आज मुंबई चौफेर हे आपणा सर्वांचे लाडके दैनिक ३२ वर्षे पूर्ण करून ३३व्या वर्षात पदार्पण करत आहे. आमचे आदरणीय बाबा तथा मुरलीधरशेठ शिंगोटे यांनी तीन दशकांपूर्वी हे दै. मुंबई चौफेर नावाचे रोपटे लावले; पण बाबांची कल्पकता, दिव्यदृष्टीने ते लवकरच जनमानसात पोहोचले आणि त्या रोपट्याचा वेल गगनभरारी घेऊ लागला. बाबांनंतर त्यांचे पुत्र अरविंद शिंगोटे, प्रवीण शिंगोटे आणि पुढच्या पिढीतील प्रतीक शिंगोटे यांनी त्यात काळानुसार बदल केला आणि जो मुंबई चौफेर छोट्या आकारात पूर्वी होता, तो गेल्या चार वर्षांपासून मोठ्या आकारात येऊ लागला. त्यामुळे सर्वांसाठी सर्वकाही घेऊन येणारे वृत्तपत्र म्हणजे दै. मुंबई चौफेर असे समीकरण झाले आहे. त्याचप्रमाणे नव्या युगाची हाक म्हणून या दैनिकाकडे वाचकवर्ग पाहतो.
नव्या युगाची हाक हे ब्रीद आम्ही २०२२ पासून घेऊन घेतलेली झेप वाचकप्रिय होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. वाचकांच्या अपेक्षा जास्तीत जास्त पूर्ण करून त्यांना हवे ते वाचायला मिळेल याची गॅरंटी आम्ही यानिमित्ताने देऊ, कारण हे सर्वसामान्यांचे दैनिक आहे. यात सामान्य माणसांचा चेहरा प्रत्येकाला दिसतो, म्हणून तो प्रत्येकाला आपलासा वाटतो. वाचकांच्या या तीन दशकांच्या प्रेमाचा वारसा बरोबर घेऊन जाताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
या सगळ्या बदलांना आमच्यावर प्रेम करणाºया सर्व वाचक, विक्रेते, जाहिरातदार, हितचिंतकांनी मान्यता देऊन त्याचे स्वागत केले, त्यामुळे हा वेलू आता गगनावरी जाताना दिसत आहे, त्यासाठी या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. बदलत्या आकारानुसार एकाच वर्तमानपत्रात सर्व काही देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यामध्ये प्रत्येक दिवशी असणारे एक वेगळ्या विषयाचे पान आणि त्याचे वाचकवर्गाकडून होणारे स्वागत हे फार महत्त्वाचे आहे.
विशेष म्हणजे सध्याचे सरते वर्ष हे निवडणुकांचे वर्ष होते. लोकसभा निवडणुका आणि पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका सरत्या वर्षात झाल्या. यासाठी मुंबई चौफेरने निवडणूक विषयक दिलेल्या विशेष पानाचे आमच्या वाचकवर्गाकडून जोरदार कौतुक झाले. त्यानिमित्ताने अनेक नवे लेखकही आमच्याकडे प्रविष्ठ झाले. या पानाला आमच्या नेहमीच्या संपादकीय पानाप्रमाणेच चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत, जागतिक घडामोडींचे होणारे विश्लेषण हे वाचकांना अधिक भावते आणि वाचक तसे आवर्जून आम्हाला कळवतात हे वाचकांचे प्रेमच आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे.
स्व. बाबा तथा मुरलीधरशेठ शिंगोटे यांचा हाच आग्रह आम्हाला कायम असायचा की, वाचकांना जे हवे आहे, ते देण्याचा प्रयत्न करा. त्यांचा तो विचार प्रामाणिकपणे जपत आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. आजच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मला आवर्जून उल्लेख करायला आवडेल तो आमचे हितचिंतक आणि मुंबई चौफेरचे खास वाचक असलेले सदानंद देऊळकर यांचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना स्थापन झाल्यापासून कार्यालयीन कामकाज सांभाळणारे देऊळकर मुंबई चौफेरच्या प्रती लेख आवडतात म्हणून सातत्याने प्रत्येक स्टॉलवरून खरेदी करतात आणि ज्येष्ठ नागरिकांना वाटतात. ज्येष्ठ नागरिकांच्या समवेत लेखांचे जाहीर वाचन केले जाते. प्रती कमी पडल्यातर त्याच्या झेरॉक्स काढतात आणि वाटतात, पण सर्वांना आवर्जून मुंबई चौफेर वाचत जा, तुमचे समाधान होईल असे सांगतात. चारच दिवसांपूर्वी बिटवीन द लाईन्समधील मराठी माणसांनो मराठी बोला या लेखाच्या त्यांनी २०० झेरॉक्स काढल्या आणि ठिकठिकाणी वाटल्या. त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुखांच्या चित्रपट सेनेबाबतच्या लेखांच्या प्रती शिवसेनेच्या पदाधिकाºयांपर्यंत पोहोचवल्या आणि त्याचे ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रमात वाचन करून चौफेरचे कौतुक केले. हे खूप अविस्मरणीय असे आहे.
काळानुसार आम्ही केलेले बदल हे वाचकांना आवडले आहेत. प्रत्येक सोमवारी अर्थविषयक घडामोडी असणारे बिझनेसचे पान, प्रत्येक मंगळवारी असणारे दिशादर्शक असे करिअरचे पान तरुण पिढीला मार्गदर्शक ठरत आहे, त्यामुळे अनेकांना आपल्या जीवनाची दिशा मिळाल्याचे वाचक सांगतात. प्रत्येक गुरुवारी येणाºया आरोग्यविषय धन्वंतरी या विशेष पानातून समाजाचे चांगले प्रबोधन होत आहे. गतवर्षात तरुणांना प्रेरणा देणाºया अशा विशेष मुलाखती आम्ही दिल्या. यात नामांकित उद्योजक आणि संघर्षकरून यशस्वी झालेल्यांचा आलेख आम्ही मांडला होता. यामध्ये दीडशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या धूतपापेश्वर उद्योगाचे रणजीत पुराणिक, पितांबरी उद्योगचे रवींद्र प्रभूदेसाई, माधवबागचे साने यांच्या मुलाखतींना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आम्हाला अशा प्रेरणादायी मुलाखती वरचेवर वाचायला मिळाव्यात म्हणून आग्रह केला. वाचकांचा विचार घेऊन चालवले जाणारे दैनिक हेच तर मुंबई चौफेरचे वैशिष्ट्य आहे.
प्रत्येक शुक्रवारी गुन्हेगारी जगताचा वेध घेणारे जागृती हे पान आमच्या वाचकांना सावध करते, तर शनिवारचे कर्मज्ञान हे पान वाचकांना मानसिक समाधान देते. त्यामुळे सर्व विषयांना स्पर्श करणारे एक परिपूर्ण दैनिक म्हणून मुंबई चौफेरची सर्वत्र ओळख झालेली आहे. राजकारण, समाजकारण, साहित्य, नाटक, चित्रपट, महिलांविषयी विशेष मार्गदर्शनपर माहिती आणि सर्व क्षेत्रातील बित्तंबातमी देताना तीन दशकांची परंपरा असलेली शब्दकोडीही आम्ही वाचकांना या अंकातून देतो. याला वाचकांचा मिळत असलेला प्रतिसाद भविष्यातही असाच वाढणाºया वेलूप्रमाणे असावा ही अपेक्षा आहे.
- प्रफुल्ल फडके/वर्धापन दिन विशेष
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा