धकधक गर्ल म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकीक असलेली अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. तब्बल २५ वर्ष आपल्या रुपेरी पडद्यावर असण्याचे कौतुक करून घेण्याचे भाग्य माधुरीला लाभले. पडद्यावर तिच्या अदाकारीने फिदा झालेला प्रेक्षकवर्ग चित्रपटापेक्षा माधुरीला बघायला म्हणून येत होता. कारण तिचे चित्रपटसृष्टीत आगमनही तसेच जोरदार झाले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील सौदर्याची खाण म्हणून मधुबालाचे नाव सर्वात वर असायचे. त्या मधुबालाचे पुनरागमन झाले आहे, मधुबालाच पुन्हा जन्माला आलेली आहे असा गाजावाजा करुन तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. पण फक्त गाजावाजा न करता तिने आपल्या मेहनतीने आणि हुषारी प्रत्येक संधीचे सोने केले. त्यामुळे तिचा तारकांमध्ये वरचा क्रमांक राहिला. अशी माधुरी अस्सल मराठी मुलगी असूनही तिने हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून सोडली होती. हिंदी सिनेमासाठी लागणारे सगळे गुण तिच्यात होतेच. पण तिने आपल्यातील गुण काकणभर जास्तच दाखवत भल्या भल्यांना मोहात पाडले. त्यामुळे पडद्यावर सबकुछ माधुरी असाच प्रकार पहायला मिळू लागला. ती माधुरी आता एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येते आहे म्हटल्यावर अनेकांना अप्रुप वाटू लागले आहे. माधुरी मराठी कशी बोलेल? ती मराठीतील कसली भूमिका करणार आहे? याची उत्सुकता प्रत्येकाला आहेच. कारण मराठी चित्रपटातील नायिका म्हणजे त्यांचे काही गट आहेत. एक गट आहे सुलोचना, जयश्री गडकर, आशा काळे यांच्या गोत्रातून आलेला सोशिक सोज्वळ आणि जाचहाट सहन करणाºया अभिनेत्रींचा. या गोत्रातून पुढे आलेली रडुबाई म्हणजे अलका कुबल की जीने आपली सोशिकता नउवारीतून सहावारीत आणली. हा एक गट. तर दुसरा गट म्हणजे तमाशाप्रधान नायिकांचा. उषा चव्हाण, उषा नाईक अशा दणकट रांगड्या महिलांचा गट. यातून वाटचाल करत मराठी सिनेमा शहरी वातावरणात येतो तेंव्हा फक्त बागेत फेºया मारणाºया आणि विनोदी चित्रपटात अडकलेल्या शहरी नायिका. यामध्ये वर्षा उसगांवकर, निवेदिता, किशोरी शहाणे अशा तारकांचा समावेश होतो. त्यामुळे माधुरी मराठी चित्रपटात नक्की कुठे बसणार असा प्रश्न प्रेक्षकांना असल्यामुळे सगळ्यांना तिचे हे मराठी पडद्यावरील आगमन हवेहवेसे आहे. पण हे ग््लॅमर यापूर्वीही अनेक अभिनेत्रींच्या बाबतीत घडले होते हेही लक्षात घेतले पाहिजे.माधुरी दीक्षित प्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत जबरदस्त ग्लॅमर आणि प्रसिद्धी लाभली होती ती अभिनेत्री म्हणजे नूतन. नूतन ही शंभर टक्के मराठी अभिनेत्री होती. शोभना समर्थ या अभिनेत्रीची ही मुलगी. १९५० पासून १९९२ पर्यंत नूतन हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत होती. राजकपूर, देवानंद, दिलीपकुमार, सुनील दत्तपासून अनेक दिग्गजांबरोबर तीचे नाव मोठे होते. त्या काळातील ती जबरदस्त बीझी नटी होती. शोभना समर्थ या अभिनेत्रीची मुलगी म्हणून जीची ओळख होती ती कालांतराने पुसली गेली आणि शोभना समर्थ यांना लोक नूतनची आई म्हणून ओळखू लागले, इथपर्यंतचा नूतनचा प्रवास महत्वाचा होता. नूतन ही मराठी आहे हे कोणालाही माहितीही नव्हते. त्यामुळेच नूतनने जेंव्हा मराठीत चित्रपट केला तेंव्हा आजच्या माधुरीप्रमाणेच सर्वांना तो सुखद धक्का होता. त्याकाळात आजच्यासारखे ब्रँडीग आणि प्रमोशनसाठी टिव्हीचे माध्यम नव्हते. पण सिनेनियतकालीकांनी मात्र नूतनच्या मराठी चित्रपटसृष्टीतील आगमनाचे असेच कौतुक केले होते, जसे आज माधुरीचे होत आहे. १९७७ च्या डिसेंबर महिन्यात किशोर मिस्कीन या दिग्दर्शकाने निर्माण केलेला तो चित्रपट होता पारध. पारध या सिनेमात चरित्र अभिनेत्री म्हणून असली तरी नूतनच त्या चित्रपटाची नायिका होती. अनेक दिग्गज हिंदी कलाकारही त्या चित्रपटात होते. या चित्रपटात रमेश देव हा नूतनचा पती होता आणि तेव्हाची गाजलेली जोडी सचिन सारीका हे या चित्रपटात होते. सचिन हा नूतनचा मुलगा होता तर सारीका ही सून होती. रहस्यमय अशा चित्रपटात खलनायक म्हणून श्रीराम लागूंची भूमिका अत्यंत महत्वाची होती. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद हे मधुसुदन कालेलकरांचे होते. तर यातील गीते चार दिग्गज गीतकारांची होती. ते दिग्गज म्हणजे ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, वंदना विटणकर आणि स्वत: मधुसुदन कालेलकर यांचे गीत या चित्रपटात होते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात नूतनचा एका गाण्यात आवाजही होता. त्याकाळात हा चित्रपट चांगलाच गाजला होता. नूतनचे मराठीत आगमन म्हणून आजच्या माधुरीच्या बकेटलीस्ट प्रमाणे नूतनलाही तेंव्हा ग्लॅमर लाभले होते.अनेक हिंदी अभिनेत्रींनी नंतर मराठी चित्रपटात कामे केली आहेत. त्यामध्ये नूतनचीच बहिण तनुजा हिने झाकोळसारख्या चित्रपटातून पदार्पण करून अगदी आत्तापर्यंत म्हणजे २०१३ मध्येही पितृऋण सारखे काही लक्षवेधी मराठी चित्रपट केले. सूषमा शिरोमणी, शुभा खोटे या मराठी अभिनेत्रींनीही हिंदीतून मराठीत येण्याचे औचित्य दाखवले होते. अनेकजण हिंदी आणि मराठी अशा दोन्ही ठिकाणी काम करणाºया अभिनेत्री होत्या. त्यामध्ये ललिता पवार, जयश्री गडकर, सुलोचना, सीमा, उषाकिरण अशा अनेकजणी होत्या. पण हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून सोडून मराठीत आगमन करण्याचे आणि त्या आगमनाचे जोरदार स्वागत होण्याचे भाग्य दोघींनाच लाभले. ते म्हणजे नूतन आणि माधुरी दीक्षित. - प्रफुल्ल फडके
गुरुवार, २४ मे, २०१८
माधुरी आणि नूतन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा