आपल्याकडचे सगळे सण हे पर्यावरण आणि निसर्गाचे रक्षण आणि जतन करण्यासाठी निर्माण केलेले आहेत. गोपाळकृष्णानेही जो निसर्गाचा घटक आपल्याला मदत करतो त्याची पूजा करा असे सांगून इंद्रपूजा म्हणजे व्यक्तिपूजा बंद केली होती.आज ज्येष्ठ पौर्णिमा. अर्थात वटपौर्णिमा म्हणून हा दिवस महिला साजरा करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वडाची पूजा केली जात असली तरी त्यामागे वृक्षसंवर्धन हाच मूळ हेतू आहे. दुर्दैवाने झाडाची पूजा करण्याऐवजी फांदीची पूजा करण्याचा शॉर्टकट गेल्या काही वर्षात रुजल्यामुळे वृक्षतोड होऊ लागली आणि आपली संस्कृती बदनाम होऊ लागली. परंतु आपली संस्कृती, धर्म आणि पूजापाठ हा मुळातच पर्यावरण संवर्धनासाठी आहे. त्यामुळे पावसाळय़ात येणारा वटपौर्णिमेचा सण हा फक्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी नाही तर समस्त मानवजातीच्या दीर्घायुष्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.वडाचे झाड हे कधीच मरत नाही. ते मारले जाते, नष्ट केले जाते, तोडले जाते पण आपोआप कधीच ते मरत नाही तर ते विस्तारत जाते. त्याला आलेल्या पारंब्या पुन्हा जमिनीत जाऊन नव्याने झाड विस्तारत असते. त्यामुळेच असे दीर्घायुष्य आपल्या पतीला लाभावे यासाठी ही पूजा केली जाते. शुद्ध हवा, भरपूर सावली देणारी झाडे चिरंजीव राहिली पाहिजेत यासाठी तर त्याला पाणी घालून पूजा केली जाते आणि त्याला फे-या मारल्या जात असतात. त्या सणासाठी असलेल्या भाकड कथा किंवा सत्यवान सावित्रीची कथा बाजूला ठेवून त्या वडाच्या झाडाचे संगोपन करणे हे जीवदान आहे, असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे. त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करण्यात कसली अंधश्रद्धा आहे असे न समजता पर्यावरण रक्षणाचा हा पर्यावरणाचा दिवस आहे हे समजून त्यादिवशी वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करणे ही खरी वटपौर्णिमेची पूजा असेल. आपल्याकडचे सगळे सण हे पर्यावरण आणि निसर्गाचे रक्षण आणि जतन करण्यासाठी निर्माण केलेले आहेत. गोपाळकृष्णानेही जो निसर्गाचा घटक आपल्याला मदत करतो त्याची पूजा करा असे सांगून इंद्रपूजा म्हणजे व्यक्तिपूजा बंद केली होती. ज्या गोवर्धनाच्या पर्वतावरील गवतावर गायी चरतात आणि आपल्याला गोधन मिळते अशा गोवर्धनाची पूजा करायचा आदेश तत्कालीन परिस्थितीत काढलेला होता.व्यक्तिपूजा आणि मूर्तिपूजेपेक्षा आपल्याकडे निसर्गावर आधारित सण- समारंभालाच जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे वटपौर्णिमा या सणाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. फक्त महिलांनी वडाची पूजा करण्यापेक्षा पती-पत्नी यांनी मिळून एक वडाचे झाड लावले तर सगळय़ांचेच आयुष्य हे दीर्घायुष्य होईल. सध्या होत असलेल्या वातावरणातील प्रदूषणाला मोठे वृक्ष लावणे आणि त्यांचे जतन करणे हाच उपाय आहे. आपल्याकडे वाढलेले धुळीचे साम्राज्य, त्यामुळे निर्माण होणारा खोकला आणि अकाली सर्दीचे प्रमाण खूप वाढले आहे. आजकाल सर्दी ही बारा महिने होत असते. पूर्वी सर्दी, खोकला हा थंडीत व्हायचा. पण धुळीमुळे कडाक्याच्या उन्हात घामाच्या धारा वाहत असतानाही सर्दी होते. याचे कारण शुद्ध हवेचे मार्ग आम्ही बंद केलेले आहेत. वाढते नागरीकरण आणि विकासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड झालेली आहे. महामार्गाचे सहा पदरी, आठपदरी करण करताना हजारो-लाखो वटवृक्षांची कत्तल केलेली आहे. मुंबई ते पुणे, पुणे ते सातारा आणि संपूर्ण महामार्गावर दुतर्फा वडांची मोठी झाडे होती. या झाडांच्या पांदीतून गाडी जायची तेव्हा मजा वाटायची. प्रत्येक झाडाच्या खोडाला कावेने रंग दिलेला असायचा आणि पांढरा चुन्याचा पट्टा ओढलेला असायचा. अशी अवाढव्य लाखो झाडे रस्ता रुंदीकरणासाठी तोडली गेली आहेत.आता या मध्ये दुभाजकांवर दिसतात फक्त कण्हेरी आणि फुलांची छोटी रोपे. ही रोपे रंगीत फुले देतील पण ती इतकी उंच कधीच होणार नाहीत की माणसांना सावली देतील. सावली देणारी झाडे म्हणजे वड, पिंपळ, आंबा हीच झाडे महत्त्वाची आहेत. म्हणून तर आपल्याकडे या झाडांचे महत्त्व आहे. आंब्याचा डहाळा, त्याची पाने कलशात ठेवायला लागतात. त्यासाठी त्या झाडांचे संवर्धन होते. पिंपळ, औदुंबर ही झाडे कोणी तोडू नयेत म्हणून त्याठिकाणी दत्तगुरूंचा वास असतो हे सांगितले गेले आहे. वडाला तर स्वतंत्रपणे पूजेचा मान मिळालेला आहे. आज हीच झाडे कमी होत आहेत. वटपौर्णिमेच्या निमित्ताने लांबवर जायला लागू नये म्हणून गावात ठिकठिकाणी पार बांधून ही झाडे जोपासली गेली होती. आज महामार्गाच्या, समृद्धी मार्गाच्या नावाखाली आणि विकासाच्या नावाखाली त्याची तोड झालेली आहे. म्हणून आता या झाडांची पूजा करणे म्हणजे जास्तीत जास्त या झाडांचे रोपण करणे हाच खरा वटपौर्णिमेचा उद्देश असला पाहिजे. सरकारने विकासकामांसाठी आणि जनतेच्या सोयीसाठी तोडलेल्या झाडांची कमतरता भरून काढण्यासाठी डहाळी किंवा फांदीची पूजा करण्यापेक्षा आपल्या परिसरात किंवा कुठेही गावाबाहेर जाऊन एक वडाचे झाड लावावे. या दिवशी पावसाळी पिकनीक काढून गावाबाहेर जाऊन असे वृक्षारोपण करणे म्हणजेच ख-या अर्थाने वटपौर्णिमेचा सण साजरा केला असे होईल.
बुधवार, २७ जून, २०१८
वटपौर्णिमेचा उद्देश पर्यावरण रक्षणाचाच
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा