शुक्रवार, २४ एप्रिल, २०२६

आशादायी सूराचा अस्त

रविवारची सकाळ उजाडली ती एक बातमी घेऊन. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ब्रीच कँडी इस्पितळात दाखल केल्याची ती बातमी होती. त्यामुळे सगळे लक्ष बातम्यांकडे लागले होते. आणि थोड्याच वेळात ती नको असलेली बातमी आली आशा भोसले यांचे निधन. आशा भोसले या केवळ गायिका नव्हत्या तर तो एक सळसळणारा उत्साह होता. फार मोठे चैतन्य होते. त्यामुळे आशा भोसले यांच्या जाण्याने केवळ सूर हरपला नाही तर संगीत क्षेत्रातील चैतन्य गेल्याची जाणीव झाली.


आशा भोसले या उत्साहाचा झरा होत्या. त्याचप्रमाणे त्या संघर्षमय जीवनाचे प्रतीक होत्या. कितीही खडतर परिस्थिती आली तरी त्यावर मात करून संघर्ष करायला शिकवणारी प्रेरणा म्हणजे आशा भोसले होत्या.

संगीताच्या सगळ्या प्रकारातील गाणी त्यांनी गायलीच, पण संगीताला एका विशेष उंचीवर त्यांनी नेऊन ठेवले आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. संगीत आणि बॉलीवूड या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड होती. त्यात मोठी बहीण गानकोकिळा लता मंगेशकर यांचीच स्पर्धा. त्यांचे आव्हान समोर असताना यशस्वी गायिका होणे हे सोपे नव्हते. पण अशाही परिस्थितीत आपली वेगळी वाट निर्माण केली होती. हे प्रत्येक संघर्ष करणाº­या व्यक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्व तयार झाले होते.


प्रत्येकाचा प्रश्न असतो, तक्रार असते की आम्हाला संधी मिळत नाही. पण संधी मिळत नसते तर आपली जागा निर्माण करायची असते, हे आशा भोसले यांच्याकडून शिकता येते. आशा भोसले हे एक तत्त्वज्ञान बनले होते. सतत हसतमुख चेहरा आणि कोणत्याही परिस्थितीला हसत सामोरे जायचे ही त्यांची जीवनशैली प्रत्येकाला जमली तर प्रत्येकाचे आयुष्य सुंदर होईल हे दाखवणारे ते व्यक्तिमत्त्व होते. आशा भोसले या महान गायिका होत्या असे म्हणणे फार तोकडे पडेल. कारण त्याही पलीकडे त्या काही होत्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ गायिकेइतके मर्यादित नव्हते. कसे जगावे, कसे असावे हे दाखवून देणारे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे हा आशादायी प्रवास आजवरच्या ज्या लोकांना पाहायला मिळाला ते भाग्यवंत आहेत असे म्हणावे लागेल. उद्यापासून आशा भोसले आपल्यात शरीराने नसतील पण त्यांचा संगीताचा ठेवा, त्यांचा न हरवणारा सूर, अनमोल वारसा चिरंतन राहील. पुढच्या अनेक पिढ्यांना तो मार्गदर्शक ठरेल.

संगीत क्षेत्रात आजकाल झटपट प्रसिद्धी आणि करमणुकीच्या विविध वाहिन्यांवर कमी श्रमात नाव मिळवण्याची संधी शोधली जाते. पण असे गायक येतात जातात, त्यांचे विस्मरण होऊन जाते. पण संघर्षाने, परिश्रमाने मोठे केलेले नाव म्हणजे आशा भोसले. ते कधीही न संपणारे असेल. आज कोणत्याही गायिकेचे स्वप्न असते ते मी लता होईन किंवा आशा होईन. पण आशा भोसले यांनी गायलेली गाणी गात नवी पिढी मोठी झाली. त्यांच्या गाण्यांचा सराव करत अनेक स्पर्धक कलाकार गायक बनले. पण फक्त त्यांची गाणी हुबेहूब म्हणून उपयोग नाही. तर आशा भोसले यांच्यासारखा संघर्ष, मेहनत करता आली पाहिजे. अभ्यास असला पाहिजे. अभ्यासाशिवाय आशा भोसले कधीही व्यक्त होत नव्हत्या. अत्यंत दिलखुलास असे ते व्यक्तिमत्त्व होते.


पार्श्वगायन करताना आशा भोसले यांची गाणी कधीच एकसुरी वाटली नाहीत. याचे कारण आपल्याला कोणासाठी आवाज द्यायचा आहे याचा विचार करत त्याप्रमाणे त्या आवाजात बदल करत, तशी शैली आत्मसात करत आशा भोसले गात होत्या. त्यामुळे पडद्यावर कोणती गायिका गाते आहे त्याचा अभ्यास करण्याचे, त्याची बोलण्याची शैली कशी आहे हे पाहण्याचे काम त्या करत असत. त्यामुळे आशा भोसले यांनी गायलेले गाणे पडद्यावरच्या नायिकेच्या तोंडात चपखल बसायचे.

भावगीत, सुगम संगीत, नाट्यगीत, रागदारी, रॉक, पॉप या सर्व गायन प्रकारात आशा भोसले या लीलया वावरल्या. एखादा परिस असतो तो दगडाला सोन्यात रूपांतरित करतो. त्याप्रमाणे आशा भोसले यांच्या आवाज आणि गायनशैलीने सर्व संगीत प्रकारांना त्यांनी स्पर्श करून ते प्रकार मोठे केले. तब्बल वीस भाषांमध्ये त्यांनी गायनाचे कर्तृत्व गाजवले होते. उत्तम गवय्या आणि सर्वोत्तम खवय्या या दोन्ही गोष्टीचा सूरसंगम त्यांनी साधला होता. उत्तम पाककौशल्याचा वापर करून आखातात अनेक हॉटेल्स उभी करून त्यात भारतीय, महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती साता समुद्रापलीकडे पोहोचवण्याचे काम त्यांनी केले होते. त्यामुळे आशा भोसले या समृद्ध आणि अष्टपैलू असे व्यक्तिमत्त्व होते. जगण्याची कला, आशा पल्लवीत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आशा भोसले. जग हे खूप सुंदर आहे ते आपण सजवायचे असते असा आशादायी विचार त्यांनी रुजवला होता. आशा भोसले हे एक भारतीय संगीत क्षेत्रातील केवळ एक पर्व नाही तर तो एक फार मोठा ठेवा आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील मंगेशकर कुटुंबीय हा फार मोठा अध्याय आहे. या अध्यायातील आशा भोसले नावाची ही एक ओवी अजरामर आणि फार मोठी शिकवणूक देणारी ही ओवी ठरली. ही ओवी म्हणजे आशादायी प्रवास आहे. एका गृहिणीची सर्व कर्तव्ये पार पाडत, घराकडे लक्ष देऊन त्यांनी एवढी मोठी कामगिरी केली हे अनमोल आहे. प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे अभिनेत्यासाठी गायिक अभिनय आपण करतो याचे भान त्यांनी ठेवले होते. त्यामुळे अभिनयाची असलेली गोडी त्यांनी वयाच्या ६५ वर्षांनंतर पूर्ण केली. माई या चित्रपटात त्यांनी सुंदर अभिनय केला होता. त्यामुळे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक कंगोरा पुढे आला. अशा या आशादायी सूराचा अस्त झाला आहे. ही आपली फार मोठी हानी आहे. त्या चिरंतन आवाजाला, सळसळत्या उत्साहाला, कर्तृत्वाला भावपूर्ण आदरांजली.

12/04/2026

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: