रविवार, १३ मे, २०१८

राहुल गांधींनी घाई का केली?

सध्या काँग्रेस आणि सर्व मोदी विरोधी पक्षांचे आघाडीसाठी प्रयत्न सुरू असताना या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. नेतृत्वाअभावीच आघाडीला आकार येत नसताना कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मीच पंतप्रधान होणार असे वक्तव्य करून राहुल गांधी पुन्हा एकदा अडचणीत आल्याचे चित्र आहे. त्यामुळे हे बोलायला राहुल गांधींनी घाई केली का? ही घाई त्यांनी का केली? असा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनी आपली ताकद पणाला लावली होती. त्यामुळे या निवडणुकीकडे जणू काही मिनीलोकसभा किंवा लोकसभेची रंगित तालीम म्हणूनच पाहिले जात होते. कर्नाटकात कसा कल मिळतो त्यावर भविष्यातील चित्र अवलंबून असेल असा होरा जाणकार मांडत होते. त्यामुळे भाजपने आपले सगळे हुकमी एक्के मैदानात उतरवून आमची टीम कशी ताकदवान आहे, आमच्याकडे नेत्यांची कशी रांग लागलेली आहे आणि आमचे नेतृत्व कसे खंबिर आहे हे दाखवून दिले होते. आज तरी भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदींना रोखण्याची ताकद कोणाकडे नाही. आता बाकीच्या पक्षांनी २०१९ चे स्वप्न सोडून पुढच्या पाच वर्षांचीच रणनीती आखली पाहिजे असे वातावरण आहे. त्यामुळे विखुरलेली विरोधी शक्ती एका आघाडीखाली आणणे हेच मोदींना रोखण्याचे महत्वाचे तंत्र असेल. गेली तीस वर्ष भारतीय लोकशाहीने आघाडीचा फॉर्म्युला मान्य केलेला आहे. त्यामुळे आघाडीचे राजकारण मान्य नसलेल्या काँग्रेसनेही गेल्या पंधरा वर्षांपासून तशी तडजोड करायला सुरुवात केलेली आहे. साहजिकच काँग्रेसला आता स्वबळ दाखवणे शक्य नाही. अशा परिस्थितीत मीच पंतप्रधान होणार अशी घोषणा करून राहुल गांधींनी फार घाई केली. ही घाई त्यांनी का केली असा प्रश्न त्यामुळे पडतो. जरा कर्नाटकच्या निवडणूक निकालापर्यंत थांबले असते तर बरे झाले असते. असा स्वयंघोषित नेतृत्वाचा गजर करून राहुल गांधींनी आपले वजन कमी करून घेतले. हे राजकारणातील अनुभव नसल्याचे आणि अपरिपक्वतेचे लक्षण म्हणावे लागेल. राहुल गांधी यांच्या मातोश्रींनीच काही आठवड्यांपूर्वी सर्वांना एकत्रित बांधण्यासाठी डिनर डिप्लमसीचे धोरण आखले होते. त्याला सर्व पक्षांनी चांगला प्रतिसाद दिला होता. फक्त या आघाडीचे नेतृत्व कोणी करायचे याचा निर्णय झालेला नव्हता. आता काँग्रेसचे लोकसभेतील असलेले सध्याचे संख्याबळ आणि एकेका राज्यातील गमावलेली सत्ता पाहता काँग्रेस हा फार मोठा पक्ष आहे असे बिल्कूल म्हणता येत नाही.  दक्षिणेतील राज्यातील विरोधी पक्ष आणि अन्य पक्षांच्याही जागा जवळपास काँग्रेसप्रमाणे दोन अंकी आहेत. यात ममता बॅनर्जींचा तृणमूल, चंद्राबाबूंचा तेलगू देशम, तमिळनाडूतला अद्रमुक हे पक्ष काँग्रेसच्या बरोबरीने आहेत. अन्य राज्यात शिरकाव केलेल्यात समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी हे पण मोठे पक्ष आहेत. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते आहेत. इतके सगळे मातब्बर असताना त्यांच्याच ताकदीचे असलेल्या किंवा कमजोर असलेल्या काँग्रेसकडे आघाडीचे नेतृत्व येईल असे म्हणणे फार घाईचे होईल. आघाडीचे नेतृत्व हे सर्वानुमते येणे अपेक्षित आहे. ते दुसºया कोणीतरी सुचवून त्याला जनमान्यता मिळवणे ही लोकशाहीची लक्षणे आहेत. त्यामुळे राहुल गांधींंनी कोणत्या जोरावर हे मत व्यक्त केले असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. पंतप्रधानपदाची अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही. तसे स्वप्न पाहणे हेही चुकीचे नाही. पण स्वप्न पाहण्यासाठी त्यासाठी काहीतरी आधार असावा लागतो. आज स्वबळावर बहुमत मिळवू शकेल अशी काँग्रेसची परिस्थिती अजिबात नाही. किंबहुना बहुमत मिळवण्यासाठी संपूर्ण देशभरात किमान चारशेसाडेचारशे उमेदवार उभे करणे आवश्यक आहे. अगदी ५४३ उमेदवार नाही उभे केले तरी किमान साडेचारशे तरी उभे केले पाहिजेत. तेवढे उमेदवार उभे करण्याचीही ताकद काँग्रेसकडे नाही, त्यामुळे स्वबळावर बहुमुत मिळवणे हे लांबच राहिले. अशा परिस्थितीत आघाडी करणे हाच एकमेव मार्ग काँग्रेसकडे आहे. आघाडीच्या राजकारणात प्रत्येकाच्या शक्तीप्रमाणे प्रत्येकाला वाटा मिळतो. त्यामुळे अन्य पक्षांपेक्षा मोठा नसलेल्या काँग्रेसला नेतृत्वाची संधी कोण देणार ? केवळ देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून किंवा गांधी नेहरु घराण्यातून आलेला वारसदार म्हणून राहुल गांधींचे नेतृत्व बाकीचे पक्ष मान्य करतील असे राहुल गांधींना वाटले का? कशासाठी इतकी घाई केली? कर्नाटकच्या निवडणुकीपर्यंत थोडे थांबले असते तर बरे झाले असते ना? प्रत्येक बाबतीत भाजपचे अनुकरण जर करायचे असेल तर ते शंभर टक्के करायला हरकत नाही. पण अर्धवटपणे बिल्कूल नको. भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यावर त्यांचे यश निश्चित झाले होते. त्याचे अनुकरण करण्यासाठी त्याच मार्गाचा अवलंब करायला हवा होता. भारतीय जनता पक्षाने गोव्यात फार मोठी बैठक सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत २०१३ मध्ये घेतली आणि सर्वात प्रथम २०१४ च्या लोकसभेचे प्रमुख प्रचारक म्हणून मोदींची निवड झाली. त्यानंतर सर्व राष्टÑीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात घेऊन मोदींना पंतप्रधानपदाचे उमेमदवार घोषित केले गेले. कारण त्यावेळी ११७ इतके भाजपचे खासदार होते. बाकी कोणी त्यांच्या निम्मेही नव्हते. त्यामुळे भाजपने नेतृत्व करणे हे योग्य होते. तरीही मोदींच्या नावाला विरोध करून नितिशकुमार बाहेर पडले होते. विश्वासात घेऊन भाजपने बैठकीत निर्णय घेतला तरीही नितिशकुमारांचा विरोध होता. मोदींनी स्वत:हून नाव नव्हते घोषित केलेले. असे असताना राहुल गांधींनी मीच पंतप्रधान होणार असे म्हणून फार घाई केली. आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला असेच म्हणावे लागेल. कारण नसताना विरोधकांचा रोष पत्करावा लागला आणि हातची संधी गमावण्याची पाळी त्यांच्यावर आल्याचे दिसत आहे. कर्नाटकात सत्ता टिकवली असती, निकालापर्यंत थांबले असते तर गुजरातनंतर आणखी परिस्थिती सुधारली आता काँग्रेस वाढते आहे असे दाखवून घोषणा केली असती तर त्यात परिपक्वता दिसली असती. पण त्यांनी आत्ता मात्र उगाचच घाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: