बुधवार, ६ जून, २०१८

ग्रामीण तरुणांना संधी

स्पर्धा परीक्षा ही फक्त उत्तर भारतीय, बिहारी लोकांचीच मक्तेदारी होती, असा समज आता मराठी तरुण खोटा ठरवत आहेत. गेल्या दहा वर्षात झालेली जागृती आणि प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील तरूणही आपले आव्हान निर्माण करून यामध्ये यशस्वी होत आहेत.अलीकडे स्पर्धा परीक्षांचे महत्त्व बरेच वाढले आहे. विशेषत: यूपीएससी, एमपीएससी परीक्षांना बसणा-या तरुणांची आणि त्यातही मराठी तरुणांची आणि त्याहीपेक्षा समाधानाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांची संख्या वाढत आहे. पूर्वी शहरी भागांतील, उच्चशिक्षित वर्गातील, सधन परिस्थितीतील मुले-मुलीच या स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देताना आढळत; परंतु आता हे चित्र बदलले आहे. अशा स्पर्धा परीक्षांसाठी अनेक तरुण नेते कार्यकर्तेही पुढाकार घेताना दिसतात. अनेक ठिकाणी मार्गदर्शक केंद्रेही चालवली जातात. कोकणातल्या विद्यार्थ्यांसाठी असे मार्गदर्शन केंद्र उभारण्याचे धोरण आमदार नितेश राणे यांनीही आखले आहे. ही अत्यंत जमेची बाजू म्हणावी लागेल. त्यामुळेच अलीकडे निमशहरी तसेच ग्रामीण भागातूनही अनेक विद्यार्थी या परीक्षा देत आहेत. एवढेच नव्हे तर, या परीक्षांमध्ये उज्ज्वल यशही संपादन करत आहेत. महत्त्वाच्या शासकीय पदांद्वारे जनतेची सेवा करण्याची तीव्र इच्छा या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे, ही समाधानाची बाब म्हणायला हवी. ग्रामीण भागातील शिक्षणाबाबत सतत बोलले वा लिहिले जात असते. दर्जेदार शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरांकडे धाव घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. ग्रामीण भागात अभ्यासाच्या पुरेशा सोयी नसणे, सुसज्ज ग्रंथालयांचा अभाव, तज्ज्ञ मार्गदर्शकांची वानवा या महत्त्वाच्या अडचणी समोर येतात; परंतु या सा-या अडचणींवर मात करत, जिद्दीने अभ्यास करून यश मिळवल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. अगदी दहावी-बारावीच्या परीक्षेतही हे चित्र पाहायला मिळते. यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेतही हेच चित्र दिसून येऊ लागले आहे. अर्थात, यातील अनेक विद्यार्थी शहरांमधील स्पर्धा परीक्षा क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. राहण्याची नीट सोय नसणे, खाण्याचे हाल, बिकट आर्थिक परिस्थिती या कशाचाही त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून अपेक्षित यश मिळवणा-यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच.काही वर्षापूर्वी दगड फोडण्याचे काम करणारा वडार समाजातला एक मुलगा भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊन जिल्हाधिकारी झाला. नाशिकमध्ये ज्याचे वडील हमाली करायचे आणि आई इतरांच्या घरी धुणी-भांडी करायची, त्या दांपत्याचा मुलगा संजय आखाडे जिल्हाधिकारी झाला. ते स्वत: सिन्नरच्या एका कंपनीत वेल्डरचे काम करत होते. पारनेर हा महाराष्ट्रातला सर्वात दुष्काळी तालुका. दोन वर्षापूर्वी या तालुक्यातील पाचजण यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी झाले. त्या अगोदर जामखेडची शीतल उगले जिल्हाधिकारी झाली.महाराष्ट्रातून यूपीएससीच्या परीक्षेत यशस्वी होणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली असली तरी एक हजार विद्यार्थ्यांमध्ये १०० विद्यार्थी, असे हे यशाचे प्रमाण आहे. यशस्वी विद्यार्थ्यांपैकी दहा टक्के विद्यार्थी महाराष्ट्रातील असतात. दोन वर्षापूर्वी योगेश कुंभेजकर या सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातील युवकाने पहिल्या दहात येत महाराष्ट्राला नवा आशेचा किरण दाखवला होता. महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा आणखी उंचवायचा असेल तर पहिल्या दहांमध्ये येण्याचे प्रमाण वाढवायला हवे. भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक तरुण महसूल विभागाला प्राधान्य देतात.परंतु अलीकडच्या काळात संरक्षण क्षेत्रातील मोठी नागरी पदे, टपाल खात्यातील पदे तसेच परदेशात राजदूत होण्याकडेही तरुणांचा कल वाढला आहे. देवयानी खोब्रागडे, ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखे अपवादात्मक लोक परदेशात राजनैतिक अधिकारी म्हणून काम पाहत होते. शिस्तबद्ध अभ्यास केला तर पहिल्याच प्रयत्नात यश मिळते, हे यूपीएससी परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या टीना दाबीने दाखवून दिले आहे. टीनासारख्याच इतर काहीजणांनी तसे यश मिळवले आहे.राज्यातील जालना, माढा, नारायणगाव, पारनेर अशा वेगवेगळ्या भागांतील शेतक-यांची मुले आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होतात. त्यात मुलीही आहेत. हे गुणवत्तेचा केंद्रबिंदू ग्रामीण आणि कष्टकरी महाराष्ट्राकडे सरकत चालला असल्याचे लक्षण आहे. आयएएसचा अभ्यासक्रम अवघड असतो. त्यासाठी आपल्या आवडीचा विषय निवडावा लागतो. मुलांना आता ते चांगलेच कळू लागले आहे. त्यामुळे कोणी फार्मसीची पदवी घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी केली तर जालन्यातील अन्सार शेख याने जाणीवपूर्वक कला शाखा निवडली.दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातून पहिल्या आलेल्या योगेश कुंभेजकरचेही विशेष कौतुक करण्यासारखे आहे. त्याचे माढा हे गाव दुष्काळी आहे. अशा दुष्काळी तालुक्यातील मुलांना एक तर चांगले शिकून मोठी पदे मिळवावी लागतात. परिस्थितीशी संघर्ष करत, ही मुले जिद्दीने स्पर्धात्मक परीक्षेचे शिखर सर करतात. जालना जिल्ह्यातील शेलगावच्या अन्सार अहमद शेखने तर स्पर्धात्मक परीक्षेसाठी पुणे गाठले होते. कला शाखेला प्रवेश घेतला. त्याचे वडील रिक्षाचालक. आई गृहिणी. त्यावरून त्याच्या परिस्थितीची कल्पना करता येते. आयएएस झाल्यानंतर त्याचे पहिले प्राधान्य कशाला असेल, तर ते हिंदू-मुस्लिम ऐक्याला. त्यांच्या मनातील सल दूर करण्याचा हा त्याचा प्रयत्न. मुस्लिम महिला किती तरी अधिकारांपासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून काम करण्याचा त्याचा मानस संवेदनशील मनाचा प्रत्यय देतो. पण ग्रामीण आणि छोटय़ा शहरातून या स्पर्धाची ओढ निर्माण होते आहे ही चांगली बाब आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: