सोमवार, २७ एप्रिल, २०२६

क्षुद्र राजकारणाचा समाचार


माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या अप्रकाशित पुस्तकासंदर्भातील वादावर जे भाष्य केले आहे, त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अनावश्यकपणे जो प्रचार करत होते, त्याला केवळ पूर्णविरामच मिळाला नाही, तर चिनी सैन्य भारतीय भूभागावर अतिक्रमण करण्यात अयशस्वी ठरले आहे, हेदेखील स्पष्ट झाले. पण यामुळे राहुल गांधींच्या बेताल वक्तव्यांना आळा बसेल अशी अपेक्षा आहे. तो नाही बसला आणि ते असेच बरळत राहिले तर आपल्या पायावर ते धोंडा पाडून घेतील यात तीळमात्र शंका नाही. कारण लष्कर, जवान आणि शेतकरी यांची अप्रतिष्ठा या देशात कधीही सहन केली जाणार नाही.


भारताने चीनकडे एक इंचही जमीन गमावलेली नाही, असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते आणि अलीकडेच या मुद्द्याचा पुनरुच्चार केला होता, तरीही राहुल गांधी ते मानायला तयार नव्हते. चीनने आपली जमीन बळकावली आहे आणि पंतप्रधान काहीही करू शकत नाहीत, असा खोटा वृत्तांत त्यांनी वारंवार पसरवला. नंतर, त्यांनी जनरल नरवणे यांच्या कथनाचा विपर्यास करण्यास सुरुवात केली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. एका मासिकात प्रकाशित झालेल्या जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील एका उताºयाचा अर्थ लावण्याच्या नावाखाली, त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले आणि असा आरोप करण्याचा प्रयत्न केला की, जेव्हा तत्कालीन लष्करप्रमुखांनी चिनी सैन्याच्या आक्रमकतेबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन मागितले, तेव्हा त्यांनी त्यांना वाºयावर सोडून दिले.


लष्करप्रमुखांना जे योग्य वाटेल ते करावे, या पंतप्रधानांच्या स्पष्ट सूचनांचा राहुल यांनी खोडसाळपणे अर्थ लावला. ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी संसद परिसरात जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाची एक कथित प्रतही फडकवली. जेव्हा राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतात, तेव्हा त्यात अपरिहार्यपणे प्रचाराचा काही अंश असतोच. मात्र, संकुचित राजकीय स्वार्थासाठी, सीमा संकटाच्या काळात लष्कर आणि सरकार यांच्यात ताळमेळ नव्हता असा खोटा दावा करणे, ही बेजबाबदारपणाची परिसीमा आहे. सीमा सुरक्षा आणि लष्कराभोवती अनावश्यक वाद निर्माण करणे हा केवळ राष्ट्रीय हिताचा अनादरच नाही, तर क्षुद्र राजकारणही आहे.

म्हणूनच हे चांगले आहे की, जनरल नरवणे यांनी, राहुल गांधींनी त्यांच्या अप्रकाशित पुस्तकाची कथित प्रत दाखवणे आणि त्यांना व लष्कराला वादात ओढणे, हे अनुचित वर्तन असल्याचे उघडपणे म्हटले. त्यांनी राहुल गांधींना आरसा दाखवत म्हटले, ‘जर तुम्हाला पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री आणि लष्करप्रमुख यांच्या शब्दांवर विश्वास नसेल, तर चीनला विचारा.’ माजी लष्करप्रमुखांच्या या स्पष्ट शब्दांमुळे राहुल गांधींना आपली चूक लक्षात येईल किंवा त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम होईल, याबद्दल शंका आहे, कारण त्यांना कोणत्याही बाबतीत आपल्या बनावट समजुती खºया ठरवण्याची सवयच झाली आहे. किंबहुना, याच कारणामुळे ते अनावश्यक वादांमध्ये अडकत राहतात. पण राहुल गांधी आणि त्यांच्या पोरकट अनुयायांना ही एक चांगली चपराक आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी अत्यंत सौम्य भाषेत राहुल गांधींना ही समज दिलेली आहे.


अर्थात राहुल गांधींना कायमच आपल्या मिलीटरी आणि संरक्षण दलावर संशय घेण्याची सवय आहे. गतवर्षी आॅपरेशन सिंदूरवरही त्यांनी खोटे आरोप केले होते. भारतीय सैन्यदलाने अफलातून कामगिरी करून पाकिस्तानचे दहशतवादी अड्डे हटवले होते. तरीही राहुल गांधींच्या तोंडून सातत्याने पाकिस्तानची भाषा येत होती. भारताची विमाने पाकिस्तानने पाडली, पाकिस्तानशी युद्ध ट्रम्पच्या सांगण्यावरून थांबवले. असले फालतू आरोप राहुल गांधी करत राहिले. भारताने काय करावे हे सांगणारे ट्रम्प कोण? पण त्यांनी हे युद्ध थांबवले म्हणून राहुल गांधी आॅपरेशन सिंदूरवर शंका घेत होते. भारतीय सैन्यदलाचा आजपर्यंत सर्वात जास्त अपमान राहुल गांधी यांनी सातत्याने केलेला आहे. आॅपरेशन सिंदूर असो नाही तर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक असो राहुल गांधींनी भारतीय लष्कराला कायम कमी लेखले आहे. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागितले. त्यामुळे ग्रामीण भागातून काँग्रेस हद्दपार झाली त्याला ते कारणीभूत आहेत. आपले सैन्यदल हे शत्रूला मारण्यासाठी नाही तर देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी लढत असते. आपल्या देशवासीयांवर त्यांचे प्रेम आहे म्हणून ते सीमेवर लढत असतात. शत्रूशी त्यांचे वैर नसते तर भारतावर आणि भारतीयांवर त्यांचे प्रेम आहे म्हणून ते सीमेवर आहेत. अशा या सैनिकांचा अपमान सातत्याने राहुल गांधी करतात आणि नवनवे वाद निर्माण करतात. त्यामुळेच माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी याबाबत केलेला खुलासा आणि दिलेले उत्तर ही एक फार मोठी चपराक आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या अनुयायांना चोख उत्तर आहे. यावरून तरी आता काँग्रेस आणि राहुल गांधींनी काही बोध घेतला पाहिजे. भारतीय सैन्यदल, शेतकरी आणि देशहिताच्या कामात कधीही राजकारण करायचे नसते ही समज त्यांना दिली पाहिजे. देशाचे हित प्रथम मग सत्तेसाठी काहीही करा. देशहिताच्या आड येणारा कोणीही या देशाचे नेतृत्व करू शकत नाही. जोपर्यंत देशप्रेमाची भाषा, सैन्यदलाचा सन्मान करण्याची वृत्ती ते जोपासत नाहीत तोपर्यंत त्यांना यश मिळणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: