शुक्रवार, १ जून, २०१८

मराठी बाहुबली ‘फर्जंद’

बाहुबली या चित्रपटातील तांत्रिक अंगांनी सर्वानाच अवाक केले होते. दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील थ्रील, अॅाक्शन मराठी चित्रपटांमधून पाहायला मिळत नाही, असे नेहमीच बोलले जाते. पण, स्वामी समर्थ मुव्हीजने आणलेला फर्जंद हा चित्रपट मराठीतील बाहुबली ठरायला हरकत नाही, असे हा चित्रपट पाहताना जाणवते. सुट्टी संपता-संपता आलेला हा ऐतिहासिक युद्धपट आबालवृद्धांनाही थक्क करेल असाच आहे. मराठी चित्रपटानेही तांत्रिक अंग सांभाळून आपल्या मर्यादा ओलांडलेल्या या चित्रपटातून जाणवतात.

छत्रपती शिवरायांच्या इतिहासावरील हा एक युद्धपट आहे. शिवरायांच्या मावळय़ांचे कर्तृत्व आणि शिवप्रेम दाखवताना शिवरायांचा खरा विचार पोहोचवण्यात निर्माते, लेखक, दिग्दर्शक यशस्वी झाल्याचे या चित्रपटातून जाणवते. तानाजी मालुसरेंचा चेला असलेला बलदंड आणि शूरवीर असा मावळा म्हणजे कोंडाजी फर्जंद. त्याच्या विश्वासावर स्वराज्यातून गेलेला पन्हाळा गड परत मिळवण्याची आखलेली योजना आणि त्यासाठी मावळय़ांनी घेतलेले परिश्रम हा या चित्रपटाचा विषय. यासाठी सध्या मराठीतील आघाडीचे कलाकार घेण्याबरोबरच फर्जंद हा नायक महत्त्वाचा आहे. पिळदार शरीरयष्टीने संपूर्ण पडदाभर हा फर्जंद प्रेक्षकांना अगदी व्यापून टाकतो. ऐतिहासिक चित्रपट बनवणे तसे सोपे नसते. खर्चिक आणि पोषाखी असलेल्या अशा चित्रपटांवर कोणी फारसे परिश्रम घेताना दिसत नाही. त्यामुळे असे चित्रपट आजवर आले तरी ते मनाला फारसे भावत नाहीत; परंतु या चित्रपटाने आपली भव्यता दाखवून देताना तांत्रिक अंगे उत्तमरीत्या सांभाळलेली आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहायला काहीच हरकत नाही.
या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, गीते दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने सांभाळून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलेले आहे. गीते, छायाचित्रण आणि वेशभूषा या सर्वच बाबतीत हा चित्रपट भव्य वाटतो. त्यामुळे चित्रपटात ऐतिहासिक पार्श्वभूमी निर्माण करण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेले आहेत. यात केलेली रंगभूषा आणि प्रत्येकाने साकारलेली भूमिका अत्यंत नैसर्गिक अशी वाटते. हेच या चित्रपटाचे मोठे यश म्हणावे लागेल. चिन्मय मांडलेकरने यात शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे, तर जिजाऊ मृणाल कुलकर्णीनी साकारलेली आहे. परंतु, यात भाव खाऊन जातो तो बहिर्जी नाईक ही भूमिका करणारा प्रसाद ओक आणि फर्जंदची भूमिका साकारणारा अंकीत मोहन हा कलाकार. मृण्मयी देशपांडे हिनेही आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांची मालिका कायम राखत यात साकारलेली केशर मस्त वाटते.
छोटय़ा-छोटय़ा भूमिकांमधून राजन भिसे, राहुल मेहेंदळे, नेहा जोशी, आस्ताद काळे, प्रवीण तरडे, निखिल राऊत हे लक्षात राहतात. यातील छायाचित्रणाला दाद द्यावी लागेल. विशेषत: किल्लेदाराला मारताना त्याच्या निळय़ा डोळय़ांत दिसणारी प्रतिमा हे छायाचित्रकाराचे कौशल्य लक्षात राहण्याजोगे आहे.
का पाहावा – इतिहासाला दिलेला नवा लुक आणि उत्तम तांत्रिक अंगासाठी

फर्जंदपूर्वी सर्जा
छत्रपती शिवरायांबद्दल अनेक चित्रपट येऊन गेले. भालजी पेंढारकरांनी तर भरपूर चित्रपट शिवरायांवर काढले. त्यानंतर श्रीराम गोजमगुंडेंनी पण, राजा शिवछत्रपती हा चित्रपट काढला. शिवरायांच्या मावळय़ांवर ती पावनखिंड हा बाजीप्रभू देशपांडेंवर, नेताजी पालकर असे चित्रपट होते. पण, त्यानंतर मात्र १९८७ साली सर्जा हा चित्रपट शिवभक्त मावळय़ावर आला होता. या चित्रपटाची निर्मिती रमेश देव आणि सीमा देव या देवमाणसांनी केलेली होती. या चित्रपटाचा नायकही त्यांचा मुलगा अजिंक्य देव हाच होता. यात पूजा पवार या अभिनेत्रीचे पदार्पण झाले होते. शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शेलारखिंड या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. त्या काळात हा चित्रपट खूप गाजला होता. यात रवींद्र महाजनी या अभिनेत्याने छत्रपतींची भूमिका साकारली होती. सर्जा हा बलदंड पिळदार शरीराचा तरुण. त्याला शिवरायांच्या सैन्यात भरती व्हायचे असते आणि शिवरायांचे दर्शन घेण्याची इच्छा असते. औरंगजेबाच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी एक भली मोठी तोफ गडावर न्यायची असते. ही तोफ व्यवस्थित वपर्यंत कशी न्यायची हे आव्हान सर्जा स्वीकारतो आणि राजांचे मन जिंकतो असे काहीसे कथानक त्या चित्रपटात होते. या चित्रपटात बहिर्जी नाईक ही भूमिका स्वत: रमेश देव यांनी केली होती. यातील ‘चिंब पावसाने झाले आबादानं’ हे गीत आजही तितकेच लोकप्रिय आहे. सातारा आणि वाई परिसरात चित्रीकरण झालेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी त्या काळात दिला होता. शिवराय आणि त्यांचे मावळे यांच्यावर कितीही चित्रपट निघाले तरी, ते पुन्हा पुन्हा पाहिले जातात. फर्जदमुळे ही आठवण ताजी झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: