एखाद्याला बदनाम करण्याची, नावे ठेवण्याची, त्याच्या विषयी अफवा पसरवणारांची संख्या या देशात फार मोठी आहे. अनेकांना अशा लोकांमुळे नाहक बदनाम व्हावे लागते. काही कारण नसताना एखाद्यावर उगाचच टिका करायची. त्याने चांगले काम करो वा वाईट पण त्याला वाईट म्हणून त्याची बदनामी करण्याचे काम अनेक उपद्रवी करत असतात. तसाच उपद्रव देण्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी सोशल मिडीया आणि भारतात झाला. भारत पाक सामन्याच्यावेळी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी म्हणे अमिताभ बच्चन याने ४ कोटी रूपये घेतले. म्हणजे सामना जिंकल्याच्या आनंदापेक्षा अमिताभने ४ कोटी रूपये घेतल्याचे दु:ख अनेकांना झाले होते. प्रत्यक्षात अमिताभ बच्चनने असे कोणतेही मानधन घेतलेच नव्हते. पण कोणाच्या टाळक्यात ही अफलातून कल्पना आली आणि त्याची पुडी त्याने सोडून दिली. त्यामुळे अमिताभला मात्र नाहक मनस्ताप पदरी पडला. असे करणे हाही देशद्रोहच नव्हे काय? म्हणजे शतकाचा महानायक म्हणून ज्याची ओळख झालेली आहे, अशा अमिताभ बच्चनला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण रविवारी त्याच्या बचावासाठी बंगाल क्रिकेट संघटनेच्या सौरव गांगुलीला धाव घ्यावी लागली. कारण या सामन्यासाठी त्यानेच अमिताभला आमंत्रण दिलेले होते. त्यात सहभागी होताना अमिताभने भारतीय संघाच्या सोबत मैदानात उतरून राष्ट्रगीत गायले होते. त्यामुळे अर्थातच ‘भारतमाता की जय’ या घोषणांना चालना मिळाली. पर्यायाने त्यातून प्रदर्शित होणार्या राष्ट्रप्रेमाने अनेकांना पोटदुखीचा विकार जडल्यास नवल नव्हते. त्यासाठी मग सोशल माध्यमातून एक आवई पिकवण्यात आली. अमिताभने राष्ट्रप्रेम म्हणून नव्हेतर धंदा म्हणून त्या राष्ट्रगीत गायनाचे चार कोटी रुपये घेतले. सहाजिकच त्यावरून सोशल माध्यमात हाणामारी सुरू झाली. प्रस्थापित माध्यमांनाही त्याची दखल घ्यावी लागली. गांगुलीला समोर येऊन खुलासा करावा लागला. थोडक्यात ज्यांनी अशी अफ़वा पसरवली, त्यांचेच नाक कापले गेले. कारण खुलाश्याने अमिताभची प्रतिमा अधिक उंचावली. त्याने गायनाचे पैसे घेतले नाहीतच. पण मुंबईहून कोलकात्याला जाताना खिशातले पैसे खर्च केले आणि हॉटेलमध्ये मुक्काम करण्याचेही पैसे सामना आयोजकांकडून घेतले नाहीत. केवळ क्रिकेटचे प्रेम व राष्ट्राविषयीची आस्था म्हणूनच त्याने इतकी पदरमोड केली. आणि असे असतानाही त्यालाच बदनाम करण्याचा उद्योग कोणी कशाला केला असेल? अर्थात त्यामागे नेहमीप्रमाणेच तथाकथित सेक्युलर व पुरोगामी मेंदू असणार हे वेगळे सांगायला नको. कारण आता ही सेक्युलर लोकं या देशात फारच उपद्रवी झालेली आहेत. मुळात अफ़वा पिकवायची आणि त्याचा गवगवा इतका करायचा, की खर्याचा शोधही घेतला जाऊ नये. हे गुजरात दंगलीपासून अखंड चालू राहिलेले कारस्थान आहे. गोबेल्स नीतीचे तंत्रज्ञान अवलंबून एखाद्याला बदनाम करायचे. मोदींनी हा त्रास पंधरा वर्ष सोसला. पण त्याला न डगमगता, न भिक घालता आपले कार्य करत राहिले. त्यामुळे या देशाचे सर्वोच्चपद त्यांना मिळाले. तोच प्रकार अमिताभ बाबत झालेला आहे. गुजरातमध्ये दंगलीचा भडका उडाल्यावर मुख्यमंत्र्याने पोलिसांना हस्तक्षेप न करण्याचे आदेश एका बैठकीतच दिले होते आणि आपण त्या बैठकीला हजर असल्याचा दावा संजीव भट्ट नामक वरीष्ठ पोलिस अधिकार्याने केला होता. मग त्यावरून तब्बल बारा वर्षे मोदींना बदनाम करण्यात आले. अखेर सुप्रिम कोर्टानेच संजीव भट्टला खोटा ठरवला आणि पर्यायाने पुरोगामी षडयंत्राचा मुखवटा गळून पडला. कॉग्रेसने याच भट्टच्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्याने पोलिससेवेत असताना तिचा प्रचार केला होता. यातून पुरोगामी मुखवट्यातल्या खोटेपणाचा चेहरा लक्षात येऊ शकतो. त्यानंतर ही पुरोगामी शैलीच होऊन गेली. कुठल्याही बाबतीत अफ़वा पसरवायची. ते अफवेचे अस्त्र कारण नसताना अमिताभ बच्चन यांच्यावर टाकले गेले. आवई उठवायची आणि मग त्यासाठी माध्यमातल्या त्यांच्याच पुरोगामी दलालांनी भाजपाकडे सतत खुलासे मागत रहायचे. अमिताभवर टिका करण्याचे कारणही हेच होते. कारण त्याने मध्यंतरी रंगलेल्या खास पुरोगामी सन्मानवापसी किंवा असंहिष्णूता नाटकात सहभागी व्हायचे टाळले होते. सहाजिकच तोही प्रतिगामी ठरवला गेला. त्याला टार्गेट करण्याची संधी हे पुरोगामी शोधू लागले. ती संधी भारत पाक सामन्यात त्यांना मिळाली. दुसरे कारण मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पर्यटन प्रचारासाठी त्यांनी अमिताभला आमंत्रित केले. त्यानेही त्यात मदत केली. पण त्या जाहिरातीसाठी अमिताभने एकही पैसा घेतला नव्हता. हे दिर्घकाळ गुपित होते. मोदी व गुजरात सरकार हे पुरोगामी वर्णव्यवस्थेमध्ये बहिष्कृत राज्य असतानाही अमिताभने त्याच्या जाहिरातीत सहभाग घेतला. याचा अनेक पुरोगाम्यांना राग होता. अमिताभनेही राज्य सरकारच्या जाहिरातीसाठी अभिनय करताना एकही पैसा घेतला नव्हता. पण आपले औदार्यही गुपित ठेवले होते. असा माणूस पुरोगाम्यांना तिरस्कारणिय वाटणारच. कारण हे पुरोगामी स्वत: काही करत नाहीत, दुसर्याने केले तर आवडत नाही. या द्वेषातूनच अमिताभवर टिकास्त्र सुरू केले. पण हे भोंदु पुरोगाम्यांवर बुमरँगसारखे उलटले.
मंगळवार, २२ मार्च, २०१६
पुरोगाम्यांवर बुमरँग
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा