- हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर मोठे राजकीय वादळ उठल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले. रोहितला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना अतिशय दुःखद आहे. एका मातेने तिचा सुपुत्र गमावला असून, ही बाब फार वेदना देणारी आहे, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यक्त केल्या. मोदी यांच्या भाषणाच्या सुरवातीलाच काही विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. हा जो प्रकार या देशात चालला आहे तो अत्यंत हिडीस असा आहे. कोणीही कोणाच्याही मरणाने खूष होत नसतो. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे याला काही अर्थ नसतो. पण विरोधकांनी असे दु:ख व्यक्त केले की ते मगरीचे आश्रू वाटतात. हे फारच विचित्र आहे.
- शिकून-सवरून मोठे होऊन सन्मानाने जगण्याची स्वप्ने पाहणार्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याला न्यायहक्कांसाठी जीवन संपवावे लागले. रोहितवर अन्याय झाला असेल, त्याची बाजू बरोबर असेल हे सगळे मान्य केले तरी न्यायासाठी त्याने आत्महत्येचा मार्ग स्विकारणे म्हणजे या व्यवस्थेपुढे गुडघे टेकण्याचा प्रकार आहे. रोहितचा बळी गेल्यावर केंद्र सरकार आणि हैदराबाद विद्यापीठाला जाग आली आहे. विद्यापीठाने ४ दलित विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेत चूक सुधारली खरी, पण ‘बैल गेला अन् झोपा केला’ या प्रकारचा हा निर्णय ठरत नाही का? आत्महत्येशिवाय रोहितपुढे दुसरा कोणताच उपाय नव्हता? या सगळ्या प्रश्नांची चर्चा कोणीच कुठे केली नाही. फक्त त्याच्या जातीच्या, पक्षाच्या लोकांनी दु:खाने अश्रू ढाळले तर विरोधकांनी सांत्वनासाठी अश्रू ढाळले. पण यातून रोहित प्रकरण पुन्हा होणार नाही हे कसे सांगता येईल? आपल्याकडे कोणत्याही प्रकारची साथ लवकर येते. शेतकर्यांच्या आत्महत्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या प्रमाणे रोहितचे अनुकरण करणारे कोणी पुन्हा तयार होणार नाहीत याची खात्री कोणी देईल काय?
- रोहितच्या आत्महत्येबद्दल विद्यापीठ व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाविरोधात जनक्षोभ उसळला आहे. सगळीकडे निदर्शने सुरू आहेत. निषेध होत आहे. तरीही या घटनेला जबाबदार मंत्री व विद्यापीठातील सूत्रधारांना सरकार पाठीशी घालत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी याआधीसुद्धा वेगळ्या कारणाने वादग्रस्त ठरल्या होत्या. आतासुद्धा त्या तोफेच्या तोंडी सापडल्या आहेत. केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्याविरुद्ध तर गुन्हा दाखल झाला. तरीही ते खूर्चीला चिकटून बसले आहेत. चार दिवसांपूर्वी अर्धा डझन केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन इराणी व बंडारू यांची बाजू लावून धरली होती.
- विद्यार्थी आणि महाविद्यालय, विद्यार्थी प्राध्यापक, विद्यार्थी विद्यापीठ असे प्रश्न, संघर्ष अनेकवेळा झालेले आहेत. ते नेहमीच घडत राहणार. पण त्यावरचा तोडगा म्हणजे कोणीतरी आत्महत्या करणे हा कधीच असू शकत नाही. विद्यार्थी निलंबनप्रश्न सामोपचाराने मिटवला गेला असता तर रोहितचे प्राण वाचले असते. पण स्वत:ला संपवून टाकणे हा प्रकार वाढत चालला आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करा असे सांगितले त्यांचे आम्ही काय ऐकले? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जेवढा त्रास, अपमान सहन करावा लागला होता त्याच्या एक दशांशही अन्याय या आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याला सहन करावा लागला नसेल. आपल्याला बाबासाहेबांचा विचार पुढे न्यायचा असेल तर या प्रस्थापितांपुढे आत्महत्या करून शरण जाणे चुकीचे आहे. त्यामुळे कोणीही अन्यायाविरोधात संघर्ष करताना डगमगता कामा नये. परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली पाहिजे.
- यापूर्वी दादरी प्रकरणातसुद्धा सरकारच्या बेजबाबदारपणाचेच दर्शन घडले. साहित्यिक-विचारवंतांनी आवाज उठवला तेव्हा ‘नौटंकी’ म्हणून खिल्ली उडवली गेली. बेताल वक्तव्ये करणार्या स्वपक्षीय वाचाळवीरांना सरकार रोखू शकले नाही. ‘देश सहिष्णु होता, आहे व पुढेही राहील’ असे म्हणणे सोपे असले तरी असहिष्णुतेच्या घटना वाढत आहेत हे वास्तव कसे नाकारणार? जागे करणार्यांवरच राजकारणाचे आरोप होत आहेत. ‘भारतात राहणारे सर्व हिंदू! त्यात भेदाभेद नाही’ असे सरसंघचालक वारंवार बजावतात. पंतप्रधानपदावर एक ओबीसी व्यक्ती निवडली जाते हा त्याचा मोठा पुरावा सांगितला जातो, पण त्या एका बहादुरीच्या बदल्यात देशात सर्वत्र कुणा ना कुणाला असहिष्णुतेचे चटके झेलावे लागत आहेत. समाजात दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. कोणाला गोमांस खाल्ले म्हणून जिवे मारले जात आहे तर कोणा रोहितला दलित म्हणून आत्महत्या करावीशी वाटली आहे. देशातील सलोखा टिकवण्यासाठी जागे व्हायला सरकारला आणखी किती दादरी, फरिदाबाद वा हैदराबाद घटनांची पुनरावृत्ती हवी आहे? ठेच लागल्यावर शहाणे व्हायचे असते. मागील चुकांचा बोध घेऊन त्यांची पुनरावृत्ती घडणार नाही याची काळजी घ्यायची असते. परंतु सरकारला व सरकारच्या बेजबाबदार समर्थकांना ते शहाणपण कधी सुचवणार आहे? जागे होण्याची हीच वेळ आहे. आता जागे झाले नाही तर पुढे वेळ निघून गेलेली असेल. संघर्ष करूनच सरकारला, व्यवस्थेला वठणीवर आणता येईल. आत्महत्येचा पायंडा पाडून काळ सोकावेल.
रविवार, ३१ जानेवारी, २०१६
आत्महत्येने काळ सोकावेल
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा