- मुंब्रा सलतनचे चे बादशाह ओबीसींचे स्वयंघोषित नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना अलिकडे काहीच काम उरलेले नाही. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्यांनी काहीही धंदे सुरू केले आहेत. त्याला माकडचाळे याशिवाय दुसरा शब्दच असू शकत नाहीत. अर्थात माकडे नाराज होणार नाहीत हे गृहीत धरून हे वाक्य इथे टाकत आहे.
- मागच्या महिन्यात इशरत जहान प्रकरण उफ़ाळून आले, तेव्हा त्यांनी काही हातपाय हलवावेत अशी अपेक्षा होती. कारण गेली काही वर्षे त्यांनी इशरतला शहीद बनवण्यात पुढाकार घेतलेला होता. ती किती निरागस व निष्पाप तरूणी होती आणि हकनाक तिचा गुजरातच्या पोलिसांनी बळी घेतला, ते पटवून देण्यात ते आघाडीवर होते. पण अमेरिकेच्या तुरूंगात बसलेल्या डेव्हीड कोलमन हेडली यानेच इशरतला तोयबाची घातपाती ठरवल्यावर आव्हाडांची बोलती बंद झाली होती.
- इशरतचा वार हुकल्यामुळे आता ते मनुच्या आश्रयाला गेले आहेत. अकस्मात त्यांना नवा शोध लागला आहे, की मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर झाले असून, तिची धडाक्यात विक्री चालू आहे. अशी विक्री करणार्या बुकस्टॉलवर हल्ले करून ते फ़ोडण्याची शांततापुर्ण धमकी त्यांनी दिली आहे. अर्थातच त्यासाठी त्यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही आधार घेतला आहे. बाबासाहेबांनी जाळून टाकलेली मनुस्मृती पुन्हा पुस्तक स्वरूपात विकली जात आहे, यामुळे आव्हाड खवळलेले आहेत. वास्तविक अशा तर्हेचे पुस्तक कुठेही विकले जात नाही, अस्तित्वात नाही. दहा वर्षापुर्वी त्यावर बंदी घातलेली होती आणि असे असूनही हे पुस्तक विकले जाते म्हणून आव्हाड चिडलेले आहेत. साप साप म्हणून भुई धोपटण्याचा हा त्यांचा नवा प्रकार आहे. अर्थात कित्येक गोष्टी बंदी असतानाही राजरोस चालतात, त्याविषयी आव्हाडांनी सहसा आपले मत व्यक्त केलेले नाही. कारण त्याला विरोध खरून फारशी प्रसिद्धी मिळणार नाही हे त्यांनी गणित केले आहे.
- दहा वर्षापुर्वी किंवा त्यांच्याच पक्षाची सत्ता असताना महाराष्ट्रात गुटखा वा डान्सबारना बंदी घातलेली होती. तरीही ठाण्यातही अनेक जागी राजरोस त्या गोष्टी चालूच होत्या. गुटखा विकला जात होता आणि डान्सबारही मस्तपैकी चालू होते. पण तेव्हा कधी आव्हाडांनी गुटख्याची दुकाने वा डान्सबार हॉटेले फ़ोडून टाकण्याचा इशारा दिला नाही. कारण या उद्योगात त्यांच्या सलतनीतील मतदार मोठ्या संख्येने भाग घेत होते.
- महाराष्ट्रात अनधिकृत बांधकामांना बंदी आहे. अनेक परवानग्या घेऊनच इमारतीचे बांधकाम करावे लागते. पण ठाण्यात व आव्हाडांच्या मतदारसंघातच हजारो बेकायदा इमारती उभ्या आहेत आणि तिथे वसलेल्या लक्षावधी नागरिकांचे जीवन धोक्यात आहे. अशा बंदी असलेल्या बांधकामांना रोखण्यासाठी वा ती मोडूनतोडून टाकण्यासाठी आव्हाडांनी कधीच काही केल्याचे दिसत नाही. जेव्हा सरकारी यंत्रणा आणि पोलिस अशा बंदीला झुगारणार्या बेकायदा इमारती पाडायला गेले, तेव्हा हेच आव्हाड मध्ये आडवे पडत होते.
- म्हणजे कायदेशीर बंदी असलेल्या पुस्तकाची विक्री होण्याविषयी इतके जागृत असलेल्या आव्हाडांना मृत्यूचे सापळे झालेल्या, त्यांचेच मतदार असलेल्या इमारतीत जीव मुठीत धरून जगणार्यांचा कधी कळवळा का आला नाही हा अनुत्तरीत प्रश्न आहे.
- मनुस्मृतीवर बंदी असताना ते पुस्तक छापले गेले तर गदारोळ होणार असेल तर ज्या ज्या गोष्टींवर बंदी घातलेली असतानाही त्या खुले आम सुरू आहेत त्यालाही आव्हाडांनी विरोध केला पाहिजे. मग ही दुटप्पीपणाची भूमिका कशासाठी?
- वास्तविक मनुस्मृतीमध्ये नेमके काय आक्षेपार्ह आहे ते तरी कधी आव्हाडांनी वाचले आहे काय? बाबासाहेबांनी प्रतिकात्मक म्हणून ते पुस्तक जाळले. त्यानंतर तो विषय संपला होता. आता पुन्हा शंभर वर्षांनी तेच काम हाती घेण्याचे दाखवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार आव्हाड करत आहेत. अशी सवंग लोकप्रियता मिळवून कोणी डॉक्टर आंबेडकर होत नसतो. त्यासाठी फार मोठा त्याग करावा लागतो. आपल्या हातातील सगळे मुद्दे निसटल्यामुळे मेलेले मढे पुन्हा उकरण्याचे काम आव्हाड करत आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घ्यायचे तर निदान अभ्यास करायला हवा आणि त्यांचे अनुकरण करायला हवे. बाबासाहेबांनी देशाची घटना लिहीली आणि कुठल्याही कायद्याला कधी धाब्यावर बसवण्याची भाषा केलेली नव्हती. म्हणून आव्हाडांनी आपल्या इच्छेनुसार जरूर जगावे आणि वागावे. पण बाबासाहेबांच्या नावाचा आधार घेऊन आपल्याच दंगेखोरीला सत्कर्म दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. आव्हाडांचे राजकारण हे सोयीस्कर राजकारण आहे. कधी ते अण्णा हजारेंना गोडसेवादी ठरवून त्यांचे पुतळे जाळायला जातात, तर कधी घातपाती जिहादी इशरतला शहीद म्हणून गौरवतात. कधी फ़ुले शाहू आंबेडकरांचा गुणगौरव करायचे नाटक रंगवतात, तर कधी उंच दहिहंड्या लावून आपल्या हिंदू असण्याचे प्रदर्शन मांडतात. हे सगळे सवंग लोकप्रियतेसाठी चाललेले धंदे आहेत.
मंगळवार, १५ मार्च, २०१६
सवंग लोकप्रियतेसाठी केलेले धंदे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा