मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

पवारांचे संकेत

विदर्भातील जनता स्वतंत्र विदर्भाची भूमिका घेणार्‍यांना नाकारते असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साहित्य संमेलनाचे व्यासपिठावरून वक्तव्य केले आहे. साहित्य संमेलन हे नेहमीच संयुक्त महाराष्ट्राचे व्यासपीठ राहिले आहे. त्यामुळे शरद पवारांनी कदाचित असे मत व्यक्त केले असेल. पण नेमका हा मुद्दा आणेवारीने चर्चेत येत असताना शरद पवारांची ही प्रतिक्रीया आलेली आहे हे विशेष. महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी हाक दिली आहे. विधानसभेच्या नागपूर अधिवेशनाच्या दोन दिवस आधी अणे यांनी विदर्भ राज्यासाठी जनमत चाचणी घेतली पाहिजे, असे म्हटले होते. नागपूर अधिवेशनात त्यावरून बराच गोंधळही झाला. शिवसेनेने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. अणे यांचे ते व्यक्तिगत मत असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ मारून नेली होती. पण आता पुन्हा अणे यांनी नागपुरात ‘विदर्भ राज्य ही राजकीय गरज आहे,’ असे ते म्हणाले. वास्तविक ‘विदर्भ सोडून कुठल्याही विषयावर बोला’, असा सल्ला त्यांच्या पत्नीने त्यांना दिला होता. तो धुडकावून त्यांनी जणू विदर्भ राज्यासाठी एल्गारच पुकारला आहे. अणे यांनी केवळ भाषणच ठोकले नाही तर रणजीत देशमुख, दत्ता मेघे अशा विदर्भवाद्यांची बैठक घेऊन विदर्भाच्या मुद्यावर निवडणूक लढवा, असा सल्लाही दिला. पदाचे गांभीर्य पाळत नाही, पत्नीचे ऐकत नाही, याचा अर्थ अणे तयारीनीशी आखाडयात उतरले आहेत असे दिसते. ३५ वर्षापूर्वी विदर्भ राज्याची चळवळ जोरात होती. आज कुठेही ही चळवळ नाही. अजून किमान तीन वर्षे कुठल्याही मोठया निवडणुका नाहीत. कॉंग्रेस म्हणा किंवा भाजपा म्हणा, कुणीही विदर्भ राज्याची भाषा करीत नाही. अशा वेळी अणे विदर्भ राज्याचा अजेंडा चालवत आहेत. त्यांचा बोलविता धनी कोण हे महत्वाचे आहे? अणेेंबरोबर सध्या बसलेले दत्ता मेघे एकेकाळी शरद पवार यांचे उजवे हात होते. अडगळीत गेल्यानंतर त्यांना विदर्भावरील अन्याय आठवला. रणजीत देशमुख यांचे या मुद्यावरून कॉंग्रेस श्रेष्ठींनी थेट प्रदेशाध्यक्ष करून टाकून त्यांची बोलती बंद केली. एन. के.पी. साळवे आणि बापूसाहेब साठे या ज्येष्ठ नेत्यांनी विदर्भासाठी उपोषणाचा डाव मांडला होता. ‘पंतप्रधान असताना राजीव गांधी विदर्भ राज्य द्यायला तयार झाले होते; पण मीच त्यांना थोडे थांबा म्हटले’, असा गौप्यस्फोट खुद्द बापू साठे यांनीच एकदा केला होता. जांबुवंतराव धोटे यांना ‘विदर्भाचा वाघ’ म्हटले जायचे. पण मधल्या काळात हा वाघ शेळी कधी झाला हे समजलेच नाही. रणजीत देशमुख, नितीन गडकरीपासून तो ‘विदर्भ यात्रा’ काढणार्‍या देवेंद्र फडणवीसापर्यंत सवार्र्ंनी हा मुद्दा नंतर सोडून दिला. याचे कारण काय? विदर्भ राज्याच्या आंदोलनाला विश्वासार्हतेच्या अभावाचा शाप आहे. हे आंदोलन कुण्याही नेत्याने कधी टोकाला नेले नाही. त्यामुळे अणे यांचे नेमके ध्येय काय आहे? त्यांना खरेच विदर्भ पाहिजे की आणखी काही? सध्या अणे हा भाजपा परिवाराच्या गळाला लागलेला मोठा मासा आहे. अणेंनी विदर्भ राज्य मागत राहून शिवसेनेला पळत ठेवायचे आणि भाजपाने आरामात राज्य करायचे, असा हा खेळ आहे. पुढच्या निवडणुकीत भाजपाला विदर्भ राज्याचा अजेंडा चालवायचा आहे. सत्तेत असल्याने भाजपा आज उघडपणे विदर्भाचे बोलू शकत नाही. त्यामुळे ते अणे यांच्याकडून विदर्भ राज्याचा अजेंडा वाजवून घेत आहेत. सत्तेतून गेल्यावर विदर्भाचा झेंडा खांद्यावर घ्यायला मोकळे. आज दुष्काळ, शेतक-यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न.. आ वासून आहेत पुढच्या निवडणुकीत लोकांपुढे जाताना काही विषय हवा म्हणून भाजपाने अणे यांना सोंगटे केले आहे. सरकारची आजची भूमिका अखंड महाराष्ट्राची असेल तर कोणता मुख्यमंत्री फुटीरतेची भाषा सहन करील? पण फडणवीस हे अणे यांना खपवून घेत आहेत. सत्तेतला आपला भागीदार शिवसेना वेगळ्या राज्याच्या विरोधात आहे, हे माहीत असतानाही फडणवीस गप्प आहेत. ‘आपण विदर्भवादी आहोत’ हेही फडणवीस लपवून ठेवत नाहीत. जबाबदार पदावर असताना भाषणबाजी करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा अणे यांना कुणी अधिकार दिला? ‘विदर्भ वेगळा झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काही उरणार नाही’ असे ते म्हणतात. कुठून त्यांनी ही आकडेवारी आणली? फडणवीस यांनी खुलासा केला पाहिजे. अणे यांच्या हातात बंदूक देवून भाजप जर असा खेळ करत असेल तर त्यांना पुन्हा जनाधार मिळणार नाही हेच शरद पवारांनी सुचित केले आहे. ते भाजपच्या हितासाठी आहे की यातही काही पवारांची खेळी आहे याचे उत्तर काळच देईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: