सोमवार, ११ जून, २०१८

‘नट-नाटक’कार सुरेश परांजपे

‘नट नाटक’ नावाच्या कार्यक्रमातून सहा अजरामर नाटकातील आविष्कार सादर करून त्या नाटकातील भाषेची ताकद पोहोचवण्याचे काम या प्रयोगातून ते करतात.काही नाटके ही विषयाप्रमाणेच त्यातील भाषासौंदर्याने अजरामर असतात. ती नाटके सादर करणारे कलाकार वर्षानुवर्षे ती भूमिका जगत मोठे होतात; परंतु त्या कलाकारांच्या माघारी ती नाटके अनाथ होतात. अशा नाटकांचा इतिहास आणि सौंदर्य अबाधित ठेवण्याचे प्रयत्न करायचे म्हटले तरी ते आव्हान कोणी पेलत नाही. याचे कारण, ज्या कलाकारांनी ती नाटके एका उंचीवर नेली आहेत, त्याच्या उंचीचे दडपण ते आव्हान पेलण्यापासून माणसाला रोखते. पण, त्या नाटकांचा आनंद मिळावा यासाठी एक कलाकार गेली अनेक वर्षे धडपडत आहे. ते म्हणजे सुरेश परांजपे. ‘नट नाटक’ नावाच्या कार्यक्रमातून सहा अजरामर नाटकातील आविष्कार सादर करून त्या नाटकातील भाषेची ताकद पोहोचवण्याचे काम या प्रयोगातून ते करतात.महाराष्ट्राचा छोटा गडकरी अशी ख्याती असलेल्या बाळ कोल्हटकरांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’, लहानपण देगा देवा, साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांचे अजरामर समस्याप्रधान नाटक ‘तो मी नव्हेच’, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे ‘असामी असामी’, कौटुंबिक स्त्री प्रधान नाटकांचे लेखक मधुसूदन कालेलकरांचे ‘अपराध मीच केला’ आणि अखेपर्यंत एव्हरग्रीन असलेल्या शं. ना. नवरे यांच्या ‘सूर राहू दे’ या सहा नाटकांचे प्रत्येकी साधारण २० मिनिटांत सादरीकरण करून दोन ते अडीच तासांचा एकपात्री आविष्कार सुरेश परांजपे सादर करतात. या प्रयोगातून ज्यांनी ही नाटके पाहिली आहेत, त्यांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळवून देण्यात परांजपे यशस्वी झाले आहेत. त्यामुळे कार्यक्रमाचे आजवर ६५० प्रयोग झाले आहेत.१३ जूनला मुंबईत ९८वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन होत आहे. त्यानिमित्ताने रंगभूमीवरील या गाजलेल्या सहा नाटकांचा एकत्रित आस्वाद प्रेक्षकांना देणा-या कलाकाराचा शाब्दिक गौरव करताना आनंद वाटतो. सुरेश परांजपे यांनी निवडलेली ही नाटके अत्यंत गाजलेली आहेतच; परंतु मराठी भाषेचा सवरेत्कृष्ट नमुना म्हणून या नाटकांकडे पाहावे लागेल.भाषासौंदर्य, भाषेची ताकद आणि शब्दांची जी करामत म्हणता येईल, त्यातील कमालीची नाटके म्हणून या नाटकांचे वर्णन केले जाते. त्यामुळे पूर्वी ज्यांनी केली त्यांनी केली, आता त्यांच्या वाटेला फारसं कोणी जाणार नाही. कारण, मराठी भाषेतील या शब्दबंबाळ नाटकांचे सादरीकरण करणे सोपे नाही. पुलंच्या अंतुबर्वामध्ये मानापमान नाटकातील नव्या कलाकाराने गाण्याची पट्टी चुकवली म्हणून तो अंतु बर्वा त्या कलाकाराची चांगलीच हजेरी घेतो. बालगंधर्वानी गायलेल्या गाण्याची वाट लावली म्हणून खरडपट्टी काढणारे अंतुबर्वासारखे प्रेक्षक या महाराष्ट्रात आहेत, याची भीती बहुदा नव्या कलाकारांना वाटत आहे. त्यामुळे नाटकांच्या वाटय़ाला कोणी जात नाही. सुरेश परांजपे यांनी या नाटकांतील काही प्रसंगांचे सादरीकरण करून या नाटकांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. बाळ कोल्हटकरांचे वाहतो ही दुर्वाची जुडी हे नाटक पन्नास वर्षापूर्वीचे असले तरी, त्यातील विचार कायम लागू पडणारा आहे. तो संदेश सर्वानी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. सुभाषच्या तोंडातून येणारी वाक्य आणि एकूणच हे नाटक म्हणजेच जणू सुभाषित होऊन जाते. त्याचा आविष्कार सर्वाना पाहायला मिळणे हा एक वेगळा आनंद असतो.‘काही सज्जन कोणी दुर्जन, तरुण कोणी, कुणी वृद्धपण, या सर्वानी विविध गुणांनी, जशी घडवली, तशीच घडली.. आयुष्याची घडी.. वाहतो ही दुर्वाची जुडी’ ही गेयता, लयबद्धता आणि शब्दांचे माधुर्य बाळ कोल्हटकरांनी फारच लोकप्रिय केले होते. त्याचाच प्रत्यय सुरेश परांजपे आपल्या कार्यक्रमातून देतात. अशाच प्रकारे तो मी नव्हेच मधला लखोबा लोखंडे सादर करून प्रेक्षकांना पणशीकरांपर्यंत ते पोहोचवतात. पणशीकर प्रत्येक साक्षीदाराची उलट तपासणी घेऊन सर्वात शेवटी तुम्ही काहीही म्हटलात तरी तो मी नव्हेच.. हे जे एका लकबीत म्हणायचे आणि मी निप्पाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे, हे बिंबवण्याचा प्रयत्न करायचे. त्यातून प्रेक्षक अवाक व्हायचे आणि कडाडून टाळय़ा वाजवायचे. ते मर्म नेमके सुरेश परांजपे यांनी जपले आहे. म्हणूनच प्रेक्षकांना त्यांच्या या एकाच कार्यक्रमात भरपूर मेजवानी मिळते. आजकालच्या मार्केटिंगच्या जमान्यात एकावर एक फ्री असते. बाय वन गेट २ फ्री असते, त्याप्रमाणे सुरेश परांजपे यांनी प्रेक्षकांना नट नाटक कार्यक्रमातून एकावर सहा अशी मेजवानी दिलेली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: