पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी अथक परिश्रम घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केवळ जोरदार प्रचारच केला नाही तर धार्मिक कार्यातही कोणतीही कसर सोडली नाही. पश्चिम बंगालमधील दुसºया टप्प्यातील मतदानाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये बाबा श्री काशी विश्वनाथांची पूजा केली. मतदानाच्या एक दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये भगवान श्री सोमनाथांची पूजा केली. याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगेला मिळणाºया हुगळी नदीत नौकाविहार केला आणि पूजा केली, तर अमित शाह यांनी हुगळी नदी आणि बंगालच्या उपसागराच्या पवित्र संगमावर असलेल्या गंगासागरला भेट देऊन पूजा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतुआ समाजाचे मुख्य मंदिर असलेल्या ठाकूरबारी आणि राजधानी कोलकाता येथील ऐतिहासिक थंथानिया काली मंदिरातही प्रार्थना केली. अमित शाह यांनी कपिल मुनी आश्रमात महर्षी कपिल यांची पूजा करून देशवासीयांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
बंगालमधील मतदानाच्या दिवशी पंतप्रधानांनी श्री काशी विश्वनाथ मंदिराला दिलेली भेट अधिक महत्त्वाची आहे, कारण काशी (वाराणसी) हे बंगाली लोकांचे दुसरे घर मानले जाते किंवा सांस्कृतिकदृष्ट्या बंगालच्या खूप जवळचे आहे. शतकानुशतके बंगाली यात्रेकरू, विद्वान आणि संत काशीला भेट देत आले आहेत आणि अनेक बंगाली जमीनदार व राजांनी काशीमध्ये घाट आणि मंदिरे बांधली आहेत. शिवाय, वाराणसीतील दशाश्वमेध घाटाजवळील ‘बंगाली टोला’ परिसरात बंगाली समुदाय राहतो, जिथे बंगाली संस्कृती, भाषा आणि खाद्यसंस्कृतीचा खोलवर प्रभाव आहे. दरम्यान, गुजरातच्या श्री सोमनाथ येथील चंद्रभागा शक्तिपीठ त्रिवेणी संगमाजवळ (कपिला, हिरण आणि सरस्वती) वसलेले आहे, जे बंगाली भक्तांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
पंतप्रधान मोदींच्या हुगळी नदीतील नौकाविहारालाही विशेष महत्त्व आहे. हुगळी नदीला ‘आदि गंगा’ म्हणून पूजनीय मानले जाते. उत्तर भारतासाठी गंगा नदीचे जे महत्त्व आहे, तेच महत्त्व बंगालच्या लोकांसाठी हुगळी नदीचे आहे. जेव्हा नरेंद्र मोदींनी २०१४ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीची निवड केली, तेव्हा ते सर्वप्रथम म्हणाले की, माता गंगेने मला बोलावले आहे. त्याचप्रमाणे स्वत:ला ‘गंगेचा पुत्र’ म्हणवणाºया पंतप्रधान मोदींनी बंगाल निवडणुकीदरम्यान हुगळी नदीला ‘माता गंगा’ म्हणून संबोधले आणि तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यामुळे त्यांची प्रतिमा बंगालच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धांशी जोडली गेली. हुगळी नदीच्या काठावर वेळ घालवून आणि बेलूर मठासारख्या आध्यात्मिक केंद्रांना भेट देऊन, पंतप्रधानांनी हे देखील दाखवून देण्याचा प्रयत्न केला की, त्यांचा पक्ष बंगालच्या मुळांचा आणि वारशाचा आदर करतो.
अमित शाह यांची गंगासागर भेटही खूप प्रभावी होती. शतकानुशतके असे म्हटले जाते की, सर्व तीर्थक्षेत्रांना वारंवार भेट दिली जाते, परंतु गंगासागरला फक्त एकदाच. या भेटीद्वारे अमित शाह यांनी भाजपला बंगालच्या मुळांशी जोडले. ऐतिहासिक कपिल मुनी आश्रमात प्रार्थना करून त्यांनी बंगाली धार्मिक भावनांचा सन्मान केला. त्यांनी गंगा नदीचे वर्णन गंगोत्री ते गंगासागरपर्यंत भारताला जोडणारा एक आध्यात्मिक दुवा असे केले आणि त्याद्वारे बंगालची संस्कृती उर्वरित भारताशी खोलवर जोडलेली आहे, हा संदेश दिला. इतकेच नाही, तर अमित शाह यांनी धर्म आणि राष्ट्रवाद यांचा मेळ घालून गंगासागर येथील शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली, जो भाजपच्या निवडणूक रणनीतीचा एक प्रमुख आधारस्तंभ राहिला आहे.
याव्यतिरिक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याची राजधानी कोलकाता येथील ऐतिहासिक थंथानिया काली मंदिरात प्रार्थना करून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. उत्तर कोलकातामधील मुख्य उत्तर-दक्षिण रस्ता असलेल्या बिधान सरणीवर स्थित, थंथानिया काली मंदिराची स्थापना १७०३ मध्ये उदय नारायण ब्रह्मचारी यांनी एकेकाळच्या स्मशानभूमी असलेल्या जमिनीवर केली होती. या मंदिरात देवी सिद्धेश्वरीची पूजा केली जाते. येथे मांसाहारी नैवेद्य अर्पण करण्याची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. या मंदिरात प्रार्थना करून पंतप्रधानांनी हा संदेश दिला की, भाजप बंगालच्या विविध खाद्य आणि धार्मिक परंपरांचा स्वीकार करतो आणि त्यांचा आदर करतो, तसेच विरोधकांकडून होणाºया शाकाहार लादण्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिवाय, हे मंदिर रामकृष्ण परमहंसांशी संबंधित आहे, जे भजन गाण्यासाठी वारंवार या मंदिराला भेट देत असत. या भेटीद्वारे भाजपने स्वत:ला बंगालच्या पुनर्जागरणाशी आणि तेथील आध्यात्मिक नेत्यांच्या वारशाशी जोडले.
दरम्यान, उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथील मतुआ महासंघाचे मुख्य मंदिर असलेल्या ठाकूरबारीला भेट देऊन पंतप्रधान मोदींनी बंगालच्या दलित (नामाशूद्र) समाजाबद्दल आपला आदर व्यक्त केला. २०२१ मध्ये पंतप्रधान मोदींनी बांगलादेशातील मतुआ समाजाचे जन्मस्थान असलेल्या ओराकांडीलाही भेट दिली होती. ठाकूरबारीला दिलेली ही भेट त्याच परंपरेचे प्रतीक आहे. मतुआ मतदार किमान ३४ विधानसभा जागांवर आणि बांगलादेश सीमेजवळील इतर दोन डझन जागांवर थेट प्रभाव टाकतात. हे विशेष उल्लेखनीय आहे की, १९ व्या शतकात हरिचंद ठाकूर यांनी स्थापन केलेला मतुआ महासंघ ही एक सामाजिक-धार्मिक चळवळ आहे, जिने ऐतिहासिकदृष्ट्या शिक्षण आणि सामाजिक सुधारणेवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘नॅशनल मिशन आॅन हिंदुइझम’च्या माध्यमातून नामाशूद्र समाजाच्या उन्नतीसाठी कार्य केले आहे.
मात्र, पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे धार्मिक दौरे केवळ वैयक्तिक श्रद्धेपुरते मर्यादित नव्हते, तर ते एका व्यापक राजकीय रणनीतीचा भाग होते. या दौºयांच्या माध्यमातून भाजपने स्वत:ला एक बाहेरील शक्ती म्हणून न दाखवता, एक संवेदनशील आणि जोडलेली शक्ती म्हणून सादर करत बंगालच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक मुळांशी जोडण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा, संस्कृती आणि राजकारण यांच्या या संगमातून हे स्पष्ट झाले की, आधुनिक भारतीय निवडणुकांमध्ये विकास आणि धोरणात्मक मुद्द्यांइतकेच प्रतीकात्मकता आणि भावनिक संबंधही महत्त्वाचे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा