बुधवार, ६ जून, २०१८

जुगाराच्या पटावरील सोंगट्या आणि फासे

आयपीएलच्या सट्टेबाजीचे प्रकरण अरबाज खानच्या निमित्ताने सध्या चांगलेच चव्हाट्यावर आले आहे. तसे दरवर्षीच कोणा ना कोणा सेलिब्रेटीचे नाव आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणात येते. काही वर्षापूर्वी भारतातील सभ्य आणि आदरणीय असलेल्या अभिनेता आणि पैलवान दारासिंग याचा मुलगा विंदू दारासिंग याचे नावही आयपीएलच्या सट्टा प्रकरणात आले होते. फारशी चर्चेत नसलेली पण सेलिब्रेटी असणारी अनेक व्यक्तिमत्त्वे अचानकपणे अशी आयपीएल सट्टा लावण्याच्या निमित्ताने समोर येतात आणि नंतर सामान्य माणसांसकट सर्वजण त्या क्रीडा प्रकारावर, त्या कलाकारावर टीका करण्यास सुरुवात करतो. यामागचे वास्तव कोणाच्या समोर कधीच येत नाही. ठरावीक काळानंतर किंवा नवा हंगाम सुरू झाल्यानंतर आपोआप या चर्चा बंद होतात. हे गेली दहा-अकरा वर्षे सातत्याने होताना दिसते आहे. वास्तविक पाहता आयपीएल काय एकूण क्रिकेटच जुगाराचा खेळ आहे. हा जुगार खेळण्यासाठी तसे कोणी सभ्य लोक येतात असे नाही. त्यामुळे या जुगारात दाऊदसारख्या गँग असणार हे अभिप्रेतच आहे. किंबहुना कोणताही अनैतिक व्यवहार म्हटले की त्याचा संबंध थेट दाऊदशी कुठून ना कुठून येतच असतो. फक्त हे आम्हाला थांबवता येत नाही याचे आश्चर्य व्यक्त करावे लागेल. एक लक्षात घेतले पाहिजे की आजवर अनेक देशांचे खेळाडू हे क्रिकेटमधील गैरप्रकाराबाबत चर्चेत आले, वादग्रस्त ठरले, शिक्षेस पात्र ठरले. पण ज्यांनी हा खेळ निर्माण केला आणि जगभर पसरवला त्या इंग्लंडचे खेळाडू कधीच अशा अपप्रकारात सापडत नाहीत. जगाला म्हणण्यापेक्षा ज्या देशांवर इंग्रजांचे साम्राज्य होते त्या देशांमध्येच हा खेळ खेळला गेला आहे. यामध्ये युरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडावर इंग्लंडचे साम्राज्य होते. तिथेच हा खेळ खेळला जातो. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स हे देश क्रिकेट खेळत नाहीत. ब्रिटिशांनी क्रिकेट हा खेळ जुगारासाठीच निर्माण केलेला आहे. क्रिकेट आणि रेसकोर्स ही ब्रिटिशांची सट्टा आणि जुगारासाठी मिळालेली देणगी आहे. हा जुगार जिंकण्यासाठी अवैध मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे इंग्लंडमध्ये तो गुन्हा मानला जात नाही. मॅचफिक्सिंग हे सट्टेबाजांच्या हितासाठी केले जाते. त्यामुळे सट्टा आणि मॅचफिक्सिंग ही जुळी भावंडे आहेत. साहजिकच सट्टा जिंकण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखवून खेळाडूंना आकर्षित केले जाते. जुगाराच्या पटावरील सोंगटे झालेले खेळाडू ज्याच्या हातात फासे आहेत त्याने दिलेल्या दानाप्रमाणेच चालतात. त्यातच बाद होतात. हे फासे सेलिब्रेटी आणि गुन्हेगारी जगतात वावर असणारांच्या हातात असतात. इंग्लंडमध्ये या गोष्टीला अघोषित मान्यता आहे, कारण त्यांनी यासाठीच या खेळांची निर्मिती केलेली आहे. पण भारतासारख्या देशात या खेळाकडे खेळ म्हणूनच पाहिले जाते; परंतु या खेळाला वेठीला धरणारे अनेक जुगारी त्याचा लिलाव करून रेसच्या घोडय़ाप्रमाणे आठ-दहा संघांतील मिळून शंभर एक खेळाडू नामक घोडय़ांवर उडय़ा मारत असतात. अचानकपणे जिंकता जिंकता हारलेले सामने किंवा येणा-या चौकार, षटकारांची आतषबाजी ही जुगारी, फासे टाकणारे यांच्या हातातील करामत असते. त्यात श्वास रोखून पाहण्यासारखे किंवा अचानक झालेल्या पराभवाने हळहळण्यासारखे काही नाही, हे अजून आम्हाला समजले नाही असेच म्हणावे लागेल. या प्रकारात सापडला तर चोर म्हणायचे, गुन्हेगार म्हणायचे, नाहीतर तो सेलिब्रेटी सर्वाचाच लाडका असतो. आज अरबाज खान, साजिद खान हे चित्रपटसृष्टीतील कलाकार चर्चेत आहेत, उद्या आणखी कोणी असतील. पण हे चित्र रोखणे नेमके कोणाच्या हातात आहे? आम्ही सामने बघितले नाहीत आणि गर्दी केली नाही तरी ठरावीक घोडय़ांवर हा जुगार चालणारच. भारतातील रेसकोर्स मैदाने आणि घोडे बंद झाल्यावर हे दोन पायांचे घोडे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्यांना लगाम घालण्यासाठी कायद्याचाच वापर करावा लागणार आहे. आज आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानला ठाणे पोलिसांनी पकडले आहे. पण हे तर हिमनगाचे एक टोक असेल. यातील नेमके फासे टाकणारे शकुनी कोण आहेत हे समोर येणे गरजेचे आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने १६ मे रोजी डोंबिवलीतील एका इमारतीवर छापा मारून आयपीएल सट्टेबाजीचे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली होती, तर अन्य दोघांना नंतर अटक झाली होती. सोनू जालानला नंतर नाटय़मयरीत्या कल्याण कोर्टाच्या आवारातून बेडय़ा ठोकण्यात आल्या होत्या. सोनू जालान हा सट्टेबाजीच्या काळ्या दुनियेत सोनू मालाड म्हणून ओळखला जातो. संपूर्ण आशिया खंडात त्याचे नेटवर्क आहे. त्याची वार्षिक उलाढाल १०० कोटींच्या घरात आहे. जालान हा मुंबईत राहणारा असून एका ऑनलाईन पोर्टलमध्ये तो भागीदार आहे. आयपीएलदरम्यान हे पोर्टल बरेच सक्रिय होते, अशीही माहिती आहे. हेच ते गुन्हेगारी जगत आणि चित्रपटसृष्टीतील साटेलोटे म्हणावे लागेल. चित्रपटनिर्मितीसाठी लागणारा हजारो कोटींचा पैसा अशा जगताकडून येत असावा, त्यामुळेच हे सेलिब्रेटी असे सट्टे लावण्याचे प्रकार करत असावेत. पण एकूणच कला आणि क्रीडा अशा दोन सुसंस्कृत क्षेत्रात झालेली ही अनैतिकतेची घुसखोरी लांच्छनास्पद आहे. त्यामुळे भविष्यात क्रिकेटकडे सभ्य लोकांनी खेळ म्हणून पाहावे की नाही असा प्रश्न पडेल. म्हणजे जत्रेत होणा-या बैलांच्या शर्यती पाहणा-याने काही वर्षापूर्वी रेसकोर्स मैदानावरील शर्यती पाहिल्या तर त्याला त्याचा अर्थ तो सांस्कृतिक क्रीडा प्रकार आहे असे वाटेल. पण ज्यावेळी रेसमध्ये न जिंकणा-या त्या घोडय़ाला गोळी मारून संपवले जाते तसे यातील काही खेळाडू वादात अडकतात आणि संपून जातात. पण हे सगळे जुगारी लोकांच्या हातातील फाशावर चालणा-या सोंगटय़ा आहेत हे लक्षात घ्या. आज दाऊदचा संबंध या प्रकाराशी आहे, असे बोलले जाते. अजूनही पाकिस्तानातील काहींची नावे त्याच्याशी जोडली जातील, पण या क्रीडा प्रकाराला नाकारून आपले राष्ट्रीय खेळ जगवणे हाच त्यावरचा उपाय असू शकतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: