आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून सर्व विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आघाडी करण्याचे धोरण आखले आहे. भाजपपेक्षा मोदी-शहा या जोडीला रोखण्यासाठी व्यूहरचना करण्यात बहुतेक सर्व विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. फक्त या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे, यावर अजून एकमत झालेले नाही. अर्थात हे नेतृत्व काँग्रेस आणि राहुल गांधींकडे जाऊ नये यासाठी मात्र एकमत असले तरी त्यांना नाकारण्यासाठी आपले घोडे दामटता आले पाहिजेत. यादृष्टीने अन्य राजकीय पक्षांमध्ये राहुल गांधींचे नेतृत्व नाकारण्याची चढाओढ लागलेली आहे. त्यात कोण बाजी मारतो हे पाहणे म्हणजे राजकारणातील फार मोठे मनोरंजन असेल.बाकीच्या विरोधी पक्षांना मोदींविरोधात एकत्र यायचे आहे हे काँग्रेसने पक्के जाणले आहे. त्यापेक्षा काँग्रेसने आघाडीचे नेतृत्व करू नये यासाठी अन्य प्रादेशिक पक्षांमध्ये सुंदोपसुंदी चालणार हेही काँग्रेसने पक्के जाणले आहे. त्यामुळे या राजकीय प्रादेशिक छोटय़ा पक्षांना एकत्रित आणून त्यांची मोट बांधण्यात आपण कसे यशस्वी होऊ शकतो हे स्पर्धक पक्षांना दाखवण्यासाठी काँग्रेसचीही खेळी चालू आहे. त्यामुळे आघाडीची फळी उभी करण्यात विरोधक जोपर्यंत निर्णायक टप्प्यावर येत नाहीत, तोपर्यंत मोदी भाजपला कसलाही धोका नाही, असे चित्र सध्याचे आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस हे मूळचे काँग्रेस प्रवाहातील पक्ष; समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी हे थोडे डाव्या विचारसरणीचे समजले जाणारे पक्ष; संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल हे जनता दलाची शकले पडून झालेले पक्ष; याशिवाय तेलुगू देशम, अद्रमुक, द्रमुक, माकप, भाकप, यूडीएफ, एलडीएफ अशा असंख्य पक्षांना एकत्र आणणे हे फार मोठे आव्हान आघाडी करू पाहणा-या नेतृत्वाला पेलावे लागेल. हे आव्हान पेलण्यासाठी परिपक्व आणि अनुभवी नेतृत्व असणे गरजेचे आहे. असे नेतृत्वगुण अर्थातच राहुल गांधींकडे नाही हे जगजाहीर आहे. म्हणूनच अजून तरी स्वत:ला मोठा समजत असला तरी काँग्रेसकडे आघाडीचे नेतृत्व जावे यावर कोणाची सहमती होणे अशक्य आहे. याचे कारण आज जर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील, काँग्रेसप्रणीत आघाडी निर्माण करायचे म्हटले तर, काँग्रेसकडून वर्चस्ववादाचे राजकारण सुरू होणार. अन्य पक्षांना दुय्यम वागणूक मिळणार. हेच विरोधी पक्षांना नको आहे. कारण, आज तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून देशात शिल्लक राहिलेला नाही. सर्वात जुना पक्ष ही त्यांची प्रतिमा आहे, पण सर्वात मोठा पक्ष नाही. पण काँग्रेसचे नेतृत्व हे सर्वात कमी अनुभवी आहे. कोणत्याही मंत्रीपदाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी नाही. साहजिकच त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप विरोधात उभे राहायचे म्हणजे आत्मघात करून घ्यायचा अशी भीती विरोधकांमध्ये आहे. साहजिकच पर्यायी नेतृत्व जोपर्यंत सर्वमान्य होत नाही, तोपर्यंत ही एकजूट होणे अवघड आहे. त्यामुळे राहुल गांधींचे नेतृत्व नाकारून आपल्या पक्षाचे नेतृत्व कसे चांगले असेल, यासाठी सर्वाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हे प्रयत्न म्हणजे राहुल गांधींचे नेतृत्व नाकारण्याची चढाओढ म्हणावी लागेल.सर्वात प्रथम काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना विरोधकांची एकजूट झाली पाहिजे याची उपरती झाली. तसे सगळेजण त्याबाबत बोलून दाखवत होते, पण त्यासाठी नेमका पुढाकार कोणीच घेतला नव्हता. ती संधी साधत डिनर डिप्लमसीचा प्लॅन सुमारे दोन महिन्यांपूर्वी सोनिया गांधींनी आखला. बहुतेक सर्व विरोधी पक्षांचे प्रतिनिधी या डिनरला उपस्थित राहिले. एकत्र येण्यावर एकवाक्यताही झाली पण नेतृत्वाबाबत कोणतीच बोलणी झाली नाहीत. तोपर्यंत काँग्रेसचा असा समज होता की आपण सर्वात जुने आणि सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे हे नेतृत्व आपल्याकडेच येणार. पण नेतृत्वाच्या विषयावरून या हालचाली अर्धवट राहिल्या. हे नेतृत्व आपल्याकडे येणार नाही आणि त्याबाबत एकवाक्यता होत नसल्याची जाणीव झाल्याने काँग्रेसने आपले शक्तिप्रदर्शन सुरू केले. अन्य छोटय़ा पक्षांना आपल्या सोबत आणण्याची व्यूहरचना करण्याचे ठरले, तर दुसरीकडे हे नेतृत्व काँग्रेसकडे जाऊ नये आणि राहुल गांधींचे नेतृत्व नाकारण्यासाठी अनेक इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले.सर्वात प्रथम भाजपमधील असंतुष्ट असलेले आणि भाजपला रामराम केलेले यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून ममता बॅनर्जी असल्याचे वक्तव्य केले. त्यासाठी ती बंगालची वाघीण या देशाचे नेतृत्व करू शकेल, असे वक्तव्य करून ममता बॅनर्जीच्या महत्त्वाकांक्षा वाढवल्या आणि राहुल गांधींचा पत्ता कापण्यासाठी जाळे फेकले. ममता बॅनर्जीचे नाव त्यामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीसाठी येऊ लागले. पण हे नाव पुढे आले होते ते राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेतृत्व नाकारण्यासाठी. पुढे मग राहुल गांधींना नाकारण्याची चढाओढच सुरू झाली.आघाडीचा फॉर्म्युला समोर आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांचे मतही महत्त्वाचे होते. त्यांनी स्पष्टपणे काहीच बोलून दाखवले नसले तरी आघाडी करण्यास होकार दिला, पण नेतृत्वाचा प्रश्न उपस्थित केला. हे नेतृत्व अनुभवी व्यक्तीकडे असले तर यश मिळेल असा विचार सोडून आपला पत्ता नकळत ओपन केला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली शरद पवारांनी काम करणे हे कधीच कोणी मान्य करू शकणार नव्हते. त्यामुळे अन्य पक्षातील नेत्यांनाही शरद पवार हा हुकमी एक्का वाटू लागला. पण ही सगळी चढाओढ राहुल गांधींना नाकारण्यासाठी होती.दोन दिवसांपूर्वी मोदी विरोधी आघाडीचे नेतृत्व नितीशकुमार सक्षमपणे करतील आणि ते पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून योग्य असल्याची बातमी आली. नितीशकुमार महत्त्वाकांक्षी आहेत, कार्यक्षम आहेत पण त्यांचे भाजपबरोबरचे संबंध सध्या चांगले आहेत. त्यांचा भाजपबरोबर झालेला ब्रेकअप संपला असून पुन्हा पॅचअप झालेले आहे. तरीही त्यांना आघाडीत आणायचे प्रयत्न विरोधकांनी चालवले आहेत. ते यासाठीच की आघाडीला चांगले नेतृत्व मिळाले पाहिजे. मोदी विरोधात नितीशकुमारांना आणून पुन्हा एकदा बिहारमधून नवा जयप्रकाश घडवण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे सगळे राहुल गांधींकडे नेतृत्व जाऊ नये यासाठी चालले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. नितीशकुमारांनी होही म्हटले नाही आणि नाहीही म्हटले नाही. पण ते मोदी विरोधात हे नेतृत्व करायला गेले तरी त्यांच्या बाजूने बंगालची वाघीण उभी राहील की नाही याबाबत शंकाच आहे. याचे कारण ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांचे सख्य सर्वाना माहिती आहे. या दोघांमधील मतभेदामुळेच वाजपेयी सरकारच्या काळात नितीशकुमारांच्या नावाने खडे फोडत ममता बॅनर्जी रालोआतून बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे केवळ राहुल गांधी नकोत म्हणून नितीशकुमार यांना ममता बॅनर्जी मान्यता देतील असे समजणे फार भोळेपणाचे ठरेल. पण नेतृत्व कोणी करायचे याबाबत एकमत नसले तरी ते राहुल गांधी आणि काँग्रेसने करू नये याबाबत मात्र सर्वाचे एकमत झालेले आहे. त्यामुळे त्यांना नाकारण्यासाठी अनेक नावे पुढे येताना दिसत आहेत.बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्या मायावती याही पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. पण त्या कोणत्याही क्षणी पलटी मारू शकतात. केवळ भाजपची घोडदौड रोखण्यासाठी मायावती या विरोधक असलेल्या समाजवादी पार्टीबरोबरही जाऊ शकतात. फक्त काँग्रेसला जवळ केले तरी त्यांचे नेतृत्व त्या मानतीलच असे नाही.आंध्र प्रदेशला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा या मागणीवरून रालोआतून बाहेर पडलेला पक्ष म्हणजे तेलुगू देशम. या पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू हेही कमी महत्त्वाकांक्षी नाहीत. त्यांना आपल्या राज्याचे हीत पाहायचे असले तरी ते राहुल गांधींचे नेतृत्व स्वीकारणार नाहीत. दीर्घकाळ अनुभवी असलेल्या चंद्राबाबूंना राहुल गांधींचे नेतृत्व कदापी मान्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी स्वत:चे नाव पुढे केले नाही तरी ते शरद पवारांच्या नावाची शिफारस करून राहुल गांधींचा मार्ग अडवू शकतात.समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव हे अनुभवी असले तरी राहुल गांधींचे नेतृत्व ते मान्य करणार नाहीत. मुलायमसिंग यादव हेही स्वत: नेतृत्व करण्यास इच्छुक नसले तरी राहुल गांधींना ते पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ते पण कदाचित शरद पवारांच्या नावाची शिफारस करू शकतात.मोदी विरोधी आघाडीतील सर्व पक्षांची रणनीती काँग्रेस आणि राहुल गांधी पूर्णपणे समजून चुकलेली आहे. तरीही त्यांना वाटते की या आघाडीचे नेतृत्व आपल्याकडेच येईल. त्यादृष्टीने आखलेल्या व्यूहरचनेचा भाग म्हणजेच कर्नाटकातील राजकारण. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या कुमारस्वामींना कर्नाटकचे नेतृत्व देण्यामागचा हाच हेतू आहे की राज्यात तुम्ही असलात तरी केंद्राच्या बाबतीत आम्हाला स्थान द्या. यातून एकेका पक्षाला आपल्या पाठबळाने मांडलिक करून घेण्याचे प्रयत्न काँग्रेसने केले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.यावरून एक लक्षात घेतले पाहिजे की भारतीय जनता पक्षाला रोखण्याची ताकद ही विरोधकांच्या एकजुटीवर अवलंबून आहे. मोदी-शहांच्या भाजपला रोखण्यासाठी १९७७ च्या आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जसे विरोधक एकत्र आले आणि जनता पक्षाची स्थापना केली तसाच प्रयत्न करावा लागेल. जनता पक्षात नांगरधारी शेतकरी या चिन्हावर तत्कालीन डावे, समाजवादी पक्ष आणि जनसंघ यांच्यासारखे परस्पर विरोधी विचारांचे पक्षही एक झाले होते. पण एका झेंडय़ाखाली आले आणि जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व मान्य करून हा पक्ष स्थापन झाला होता. जयप्रकाश नारायण हे काही पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून नेतृत्व करत नव्हते, तर इंदिरा गांधींची राजवट संपुष्टात आणणे या हेतूने सगळे एका झेंडय़ाखाली एकत्र आले होते. सर्वात प्रथम इंदिरा गांधी आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर करणे हे ध्येय होते. पंतप्रधान कोण होणार हे ध्येय तेव्हा नव्हते. पण आज मोदींना हटवण्यासाठी मीच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून अनेकजण स्वयंघोषित नेते बनू पाहत आहेत. त्यामुळे जोपर्यंत भाजपला पराभूत करून विरोधकांचे सरकार आणण्यासाठी आपले अहंकार आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेऊन विरोधक एक होत नाहीत तोपर्यंत २०१९ ला मोदींना सत्तेपासून रोखणे कोणालाही शक्य होणार नाही.
शनिवार, २ जून, २०१८
राहुल गांधींचे नेतृत्व नाकारण्याची चढाओढ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा