शनिवार, ५ मे, २०१८

संघ-भाजपमधील दरी

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील दरी वाढत असावी, असे चित्र दिसते आहे. संघ आणि संघ परिवारातील अनेक घटक एका बाजूला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दुस-या बाजूला, असे चित्र सातत्याने दिसते आहे. वारंवार यांच्यात भेटीगाठी होत असल्या तरी विचारांमध्ये कुठेतरी एकवाक्यता दिसत नाही. त्यामुळे ज्या गतीने भारतीय जनता पक्ष वाढत गेला आहे त्या गतीने एक फार मोठा तुकडा या पक्षाचा पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जी अवस्था काँग्रेसची झाली तीच भाजपच्या बाबतीत घडताना दिसणार का?अगदी अलीकडचीच गोष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फतवा काढला की सगळ्या भाजप नेत्यांनी दलितांकडे जाऊन भोजन करावे. लगेच उत्तर प्रदेशात त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सगळे मंत्री, नेते दलितांसमवेत भोजनाचे प्रकार करू लागले. त्यात इतक्या गमती जमती झाल्या की अशाने भाजपचे दलित प्रेम वाढण्याऐवजी भाजपवरची दलितांची नाराजीच वाढलेली दिसून आली. हा सगळा दिखाऊपणा इतका हिणकस होता की, त्याची चर्चाही नकोशी वाटत होती. असा फतवा काढून कधी जातीयव्यवस्था मोडीत निघते का? म्हणजे आपण इसापनितीतल्या लहरी राजाच्या गोष्टी ऐकतो किंवा मनात येईल तेव्हा राजधानी बदलणा-या गझनीच्या महंमदाची थट्टा करतो त्यातलाच हा प्रकार.उत्तर प्रदेशातील अमरोही या गावात तर फारच मजा झाली. या गावात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेवायला येणार अशी बातमी आली. कोणा एका दलिताचे घर निवडले. ते घर अत्यंत साधे होते. घरावर म्हणे छप्परही चांगले नव्हते. त्या झोपडीवजा घरात ते कुटुंब आपल्या परिवार आणि गुरे-जनावरांसह राहात होते. गावही तसे पडीकच. ओसाडच होते. गावात नळ होते, तर त्या नळाला पाणी नव्हते. रस्ते कागदोपत्री होते पण अस्तित्वात खड्डेच होते. विहिरी, बोअरिंग यांची अवस्थाही मोडकळीस आलेली अशी होती. स्वच्छतेचा या गावाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. कारण उत्तर प्रदेशातील खेडी म्हणजे फक्त मतदानापूर्वी मतदारांना भेटण्यासाठी असतात ही काँग्रेसी परंपरा अजूनही मोडीत निघालेली नव्हती. अशा या गावात एका दलिताच्या घरी मुख्यमंत्री जेवायला येणार म्हणून काय तो उत्साह संचारला. म्हणजे आपल्याकडे ‘साधुसंत येती घरा तोची दिवाळी-दसरा’ असे म्हणतात. तसे हे भाजपचे संधीसाधू संत येणार म्हटल्यावर गावात उत्साह सळसळला. खराब रस्ते रातोरात चकाचक झाले. नळांना पाणी आले. गाव स्वच्छ झाले. प्रशासन कामाला लागले. म्हणजे कृष्णाला भेटून सुदामा आपल्या गावी रिकाम्या हाताने परततो तेव्हा त्याला आपले घर, गाव जसे बदललेले दिसते तसाच अनुभव अमरोही गावातील लोकांना आला असेल. कारण ज्या घरात योगी भोजनास जाणार होते तिथला कायापालट तर विचारूच नका. घरावर मस्तपैकी प्लास्टिकचे निळ्या रंगाचे अच्छादन आले. सगळीकडे शीट बसवल्या गेल्या. विशेष म्हणजे बाहेर गोठय़ात बांधलेल्या गाईंना तर चक्क शांपूने स्वच्छ करून आंघोळ घालण्यात आली. धन्य त्या गाई. ज्यांना प्यायला पाणी नव्हते त्या घरात बिसलेरीचे कॅनच्या कॅन आले. गावात अच्छे दिन आले. असाच माहोल सगळीकडे बघायला मिळाला. म्हणजे पूर्वी चौथीच्या आणि सध्या पाचवीच्या पाठय़पुस्तकात द. मा. मिरासदार यांचा ‘अति तिथं माती’ नावाचा धडा होता. गाण्याला प्रोत्साहन देण्यासाठी तो राजा राज्यात कोणीही गद्यात बोलायचे नाही, सगळ्यांनी गाण्यातच बोलायचे असा फतवा काढतो. तसाच काहीसा प्रकार वाटला हा. दलित आणि सवर्ण यांच्यातील दरी कमी होण्यासाठी आणि भाजप दलितांना जवळ करतो, अस्पृश्य मानत नाही, यासाठी काढलेला हा फतवा म्हणजे संजय पवारच्या ‘कोण म्हणतं टक्का दिला’ या नाटकाचाच एक भाग वाटतो. त्यामुळे या विसंगती, थट्टा यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज होईल नाही तर काय होईल? त्यांनी यावर ताबडतोब प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. ही विचारांची दरी सातत्याने भाजपच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे वाढताना दिसते आहे. त्याचा परिणाम भाजपचा एक फार मोठा तुकडा पडण्याची भीती येत्या काळात आहे.संघ परिवारातल्याच पण हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नेत्या उमा भारती यांनी तर यावर आपली मते वेगळ्या प्रकारे व्यक्त केली. त्याची बातमी झाली असली तरी ती मते अगदी स्पष्ट आणि खरी वाटतात. मी दलितांकडे जेवायला जायला प्रभू रामचंद्र नाही असे सांगून दलितांनी माझ्याकडे जेवायला आले तर हाताने आनंदाने वाढेन असा सूर आळवला. दलितांकडे जाऊन त्यांचे घर पवित्र करायला मी राम नाही तर दलितांनी माझ्याकडे येऊन आमचे घर पवित्र करावे असे वक्तव्य करून ख-या अर्थाने बदलाचे वारे कोणते असले पाहिजेत हे सांगितले. पण एकूणच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे आणि उर्वरित संघ परिवार, संघ परिणीत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकीकडे अशी स्पष्ट स्थिती सध्या दिसत आहे. त्यामुळेच सरसंघचालक मोहन भागवत यांनी या चाललेल्या प्रकारांवर भाष्य करून आपली नाराजी व्यक्त केली.मोहन भागवत यांची नाराजी ताबडतोब प्रसारमाध्यमांमधून बाहेर पडली. भाजप नेत्यांनी सध्या दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यावर भर दिला असला तरी भाजपचा हा एकतर्फी व्यवहार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र काही पटलेला दिसत नाही, अशा शब्दांत सर्वत्र हे वृत्त प्रकाशित झाले. या वृत्तांमध्ये प्रसिद्ध झालेल्या मतांनुसार, भाजपचा हा प्रकार म्हणजे एकतर्फी कार्यक्रम असल्याचे सांगत संघाने भाजपला चांगलेच झापले आहे. संघाचे म्हणणे आहे की, ‘केवळ दलितांच्या घरी जाऊन जेवण करू नका, तर त्यांनाही तुमच्या घरी आणून त्यांच्यासोबत भोजनाचा अस्वाद घ्या’ असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपला दिला आहे. म्हणजे जे उमा भारती बोलल्या तेच मोहन भागवत वेगळय़ा आणि स्पष्ट शब्दांत बोलले.यासंदर्भात दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अंतर्गत बैठक झाली. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी समरसता अभियानावर चर्चा केली. यावेळी सरसंघचालकांनी भाजपलाही कानपिचक्या दिल्या असल्याचेही बातम्यांमधून प्रसिद्ध झाले आहे. ही वेळ का यावी? संघाच्या परिवारातून, विचारातून आलेल्या भाजपची वाटचाल विचारांपासून भरकटत चालली आहे का? भाजपची अवस्था ही काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत चालली आहे असाच प्रकार सध्या दिसत आहे. म्हणूनच सरसंघचालकांनी भाजप नेत्यांना सांगितले की, अष्टमीच्या दिवशी दलित समाजातील मुलींना घरी बोलावून आपण त्यांची पूजा करतो. पण आपण आपल्या मुलींना कधी दलितांच्या घरी पाठवतो का? असा सवाल भागवत यांनी केला. ते म्हणतात, दोन्ही बाजूंनी व्यवहार झाला तरच समरसता अभियान यशस्वी होईल. केवळ दलितांच्या घरी जाऊन जेवण करून चालणार नाही. तर त्यांनाही आपल्या घरी बोलावले पाहिजे. अर्थात हा विचार अगदीच चूक आहे, असे नाही. पण कशाही प्रकारे समरसता अगदी संघाच्या किंवा भाजपच्या विचाराने आणायची म्हटली तरी त्याचे ब्रँडिंग, प्रसिद्धी यावर भर देणार असाल आणि केवळ दिखाऊपणासाठी असेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळेच हा असला विचित्र कारभार भाजपला अडचणीचा ठरू शकतो. कारण भाजपची एक फळी पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारापासून दूर जाताना दिसते आहे.भागवत यांनी आपली मते अधिक स्पष्ट करताना म्हटले आहे की, केवळ दलितांच्या घरी जेवल्याने समरसता येणार नाही. त्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. दलितांच्या घरी गेल्याने ‘धन्य’ झालो असे कुणाला वाटत असेल तर तो केवळ अहंकार आहे. जर कोणी स्वत:ला मोठा आणि दुस-याला छोटा समजून त्याच्या घरी जेवत असेल तर त्याने समरसता कधीच येणार नाही. संघाचे दिल्लीचे सह प्रांतचालक आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात, १९३० मध्ये महात्मा गांधींनी दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्याचा मार्ग दाखवला होता. त्या काळात त्याचा फायदाही झाला. मात्र आजच्या काळात आणखी काही गोष्टी करण्याची गरज आहे. संघ स्वयंसेवकांनी दोन्ही बाजूने समरसता यावी म्हणून प्रयत्न सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. संघ स्वयंसेवक दलित वस्त्यांमध्ये जाऊन दलितांच्या घरी थांबतात आणि जेवतात. त्यांच्या वस्त्याही स्वच्छ ठेवतात. तसेच दलितांनाही आपल्या घरी बोलावून त्यांच्यासोबत जेवण करतात. फक्त भाजप हे हायटेक पद्धतीने आणि प्रचारकी पद्धतीने करत असल्यामुळे जरा विचित्र आहे, त्यामुळे संघापासून भाजप हा विचाराने दूर जाताना दिसत आहे. ही दरी कशी कमी होणार हे पाहिले पाहिजे.संघ परिवारातून आलेले आणि विश्व हिंदू परिषदेचे दीर्घकाळ नेतृत्व करणारे प्रवीण तोगडिया परिवारातून दूर गेले ते भाजपच्या नेत्यांमुळे गेले. त्यांनी भाजप नेत्यांवर, त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. असे अनेक असंतुष्ट आज संघ परिवारात आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे संघात व्यक्तिपूजेला फारसे महत्त्व नाही. व्यक्तिस्तोम माजवणे संघाला मान्य नाही. त्यामुळेच कोणतीही एकाधिकारशाही संघाला मान्य नाही. या विचारामुळेच भाजपमध्ये जी एकाधिकारशाही चाललेली आहे त्याला विरोध करणारी एक फळी भविष्यात तयार होण्याची शक्यता आहे. अगदी काँग्रेसच्या दिशेनेच भाजपची वाटचाल चाललेली आहे. साठ- सत्तरच्या दशकात काँग्रेसची सूत्रे जेव्हा इंदिरा गांधींच्या हातात आली तेव्हा एक विरोधी गट इंदिरा गांधींच्या विरोधात उभा राहिला. गांधी-नेहरू विचारांची काँग्रेस ही इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस नाही, असे सांगून काँग्रेसमध्ये समाजवादी काँग्रेस तयार झाला. तशीच सुरुवात भाजपमध्ये होताना दिसते आहे. संघ आणि भाजपमधील ही वाढती दरी भाजपचा एक नवा तुकडा पाडून नवा पर्याय समोर आणू शकते. मोदी-शहांना हटवायला काँग्रेस अथवा अन्य कोणत्याही तिस-या आघाडीची गरज लागणार नाही तर संघाचा हा एक गटच ते काम करेल, कारण ही दरी वाढत जाण्याची शक्यताच अधिक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: