या प्रातर्विधीच्या गोष्टींपासून प्लास्टिक आपल्या सेवेला असते. मग डबे, बास्केट, चाळण्या, फ्रीजमध्ये ठेवायच्या बाटल्या, मायक्रोवेव्ह ओव्हनची भांडी ही सगळीच प्लास्टिकची असतात. ते प्लास्टिक चांगले, घातक नाही अन् फक्त पिशव्या कॅरीबॅगचे घातक आहे हे सप्रमाण अजूनपर्यंत कोणीही सिद्ध केलेले नाही. आपण कार्यालयीन कामकाजात वापरली जाणारी पेन, फाईल, लॅमिनेशनसाठी लागणारे प्लास्टिक यात भेदभाव कसा होऊ शकतो आणि या सर्वामधला फरक तो काय, हे समजावून कोण सांगणार? प्लास्टिक वाईट आणि घातक असेल तर ते सगळेच असायला पाहिजे. असे ठरावीक ते चांगले आणि बाकीचे वाईट हे कसे शक्य आहे. म्हणजे हा प्रकार अल्कोहोलीक पदार्थाचे समर्थन करण्यासारखा झाला. देशी दारूला बंदी घाला, विदेशी सुरू ठेवा. दोन्हींमधील अल्कोहोल हा घातक पदार्थ एकच असताना, एकाला बंदी आणि एकाला पायघडय़ा असला प्रकार कशाला? बरं, ते खरोखरच घातक आहे म्हणून त्यावर बंदी घालायची असेल, तर ती संपूर्णपणे घाला. पार्टली बंदी कशी काय असू शकते? बंदी घालायचीच होती, तर मग त्याच्याऐवजी पर्यायी वस्तूंची निर्मिती करण्याकडे दुर्लक्ष केले.प्लास्टिक येण्यापूर्वी सुमारे तीस-चाळीस वर्षापूर्वी किराणा मालाच्या दुकानातून वर्तमानपत्रांच्या कागदाच्या पुडय़ांचा वापर होत होता; परंतु प्लास्टिक पिशव्यांचे प्रस्त आले तसे सगळे सोपे झाले. किटली घेऊन येणारा गवळी किंवा भय्या भाई दूध म्हणून पातेले घेऊन येण्याची वाट पाहेनासे झाले. पिशवीत दूध भरून दाराला लावून जाऊ लागले. असे प्रत्येक ठिकाणी घडत गेले. भाजी मंडई किंवा शॉपिंगला जाताना घरातून पिशवी, थैली घेऊन जाण्याची गरज वाटेनाशी झाली, कारण बझार संस्कृतीत बिगशॉपर अशा पिशव्या आल्या. जमाना यूज अँड थ्रोचा आला आणि सगळे प्लास्टिकमय जग बनले. त्यावर एकाएकी कसलाही पर्याय उभा न करता बंदी घालणे म्हणजे गैरसोयींना आमंत्रण आणि भ्रष्टाचाराचे कुरणच खोदल्याचा प्रकार म्हणायला हवा. पालिकेचे कर्मचारी सगळी कामे टाकून प्लास्टिक हटावसाठी बाहेर पडतात आणि धाडी टाकू लागतात, याचा अर्थ काय? जीएसटी आल्यापासून महापालिका क्षेत्रातील जकात बंदी झाली. ही जकात चुकवून भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्याची सवय अनेकांना अंगवळणी पडली होती. वर्षभरात तो पैशाचा मार्ग बंद झाल्याने प्लास्टिकमधून आम्हाला आता काही इन्कमसोर्स होईल, असे अनेकांना वाटू लागले असण्याची शक्यता आहे. पण, ही अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्य सरकारने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. बंदीनंतरचा पहिलाच रविवार होता आजचा. रविवार हा प्रत्येकाचा खरेदीचा, विशेष बेत आखायचा दिवस असतो. मच्छीमार्केटमध्ये फेरफटका मारल्यावर खरेदी करताना, तो विक्रेता पटकन प्लास्टिकमध्ये मासे बांधून देत होता. भाजीचेही तसेच होते. त्यांनी करायचे काय? कापडी पिशवी ही प्लास्टिकच्या तुलनेत महाग असते. तिचा पुनर्वापर जास्त असला तरी, ती तशी अजागळ आणि ओंगळ वाटत असल्याने कॅरीबॅगला लोकांनी पसंती दिली होती.शॉपिंगसाठी कापडी पिशव्याही वापरल्या जातील, पण पॅकिंगसाठी वॉटरप्रुफ असे कोणते मटेरिअल वापरले जावे, याचे काहीच कोणी बोलत नाही. प्लास्टिकचे वेष्टन हे सुरक्षित वाटत असल्यामुळे त्याचा वापर होत होता. आता गणपतीचे दिवस येतील. पावसाळय़ात गणपतीच्या मूर्तीचे रक्षण करण्यासाठी त्या प्लास्टिकच्या पिशव्यांनी झाकून ठेवल्या जातात आणि सुरक्षितपणे सर्वत्र पाठवल्या जातात. या मूर्तीकारांनी नेमके करायचे काय? थर्माकोलची आरास आणि त्याच्या वस्तू करण्याची फार मोठी कारागिरी आणि कौशल्य आपल्याकडे विकसित झालेले आहे. ही कलाकारी गणपतीत पाहायला मिळते. त्या कलेला आता गुंडाळून ठेवायचे काय? यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनी करायचे काय? त्यांच्या रोजगार आणि पुनर्वसनासाठी सरकारने काही पावले उचलणे गरजेचे होते. या सगळय़ाची कसलीही पर्यायी व्यवस्था सरकारने केलेली नाही. फक्त दिसले प्लास्टिक की कर दंड, असला बडगा दाखवायला सुरुवात केली आहे. हा प्रकार म्हणजे प्लास्टिक बंदी कमी, भ्रष्टाचाराचे कुरण वाढवायचा प्रकार म्हणावा लागेल.
रविवार, २४ जून, २०१८
प्लास्टिक बंदी स्तुत्य, पण..?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा