राष्ट्रीयीकृत बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्या याने दोन दिवसांपूर्वी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे हे म्हणणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा खरा अर्थ आहे. मल्ल्या म्हणतो बँकांच्या कर्जाची परतफेड करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. पण मला कर्ज बुडवणाºयांचा पोस्टर बॉय बनवून टाकले आहे. पण हे सगळे नेमके कोणी केले? मल्ल्याला जर कर्ज फेडायचे होते, बुडवायचे नव्हते आणि आपण पोस्टर बॉय नाही असे वाटत आहे तर तो पळून का गेला? स्वत:हून तो न्यायायलात, पोलिसात, बँक अधिकारी यांना का भेटला नाही? यालाच तर चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. मल्ल्या म्हणतो की, आता हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्यास मी काही करू शकत नाही. मग हे बोलायला इतकी वर्षे का थांबला. मल्ल्या पळून गेला, बँकांना बुडवल्याच्या बातम्या गेली अनेक महिने येत आहेत. एवढे दिवस गप्प बसला आणि आता तोंड उघडले याचा अर्थ त्याचा बोलविता धनी कोणीतरी दुसराच असला पाहिजे. आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने त्यामध्ये आपली पोळी भाजून घेण्याचा मल्ल्याचा डाव असावा. किंवा सरकारविरोधी कोणा राजकीय पक्षांचा त्याला पाठिंबा असल्याशिवाय मल्ल्याने तोंड उघडले नाही. तो खरेच प्रामाणिक असता, तर अन्य देशांचा आसरा घेण्याचे काहीच कारण नव्हते. मल्ल्याला जर बँकांची कर्ज बुडवायची नव्हती तर लपून छपून त्याला देश सोडण्याचे कारण नव्हते. एकूणच देशातील बँकींग क्षेत्र मल्ल्यासारख्या कर्जबुडव्या लोकांमुळे धोक्यात आलेले आहे. एकापाठोपाठ एक आर्थिक गुन्हे घडत आहेत. नव्वदच्या दशकात अर्थव्यवस्थेवर असलेली बंधने कमी होऊन मुक्त अर्थकारणाला चालना मिळाल्यापासून आर्थिक उलाढालींना मोठा वेग आला. त्यातून ठराविक उद्योग घराणी व उद्योग समूह यांची मक्तेदारी संपुष्टात आली, तरी अर्थकारणाला मोठी स्पर्धा करू देताना त्यातून ज्या गैरवृत्तींना प्रोत्साहन मिळण्याची शक्यता होती, त्याची दक्षता घेतली गेली नाही. त्यामुळे अर्थकारणाची कागदोपत्री अफाट वाढ, विस्तार होत असताना अनेक विकृती फोफावत गेल्या. विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत. याच मल्ल्यापाठोपाठ नीरव मोदी, त्याचा साथीदार मेहुल चोक्सी हेही परदेशात पळून गेले. या सगळ्यांनी बँक अधिकाºयांशी संगनमत करून बँकांची फसवणूक केली. बँकेत विश्वासाने येणाºया ग्राहकांची फसवणूक केली आणि प्रकरण अंगलट आल्यावर एका रात्रीत चंबुगबाळे उचलून देशाबाहेर पलायन केले. साहजिकच कोणतीही घटना, दुर्घटना घडली की त्याच्याशी साधर्म्य असणाºया घटनांची उजळणी होते. त्यावर चर्चा होते. नीरव मोदी, चोक्सी बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून पळून गेल्यावर मल्ल्याप्रमाणे हे पण पळून गेल्याची चर्चा तर होणारच. कारण अशा घटनांमध्ये अलिकडच्या काळातील मल्ल्या हाच चोरांचा ‘आयकॉन’ ठरला होता. नीरव मोदी, चोक्सीचा आदर्श हा मल्ल्याच असू शकतो. सरकार मल्ल्याचे काय करू शकले? तो बिनधास्त फिरतोय परदेशात. मग आपणही पळायला काय हरकत आहे असा विचार या बाकीच्या चोरांनी केला असेल तर त्याला मल्ल्या जबाबदार आहे, सरकार नाही. मल्ल्या म्हणतो त्याप्रमाणे त्याने सरकारला २०१६ मध्येच पत्र पाठवले होते, तर तो इतके दिवस गप्प का बसला? आज ब्रिटनमध्ये असलेल्या मल्ल्याने एक पत्रक प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांना १५ एप्रिल २०१६ रोजी एक पत्र पाठवून आपली बाजू मांडली होती. मात्र, दोघांकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे ते पत्र सार्वजनिक करणार आहे, असे मल्ल्याने म्हटले आहे. मल्ल्याच्या पत्राची दखल या दोन्ही कार्यालयांकडून घेतली नसेल हे शक्य वाटत नाही. जरी त्या पत्राचे उत्तर दिले नसले तरी मल्ल्याने दोन वर्षे त्याचा पाठपुरावा का केला नाही? वर अत्यंत मग्रुरपणे तो म्हणतो की, बँकांच्या कर्जाची परतफेड करण्याचे मी प्रयत्न केले. पण मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवून टाकले. माझे नाव घेताच लोक भडकतात. हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित होऊन केले असल्यास त्याला मी काहीही करू शकत नाही, असे सांगून त्याने हात झटकले. हा सपशेल खोटारडेपणा आहेच, परंतु बनवेगिरीचा कळस म्हणायला हवा. मल्ल्याला राजकीय नेत्याची किंवा पक्षाची यामध्ये साथ असली पाहिजे. त्याशिवाय इतके दिवस तो गप्प बसला नसताच. आता निवडणुकांच्या तोंडावर सहानुभूती मिळावी आणि निवडणुकीत त्याचा फायदा उठवावा ही मल्ल्याची चाल आहे. पण अशा कर्जबुडव्यांच्या वक्तव्याला महत्व देण्याचे काहीही कारण नाही. सरकारच्या उत्तराची वाट न पाहता कर्जफेड करणे ही मल्ल्याची जबाबदारी होती. पण आता त्याची सारवासारव सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून तो पोस्टरबॉय नाही तर कर्ज बुडवणाºया प्रवृत्तीचा चेहरा झाला आहे. आज सामान्यातला सामान्य माणूसही कर्ज थकले की बँकेच्या अधिकाºयांना वेठीस धरताना मल्ल्याला मोकाट सोडले आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या मागे लागता असे खडसावू लागले आहेत. त्यामुळे मल्ल्या हा कर्जबुडवणारांचा पोस्टरबॉय नाही तर आदर्श बनला आहे. हे देशासाठी आणि बँकींग धोरणासाठी अत्त्यंत घातक आहे. मल्ल्याच्या या कांगाव्याला तिळमात्र खरेपणाचा लवलेश नाही. कर्ज बुडवून पळून जायचे आणि वर तोंड करून बोलायचे, असा उफराटा कारभार सुरू आहे. अशा उद्दाम आणि मुजोर आर्थिक गुन्हेगारांवर तातडीने लक्ष द्यायला पाहिजे. त्यांचे प्रत्यार्पण करून त्यांना तातडीने खडी फोडायला पाठविले पाहिजे. केवळ कर्जबुडव्यांचा तो पोस्टर बॉय नाही तर आर्थिक गुन्हेगारीला पाठबळ देण्याचे काम मल्ल्याने केलेले आहे.
बुधवार, २७ जून, २०१८
पळपुट्या मल्ल्याच्या उलट्या बोेंबा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा