आज पालघरच्या लोकसभेच्या जागेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने जे गलिच्छ राजकारण केले आहे ते अत्यंत घातक आणि लज्जास्पद असे आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार म्हणजे काय तर शिवसेनेने या निवडणुकीत केलेले गलिच्छ राजकारण. केवळ भारतीय जनता पक्षाच्या द्वेषापोटी केलेले हे राजकारण शिवसेनेला आणखी गाळात नेणारे आहे निश्चित. कारण सुरवातीपासूनच शिवसेनेने ज्याप्रकारे पावले टाकली आहेत ती अत्यंत हिडीस अशी आहेत. लोकशाहीला काळीमा फासणारे असे शिवसेनेचे वर्तन आहे. त्यामुळे या निवडणुकीत निकाल काहीही लागला तरी शिवसेनेचा नैतिक पराभव झालेला आहे, हे नाकारता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत २०१४ ला शिवसेना भाजप युती होती. पालघरची जागा ही भाजपने लढवली होती आणि जिंकलीही होती. या भागात भाजपचे, संघ परिवाराचे मोठे कार्य आहे. त्यामुळेच भाजपने ही जागा जिंकली होती. हा मतदारसंघ भाजपने पिंजून काढला होता. परंतु भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांचे अकाली निधन झाले आणि ही पोटनिवडणूक लागली. या गोष्टीचा शिवसेनेने दुरुपयोग केला. गैरफायदा घेतला. वनगा कुटुंबियांना फसवून त्यांना शिवसेनेत घेतले आणि आपला उमेदवारी अर्ज भरला. हा शिवसेनेचा रडीचा डाव होता. हिंमत असती तर शिवसेनेने स्वत:चा उमेदवार दिला असता. शिवसेनेची काहीही ताकद नव्हती अशा मतदारसंघात घुसखोरी करून शिवसेनेने भाजपचा उमेदवार पळवला आणि सहानुभूतीच्या लाटेवर वनगांचे पुत्र निवडून येतील अशी स्वप्न पाहू लागले. अर्थात त्यामध्ये शिवसेनेचा हेतु खरा नव्हताच. वनगा कुटुंबियांशी त्यांना काही देणेघेणे नव्हते. शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार नाही याचीही शिवसेनेला खात्री होती. फक्त वनगांना पळवले म्हणजे सहानुभूती आणि भाजपच्या मतांचे विभाजन होईल आणि त्याठिकाणी दुसºया पक्षचा, काँग्रेसला लाभ होईल ही शिवसेनेची खेळी होती. शिवसेना जर स्वत:चा उमेदवार घेऊन लढली असती तर भाजपला काहीही फरक पडणार नव्हता. पण शिवसेनेला फक्त भाजपला डॅमेज करायचे होते. त्यामुळे भाजपचा उमेदवार त्यांनी पळवला. भाजपचा उमेदवार पळवला म्हणजे त्यापाठोपाठ त्यांची मतेही पळवता येतील. कारण शिवसेनेची ताकद या भागात अजिबातच नव्हती. हा आयत्या बिळावर नागोबा होण्याचा प्रकार शिवसेनेने काँग्रेसचा लाभ होण्यासाठी केला हे निश्चित आहे. शिवसेना आज काँग्रेसच्या जिवावर उड्या मारते आहे. परंतु शिवसेनेने अशा दुटप्पी आणि छळ कपटाच्या राजकारणाने मूळच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट लावली आहे. शिवसेनाप्रमुखांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नव्हते. पण त्यांच्या माघारी शिवसेना म्हणजे दुष्ट लोकांचा पक्ष झाल्याचे चित्र आहे. केवळ भाजपला हरवण्यासाठी, भाजपचे लोकसभेतील संख्याबळ कमी होण्यासाठी युतीमध्ये राहून, सरकारमध्ये राहुन विश्वासघात करण्याचे काम शिवसेनेने केले. याला ग्रामीण भाषेत एकच म्हण आहे. तो म्हणजे ‘नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झालेली पहायची आहे.’ तसा प्रकार शिवसेनेचा आहे. या प्रवृत्तीनेच अखेरच्या टप्प्यात शिवसेनेने गलिच्छ राजकारण सुरु केले. यातूनच पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या आॅडिओ क्लिप युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर आता दोन्ही बाजूनी वाक्बाण सोडण्यात येत आहेत. आॅडिओ क्लिप माझीच होती, पण त्यातील शेवटचे वाक्य त्यांनी सादर केलेनाही. अन्यथा तोंडावर पडले असते, असे ा्रत्युत्तर देणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदचा अर्थ सांगावा, आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायलाही तयार आहोत, असे ठाकरे म्हणाले. हा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा पोरकटपणाच म्हणावा लागेल. काही नीतीमत्ता नावाची चीज आहे की नाही? अगोदर सत्तेतून बाहेर पडा आणि मग विरोध करा. सत्तेतून बाहेर पडल्यावर कोणी काळं कुत्रं विचारणार नाही या भितीने सत्तेतून बाहेर पडत नाहीत. त्यासाठी शिवसेनेचा हा दुटप्पीपणा चालला आहे. ज्या काँग्रेसच्या जिवावर आणि काँग्रेसला प्रमोट करण्यासाठी शिवसेना धडपडत आहे ती काँग्रेस शिवसेनेचा वापर करणार आहे पण आपल्या आघाडीत शिवसेनेला घेणार नाही हे निश्चित आहे. काँग्रे्रसने तसे बोलूनही दाखवले आहे. त्यामुळे शिवसेनेची अवस्था या दुटप्पीपणामुळे ना घर का ना घाट का अशी झालेली आहे.पालघर पोटनिवडणूक भाजप आणि शिवसेनेने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. समोर पराभव दिसू लागल्यामुळे भाजप आणि फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी शिवसेनेने एका आॅडिओ क्लिपद्वारे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच शरसंधान साधले होते. भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस हे निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व अस्त्रांचा वापर करण्याच्या सूचना देत असल्याचे ऐकवणारी ही क्लिप आहे. यामध्ये एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्याठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर त्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असा उल्लेख या आॅडिओ क्लिपमध्ये असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. ही क्लिप सादर करून शिवसेनेने अप्रत्यक्षपणे स्वत:च्या खंजीर खुपसण्याचीच कबूली दिली आहे. कारण त्यावर फडणवीस यांनी क्लिप माझीच आहे. पण ती मोडूनतोडून शिवसेनेने सादर केली असं सांगत साम-दाम-दंड-भेदचा अर्थ कूटनिती असा होतो, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. तसंच क्लिप मोडूनतोडून सादर करणाºया शिवसेनेवर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या पाचावर धारण बसली. जळी स्थळी काष्टी पाषाणी त्यांना भाजप दिसू लागल्याने मुंबईतल्या नालेसफाईचे काम शिवसेनेच्या नाकर्तेपणाने अपुरे राहिले आणि पाणी तुंबण्याची भिती असताना त्याचे खापरही भाजपवर आणि राज्य सरकारवर फोडण्याचा आचरटपणा केलेला आहे. यातून केवळ भाजपद्वेषापोटी शिवसेनेची दुटप्पी भूमिका अधोरेखीत होत आहे.
रविवार, २७ मे, २०१८
शिवसेनेची भूमिका, ‘नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा होऊदे’
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा