मंगळवार, १२ जून, २०१८

संवाद हरवलेले संमेलन

९८ वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन आजपासून मुंबईत सुरु होत आहे. हे संमेलन म्हणजे नावाला संमेलन आहे. कारण कोणत्याही संमेलनात प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांना, शंकाना दूर करण्याचे काम होणे अभिपे्रत असते. नाटकातील कलावंत एरवी कसे असतात, कसे बोलतात, त्यांचे विचार काय आहेत याबाबत प्रेक्षकांना, चाहत्यांना उत्सुकता असते. त्यामुळे त्याबाबत अनेक अपेक्षांनी प्रेक्षक अशा संमेलनांना येत असतात. त्यासाठी विविध चर्चासत्रे, परिसंवाद ठेवले जातात. पण मुंबईत असलेल्या या नाट्यसंमेलनाचे एकूणच नियोजन असे विचित्र केले आहे की यात ना कसले परिसंवाद ना चर्चासत्र आहेत. फक्त कार्यक्रमांची रेलचेल आहे असे भासवले गेले आहे. फक्त एक चर्चासत्र ठेवण्याचे काम केले आहे. पण त्याचा विषयही इतका विचित्र आहे की त्यातून नेमके काय सांगायचे आहे किंवा या परिसंवादात कोण भाग घेणार आहे याचा काहीही बोध होत नाही. यापूर्वी जी नाट्यसंमेलने होत त्यामध्ये तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेणारा, नाटकाला पोषक अथवा मारक ठरणाºया गोष्टींची साधकबाधक चर्चा नाट्यसंमेलनातील परिसंवादातून होत असे. पण या पत्रिकेत फक्त सांस्कृतिक आबादुबी नावाचा परिसंवाद ठेवला आहे. पण तो कोणाच्या अध्यक्षतेखाली होणार, कोण त्यात भाग घेणार याचा कसलाही उल्लेख नसल्याने प्रेक्षक या परिसंवादाला येतील असे काहीही त्यात नमूद केलेले नाही. बाकी कार्यक्रम मात्र अगदी सकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरु आहेत. म्हणजे मराठी बाणा हा सकाळी ६.३० ला सुरु होतो तर त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता नाट्यदिंडी निघून सायंकाळी साडेसहाला संमेलनाचे उद्धाटन होणार आहे. म्हणजे उद्घाटनाच्या बारा तास अगोदर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी बाणा सुरु करून नाट्यसंमेलनाला सुरुवात होत आहे तर सायंकाळी कसले उद्घाटन असणार आहे? तीन दिवस नाट्यगृह घेतले आहे म्हणून त्याचा पूर्ण वापर करण्यासाठी एकापाठोपाठ कार्यक्रम करत रहायचे. मग त्याला प्रेक्षक येतात की नाही याचा कसलाही विचार संयोजनात दिसत नाही. एकूणच नाट्यसंमेलन हे नाटकापासून दुर आणि नाट्येतर कार्यक्रमांसाठी अधिक असे स्वरुप या नाट्यसंमेलनात दिसून येते. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार असल्यामुळे एका संगीत सौभद्र नाटकाची या संमेलनात वर्णी लागलेली आहे. बाकी सगळे कार्यक्रम हे लोकगीते आणि लोकसंस्कृतीवर आधारीत आहेत असेच दिसून येते. तीन दिवसात किमान पाच चांगले परिसंवाद ठेवून त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते. यामध्ये मराठी नाटकांचे बंद झालेले दौरे नेमके कशामुळे आहेत यावर चर्चा होणे अपेक्षित होते. आज बहुतेक नाट्य कलावंत हे डेलीसोपमध्ये अडकले आहेत. किंबहुना त्यामध्ये उत्पन्न चांगले असल्यामुळे डेलीसोपकडे वळलेले असताना नाटकाचे दौरे बंद पडले आहेत. मुंबई आणि उपनगरापुरतीच नाटके सादर केली जात आहेत. पनवेल आणि कल्याणपेक्षा लांब जायला आणि शनिवार रविवार शिवाय अन्य वारी प्रयोग करायला कलाकार तयार होत नाहीत. त्यामुळे मुंबई बाहेरची नाट्यगृहे शांत शांत होताना दिसतात. हा नाटकाचा ºहास आहे की विकास?  मराठी नाटक मुंबईच्या बाहेर जात नाही फक्त काही संस्था परदेश दौरे करतात अशा परिस्थितीत नाट्य परिषद आणि नाट्यसंमेलन हे अखिल भारतीय आहे हे कसे म्हणायचे? यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. डेलीसोपमुळे किंवा विविध वाहिन्यांवरील मालिकांमुळे नाटकावर परिणाम झाला आहे का याचा आढावा घेणे अपेक्षित होते. १७६ वर्षांची मराठी रंगभूमीची परंपरा आहे आणि १०० व्या संमेलनाच्या दिशेने प्रवास होत असताना आगामी काळातील रंगभूमीपुढची आव्हाने काय आहेत याचा विचार या संमेलनातून होणे अपेक्षित होता. पण हा एकूणच संमेलनाचा मंच राजकीय मंच झाल्याचे दिसून येते. सर्वपक्षिय नेत्यांना आग्रहाने आमंत्रित करून नाट्य परिषदेने सर्वधर्म म्हणजे सर्व राजकीय धर्म समभावाची दिंडी वाहिलेली दिसून येते. राष्टÑवादीचे शरद पवार आणि राज ठाकरे यांना उद्घाटनाला एकत्र आणले आहे. तर समारोपाला उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे यांना आमंत्रित केलेले आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे भाजपचे, शरद पवार राष्टÑवादीचे, सुशीलकुमार शिंदे काँग्रेसचे, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे असे सगळे पक्ष रंगमंचावर बोलावले आहेत. त्यातही समविचारी लोकांना वेगवेगळे आमंत्रित केले अ ाहे. शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक असल्यामुळे उद्घाटनाला त्या दोघांना बोलावले आहे. तर शिवसेना सध्या काँग्रेसच्या बाजूने असल्यामुळे समारोपाला काँग्रेस आणि सेना नेत्यांना बोलावले आहे. हे चित्र किंवा नाट्य प्रेक्षकांना ास्पष्ट जाणवते आहे. बोलवायचेच होते तर सर्वांनाच एका रंगमंचावर बोलावून चांगला परिसंवाद का नाही ठेवला? राजकारणातील नाट्य आणि नाटकातील राजकारण असा विषय घेऊन राजकीय नेत्यांबरोबरच नाट्य परिषदेत राजकारण करणाºया मोहन जोशींसारख्या नटनेत्यांनाही आमंत्रित करून त्या परिसंवादातून प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन झाले असते. पण या नाट्यसंमेलनातून फक्त भरगच्च करमणुकीचे कार्यक्रम देऊन प्रेक्षकांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु नाट्यसंमेलनातून प्रेक्षकांची अपेक्षा वेगळी असते हे संयोजकांनी लक्षात घेतले नाही. नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, कलाकार, लेखक यांच्याशी काहीतरी संवाद यातून व्हावा अशी अपेक्षा प्रेक्षकांची असते. पण भरगच्च कार्यक्रमांची नॉनस्टॉप जंत्री लावून हे नाट्यसंमेलन सादर करण्याचा प्रकार होत आहे. विविध रंगमंचांवर विविध कार्यक्रम करून त्यातही अपुºया प्रेक्षकांना ओढायचा प्रकार चालवला आहे. परंतु चार पाच चांगल्या परिसंवादांची कमतरता असणे हे या नाट्यसंमेलनाच्या संयोजनातील उणेपण आहे. युवा अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. त्या अर्थातच पूर्ण झालेल्या नाहीत हे सांगावेसे वाटते. संमेलनात संवाद असतो. पण इथे संवादाला थारा नाही. इथे ेनाट्यप्रयोग केल्याप्रमाणे कार्यक्रमांची रांग आहे. त्यामुळे हे नाट्यसंमेलन संवाद हरवलेले संमेलन झालेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: