खासगीकरणासाठी उतावीळ झालेल्या शिवसेनेने आपल्याकडे असलेल्या मंत्रिपदांचा वापर मनमानी निर्णयासाठी घेतला. त्या निर्णयांमधून फायदा झाला तर त्याचे श्रेय आपण घ्यायचे आणि काही वाईट निर्माण झाले तर त्याचे खापर सहयोगी भाजप सरकारवर फोडायचे हा उद्योग शिवसेनेच्या मंत्र्यांनी सुरू ठेवलेला आहे. उद्योग, पर्यावरण आणि परिवहन अशा तिन्ही खात्याच्या मंत्र्यांनी फक्त दुटप्पी भूमिका घेत काम चालवले आहे. उद्योग मंत्र्यांनी नाणारला हिरवा कंदील दाखवला आणि नंतर आपल्या मानगुटीवर हे भूत बसणार म्हटल्यावर त्यातून पळ काढत विरोध करायला सुरवात केली. पर्यावरण मंत्र्यांनीही प्लास्टिक बंदीतून आणि अन्य निर्णयांमधून आपल्या निष्क्रियतेचे जाहीर प्रदर्शन केले. तिसरे मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन खात्यात असे काही परिवर्तन करायला सुरुवात केली की त्या परिवहनाचे केवळ वहनच थांबले नाही तर वारंवार अपघात होणाºया शिवशाहीत जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. राज्य सरकारची सर्वसामान्यांसाठी असणारी एसटी बस ही भांडवलदारांसाठी पायघड्या घालणारी यंत्रणा निर्माण करण्याचे काम या मंत्रिमहोदयांनी केले. एसटीचे खासगीकरण करून सामान्यांचा जीव टांगणीला लावण्याचे काम या खात्याने केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे वारंवार अपघात होणारी शिवशाही ही बससेवा. बस वाहतुकीत सुधारणा करण्याऐवजी, एसटीकडे प्रवासी संख्या वाढवण्याचे उपाय करण्याऐवजी महागडी एसटीसेवा माथी मारण्याचा प्रकार सरकारने केलेला आहे. अत्यंत निकृष्ठ प्रकारची अशी शिवशाही नामक सेवा महामंडळाने सुरु करुन त्याचे खापर सरकारवर फोडायला निमित्त दिलेले आहे. ही जी शिवशाही नामक वातानुकूलित बससेवा सुरु केलेली आहे ती अत्यंत धोकादायक आणि असुरक्षित अशी बससेवा राज्य सरकारने सुरु केलेली आहे. याचा एसटीला लाभ होण्याऐवजी नुकसान होण्याचेच प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिवहन मंत्रालयाने ही सेवा सुरु करताना नेमके कोणाचे हित पाहिले होते हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. एसटीचे खासगीकरण टप्प्प्याटप्प्याने करून सर्वसामान्यांचे सोयीचे सार्वजनिक प्रवासाचे साधन काढून घेण्याचे काम शिवसेनेच्या या मंत्र्यांनी केलेले आहे. अत्यंत चुकीचे नियोजन आणि एसटीला खड्ड्यात घालण्याचे धोरण म्हणजे शिवशाही बससेवा असे चित्र सध्या दिसत आहे. ही बससेवा सुरु केल्यापासून एसटी यंत्रणेतील सर्वात जास्त अपघात शिवशाही बसचे झालेले दिसत आहेत. अत्यंत बेजबाबदारपणे घेतलेले चुकीचे निर्णय हे त्यामागचे कारण आहे. या बस खासगी कंपन्यांकडून चालवायला घेतलेल्या आहेत. त्यावर चालक हा खासगी संस्थांचा असणार आणि फक्त वाहक किंवा कंडक्टर हा महामंडळाचा असणार. हा कसला ताळमेळ आहे? खासगीत चालक ही सुरक्षित सेवा देण्यास सक्षम नसतात. ते प्रशिक्षितही नसतात. त्यांच्या हातात प्रवाशांचा जीव देण्याचे काम सरकारने या शिवशाहीच्या माध्यमातून केले आहे. एसटीमध्ये जेव्हा चालकांची भरती होते तेव्हा त्या चालकांकडे हेवीचे लायसन्स, परवाना, बॅच आदी बाबी तपासून तो योग्यप्रकारे वाहन चालवू शकतो याची खात्री करून भरती करून घेतले जाते. चालक म्हणून भरती केल्यानंतरही त्याला विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी प्रशिक्षण देणारी खास वाहने असतात. यामध्ये वाहक आणि चालक यांच्यातील समन्वय कसा साधला जातो, त्याने वाहकाचे कसे ऐकायचे, गाडी कुठे कशी केव्हा थांबवायची यावर पूर्णपणे वाहकाचे नियंत्रण असते. डबल बेल, सिंगल बेल, केव्हा गाडीतले दिवे बंद करायचे. गाडीतला विशिष्ट दिवा बंद चालू करून गाडी थांबवावी की न थांबवावी यासाठी वाहकाला चालकाने कसे सूचित करायचे याचे पूर्णपणे प्रशिक्षण दिलेले असते. त्यानुसार विनाअपघात सेवा देण्याचे प्रयत्न एसटीचे चालक वाहक करत असतात. चालक आणि वाहक यांच्यात समन्वय नसेल तर अपघात हे होणारच. आज शिवशाही बसचे अपघात हे खासगी चालक आणि महामंडळाचा वाहक या धोरणामुळे झालेले आहेत. खासगी चालक हे बेजबाबदारपणे आणि बेधुंदपणे गाडी चालवत असतात. या चालकांना कसलीही भीती आणि जबाबदारीची जाणिव नसते. त्यांच्यावर महामंडळाचे कोणतेही नियंत्रण नाही. कारवाईबाबतचे निर्णयही खासगी ठेकेदाराकडे असतात. त्यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी आहे असे दिसून येत नाही. हा घाट्याचा सौदा परिवहन मंत्र्यांनी करून महामंडळाला अडचणीत आणले आहे. बसेस खासगी मालकीच्या. त्यावर महामंडळाचा कसलाही अधिकार नाही. मात्र त्याची दुरुस्ती, देखभाल, त्याचा सगळा खर्च हा महामंडळाने करायचा. दरदिवशी ठराविक इतकी रक्कम महामंडळाने त्या खासगी मालकाला द्यायची. त्या गाडीचा वापर होवो न होवो, त्या गाडीत प्रवासी असोत किंवा नसो त्याचे ठेकेदाराला काहीही देणे-घेणे नाही. नुकसान होईल ते भरून देण्याची जबाबदारी फक्त महामंडळाची. फायदा होईल तो ठेकेदाराचा होईल. या धोरणात गाडीवर खासगी चालक ठेवल्यावर तो कंडक्टरचे किंवा महामंडळाच्या अधिकाºयांचे कशाला ऐकतो आहे? खासगी बसचालकांना बसेस सुसाट पळवायची सवय लागलेली असते. त्यांचा वेगावर कसलाही ताबा नसतो. प्रवाशांनी पडदे बंद करून आत बसायचे आणि ड्रायव्हर उतरवेल तिथे उतरायचे हे खासगी धोरण. तेच धोरण शिवशाहीला मारक ठरू लागले आहे. चालक आणि वाहक जेव्हा प्रशिक्षित असतात, तेव्हा त्यांना बस थांब्यावर, फलाटावर गाडी कशी लावायची, मागे कशी घ्यायची, कंडक्टरच्या शिट्टीवर कसे लक्ष ठेवायचे हे सगळे शिकवलेले असते. वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणे आणि बेदरकारपणे गाडी चालविण्याच्या प्रकारामुळे शिवशाहीचे अपघात वाढले आहेत. सातत्याने होणाºया अपघातांचे कारण नेमके इथेच दडलेले आहे. त्यामुळे शिवशाही ही बससेवा सुरु करून शिवसेनेच्या मंत्र्यांनी अपघातशाही सुरु केलेली आहे. या सेवेकडे महामंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. परिवहन मंत्र्यांच्या या खासगीकरणाचा निर्णयाने प्रवाशांचे जीव नाहक टांगणीला लागत आहेत. अशा घाट्याच्या सौद्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. एसटीने या बसवर स्वत:चा चालक नेमावा म्हणजे हे अपघात कमी होतील.
शुक्रवार, २९ जून, २०१८
प्रवाशांच्या जिवावर उठलेली ‘शिवशाही’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा