गुरुवार, ३१ मे, २०१८

शिवसेनेला अद्दल, भाजपला धक्का

पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत एका ठिकाणी भाजपला विजय तर दुसरीकडे पराभवाचा सामना करावा लागला. यातून एकच लक्षात घेतले पाहिजे की या निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला अद्दल घडवली आहे तर भाजपला मतविभागणीचा फायदा न मिळू देता काँग्रेस राष्टÑवादी आघाडीने धक्का दिला आहे. पालघरची निवडणूक ही शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेची केलेली होती. पण या निवडणुकीसाठी शिवसेनेने जे अचाट प्रकार केले त्याला मतदार फसले नाहीत आणि त्यांनी शिवसेनेला अद्दल घडवली आहे. या निवडणुकीत श्ोिवसेनेने अत्यंत गलिच्छ राजकारण केले होते. त्या गलिच्छ राजकारणाला मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पालघरची पोटनिवडणूक जाहीर होताच शिवसेनेने सर्वात प्रथम काय केले तर भाजपचा उमेदवार पळवण्याचा अधमपणा केला. त्यासाठी भाजपला बदनाम करून वनगा कुटुंबियांकडे भाजपने दुर्लक्ष केल्याच्या वल्गना केल्या. पण मतदार शिवसेनेच्या अशा फसव्या आवाहनांना भुलला नाही. चिंतामण वनगा यांच्यानंतर त्यांच्या मुलालाच भाजप तिकीट देणार हे निश्चित होते. त्यामुळे भावनिक लाटेवर आपण वनगांना आपल्या तिकीटावर निवडून आणू शकतो असा साक्षात्कार शिवसेनेला झाला. परंतु मतदारांनी भाजपला कौल दिला होता. वनगांना भाजप संधी देणार हे माहिती असूनही शिवसेनेने अपप्रचार केला त्याला मतदारांनी भिक घातली नाही. कळस म्हणजे शिवसेनेने पालघरच्या प्रचारात ज्या प्रकारे वनगा कुटुंबियांचा वापर करून भावनिक लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो प्रकार अत्यंत हिडीस होता. प्रत्येक सभेत त्या वनगांच्या पत्नीला रडायला लावून भावनीक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न मतदारांनी हाणून पाडले. सत्तेत राहुन आपल्याच सरकारचा अप्रचार करून टाळूवरचं लोणी खाण्याच्या शिवसेनेच्या प्रवृत्तीला मतदारांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. आता पराभव झाल्यानंतर शिवसेना या वनगा कुटुंबाला किती जवळ करते हे समजून येईल. पण यामुळे शिवसेना, त्यांचे नेते उद्धव ठाकरे यांचा फुगा पुरता फुटलेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पोटनिवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागतो हा जो समज होता तो पालघरच्या सुजाण मतदारांनी खोटा ठरवला आहे. युतीत राहुन, सरकारमध्ये राहुन आपल्याच घटक पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणाºया गद्दार शिवसेनेला मतदारांनी पुरता धडा शिकवला आहे. आता त्यांनी सत्तेतून बाहेर पडून अधिकृतपणे युती तोडावी आणि स्वबळाची भाषा करावी असाच निकाल मतदारांनी दिलेला आहे. पण मतदारांनी केवळ भाजपच्या बाजूने कौल दिलेला नाही तर शिवसेनेचाच पुरता निकाल लावलेला आहे. आता निवडणूक आयोग, मतदानयंत्रे यावर खापर फोडण्यात शिवसेना नेते धन्यता मानतील पण मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत हे नक्की. महाराष्टÑातील आणखी एक पोटनिवडणूक म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक. याठिकाणी भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अर्थात हा पराभव फार मोठा आहे अशातली बाब नाही. याठिकाणी भाजप विरोधात काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस एक झाले होते. मतविभागणीचा कोणताही फायदा भाजपला मिळू नये यासाठी राष्टवादी काँग्रेसने पुरेपूर काळजी घेतली होती. त्यासाठी जी तडजोड काँग्रेस राष्टÑवादीत झाली होती ती फार महत्वाची होती. याठिकाणी जी पोटनिवडणूक झाली ती भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक झाली. नाना पटोले हे भाजपमधून काँग्रेसवासी झाले. आपल्या स्वगृही परतले. या मतदारसंघातून पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवायला लागू नये म्हणून नाना पटोले काँग्रेसमध्ये आल्यानंतर आघाडीच्या राजकारणात हा मतदारसंघ राष्टÑवादीच्या वाट्याचा आहे असे सांगून तो राष्टÑवादीला सोडण्यात आला. त्यामुळे नाना पटोले यांना ही निवडणूक लढवावी लागली नाही तर राष्टÑवादीने आपला उमेदवार त्याठिकाणी दिला. काँग्रेस राष्टÑवादीने एकत्रित मुकाबला करत ही लढत दिल्यामुळे भाजपला हरवणे याठिकाणी सोपे गेले. जो प्रकार गोरखपूर मतदारसंघात सपा भाजप यांच्या एकत्र येण्याने घडला होता तोच प्रकार याठिकाणी काँग्रेस राष्टÑवादीच्या एकजुटीने घडला. या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आखलेली रणनिती कारणीभूत ठरलेली आहे. हा मतदारसंघ मूळचा त्यांचा होता. त्यामुळे तो त्यांनी परत मिळवला आहे. भाजपविरोधात सगळे विरोधी पक्ष एक आले तर त्यांना धक्का देता येतो हे भंडारा गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून मतदारांनी दाखवून दिले आहे. तर खोटेपणाने निवडणूक लढवून मतदारांची दिशाभूल करणे सोपे नाही पालघर निवडणुकीच्या निकालातून शिवसेनेला मतदारांनी दाखवून दिले आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून नाना पटोले हे २०१४ ला मोदी लाटेत निवडून आले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते जर काँग्रेसमधून निवडणूक लढण्यासाठी उभे राहिले असते तर त्यांनाही मतदारांनी धडा शिकवला असता. त्यामुळे त्यांनी झाकली मूठ सव्वालाखाची या न्यायाने निवडणूक न लढवता तो मतदारसंघ राष्टÑवादीला बहाल करण्याचा निर्णय घेतला. त्या संधीचे राष्टÑवादीने सोने केले. कारण यामुळे राष्टÑवादीच्या खासदाराची संख्या १ ने वाढली आहे. जेमतेम वर्षभरही आता या लोकसभेचा कार्यकाल राहिलेला नाही. तरीही दीर्घकाळ मतदारसंघ लोकप्रतिनिधीशिवाय ठेवता येत नसल्यामुळे या निवडणुका झालेल्या आहेत. परंतु यामुळे आगामी लोकसभा २०१९ ची चाचपणी करण्याचे प्रयत्न सर्व पक्षांना करता आले आहेत. भाजपने पालघर आणि भंडारा गोंदिया या दोन्ही निवडणुकीत आपली साम दाम दंड भेदाची निती वापरली असली तरी पालघरमध्ये ती यशस्वी झाली तर भंडारा गोंदियात ती उपयोगी ठरली नाही. अर्थात भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीपेक्षा भाजपने पालघरची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. याचे कारण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला. त्यामुळे या कपटी मित्राला, स्वकीय शत्रूला बंदोबस्त करण्याचे धोरण भाजपने ठरवले. त्यामुळे भंडारा गोंदिया गेला तरी चालेल पण पालघर मिळवायचेच या इराद्याने ही निवडणूक भाजपने लढवली. त्यात मतदारांनी शिवसेनेला अद्दल घडवलीच पण भाजपलाही एक धक्का दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: