शनिवार, १६ जून, २०१८

राहुल गांधी बदलत आहेत

राहुल गांधी आपली प्रतिमा बदलण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमध्ये त्यांना ब-यापैकी यशही येताना दिसत आहे. एकेकाळी पप्पू म्हणून ज्यांची हेटाळणी आणि चेष्टा केली जात होती, तेच आता परिपक्व होताना दिसत आहेत. पण, त्यांची हीच परिपक्वता २०१९ ला काँग्रेसला गाळातून वर काढू शकेल का? याचे उत्तर अर्थातच अजून पाच-सहा महिन्यांनी होणा-या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकीतील निकालानंतर मिळेल. तरीही त्यांचे बदलणे काँग्रेसला दिलासादायक आहे.राहुल यांच्या नावात गांधी आहे. काँग्रेससारख्या पक्षातील नेतेपद आहे. तरीही गेली चार वर्षे त्यांना सतत यशाने हुलकावणी दिली. २०१४च्या निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल या सामन्यात त्यांचा अजिबात टिकाव लागला नाही. नमो विरुद्ध रागा या स्पर्धेत राहुल गांधींनी काँग्रेस पार रसातळाला नेऊन ठेवली होती. संसदेत कायम मोठा पक्ष असणा-या या पक्षाला अर्धशतकही गाठता आले नाही. त्यामुळे राहुल गांधी काँग्रेस संपवणार, असाच सूर सगळीकडे दिसू लागला. असे असताना अचानक गेल्या सहा महिन्यांत फिनिक्स पक्षाप्रमाणे राहुल गांधी आणि काँग्रेसमध्ये चैतन्य येताना का दिसत आहे? तर, याचे कारण आहे राहुल गांधी स्वत:ला बदलत आहेत.राहुल गांधी यांना २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसने मोदींविरोधात पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले होते. पण, मोदींची आक्रमकता आणि भाजपचे प्रचारतंत्र यापुढे राहुल गांधी नेहमीच फिके पडताना दिसत होते. ते सर्वाचा थट्टेचा विषय ठरत होते. त्यांना अगदी पप्पू किंवा कार्टून पाहणारे बाळ इथपर्यंत प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाने नेऊन ठेवले होते. यातून सावरणे तितकेसे सोपे नव्हतेच. तरीही राहुल गांधी सध्या सावरताना दिसत आहेत. याचे नेमके कारण काय असावे? तर राहुल आता स्वत:चे बोलू लागले आहेत. त्यांच्या कृतीतील नाटकीपणा कमी झालेला दिसत आहे. हा बदलच नागरिकांना योग्य वाटत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आणखी काय काय बदल केले आहेत?राहुल गांधींच्या भोवती २०१६ पर्यंत जे कोंडाळे होते, ते राहुल गांधींना चुकीचा सल्ला देत होते. राहुल गांधींची प्रतिमा त्यामुळे मलिन आणि खालावत होती. यामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग, पेशाने वकील असलेले आणि राहुल गांधींच्या वतीने अनाहुत वकिली करणारे कपिल सिब्बल यांच्यासारखे नेते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेछूट बरळणारे मणिशंकर अय्यर यांच्यासारखे बोलघेवडे मूर्ख शिरोमणी होते. या नेत्यांच्या कोंडाळय़ात राहून राहुल गांधींची अवस्था असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ अशीच झाली होती. राहुल गांधींच्या नावावर आपण त्यांचे मार्गदर्शक आहोत, राहुल गांधींचे प्रवक्ते आहोत अशा थाटात हे तिघे काहीही बोलायचे आणि त्यांच्यापुढे राहुल गांधींना खाली मान घालावी लागायची. या सर्वापासून सध्या राहुल गांधी लांब आहेत, हाच फार मोठा बदल आहे. काँग्रेसमध्ये जी सभ्यता अपेक्षित आहे, त्या सभ्यतेच्या मर्यादा सोडून वक्तव्य करण्याचे काम मणिशंकर अय्यर यांनी कायम केले आहे. त्यामुळे अशा मणिशंकर अय्यरशी जवळीक असल्यामुळे राहुल गांधींची आणखी थट्टा होत होती. मणिशंकर अय्यर यांच्यावर असलेला सगळा राग राहुल गांधींवर निघत होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले असले तरी नेहरू ते राजीव गांधी या काळात सावरकरांबद्दल कधीही अपशब्द काँग्रेसने काढले नव्हते. प्रत्येकाचा देशभक्तीचा विचार वेगळा असतो, पण सावरकरांच्या देशभक्तीवर शंका कोणीच घेऊ शकत नव्हते. पण, याच मणिशंकर अय्यरने सावरकरांची हेटाळणी केली. त्यामुळे तीच काँग्रेसची भूमिका आहे असा भास निर्माण केला. साहजिकच भारतातील सावरकरप्रेमीच नव्हे तर सर्वच भारतीयांच्या भावना त्यामुळे दुखावल्या. अशा मणिशंकर अय्यरला राहुल गांधी पकडून होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तेढ ही राजकीय नेत्यांसाठीच नाही, तर तमाम भारतीयांसाठी चर्चेचा विषय असते. त्या पाकिस्तानचे फाजील लाड करून आमच्या सैनिकांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम सातत्याने मणिशंकर अय्यर यांनी केले. तरीही राहुल गांधी मणिशंकर अय्यर यांना जवळ करत राहिले. साहजिकच अय्यरचा राग भारतीय जनता राहुल गांधींवर काढत राहिली. मात्र हे मणिशंकर अय्यर यांचे वागणे आपल्याला डोईजड होणार हे राहुल गांधींच्या लक्षात आले तेव्हा त्यांनीच मणिशंकर अय्यर यांना दूर केले. तिथून राहुल गांधींमध्ये बदल होत गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच म्हणेपर्यंत या अय्यरची मजल गेल्यावर राहुल गांधींना राहवले नाही, त्यांनी माफी मागितली आणि मणिशंकर अय्यरवर कारवाई केली. या कृतीने राहुल गांधींनी तमाम भारतीयांची मने जिंकली. हा राहुल गांधींमधला झालेला बदलच काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू लागला.आपल्याकडे कोणत्याही गोष्टीकडे तुलनात्मक दृष्टीने पाहण्याची प्रथा आहे. अमूक एक गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे यापेक्षा ती तमुक एका गोष्टीपेक्षा चांगली किंवा वाईट आहे हे बिंबवण्याचे प्रकार आपल्याकडे लोकप्रिय आहेत. त्यामुळेच मार्केटिंग किंवा जाहिरातीला बळी पडण्याचे प्रकार आपल्याकडे घडताना दिसतात. साहजिकच राहुल गांधी कसे आहेत यापेक्षा ते मोदींच्या तुलनेत कुठे आहेत हे जोपर्यंत दाखवण्यात त्यांना यश येत नाही तोपर्यंत त्यांना सत्तेपासून दूरच राहावे लागेल. तरीही त्यांच्यात होत असलेले बदल त्यांना आपले श्रेष्ठत्व आणि वेगळेपण दाखवण्यात करावे लागत आहेत. त्यामुळे त्यांना ही नेमकी नस सापडली आहे. मी कसा मोदी आणि भाजपपेक्षा वेगळा आहे हे दाखवण्याचा ते आता प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यात होत असलेला हा बदल नेमका किती फायदेशीर ठरतो हे येत्या काही महिन्यांतच आपल्याला दिसणार आहे. घोडामैदान लांब नाही.राहुल गांधींचा यापूर्वीचा बराचसा वेळ हा चुकीचे प्रकार करण्यात गेला. तो अर्थातच भोवतीच्या कोंडाळय़ामुळे घडला आहे. असे कोंडाळे दूर केले तरच त्यांची प्रतिमा सुधारू शकते हे त्यांच्या लक्षात येते आहे हेच फार मोठे म्हणावे लागेल. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी राहुल गांधी महाराष्ट्रात अनेकवेळा आले होते. त्यावेळी त्यांनी जे प्रकार केले होते ते नौटंकी या सदरात मोडणारे होते. त्यामुळे राहुल गांधींच्या या नौटंकीवर बोट ठेवून भाजप नेते मोठे होत होते. यामध्ये विदर्भात त्या कलावती नामक आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या महिलेच्या घरात जाऊन भोजन करणे, तिला मदत देतो असे सांगून ती न करणे. हे अर्थातच तत्कालीन महाराष्ट्र काँग्रेसच्या अशोक चव्हाण आदी नेत्यांच्या कल्पनेतून आलेले खुळ होते. अशी सहानुभूती मिळवून आपल्याला मोठे होता येईल असे राहुल गांधींपुढे बिंबवले गेले. पण ही नौटंकी लोकांच्या लक्षात आल्याने त्याचा फटका राहुल गांधींची प्रतिमा डागाळण्यासाठी झाला. अशी शोबाजी करण्याची गरज नाही. पण स्थानिक नेते, प्रादेशिक नेते आपले इंप्रेशन पाडण्यासाठी असला काहीतरी आचरटपणा करतात त्याचा फटका नेत्यांना बसतो. राहुल गांधींच्या बाबतीत तेच झाले. त्याचवेळी राहुल गांधी एकदा मुंबई दौ-यावर आले होते. तेव्हा त्यांनी मुंबईकरांना खूश करण्यासाठी काँग्रेसच्या आचरट नेत्यांच्या नादाला लागून लोकल प्रवास केला होता. या प्रकाराचेही नौटंकी म्हणूनच प्रसारमाध्यमांनी वर्णन केले होते. याचे कारण घाटकोपरला राहुल गांधी उतरले. तिथे त्यांनी एटीएममध्ये जाऊन पैसे काढले. त्या पैशातून रांगेत उभे राहून लोकलचे तिकीट काढले आणि मग लोकलने प्रवास केला. म्हणजे बातमी म्हणून सांगायला, पाहायला छान आहे हे सगळे. पण यातील वास्तव काय होते? राहुल गांधी तेव्हाही काँग्रेसचे खासदार होते. खासदारांना रेल्वेचा प्रवास मोफत असतो. त्यांना तिकीट काढायची काय गरज होती? त्यांनी सेकंड क्लासने प्रवास केला होता. जेमतेम ५ रुपये तिकीट होते. त्यासाठी एटीएममध्ये जाण्याची काय गरज होती? तेवढे पैसे कोणीही काँग्रेस कार्यकर्ता देऊ शकला असता. त्यानंतर एकेठिकाणी त्यांच्या चपला एका मंत्र्याने उचलून घेतल्या होत्या. हे सगळे प्रकार अत्यंत हास्यास्पद होते. ते स्थानिक प्रादेशिक नेत्यांच्या आग्रहाने केले जात होते. पण त्यामुळे राहुल गांधींचा पोरकटपणा दिसत होता. त्याचप्रमाणे रोजगार हमीच्या कामाच्या पाहणीसाठी एका शेतात राहुल गांधी गेले असता तेथील शेतमजुरांना, रोजगार हमीच्या लोकांना धान्य आणि पैसे मिळत नव्हते. हे बिंग बाहेर पडू नये म्हणून काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांना मजुरांच्या वेशात रोजगार हमीच्या कामावर उभे करण्यात आले आणि त्यांच्याशी राहुल गांधी बोलले. खरे मजूर डांबून ठेवले होते. हा प्रकार अत्यंत वाईट आहे. असल्या उघड होणा-या प्रकारांमुळे राहुल गांधींची प्रतिमा ही पप्पू अशी बनवण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते गुंतले होते. पण आता त्यातून बाहेर पडत राहुल गांधी बदलत आहेत.गुजरात निवडणुकीनंतर आणि पक्षाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांच्या वागण्यात, बोलण्यात बदल झालेला आहे. ते आता स्वत:ची मते मांडताना दिसतात. फक्त कधीकधी अतिउत्साहीपणा नडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उणीव दाखवण्यासाठी काहीतरी अचाट करायला जातात आणि पुन्हा गडबड होते. त्यातलाच एक प्रकार म्हणजे चार दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना एम्समध्ये दाखल केल्यावर राहुल गांधी त्यांना बघायला गेले. ते गेल्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंग असे सगळेच भेटायला गेले. प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले. इथंवर गप्प बसायचे की नाही? पण नंतर राहुल गांधी मुंबईत बोलून गेले की त्यांच्या अगोदर मी भेटायला गेलो. केल्या सत्कर्मावर पाणी फेरल्याचा प्रकार झाला. म्हणजे पंतप्रधानांना कमी लेखण्यासाठी तुम्ही अटलजींना भेटायला गेला होता का? वाजपेयींना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले असते तर आणखी परिपक्वता दिसली असती. तरी पण जो बदल त्यांनी घडवण्याचा प्रयत्न आहे तो स्वागतार्ह असला तरी सत्ताबदल घडवण्यासाठी पुरेसा नाही हे निश्चित. याचे कारण खासदार म्हणून निवडून गेल्यावर यूपीएचे सरकार असताना संधी असूनही त्यांनी कसल्याही मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली नाही. इंदिरा गांधी याही पंतप्रधान होण्यापूर्वी मंत्रिमंडळात होत्या. थेट पंतप्रधान झाल्या नव्हत्या. राजीव गांधींची संधी ही अपघाताने होती. पण अनुभव घेण्याची संधी असतानाही राहुल गांधींनी ती घेतली नाही किंवा काँग्रेसने तेव्हा त्यांना ती जबाबदारी दिली नाही यातूनच त्यांच्या नेतृत्वावर साशंकता निर्माण करण्याचे काम केले आहे. आता जेवढे नेते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत त्या सगळय़ांना अनुभव आहे. फक्त राहुल गांधींना नाही. त्यामुळे त्यांना आता आपल्यातील परिपक्वता दाखवण्याचा बदल करावा लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: