गुरुवार, ३१ मे, २०१८

संयमी नेते पांडुरंग फुंडकर

राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे गुरुवारी निधन झाले. आपल्या कारकीर्दीत अत्यंत संयमी आणि शांत अशी प्रतिमा जपत त्यांनी संघ, अभाविप ते भाजप असा प्रवास केला होता. पांडुरंग फुंडकर हे मूळचे नांदुरा तालुक्यातील नारखेड येथील रहिवासी होते. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रीय झाले. आणीबाणीच्या काळात त्यांनी तीन महिने तुरुंगातही काढले. यानंतर मिसाबंदी म्हणूनही नऊ महिने ते तुरुंगात होते. मुंबई आणि मराठवाड्यात मुंडे महाजन या जोडगोळीने भाजप वाढवण्याचा सपाटा लावला असताना विदर्भात पांडुरंग फुंडकर यांनी आपले कार्य सुरू ठेवले होते. गोपिनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या फुंडकर यांची कारकीर्द अत्यंत संयमी आणि नेमकेपणाची झाली. अनेक महत्वाच्या पदांवर कार्यरत राहुनही त्यांनी आपला तोल कधी जाऊ दिला नव्हता हे विशेष त्यांचे गुण होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने भाजपने एका संयमी नेत्याला गमावले असेच म्हणावे लागेल.भारतीय जनता पक्षातले सध्याचे नेते हे आणिबाणीच्या काळात १८ महिने तुरुंगवास भोगून आलेल्यांपैकी आहेत. अनेकांना मिसा कायद्याखाली त्या काळात अटक केली होती. कारण राष्टÑीय स्वयंसेवक संघावर त्यावेळी बंदी घातली होती. त्यामुळे संघाच्या मैदानावरून अनेकांना दहशतवादी पकडावेत तसे पकडून नेले होते. अशाचप्रकारे आणिबाणीग्रस्त असे अनेक नेते भाजपमध्ये निर्माण झाले. त्यापैकीच एक म्हणजे पांडुरंग फुंडकर होते. १९७७ मध्ये फुंडकर हे राजकारणात सक्रीय झाले. त्यावेळी भारतीय जनसंघातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. जनसंघाच्या वतीने विदर्भात निवडून येणाºया पहिल्या चार आमदारांमध्ये पांडुरंग फुंडकर यांचा समावेश होता. जनता पक्षाच्या काळात १९७८ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. १९८३ मध्ये कापूस प्रश्नावर फुंडकर यांची ३५० किलोमीटरची पदयात्रा काढली होती. विदर्भातील कापसाचा प्रश्न हा काही आजचा नाही. १९८३ मध्ये काँग्रेसची राजवट असतानाही कापूस उत्पादक शेतकºयांचे प्रश्न कायम होते. त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम फुंडकर यांनी केले होते.  त्या काळात अकोला लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. पण विदर्भातील कापूस उत्पादक शेतकºयांसाठी केलेल्या आंदोलनाने अकोल्यात भाजपचा शिरकाव करण्याचे काम फुंडकर यांनी केले. अकोला या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला फुंडकर यांनी सर्वात प्रथम सुरुंग लावला. राजकारणात आल्यानंतर त्यांनी अनेक पदे भूषविली. यामध्ये आमदार, खासदार झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्याकाळी राज्यात काँग्रेसचे वर्चस्व असताना पांडुरंग फुंडकर यांनी राज्यात विशेषत: ग्रामीण भागात भाजपाचे स्थान मजबूत केले. त्यामुळे भाजपच्या वाढीत फुंडकरांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे.पांडुरंग फुंडकर हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते. गोपीनाथ मुंडे आणि पांडुरंग फुंडकर यांची मैत्री सर्वश्रृत होती. शेतकºयांच्या प्रश्नावर फुंडकर यांनी केलेले आंदोलन गाजले होते. शेतकरºयांच्या प्रश्नांची खरी जाण असलेले ते नेते होते. त्यामुळेच त्यांच्याकडे कृषी मंत्रीपद आल्यावर त्यांनी शेतकºयांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते. गतवर्षी शेतकºयांचा संप झाला होता. दोन महिन्यांपूर्वी किसान सभेने मंत्रालयावर नाशिक ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता. त्यावेळी सगळ्या आंदोलकांशी त्यांनी अत्यंत  संयमाने आणि सामंजस्याने वाटाघाटी करून शेतकºयांशी सन्मानाने ते वागले होते. हजारोंचा मोर्चा मुंबईत आलेला असताना संपूर्ण देशाचे लक्ष त्याकडे लागले होते. त्याही परिस्थितीत या मोर्चाला शांतपणे हाताळण्याचे काम त्यांनी केले होते. यापूर्वी जेंव्हा असे मोर्चे शेतकरºयांनी काढले आहेत त्याला हिंसक वळणे लागली होती. गोळीबार, लाठीमार करण्याचे प्रकार घडले होते. पण हा मोर्चा मात्र अतिशय सन्मानजनक असा झाला. याचे कारण फुंडकर यांचा संयमी स्वभाव हे होते. फुंडकर हे अकोला मतदारसंघामधून १९८९ ते ९८ या कालावधीत लोकसभेवर निवडून गेले. याच कालावधीत अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या दिग्गज नेत्यांशी त्यांचा संपर्क वाढला. यामुळेच त्यांनी फुंडकर यांच्यावर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी दिली. आपल्या निकटवर्तीयांमध्ये ते भाऊसाहेब म्हणून परिचित होते. त्यांनी कधीही कोणतेही वादग्रस्त विधान केले नाही. कापूस उप्तादक शेतकºयांच्या प्रश्नावर काम करतानाच त्यांनी कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष म्हणून फुंडकर यांनी काम केले आहे. ११ एप्रिल २००५ ते २४ एप्रिल २००८ या कालावधीत ते विरोधी पक्षनेते होते. २५ एप्रिल २००८ रोजी त्यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदी दुसºयांदा बिनविरोध निवड झाली. जून २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन २००६-०७ या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एप्रिल २०१४ मध्ये त्यांची विधान परिषदेवर फेरनिवड करण्यात आली. भाजपातील महत्त्वाच्या पदांवर काम केले असले तरी फुंडकर यांना मंत्रिपद मिळाले नव्हते. पण २०१६ च्या मंत्रिमंडळ विस्तारात खडसे यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतल्यानंतर पांडुरंग फुंडकर यांना संधी मिळाली. त्या कार्यकालात त्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले असले तरी परिस्थिती संयमाने हाताळून त्यांनी वेळ निभाऊन नेली होती. अशा एका संयमी नेत्याला गमावून भाजपला फार मोठा धक्का बसला आहे. १ जूनला शेतकरी संप झाला होता आणि बरोबर वर्षभरानी कृषी मंत्री फुंडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत हा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल. त्या पांडुरंग फुुंडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: