- सुमारे साठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेल्या सैद काझी प्रकरणावरून आचार्य अत्रे यांनी तो मी नव्हेच हे अजरामर नाटक लिहीले. महाराष्ट्रात क्वचितच असा एखादा असेल की ज्याने ते नाटक पाहिले नसेल. या नाटकात सगळ्यात शेवटी लखोबा लोखंडेचे वर्णन करताना सरकारी वकील म्हणतात की दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीये. तसाच प्रकार सध्या राजकारणात होताना दिसतो आहे. रस्त्यावर साप मुंगसाची लढत म्हणून गर्दी खेचणार्या आणि कायम गर्दीत बडबडीने लोकांना गुंग करणार्या पण कधीही साप मुंगसाची झुंज न लावणार्या मदार्याची आणि राजकारणी लोकांची वागणूक सारखीच असते.
- मग अशी गर्दी किंवा जमाव कुठेही जमलेला असो. जंतरमंतर रामलिला मैदानावरचा असो, नेहरू विद्यापीठातला असो पण अशा मदार्यांपुढे झुकलेला जमाव कधीच बुद्धीवादी नसतो. कारण जमलेल्या गर्दीचा एक समान विचार असतो किंवा अपेक्षा असतात. सहाजिकच त्यात सहभागी झालेल्या कुणालाही स्वतंत्र्यपणे विचार करता येत नाही. आपण वेगळे आहोत हे दाखवण्याची हौस असलेल्यांना आपले हे पाशवी रुप लपवायचे असते. म्हणून ते अशा कळप वृत्तीला समविचारी किंवा पुरोगामी असे गोंडस नाव देतात.
- कन्हैयाकुमार या विद्यार्थ्याचे कौतुकाचे भाषण दाखवणारे किंवा त्याला ऐतिहासिक ठरवायला धडपडणारे, त्यापेक्षा अजिबात भिन्न नाहीत. एका महिलेसमोर असभ्य वर्तन करणारे कन्हैय्याचे कृत्य समोर आले आहे. महिलांबाबत अतिशय वाईट विचार मनात असणारा हा विकृत माणूस आहे. पण त्याला पाठीशी घालण्यात स्वत:ला धन्य मानणारे हे विकृत मनोवृत्तीचे रस्त्यावर खेळ करणारे आणि जनतेला उल्लू बनवणारे पुरोगामी आहेत. कन्हैयाच्या पुरस्कर्त्यांची गर्दी ज्याप्रकारे त्याला प्रतिसाद देत होती, तशीच गर्दी २०११ मध्ये लोकपाल आंदोलनातील वा केजरीवाल गोतावळ्यातील गर्दी होती हे आठवून पाहिले पाहिजे. जे तेव्हा केजरीवाल करत होते तोच प्रकार आज कन्हैय्याकुमार करत आहे. डावे त्याला बळीचा बकरा बनवत आहेत. म्हणजे मोदींच्या सभा संमेलनात जमलेल्या गर्दीत ‘हर हर मोदी’ म्हणणारे आणि कन्हैयाला जोरदार प्रतिसाद देणारे, यात फारसा फरक नाही. सगळीकडे दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीये असा प्रकार आहे. दोन्हीकडे जमाव तसाच प्रतिसाद देताना दिसतो.
- फक्त आमच्या जमावात शिकणारी मुले हुशार बुद्धीमान आहेत, त्यामुळे देशातला बुद्धीमान वर्ग आपल्या सोबत असल्याचा देखावा केला जात आहे. तसे पाहता लालू आणि कन्हैयाच्या भाषणात काहीच फ़रक सापडणार नाही. जे लोक मोदींचा तिरस्कार करतात त्यांनी कधी या कन्हैय्याचे भाषण ऐकले आहे काय? केवळ मोदींवर टिका करतो म्हणून त्याला शहाणा म्हणणे हे मूर्खपणाचेच लक्षण नव्हे काय? त्यांनी कन्हैयाच्या भाषणाचीही चिकित्सा केली पाहिजे.
- भाषण करताना म्हणे कन्हैया हसवतो. अनेक किस्से सांगतो. कधी जादुगाराची गोष्ट सांगतो. कधी तुरूंगातल्या कुणा पोलिसांशी केलेल्या गप्पांचा उल्लेख करतो. यात वेगळेपण काय आहे? चार वर्षांपूर्वी अशाच गोष्टी केजरीवालांनी आपल्याला सांगितल्या नव्हत्या काय? जरा आठवा सगळ्यांनी. खाजवा डोकं जरा आपलं. कुणा रिक्षावाल्याने कमावलेले तीस रुपये म्हणे आम आदमी पक्षाच्या प्रचाराला देणगी म्हणून दिल्याचा किस्सा केजरीवाल रंगवून सांगतात. त्या रिक्षावाल्याला का समोर कधी आणले नाही? ते कॉंग्रेसचे राहुल गांधी असेच. त्यांच्याबद्दल हे लाचार लोचट कॉंगी काय वाटेल ते कौतुकाचे किस्से सांगतात. काय तर म्हणे, राहुल गांधी यांना दिल्लीच्या सिग्नलपाशी गाडी थांबली असताना भिक मागायला आलेल्या कुणा पोराने उत्तर प्रदेशातून आल्याचे सांगितले होते. हे आपण विसरून गेलो काय? म्हणजे जेव्हाचा हा किस्सा आहे तेव्हा राहुल सोनिया गांधींचे मनमोहनसिंगांच्या नावाने चालवले जात असलेलेे सरकार होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा होती. झेडप्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या गाडीपाशी भिकारी येऊन गुजगोष्टी करू शकतो काय? पण राहुल गांधी आणि त्यांचे लाळघोटे समर्थक सांगतात आणि बाकीचे भक्तगण भारावून ऐकतात. कारण दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये.
- कन्हैय्या आपल्या भाषणात म्हणतो, डंडा चालवण्याचा अधिकार पोलिसांना नाही. आता गम्मत पहा, म्हणजे डंडा पोलिसाच्या हाती असतो. पण तो वापरण्याचा निर्णय त्याच्या हाती नसतो. म्हणजेच पोलिस हा सरकार वा राज्यकर्त्यांची गुलामी करतोय आणि त्याच्यापासून त्याला आझादी मिळणे, हाच लढा आहे. म्हणजे ही सरळ सरळ पोलिसांविरोधात, प्रशासनाविरोधात, प्रस्थापितांविरोधात असलेली नवी नक्षलवादी चळवळ आहे. अफ़जल गुरू वा याकुब मेमन यांनी त्याच आझादीचा वापर केला आहे. म्हणजे कन्हैयाला आझादी नाही तर अराजक आणायचे आहे. अराजक नावाची आझादी नेहमीच सामान्यांचा बळी घेत असते. अशी आझादी अराजकात सहभागी असलेल्या नक्षल्यांना असते, जिहादमध्ये भाग घेणार्यांना असते. जनतेला, सामान्यांना चुकीचे काहीतरी सांगून देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न या डाव्या, पुरोगामी शक्ती करत आहेत. त्यासाठी त्यांचा फार्म्युला आहे की दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये.
मंगळवार, १५ मार्च, २०१६
दुनिया झुकती है
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा