मुंबई महापालिकेकडून नेहमीप्रमाणेच या वर्षीही पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नालेसफाई झाली नाही. कामे वेळेवर करायची नाहीत ही मुंबई महापालिकेची ख्यातीच झाली असून त्याची सारवासारव करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेचे नेते वाट्टेल ते बोलत आहेत, असे चित्र आता सर्रास दिसू लागले आहे. गेल्या वर्षी मुंबईतील खड्डे किती गोल गोल हे विडंबन गीत व्हायरल झाल्यानंतर शिवसेना प्रचंड संतप्त झाली होती, पण कामात सुधारणा करण्याबाबत कोणतीही खबरदारी घेतली गेली नाही हे विशेष म्हणावे लागेल. म्हणजे ‘सोनू, तुझा बीएमसीवर भरवसा नाय का’ या गाण्याने संतापलेल्या शिवसेनेने बीएमसीबाबत भरवसा ठेवता येईल, अशी कोणतीही कृती वर्षभरात केली नाही. परिणामी नेमेची येतो मग पावसाळा या नियमाप्रमाणे ‘नेमेची तुंबते बीएमसीमुळे मुंबई’ असे म्हणावे लागत आहे. परंतु या निष्क्रियतेमुळे निष्पाप जीव जात आहेत याचे भान पालिकेला नाही हे मुंबईकरांचे मोठे दुर्दैव आहे. मुंबईतील उघडी गटारे आणि गटारांची झाकणे न लावल्याने अनेकजणांना त्याचा सोमवारी फटका बसला. कोणाची दुचाकी अडकली, कोणी त्या खड्डय़ातून वाहून गेले, कोणी आत अडकले तर कोणाला जीवही गमवावा लागला. हा सगळा महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका आहेच, पण बेजबाबदारपणाचा कळस म्हणावा लागेल.तरीही मुंबईचे महापौर बिनधास्त वक्तव्य करून आपली सारवासारव करत होते. या शिवसेनास्टाईल सारवासारवीला दुतोंडीपणा म्हणतात. सगळीकडे पाणी तुंबलेले असतानाही महापौरांचे वक्तव्य म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस म्हणावा लागेल. ते म्हणाले, ‘मुंबईत आतापर्यंत चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडूनही गेल्या वर्षीप्रमाणे पाणी तुंबून राहिलेले नाही. याची कल्पना मुंबईकरांना आहे. मुंबईत मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले किंवा साचले असे कुठेही दिसले नाही’. अर्थात हे वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पालिकेत केले होते, त्याचीच रि ओढण्याचे काम महापौरांनी केले. म्हणजे रोम जळत होता आणि राजा फीडल वाजवत होता असाच प्रकार शिवसेनेच्या नेत्यांचा आणि मुंबईचे राजे म्हणवणारे महापौरांचा आहे. सोमवारी आपत्कालीन नियंत्रण कक्षात पाहणीसाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ‘मुंबईत विविध प्राधिकरणांची कामे सुरू आहेत. त्यामुळे मी आता कोणावरही आरोप करणार नाही. तो माझा स्वभाव नाही. मुंबईकरांना त्रास होत असताना आपण आरोप करणे बरे नाही’, असे स्पष्ट करीत त्यांनी मेट्रोच्या कामावर टीका करणे टाळले. म्हणजे यालाच आम्ही दुतोंडीपणा म्हणतो. आम्ही असे म्हणणार नाही असे म्हणायचे, मागचे दोन महिने नालेसफाई करण्याचे काम केले नाही, अगोदरच मेट्रो आणि एमएमआरडीएच्या नावाने शंख करून झाला आणि आता कामे झाली नाहीत तर आम्ही असे म्हणणार नाही असे म्हणून काढता पाय घेतला. यांच्या बोलण्यात एकवाक्यता ती येणार कधी? कायम त्या दादा कोंडकेंसारखे द्वयर्थी बोलायचे आणि सोयीचे ते आपले म्हणायचे ही शिवसेनेची भूमिका राहिली आहे.मेट्रोच्या कामांमुळे यंदा मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता असून त्यास सरकार जबाबदार असेल, असा आरोप शिवसेनेच्या वतीने वारंवार करण्यात आला होता. तरीही आम्ही असे म्हणणार नाही असे सांगून दुतोंडीपणा केलाच. सोमवारी मुंबई शहरासह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडून अनेक भाग जलमय झाले. याबाबत मात्र पालिकेच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत उद्धव यांनी पालिकेचे कौतुक केले. हा फार मोठा विनोद आहे. काही धोका निर्माण झाला तर तो राज्य सरकारमुळे, मेट्रोमुळे झाला. काही चांगले झाले तर ते मात्र पालिकेमुळे होणार. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले पाहिजे की, सोमवारी पाणी तुंबले आणि अनेकांना त्याचा फटका बसला. हे पाणी बीएमसीमुळे नाहीतर राज्य सरकारमुळे, मेट्रोमुळे तुंबले असेही एकवेळ मान्य करता येईल, पण पाणी तुंबले असताना रस्त्यावरची गटारे उघडी ठेवली होती आणि त्यामुळे झालेल्या अपघाताची तरी जबाबदारी शिवसेना आणि पालिका घेणार आहे का? का ही झाकणेही राज्य सरकारच्या आदेशाने उघडी ठेवली होती? झाकणे काढून ठेवल्यामुळे अनेकांना त्याचा फटका बसला, काहींना जीव गमवावा लागला, ही जबाबदारी शिवसेनेची नाही का? का नेहमीप्रमाणे शिवसेना हात झटकणार आहे? सोमवारी पहिल्याच पावसात मालाड पश्चिमेला उघडय़ा गटाराचे झाकण लावलेले नसल्यामुळे त्यात साचलेल्या पाण्यात गटार न दिसल्यामुळे एक १२ वर्षाचा मुलगा मुत्युमुखी पडला, याला जबाबदार कोण? महापालिकेचे कर्मचारी गटारांची झाकणे काढून तशीच असुरक्षित गटारे कशी काय ठेवू शकतात? अशाच गटारात वाहून गेल्यामुळे गेल्या वर्षी डॉक्टर अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता.मेट्रोमुळे पाणी तुंबले असेल पण झाकणे उघडी ठेवल्यामुळे असुरक्षित गटारे ठेवल्यामुळे मुंबईकरांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे हे शिवसेना नेते मान्य करणार आहेत का? विशेष म्हणजे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच मत व्यक्त केले. त्यांच्या मते, मुंबईत कुठेही पाणी तुंबले नव्हते, तर साचले होते, असा दावा त्यांनी केला आहे. आता साचणे आणि तुंबणे यात नेमका काय फरक आहे हे शिवसेनेच्याच शब्दकोशातून शोधावे लागेल. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उत्तर दिले पाहिजे की हे पाणी साचले किंवा तुंबले असेल, पण झाकणे न लावता उघडी गटारे ठेवण्याचे आदेश कोणाचे? ती जबाबदारी कोण घेणार? पावसाळय़ात पाणी साचायच्या बेतालाच गटारे उघडी का ठेवली जातात? याची जबाबदारी महापौर, महापालिका, शिवसेना यापैकी कोण घेणार आहे? नालेसफाईची कामे पूर्ण करता येत नाहीत, गटारे सफाईची कामे पूर्ण करता येत नाहीत तर किमान झाकणे बंद करून धोका कमी करण्याचे काम करायला काय हरकत आहे? बहुसंख्य ठिकाणी मेनहोलची झाकणे काढून टाकलेली आहेत. एरवी मुंबईकर ती चुकवून जातात. पण पाणी साचल्यावर ती दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होतात, याची जबाबदारी पालिका घेणार का?
बुधवार, २७ जून, २०१८
बेजबाबदार महापालिका, बेताल पदाधिकारी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा