लोणावळय़ातील भुशी धरणात शुक्रवारी एक तरुण बुडाला. दोन दिवसांपूर्वी माथेरानला सेल्फी काढताना एका महिलेचा कडेलोट झाला. मागच्या आठवडय़ात रत्नागिरीच्या समुद्रात काही पर्यटक बुडाले. तर गोव्यातील समुद्रातही मागच्या आठवडय़ात विदर्भातील काही पर्यटक बुडाले होते. अवघ्या काही दिवसांतील या घटना आहेत. पण यामुळे पर्यटकांचा बेजबाबदारपणा कसा जीवावर बेतू शकतो हे स्पष्ट होत आहे. म्हणूनच पर्यटनाला जाताना त्या पर्यटनक्षेत्राचे सौंदर्य, पावित्र्य याबरोबरच नावलौकिक खराब होणार नाही याची जबाबदारी पर्यटकांची आहे. सेल्फी काढण्याच्या नादात अपघाती मृत्यू होणे या घटना गेल्या पाच-सहा वर्षात खूपच वाढलेल्या आहेत. परंतु तरीही उत्साहाच्या भरात अनेकजण आपला जीव गमावून बसतात. त्यामुळे तो संपूर्ण परिसरच भयावह आणि धोकादायक म्हणून गणला जातो. म्हणजे महामार्गावर अनेक ठिकाणी अपघाती वळण, अॅक्सिडेंड पॉइंट अशाप्रकारे ओळखली जाणारी ठिकाणे असतात. ही ठिकाणे चालक वाहकांच्या मनात, प्रवाशांच्या मनात भीती निर्माण करतात. त्या भीतीपोटी वारंवार त्या ठिकाणी अपघात होत राहतात. कधीतरी एखादा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी तसा बदलौकिक निर्माण होतो आणि तिथे भीतीतून अपघात निर्माण होतात. कारण चालकांचे त्या ठिकाणी लक्ष विचलित होत असते.यातून अंधश्रद्धा पसरून ते ठिकाण अकारण बदनाम होत असते. असाच परिणाम विविध पर्यटन स्थळांबाबत होत राहतो. अमूक एक ठिकाणच्या तलावात पाण्याला ओढ आहे, आस लागते, बळी जातात, अशाप्रकारे अफवा सर्वत्र पसरत जातात. त्यामुळे त्याच त्याच ठिकाणी वारंवार अपघात होऊन ते पर्यटन स्थळ बदनाम होते. म्हणजे चूक असते ती पर्यटकांची पण बदनाम होते ती विशिष्ठ अशी जागा. समुद्रात जेव्हा पर्यटक जातात तेव्हा प्रत्येक समुद्राच्या किना-यावर धोक्याची पातळी, काय करू नये, कुठे पोहायला जाऊ नये, भरती-ओहोटीच्या वेळा, पाणी कुठपर्यंत येते याच्या सांकेतिक खुणा दिलेल्या असतात. सूचना फलक असतात. तरीही त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. गोव्याचे समुद्रकिनारे हे सर्वाधिक सुरक्षित असे समुद्रकिनारे म्हणून ओळखले जातात. तरीही नको तितके आत घुसल्याने विदर्भातील पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. समुद्रात लाट येते आणि पाणी पुन्हा समुद्राच्या दिशेने जाते तेव्हा वाळू खचत जात असते. अशावेळी किती खंबीरपणे उभे राहायचे, किती आतपर्यंत जायचे याचे भान ठेवावे लागते. ते भान नसल्यामुळे अपघात होत असतात. गणपतीपुळे येथील समुद्र किनारा, मुरूडच्या अलीकडे काशिदचा समुद्रकिनारा हे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात; परंतु या ठिकाणी पर्यटक अतिउत्साहाच्या भरात अनेकदा गाढवी धाडस करतात आणि अपघातांना निमंत्रण देतात. पर्यटन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था, तेथील मदतीची व्यवस्था यावर टीका केली जाते. पण पर्यटक चुकीचे वर्तन करत असतील त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? पर्यटन स्थळावर सुरक्षितपणे आनंद घेण्याची जबाबदारी ही पर्यटकांची आहे. असे असताना त्याकडे दुर्लक्ष केले की अपघात अटळ आहे.समुद्रकिना-यांवर जाणारी तरुणाई अनेकवेळा कोणत्याही अवस्थेत असते. बरेच तरुण समुद्रकाठी बसून बिअर आदी मद्यपान करतात, त्या मद्याच्या बाटल्याही कुठेही टाकतात. समुद्र किनारी असलेल्या झाडीत अशा बाटल्या पाहायला मिळतात. मद्यपान करून जोशात अनेकजण समुद्रात घुसतात. अशावेळी हे अपघात होत असतात. त्यामुळे पर्यटनस्थळांवर आपण आनंद घेण्यासाठी जात आहोत याचे भान ठेवले पाहिजे. प्रत्येजण काही पर्यटनस्थळी ऑर्थरसीट होऊ शकत नाही. थंड हवेची जी उंचीवरची पर्यटनस्थळे आहेत त्यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, पांचगणी या स्थळांचा उल्लेख करावा लागेल; परंतु या ठिकाणी वा-याचे प्रमाण खूप असते. आपण परिधान केलेले कपडे वारा भरणारे, फुगणारे असतील तर त्या ठिकाणी वारा तुम्हाला खेचू शकतो, दरीत तुमचा कडेलोट होऊ शकतो. महाबळेश्वरच्या ऑर्थसीट पॉइंटवर फक्त वा-याची ताकद बघायला लोक जमतात. या ठिकाणी दरीतून वर येणारे डोंगरवारे प्रचंड ताकदीचे असते. त्यामुळे तिथे पर्यटक अनेक गोष्टी वाकून दरीत फेकतात, त्या वा-याच्या वेगाने परत येत असतात. हा निसर्गाचा चमत्कार बघण्यासाठी अनेकजण ऑर्थरसीटवर नाणी फेकतात. बिल्ले किंवा सोडावॉटर, कोल्ड्रिंकच्या बाटल्यांची बूचने या दरीत भिरकावून पुन्हा ती सुदर्शन चक्राप्रमाणे परत येताना आनंद घेतात. हा पॉइंट ऑर्थरसीट म्हणून ओळखला जातो. कोणा ऑर्थरसीट नामक ब्रिटिश माणसाने आपणही असेच उडून परत येऊ अशा विश्वासाने तिथे उडी मारली अन् जीव गमावला. पण त्याच्या नावाने हा वा-याच्या ताकदीचा पॉइंट अजरामर झाला.पण हे भाग्य प्रत्येकाला लाभत नसते. त्यामुळे ऑर्थरसीटचे नाव लागले म्हणून आपलेही मरणोत्तर नाव एखाद्या पॉइंटला मिळेल अशी भ्रामक कल्पना कोणी बाळगू नये. अशा पर्यटनस्थळी गेल्यावर विशेषत: महिलांनी आपला घागरा, साडी, कुडता यांचे भान ठेवले पाहिजे. त्यात वारा शिरून दरीच्या दिशेने खेचले जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपल्या डोक्यावरील टोपी, गळय़ात अडकवलेले कॅमेरे आदी काही वस्तू असतील तर त्यांचेही भान ठेवावे लागते. नाहीतर अपघात हा अटळ आहे. विनाकारण धोका पत्करून कधीही पर्यटनाचा आनंद मिळत नसतो. पर्यटन स्थळे ही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी असतात, त्याच्याशी खेळण्यासाठी नाहीत. मागच्या आठवडय़ात गोकाकच्या धबधब्यात एक तरुण असाच वाहून गेला होता. साता-यातील ठोसेघरलाही मोठा धबधबा आहे. तिथेही बाहेरून आलेले अनेक पर्यटक वाहून जातात. हा धबधबा खूप मोठा आणि उंचावरचा आहे. या धबधब्याच्या पाण्याला खूप ओढ आहे. पण त्यावर चढून पाण्यात उतरण्याचा मोह अनेकांना होतो आणि जीव गमावतात. असले प्रकार टाळले पाहिजेत आणि धबधब्याचा आनंद हा रेलिंग आणि सुरक्षित ठिकाणातूनच घेतला पाहिजे. पर्यटनाचा सुरक्षित आनंद घेतला पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा