शनिवार, ९ जानेवारी, २०१६

काय हा गाढवपणा?

सध्या जो तो गाढवांना वेठीस धरतो आहे. त्या बिचार्‍या गाढवांची काय अवस्था होत असेल ते गाढवच जाणे. सातार्‍यातील मोती तळ्याजवळ पोहोण्याचा तलाव आहे, तिथे गाढवाचे चित्र लावून लिहीले आहे की, इथे कचरा टाकणारा गाढव आहे. तोच प्रकार आर्यांग्ल हॉस्पिटलच्या समोर क्रांतीस्मृतीकडे जातानाच्या चौकात पहायला मिळतो. तिथेही कचरा कोणी टाकला तर त्याला गाढव म्हणण्यात येईल असे लिहीले आहे. राजपथावर खण आळीकडे जाताना फुटपाथजवळही असाच बॅनर पहायला मिळतो की येथे कचरा टाकणारा गाढव आहे. असे सध्या सातार्‍यात गाढवाचे बॅनर लावण्याचे सत्र अनेकांनी अवलंबले आहे. पण आजवर कोणत्या गाढवाने असा कचरा केलेला पाहिला आहे का कोणी? गाढव उकीरडे फुंकते, कचर्‍यात लोळते असे म्हणतात पण खरे तर अत्यंत प्रामाणिकपणे ते काम करताना दिसते. मला नाही वाटत की आजवर कोणतेही गाढव कुरकुरे खाउन त्याच्या पॅकेटची पिशवी कुठेही टाकत असेल. कोणत्याही गाढवाने कधी कुठल्याही तळ्यात, कुंडीबाहेर कचरा टाकल्याचे कोणी पाहिले आहे का? पण त्या गाढवाचा उगीचच सगळीजण अपमान करताना ठिकठिकाणी दिसते. आता खाउन विष्ठा टाकण्याचे प्रकार तर सर्रास रस्त्याने अनेक प्राणी करतात. पण गाढवाचाच कचरा का दिसावा हे न समजणारे असे आहे.    गाढव माल वाहून नेण्याचे काम करते. मुरुम, डबर, माती वाहून नेते. अनेक ओझी वाहण्याचे काम गाढव करताना दिसते. तशी गाढवं सातार्‍यात उगाच मोकाट सुटलेलीही फारशी दिसत नाहीत. ज्याप्रमाणे अनेक ठिकाणी गाई, म्हशी, कुत्री, डुकरं घाण करताना दिसतात तशी गाढवं फार कमी दिसतात. जाता येता गाढवं दिसतात ती काम करतानाच दिसतात. तरीही कचरा टाकणार्‍याला गाढव का म्हटले जाते आहे हे अनाकलनीय आहे.  दोन दिवसांपूर्वी पिंपरी पुण्यात ८९ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धींड काढली गेली.  का तर त्यांनी नरेंद्र मोदींबाबत अवमानकारक वक्तव्य केले. नरेंद्र मोदींचा अपमान केला म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रीपाल सबनीसांची गाढवावरून धींड काढली. मग या गाढवाचा अपमान झाला त्याचे काय? गाढवाचा अपमान करणार्‍या तमाम भाजपेयींची धींड श्रीपाल सबनीसांच्या पाठीवर बसवून काढणार काय? अपमान करणारे ते सबनीस. शिक्षा मात्र त्या गाढवाला. गाढवावरून धींड काढताना काय काय अत्याचार त्या गाढवावर केले जातात हे गाढवावरून धींड काढणारे शहाणे लोक आणि ते गाढवच जाणो. कुणी त्या बिचार्‍या गाढवाच्या शेपटीला डबा बांधतात. फटाक्याची माळ लावतात. वेगवेगळे रंग लावतात. म्हणजे थोडक्यात गाढवाच्या अंगावर कचरा करण्याचे काम ही माणसं करतात. तरीही गाढवाला नावे ठेवली जातात.     त्या गांधी घराण्याच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार मनेका गांधी यांना विविध प्राण्यांची दया येते. उपद्रवी अशा भटक्या कुत्र्यांकरीता मनेका गांधी गळा काढतात. लूद भरलेली, पिसाळलेली, रोग लागलेली कुत्रीसुद्धा वाचवण्यासाठी त्या धडपडतात. पण त्यांना आमच्या गाढवाची दया का येत नाही? मला वाटते देशभरातील तमाम गाढवांच्या मालकांनी आता मोर्चा काढला पाहिजे. म्हणजे हा गाढवांचा दुरूपयोग करणे हा गाढवपणा आहे की त्याला माणुसकी म्हणायची? ज्याने त्याने उठावे आणि निषेधासाठी त्या गाढवांचा वापर करायचा. याला काही अर्थ आहे काय? खरं तर आज राजकारणात आणि सत्ताकारणात माणसांपेक्षा गाढवांचीच जास्त गरज आहे. मागे एक़दा बॅ.विठ्ठलराव गाडगीळ यांच्या एका भाषणातील किस्सा सांगितला होता. तो आता वेगळ्या अर्थाने समजू लागला आहे. एक राजा होता. तो शिकारीला निघाला होता. तेव्हा वाटेत एक शेतकरी भेटतो आणि सांगतो, महाराज आपण शिकारीला जावू नका. कारण आज पाउस पडणार आहे. राजा म्हणतो, शक्यच नाही. आमच्या हवामान खात्याला विचारून तर मी शिकारीला चाललो आहे. आज पाउस पडणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे त्यांनी. असे म्हणून राजा शिकारीला जातो. पण थोड्याच वेळात ढग जमा होतात आणि जोरदार पाउस पडतो. त्याला आश्‍चर्य वाटते. दुसर्‍यादिवशी राजा आपल्या प्रधानांना सांगतो की त्या शेतकर्‍याला बोलवा. शेतकर्‍याला बोलावून राजा म्हणतो की, तुझा अंदाज बरोबर होता. तू हुशार आहेस. आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाला, हवामानखात्याला जे जमले नाही ते तूला जमले. तू आजपासून या राज्याचा मुख्यमंत्री आहेस. तेव्हा शेतकरी म्हणतो, महाराज यात माझं कौशल्य काहीच नाही. हे सगळं माझ्या गाढवाचं कौशल्य आहे. पाउस येणार असेल तर शेपटी हालवतं. राजा खूष झाला आणि म्हणतो, मग असं करू. तुझ्या गाढवालाच या राज्याचा मुख्यमंत्री करू. तेव्हापासून राज्यातील सगळ्या गाढवांना वाटू लागलं की आपणही या राज्याचे मुख्यमंत्री होवू शकतो. विठ्ठलरावांची गोष्ट इथंच संपली. पण आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणखी गाढवं नकोत म्हणून या गाढवांना बदनाम करण्याचे राजकारण कोणी सुरू केले नाही ना याचा आता शोध घेतला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: