रविवार, २० मे, २०१८

विरोधकांच्या एकजुटीचे भाजपपुढे आव्हान

कर्नाटकातील राजकीय नाट्यानंतर विरोधकांचा किंबहुना काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. या तीन दिवसांतील एकूणच नाट्यानंतर भारतीय जनता पक्षाला आपल्या कार्यपद्धतीचे आत्मपरिक्षण करावे लागणार आहे असे दिसते. काँग्रेसमुक्त भारत किंवा शत प्रतिशत भाजपच्या वाटचालीत काँग्रेसफक्त ३ पी म्हणजे पंजाब, पॉंडिचेरी आणि परिवारापुरती शिल्लक राहील असे हिणवणे भाजपला महागात पडले आहे. त्यामुळे शनिवारच्या येडियुरप्पांच्या राजीनामा नाट्यानंतर सोशल मिडीयासह सर्वच माध्यमांमधून भाजपला सहानुभूतीपेक्षा नाराजीचा सामना करावा लागलेला दिसतो आहे. ५६ इंच छातीवाले ५५ तास सरकार उभे करू शकले नाहीत अशा तºहेच्या टीकांना आज भाजपला सामोरे जावे लागत आहे. कारण या संपूर्ण राजकारणात भाजपने ज्या प्रकारे घाई केली त्याचाच फटका भाजपला बसला असे दिसते आहे. भाजपने वेळोवेळी सोडलेले बुमरँगही उलटलेले या निमित्ताने दिसत आहे. परंतु अशाचप्रकारचे बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे अटलबिहारी वाजपेयींना १९९६ ला राजीनामा द्यावा लागला होता. तेंव्हा संपूर्ण देश हळहळला होता. विरोधकही त्या त्यांच्या भाषणानंतर ओशाळले होते आणि वाजपेयी सहानुभूती घेऊन सभागृहातून बाहेर पडले होते. तसा प्रकार येडियुरप्पांच्या बाबतीत झाला नाही. त्यांना तशी सहानुभूती मिळाली नाही, हे नाकारून चालणार नाही. परंतु या एकूणच राजकीय नाट्यामध्ये विरोधकांची एकजूट दिसून आली. धर्मनिरपेक्ष जनता दल म्हणजे भाजपचीच बी पार्टी आहे असा प्रचार एका बाजूने झालेला असताना ती भाजपची नाही तर काँग्रेसची बी पार्टी आहे हे कोणाला समजलेच नाही. त्यामुळे हा प्रकार म्हणजे सूर्य मावळला समजून पुढे आलेल्या जयद्रथासारखा झाला. न्यायालयाने केलेली कोंडी, विरोधकांची झालेली एकजूट आणि फोडाफोडीसाठी पुरेसा अवधी न मिळाल्याने विरोधकांनी हा सूर्य अन हा जयद्रथ असा प्रकार करून येडियुरप्पांना अक्षरश: घालवले. त्यामुळे या नाट्यातून भाजपला आता काही तरी बोध घ्यावा लागणार आहे असे दिसते. भाजप विरोधात या निवडणुकीत केवळ कर्नाटकातील विरोधकच एक झाले असे नाही तर अनेक प्रांतांमधून आपापल्या परिने अनेकांनी ताकद पणाला लावली आणि आपला खारीचा वाटा उचलला होता. केवळ भाजपला रोखण्यासाठी हे केले होते. शेजारच्या आंध्र प्रदेश, तेलंगणामधून चंद्राबाबूंनी आपल्या तेलगू देशमचा पाठिंबा दिला होता. भाजपचा विजयचा वारु रोखण्यासाठी त्यांनी आपली ताकद इथे लावली होती. उत्तर प्रदेशातून मायावतींनी शंख फुंकला होता आणि बहुजन समाज पार्टीला धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर पाठवले होते. त्याशिवाय महाराष्टÑ, पश्चिम बंगाल अशा अनेक राज्यांमधून भाजपविरोधासाठी कर्नाटकात विविध पक्षांनी आपली ताकद पणाला लावून विरोधी ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला होता. इथे विरोधकांची चांगली  एकजूट दिसून आली. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला रोखण्याची ताकद विरोधकांमध्ये आहे हे दाखवून देण्यात विरोधक यशस्वी झाले आहेत. अर्थात या विरोधकांचे नेतृत्व कोणी करायचे हे जोपर्यंत निश्चित होत नाही आणि सर्वमान्य होत नाही तोपर्यंत भाजपला रोखणे अवघड आहे हेही तितकेच खरे आहे. त्यामुळेच नेतृत्वाच्या मुद्दद्यावर एकमत झाले तर मोदींच्या भाजपला रोखणे विरोधकांना सहज शक्य आहे. पंजाब, पाँडीचेरी आणि परिवारापुरती काँग्रेस मर्यादीत राहिल असे वक्तव्य करून ज्याप्रकारे काँग्रेसला भाजपकडून हिणवले गेले त्याला चांगलेच उत्तर यातून मिळाले आहे. सत्ता काँग्रेसची नसली तरी काँग्रेसच्या पाठिंब्यावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे हे सरकार उभारणार असल्यामुळे त्यामध्ये काँग्रेसची ताकद दिसणार आहेच. सत्तेची फळे काँग्रेसला चाखायला मिळणार आहेत हे निश्चितच. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला कर्नाटकच्या माध्यमातून दक्षिणद्वार उघडले आहे असे म्हणणाºयांना विचार करावा लागेल. कर्नाटकात भाजपची कामगिरी २०१३ च्या तुलनेत चांगली असली तरी ते दार पार करून आत प्रवेश झालेला नसल्यामुळे उंबरठ्यावरच भाजपला मतदारांनी, कर्नाटकने रोखले आहे. त्याचा परिणाम दक्षिण प्रवेशावर होणार हे निश्चित. भाजपची मोठी टीम, खंदे वक्ते, जोरदार प्रचारसभा घेणारी यंत्रणा उभी करूनही जादुई आकडा गाठता आला नाही आणि पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे फोडाफोडी करता आली नाही, त्यामुळे हे राज्य गमवावे लागले आहे. त्यावरून भारतीय जनता पक्षाला भविष्यात बरेच काही करावे लागेल. गाफील राहुन चालणार नाही. लोकसभेची रंगित तालिम असल्यामुळे आणि नियोजीत कार्यक्रमानुसार डिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन भाजप शासीत राज्यांमधील विधानसभा निवडणुका असल्यामुळे भाजपला सावध रहावे लागणार आहे. अशाच प्रकारची एकजूट या तीन राज्यात विरोधकांनी दाखवली तर तिथेही विरोधक भाजपला रोखू शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. दोन वर्षांपूर्वी बिहारमध्ये एकजुटीने भाजपला लांब ठेवले होते. आता कर्नाटकातही तेच घडले  आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत दोन महिन्यांपूर्वी अशीच एकजूट दाखवून विरोधकांनी भाजपचे बालेकिल्ले कोसळवले होते. त्यामुळे विरोधकांमध्ये एकजूट होऊ शकते. स्थानिक पातळीवरील ती एकजूट यशस्वी झाल्याचे दिसून आलेले आहे. आता राष्टÑीय पातळीवर विरोधक असा चमत्कार घडवतात का हे पहावे लागेल. विरोधकांचे आघाडीचे सुरु असलेले प्रयत्न पाहता ही एकजूट महत्वाची असेल. फक्त सक्षम नेतृत्वावर तीचे राष्टÑीय पातळीवर यश अवलंबून राहील. कर्नाटकात जनता दल हा किंगमेकर असेल असे बोलले जात होते. काँग्रेस भाजप या दोघांपैकी कोणाला तरी जनता दलाची मदत घेऊन सरकार बनवावे लागेल असे कौल येत होते. झालेही तसेच फक्त चित्र फिरले. किंगमेकरच्या भूमिकेवरून जनता दल किंगच बनला आणि काँग्रेसला किंगमेकरची भूमिका घ्यावी लागली. अशीच भूमिका काँग्रेस राष्टÑीय पातळीवर घेणार का हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो. कर्नाटक निवडणुकीत आपण मोदींना रोखू आणि पंतप्रधान होऊ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यामुळे विरोधकांनी त्यांना स्वयंघोषित म्हणून टोकले होते. आता अशाच एखाद्या नेतृत्वार एकमत झाले तर ते भाजपपुढे फार मोठे आव्हान उभे करू शकतील याचा विचार भाजपला करावा लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: