सोमवार, २७ एप्रिल, २०२६

मराठी माणसांनो मराठी बोला


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राज्य सरकारने राज्यात रिक्षा, टॅक्सी चालकांनी मराठी बोलावे म्हणून ठोस भूमिका घेतली आहे. त्यासाठी मंत्री सरनाईक हे अभिनंदनास पात्र ठरतात. यावरून बाकीच्या पक्षांनी राजकारण करण्यास सुरुवात केलेली असली तरी ही एक काळाची गरज आहे. पण यात विसंगती एक आहे ती अशी की, रिक्षा, टॅक्सी चालकांकडून आपण मराठी बोलण्याची अपेक्षा करतो त्याप्रमाणे सर्वात प्रथम मराठी माणसांनीच मराठी बोलायला सुरुवात केली पाहिजे हे ठळकपणे लक्षात घेतले पाहिजे.


आपण घरातून बाहेर पडल्यावर रिक्षा, टॅक्सी, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, दुकानात, हॉटेल रेस्टॉरंट कुठेही गेलो तरी हिंदीतून बोलतो. त्याहीपेक्षा गमतीची बाब म्हणजे दोन मराठी माणसे एकमेकात हिंदीत बोलतात. मग रिक्षा चालकांकडून का अपेक्षा करावी? आपणच रिक्षात बसल्यावर ‘स्टेशन चलो’ असे बोललो, ‘कितना हुआ’ असे विचारले तर तो का मराठी बोलेल? याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. मराठी भाषा रिक्षा-टॅक्सी चालकांना सक्तीची करून उपयोग नाही, तर मुंबई आणि महाराष्ट्राला तशी सवय लावावी लागेल. तुम्ही मराठीत बोलला तर ते मराठीतच बोलतील. नाही समजले तर समजून घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही फक्त आपल्या भाषेवर ठाम राहायला पाहिजे.

कायदा आणि नियम करून काही बदल होत नाही, तर बदल हा आपल्या वागण्यातून होत असतो. आपण अगोदर मराठी बोलायला-वागायला शिकले पाहिजे. आमच्यात किती मराठीपण शिल्लक राहिले आहे हे आपण आंतर्मुख होऊन पाहायला पाहिजे. आपण पंजाबात गेलो तर तिथे त्यांची पगडी आहे. ईशान्येकडे गेलो तर तेथील लोकांची टोपी, वेशभूषा आहे. दक्षिणेत लुंगी आहे. तसा मराठी माणसाचा पोशाख नेमका कोणता? आमचे कपडेच अन्य भाषांनी काढून घेतले आहेत तिथे भाषेचे काय घेऊन बसलात? राजकारण करणे सोपे आहे, त्यावरून आंदोलन करणे सोपे आहे, पण मराठीपण टिकवण्यासाठी मराठी बनणे जरूर आहे. दक्षिणेत हॉटेलमध्ये गेल्यावर तिथले लोक इडली आणि दाक्षिणात्य चटणी, सांबार हेच खातात. महाराष्ट्रातही आपण इडलीच खातो. का नाही आपण हॉटेलमध्ये पोहे, उप्पीट, मिसळ, थालीपीठ याचा आग्रह धरत? अन्नरस पोटात जसा जाणार तसेच आपण वागणार. भय्ये इथे येतात आणि राईच्या उग्र तेलाचा स्वयंपाक करतात. इथे त्यांचे पदार्थ उपलब्ध करतात आणि त्यांचे जेवण करतात. पण आमचा ना पोषाख आम्हाला माहिती, ना आमचा आहार आम्ही करत. मग तोंडात भाषा मराठी कशी येणार? तेव्हा आपल्याला आधी मराठी बनावे लागेल, वागावे लागेल, बोलावे लागेल. हे कायदा करून नाही तर सवय लावून होईल हे लक्षात घेतले पाहिजे.


मंडईत गेल्यावर का ‘आम्ही ये कैसा दिया? थोडा कम करो ना? इतना मेहंगा क्यू?’ असले प्रश्न का करतो? ए.. किती महाग आहे. कमी कर. काय दर आहे? कशी दिली भाजी? असे विचारा ना. काय फरक पडतो? आपली भाषा त्यांच्या कानावर पडली तरच ते मराठी बोलतील. तोडके मोडके बोलतील पण बोलतील. बोलायला भाग पाडले पाहिजे. आपण मराठी बोललो तर ते मराठी बोलतील. म्हणून सांगावेसे वाटते मराठी माणसा मराठी बोल!

राज्य सरकार आणि परिवहन मंत्र्यांनी हा नियम फक्त रिक्षा-टॅक्सी चालकांबाबत केला आहे. तो सर्वांबाबत केला पाहिजे. बहुसंख्य दवाखाने आणि हॉस्पिटलमध्ये अमराठी डॉक्टर, नर्स आहेत. त्यांच्याशी बोलताना अनेकांची पंचाईत होते. आपला नेमका शारीरिक आजार काय आहे हे सांगणे अवघड जाते. शासकीय रुग्णालयात अनेक डॉक्टर शिकाऊ आणि परप्रांतातून आलेले ेअसतात. त्यांना आपला आजार सांगणे अवघड जाते. त्यामुळे नको त्या चाचण्या आणि चुकीची ट्रीटमेंट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक सरकारी रुग्णालयातून डॉक्टर आणि स्टाफने मराठीच बोलले पाहिजे. प्रत्येक खासगी आणि सार्वजनिक दवाखाने, डॉक्टर, डिस्पेन्सरी इथे मराठी बोलणारे असले तरच उपचार घेतले पाहिजेत. रोग बरा होण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. रिक्षा-टॅक्सी चालकाला ज्याप्रमाणे कुठे जायचे हे समजणे आवश्यक आहे, तसेच डॉक्टरलाही त्या रुग्णाला काय झाले आहे हे त्याच्याकडून समजून घेता आले पाहिजे. म्हणून मराठी माणसाने सगळीकडेच मराठी बोलले पाहिजे. आज आमचा दुधवाला भैय्या आहे नाहीतर गुजराथी आहे. सलूनवाला यूपी, बिहारचा आहे. सुतारकाम करणारा राजस्थानी जांगिड आहे. फ्लोरिंगचे काम करणारा उत्तर प्रदेशातील आहे. टायर, गॅरेज, पंक्चरचे काम करणारे केरळी आहेत, मद्रासी आहेत. इतकेच काय रत्नागिरी हापूस आंबा विकणारेही परप्रांतीय आहेत. या सगळ्यांशी आपण मराठीत बोलत नाही तर हिंदीत बोलतो. त्यांच्याकडून जादा पैसे देऊन सेवा घेतो. एकीकडे आमचा मराठी नाभिक, सुतार, चर्मकार हे सगळे आपल्या पारंपारिक व्यवसायाची लाज बाळगून नोकरीच्या शोधात जातात आणि आपले उद्योगधंदे बंद करतात. दुसरीकडे या परप्रांतीयांच्या हातात आपले व्यवसाय आपण सोपवतो. आमचे पोषाखापासून संपूर्ण जीवनशैलीच जर अमराठी झाली असेल तर ओठात मराठी येणार कशी? ओठावर मराठी येण्यासाठी पोटात मराठी पचवली पाहिजे. त्यासाठी मराठी जगले पाहिजे. मराठी बोलले पाहिजे. म्हणून सांगावेसे वाटते, मराठी माणसा आधी तू मराठी बोल. राजकारण्यांना राजकारण करू देत, पण आपल्या अस्तित्वासाठी आणि मराठीप्रेमासाठी तरी आपण मराठी बोलले पाहिजे.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: